You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिंदे सरकारमध्ये 18 नवे मंत्री, केसरकर, राठोड, सत्तार यांना संधी, एकही महिला नाही
एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळाचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार संपन्ना झाला. आज एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यात भाजपच्या 9 आणि शिंदे गटाच्या 9 आमदारांचा समावेश आहे.
लाईव्ह कव्हरेज
पुन्हा भेटूया
हे लाईव्ह पेज आम्ही सध्या बंद करीत आहोत. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा बीबीसी मराठी.
पंतप्रधानांनी नवीन मंत्र्यांना दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विस्तारित मंत्रिमंडळाला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत ते म्हणाले, “महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा.”
भाजपला प्रथम क्रमांकाचा पक्ष करण्यासाठी प्रयत्न- भाजप नेते
राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन तसंच मंगल प्रभात लोढा या भाजप मंत्र्यांनी शपथविधीनंतर बीबीसी मराठीशी बोलताना भाजपच्या पक्षविस्तारासाठी तसंच पक्षाला राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.
गिरीश महाजन यांनी म्हटलं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची भाजपची संघटनात्मक तयारी पूर्ण झालेली आहे. भाजपला राज्यात नंबर एकचा पक्ष बनवण्यासाठी सर्व काम करणार आहेत.
मंगल प्रभात लोढा हे भाजपचे मुंबईमधील नेते आहेत. पक्ष देईल ती जबाबदारी निष्ठेने पार पाडण्याचे आपले संस्कार आहेत असं म्हणत येणारा महापौर हा भाजपचा एकहाती निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू अशीही प्रतिक्रिया दिली.
संजय राठोडांना मंत्रिपद दिल्याचा आनंद- सुप्रिया सुळे
काही आमच्याबरोबर होते त्यांनाही मंत्रिपदाची संधी दिली आहे. त्यांचे आभार. त्याबद्दल मला आनंद झाला आहे. आमच्या विचारांचे लोक तिथे आहेत.
18 मंत्र्यांची शपथ झाली. एकाही महिलेला स्थान नाही हे दुर्देवी आहे. अनेकदा त्याच पक्षाची मतं असतात की महिलांनी काय करावं आणि काय करू नये.
मला आनंद झाला की संजय राठोडांना मंत्री केलं आहे. त्यांच्यावर अनेकांनी आरोप केले, आरोपांचं नक्की काय होतं? पूजाचं नक्की झालं काय? संजय राठोडांचा काही संबंध नाही हे आम्हाला आधीच महिती होतं. या आरोपामुळे कुटुंब उद्धवस्त होतं. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
संजय राठोडांना पोलिसांची क्लीन चीट- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोणाचं काय मत असेल तर ऐकून घेतलं जाईल. लोकांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पोलिसांनी तपास केला आहे. त्यांना क्लीन चीट दिली आहे म्हणून त्यांचा समावेश केला आहे. याउपर कोणाचं काही म्हणणं ऐकून घेतलं जाईल असं ते म्हणाले. यापुढेही मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि महिलांचा समावेश करू. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
भाजप नेते आणि केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रासाठी चांगले निर्णय घेतले. तसंच कोणीही नाराज नाही. सगळे समजून घेतात आणि सगळे सुज्ञ आहेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
काही नावं टाळता आली असती- अजित पवार
ज्यांना क्लीनचिट मिळाली नाही त्यांचं नाव टाळता आलं असतं. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. मात्र अजित पवार यांनी नाव घेणं टाळलं आहे.
तर या मंत्रिमंडळात एकही महिला नसल्याने सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे.
त्या म्हणतात, “स्वतः पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ 'होम मेकर' असू नयेत तर त्या 'नेशन बिल्डर' असाव्यात असं ते सांगतात.
पण राज्यात मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतु यात महिलांना प्रतिनिधित्व देण्यात आलं नाही. मंत्रिमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे.
व्हाईट वॉश मंत्रिमंडळ आहे का?
मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याबद्दल माजी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
“भाजपची वॉशिंग पावडर फारच चारित्र्य साफ करते, चित्राताई वाघ आता काय कमेंट करतील याची मी वाट पाहत आहे,“ असं ठाकूर यांनी म्हटलंय.
“हे एकदम व्हाईट वॉश केलेलं मंत्रिमंडळ आहे का,” असा सवालसुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे.
नव्या १८ मंत्र्यांच्या शपथविधीनंतर राजभवनातून बीबीसी प्रतिनिधी प्राजक्ता पोळ LIVE
चित्रा वाघ यांचा भाजपला घरचा आहेर.
पूजा चव्हाण च्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोड यांना मंत्रीपद देणं हे अत्यंत दुर्देवी आहे. असं ट्विट भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलं आहे. त्यांच्याविरुद्धचा माझा लढा चालूच राहील अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मंगलप्रभात लोढा यांनी घेतली शपथ
भाजपचे ज्येष्ठ नेते मंगलप्रभात लोढा यांनी शपथ घेतली आहे.
शंभूराज देसाई यांनी शपथ घेतली
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांनी शपथ घेतली.
अतुल सावे यांनीही घेतली शपथ
औरंगाबादचे आमदार अतुल सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मराठवाड्याला तीन मंत्रिपदं गेली आहेत.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी घेतली शपथ
शिवसेनेचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी शपथ घेतली आहे. ते शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून ओळखले जातात. ते कायम या गटाची भूमिका हिरिरीने मांडतात.
त्यांच्याविषयी सविस्तर माहिती इथे वाचा
अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळात अखेर समावेश
अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. टीईटी घोटाळ्यात त्यांच्या मुलीचं नाव आल्याने त्यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह होतं.
त्यांच्याविषयी सविस्तर माहिती इथे वाचा
रविंद्र चव्हाण यांचाही समावेश
शिवसेना आमदार रविंद्र चव्हाण यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते कल्याण डोंबिवलीचे आमदार आहेत. आधी ते राज्यमंत्री आहेत.
तानाजी सावंत यांनी घेतली शपथ
शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
उदय सामंत यांनी घेतली शपथ
माजी उच्चतंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते अगदी शेवटच्या क्षणी शिंदे गटात सामील झाले होते. ते आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.
संदिपान भुमरे यांचा शपथविधी
शिंदे गटाचे संदिपान भुमरे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते पैठणचे आमदार आहेत.
सुरेश खाडे यांनी घेतली शपथ
मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी शपथ घेतली आहे. हा आमचा सन्मान आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.