You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

विधानसभा निवडणूक निकाल : हा नारीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी, गरीबांचा विजय- नरेंद्र मोदी

मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड अशा चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. नरेंद्र मोदींमुळेच आम्ही जिंकत आहोत - शिवराज सिंह चौहान

    मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भाजपाच्या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं आहे.

    "नरेंद्र मोदी मध्य प्रदेशाच्या मनात आहे. त्यांच्या मनातसुद्धा मध्य प्रदेश आहे. त्यांच्या परिश्रमांमुळेच भाजपा मध्य प्रदेशात जिंकत आहे. केंद्राच्या योजना आम्ही इथं लागू केल्या. गरिबांसाठी काम केलं. माझ्या सर्व भाच्यांसाठी मी काम केलं. आम्ही एक कुटुंब होऊन गेलो आहोत. अमित शहाचं कौशल्य आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे हे साध्य झालं आहे," असं त्यांनी म्हटलंय.

  2. तेलंगणा काँग्रेस मुख्यालयाबाहेर जल्लोष

    तेलंगणातल्या काँग्रेस मुख्यालयाबाहेर सध्या जल्लोषाचं वातावरण आहे.

  3. आरजेडी कार्यकर्त्यांनी काँग्रेस मुख्यालयात आणला मासा

    बिहारमधल्या आरजेडी कार्यकर्त्यांनी काँग्रेस मुख्यालयात मासा आणला आहे. काँग्रेसला आज शुभशकून व्हावा म्हणून त्यांनी हा मासा आणल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

  4. भाजपा मुख्यालयात आनंदाचं वातावरण

    भाजपाच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयात सध्या आनंदाचं वातावरण आहे. तिथं असलेल्या जल्लोषाचा आढावा घेतला आहे बीबीसी प्रतिनिधी नितीन श्रीवास्वत यांनी.

    यावेळी त्यांनी भाजपा प्रवक्त्यांशीदेखील चर्चा केली आहे.

  5. मध्य प्रदेशात भाजपाचं सरकार येईल - शिवराज सिंह चौहान

    शिवराज सिंह यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या तिथं भाजपा 130 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे.

    तसंच मध्य प्रदेशात भाजपाचं सरकार येईल, असं विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

  6. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात कमी गर्दी

    दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयात सध्या फार कमी गर्दी आहे. पण सध्या तिथे असे पोस्टर्स मात्र दिसत आहेत. ज्यावर श्रीराम आणि हनुमानाचं चित्र आहे आणि खाली राहुल प्रियंका गांधी सेना असं लिहिलं आहे.

  7. मध्य प्रदेशात पुन्हा भाजपा सरकार येईल - ज्योतिरादित्य सिंधिया

    मध्य प्रदेशात सध्या भाजपा सध्या आघाडीवर आहे. त्याचाच आधार घेत भाजपा नेते ज्योतिरादित्य सिंधियांनी दिग्विजय सिंह यांच्यावर टीका केली आहे. दिग्विजय यांनी दिलेल्या शापाचं मी स्वागत करतो, असं सिंधिया यांनी म्हटलंय.

    तसंच मध्य प्रदेशात भाजपचं सरकार पुन्हा येतंय, असा दावासुद्धा त्यांनी केला आहे.

  8. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर कामारेड्डी मतदारसंघात पिछाडीवर

    तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव कामारेड्डी मतदारसंघातून सध्या पिछाडीवर आहेत.

    काँग्रेसचे रेवंत रेड्डी त्यांच्या विरोधात उभे आहेत.

    चंद्रशेखर राव तेलंगणाच्या स्थापनेपासून राज्याचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रातही पाय रोवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

  9. छत्तीसगढ मध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि त्यांचा पुतण्या यांच्या लढतीत पुतण्या आघाडीवर

    छत्तीसगढ च्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीच्या निकालांमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल पिछाडीवर गेले आहेत.

    भाजपने त्यांचा पुतण्या विजय बघेल यांना मैदानात उतरवलं आहे. विजय सध्या आघाडीवर आहे.

    सी वोटरच्या मते सुरुवातीच्या निकालात काँग्रेस 42 आणि भाजप 43 जागांवर पुढे आहे.

    भूपेश बघेल पहिल्यांदा 1993 मध्ये पाटण मधून निवडणूक लढले होते. आतापर्यंत ते पाच वेळा आमदार झाले आहेत.

  10. मध्य प्रदेश निवडणुकीत शिवराज सिंह चौहान यांच्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे?

    मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. राज्यात 17 नोव्हेंबरला मतदान झालं होतं.

    मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान बुधनी या जागेवरून निवडणूक लढवली. त्यांनी विक्रम मस्तवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ते टीव्ही अभिनेते आहेत.

    सी वोटरच्या मते रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बुधनी सीटवर शिवराज सिंह चौहान सध्या आघाडीवर आहे.

    9 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीमध्ये प्रदेश मध्ये काँग्रेस 58 आणि भाजप 55 जागांवर पुढे आहे.

    विक्रम मस्तवाल यांनी रामायण-2 मध्ये हनुमानाची भूमिका केली आहे. विक्रम मस्तवाल काही काळाआधी काँग्रेसमध्ये सामील झाले होते.

    त्यातच शिवराज सिंह चौहान सगळ्यात जास्त काळापर्यंत मुख्यमंत्री असलेले नेते आहेत. शिवराज सिंह चौहान 2006 पासून आतापर्यंत लागोपाठ या जागेवरून जिंकले आहेत.

    गेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरुण यादव यांना हरवलं होतं.

  11. तेलंगणात 70 पेक्षा अधिक जागा मिळणार - माणिकराव ठाकरे

    मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसला 70 पेक्षा अधिक जागा मिळणार, असा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केला आहे.

    एक्झिट पोलमध्येही काँग्रेस जिंकेल असंच सांगितलं आहे, असंही माणिकराव ठाकरे म्हणाले.

  12. गजेंद्र सिंह शेखावत दर्शनासाठी जयपूरच्या गोविंद देवजी मंदिरात

    केंद्रीय मंत्री आणि राजस्थानमधील भाजप नेते गजेंद्र सिंह शेखावत यांनी जयपूरच्या गोविंद देवजी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

  13. आम्ही 125 ते 150 जागा जिंकू - नरोत्तम मिश्रा

    मध्य प्रदेश निवडणुकीचे निकाल येण्यास काही क्षणांचा अवधी आहे.

    मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी माध्यमांशी संवाद साधला.

    नरोत्तम मिश्रा म्हणाले, "हा लोकशाहीचा महान उत्सव आहे. जनतेने अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. माता-भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मतदान जास्त झालं."

    ते पुढे म्हणाले, “काही तासांचाच प्रश्न आहे. भाजप सरकार स्थापन करेल. आम्ही 125 ते 150 जागा जिंकू.”

    दतिया मतदारसंघातून नरोत्तम मिश्रा निवडणूक लढवत आहेत. मिश्रांच्या विरोधात काँग्रेसचे राजेंद्र भारती रिंगणात आहेत.

    मध्य प्रदेशातील दतिया येथील नरोत्तम मिश्रा हे शिवराज सिंह चौहान यांचे प्रतिस्पर्धी मानले जातात आणि ते स्वतःला शिवराज सिंह चौहान यांचा पर्याय मानत असल्याचा दावाही केला जात आहे.

    दतिया ग्वाल्हेरजवळ आहे आणि भोपाळपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर आहे.

    दतिया विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या अंदाजे तीन लाख 35 हजार असून येथे मुस्लिमांची लोकसंख्या चार टक्के आहे. मिश्रा 2008 पासून दतियामधून निवडणूक जिंकत आहेत.

  14. चार राज्यांचे निकाल आज हाती येणार

    नमस्कार,

    बीबीसी मराठीच्या लाईव्ह पेजमध्ये आपले स्वागत. गेल्या महिन्यात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यापैकी मिझोरम वगळता सर्व राज्यांची मतमोजणी आज आठ वाजेपासून होणार आहे. या मतमोजणीचे आणि अन्य अपडेट्स या पानावर तुम्हाला पहायला मिळतील.

    देशाच्या एकूण 1/6 भागात या निवडणुकांसाठी मतदान झालं. एकूण 679 मतदारसंघात मतदान झालं असून एकूण मतदारांची संख्या 16 कोटी होती.

    मध्य प्रदेशमध्ये 230, छत्तीसगढमध्ये 90 जागा, राजस्थानमध्ये 199 जागा, तेलंगणा मधील 119 जागा, तर मिझोरममध्ये 40 जागांवर मतदान झालं.