You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे आमनेसामने, वाचा दोन्ही दसरा मेळाव्यांतील सर्व घडामोडी

मुंबईत उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे तर एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात आज आयोजित करण्यात आला होता.

लाईव्ह कव्हरेज

  1. दसरा मेळाव्यात शिवसैनिकांच्या उत्साहाला उधाण

    मुंबई येथील शिवाजी पार्क आणि बीकेसी या मैदानावर शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे काही वेळेत होणार आहेत.

    या मेळाव्यात शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून सुरू आहे. दोन्ही गटांतील शिवसैनिकांच्या उत्साहाला उधाण आल्याचं या निमित्ताने दिसून येतं.

    दरम्यान, या मेळाव्यात दाखल होणारे शिवसैनिकही अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना दिसत आहे.

    या निमित्ताने शिवसैनिकांच्या सर्जनशीलतेलाही वाव मिळाल्याचं दिसून येतं. शिवसैनिक विविध प्रकारचे पोस्टर, बॅनर यांच्या माध्यमातून आपापल्या नेत्याला पाठिंबा दर्शवत आहेत.

  2. एकनाथ शिंदे गटाने सभेपूर्वी बॅनर बदलला

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची बीकेसी मैदानावरील सभा सुरू होण्यास अवघे काही तास राहिले असताना त्यांनी आपलं सभेचं बॅनर बदलल्याचं दिसून आलं.

    एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी तयार करण्यात आलेल्या जुन्या बॅनरवर शिवसेना हा शब्द लहान आकारात लिहिण्यात आला होता.

    पण हे निदर्शनास येताच आयोजकांनी शिवसेना शब्द मोठ्या आकारात लिहिण्यात आलेला नवा बॅनर व्यासपीठावर बसवला आहे.

  3. उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, शिवसेनेचा 'धनुष्यबाण' कुणाकडे राहील?

    निवडणूक आयोगाच्या कामकाजात मध्यस्थी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. यामुळे पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे.

    सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे शिंदे गटाला दिलासा मिळाला असून, ठाकरेंना मात्र मोठा धक्का आहे.

    यानंतर आता कुणाकडे धनुष्यबाण चिन्ह जाईल याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे.

  4. जेव्हा शिवसेनेने भाजपविरोधात निवडणूक लढवली होती...

  5. मुंबईत दसरा मेळाव्याला येण्याआधी 'हे' नक्की पाहा

  6. उद्धव ठाकरेंचा 'एकनिष्ठ दसरा मेळावा'

    दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरील उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून आयोजित दसरा मेळाव्यासाठी दुपारपासूनच शिवसैनिकांची गर्दी सुरु झाली आहे. या मेळाव्याला एकनिष्ठ दसरा मेळावा असं नाव देण्यात आलं आहे.

    राज्यभरातून शिवसैनिक निष्ठा दाखवण्यासाठी पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या इतिहासात यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच दोन दसरे मेळावे होत असल्याने दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे.

  7. शिवाजी पार्क शिवसेनेसाठी 'शिवतीर्थ' कसं आणि कधी झालं?

    शिवसेनेच्या स्थापनेपासून ते पक्षासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या प्रत्येक घटनेला शिवाजी पार्क साक्षीदार आहे.

    या शिवाजी पार्कचं पहिलं नाव होतं - माहीम पार्क. दादरच्या पश्चिमेला असणारं हे 28 एकरांचं खुलं मैदान तेव्हा चहूबाजूंनी मराठी वस्तीने वेढलेलं होतं. 'पार्कातलं' उद्यान गणेशाचं मंदीर आणि मैदानात रंगणारे क्रिकेटचे डाव, आणि समर्थ व्यायाम मंदिरातला मल्लखांब यासगळ्यासोबतच शिवसेनेचा दसरा मेळावा ही या शिवाजी पार्कची खास ओळख.

  8. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर ठाकरे गटाची तयारी

  9. बीकेसी मैदानावर 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त

    शिवसेनेवर दावा केलेल्या एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील बीकेसी मैदानावर होणार आहे.

    यासाठी जवळपास 3 हजार पोलिसांचा फौजफाटा बीकेसी मैदानाजवळ आणि रस्ते मार्गावर ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

    तसंच एसआरपीएफ, रॅपिड अॅक्शन फोर्स, एटीएसच्या टीम्स सुद्धा शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानातील दसरा मेळाव्यासाठी सज्ज केल्या आहेत.

  10. दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे म्हणाल्या...

  11. मोहन भागवत- गेल्या काही वर्षांत समाजाला तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत

  12. बाळासाहेब ठाकरेंबद्दल नारायण राणेंनी कोणत्या जुन्या आठवणी सांगितल्या?

  13. एकनाथ शिंदे वि. उद्धव ठाकरे: दसरा मेळाव्यात 'हे' मुद्दे गाजण्याची शक्यता

  14. 'मी आता 2024 च्या तयारीला लागणार आहे'

    बीड जिल्ह्यातील भगवानगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात घोषणा केली की, मी आता 2024 च्या तयारीला लागणार आहे. पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात अनेक गोष्टींवर भाष्य केले.

    जर पक्षाने मला तिकीट दिलं तर मी परळी मतदारसंघातून 2024 ला निवडणूक लढवणार आहे आणि त्याची तयारी आतापासूनच सुरू करणार आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

    आपल्या नेत्याकडे पद असावे अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते त्यात गैर काय आहे असा सवाल त्यांनी यावेळी केला.

  15. दसरा मेळावे का सुरू झाले? दसऱ्याला राजकीय महत्त्व का आलं?

  16. बीबीसी मराठीच्या दसरा विशेष लाईव्ह पेजमध्ये सर्वांचं स्वागत

    नमस्कार,

    आज विजयादशमी म्हणजेच दसरा. आजच्याच दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून विजय प्राप्त केला, असं धार्मिक पुराणांमध्ये म्हटलेलं आहे. दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याचीही प्रथा अनेक हिंदू धर्मीय पाळताना दिसतात.

    गेल्या काही वर्षांत दसऱ्याला राजकीय महत्त्वही प्राप्त झालं आहे. याचं कारण म्हणजे यादिवशी होणारी राजकीय भाषणं.

    या प्रथेची सुरूवात बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केली होती. बाळासाहेबांच्या निर्वाणानंतरही त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे शिवसेनेची परंपरा म्हणून दसरा मेळावा नियमितपणे आयोजित करतात.

    महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे नेते दोन स्वतंत्र दसरा मेळावे घेत आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे शिवाजी पार्क येथे होणार आहे, तर शिवसेनेवर दावा केलेल्या शिंदे गटाचा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानात होणार आहे.

    त्याचप्रमाणे, बीडमध्ये भगवान भक्तीगड येथे पंकजा मुंडे यांनीसुद्धा दसरा मेळाव्याचं आयोजन सुरू केलं.

    या सर्व राजकीय भाषणांकडे आपलं लक्ष असणार आहे. या सगळ्या घडामोडींचे क्षणाक्षणाचे अपडेट्स तुम्हाला बीबीसीच्या या लाईव्ह पेजवर पाहायला मिळतील.