You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

कोरोना : महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 30 हजार 706 वर पोहोचली

महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 30 हजार 706 वर पोहोचली आहे. राज्यात एका दिवसात 67 मृत्यू झाले आहेत.

लाईव्ह कव्हरेज

  1. चीन 10 दिवसात करणार 1 कोटी लोकांची कोरोना चाचणी

  2. दिल्लीत गेल्या 24 तासात 438 नवे रुग्ण आढळले

    दिल्लीत गेल्या 24 तासात 438 नवे रुग्ण आढळले. त्यामुळं दिल्लीतल्या एकूण रुग्णांची संख्या 9333 वर पोहोचली आहे. दिल्लीत आतापर्यंत 129 जणांचा मृत्यू झालाय.

  3. सिंगापूरमध्ये 465 नवे रुग्ण आढळले

    सिंगापूरमध्ये कोरोनाचे 465 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं सिंगापूरमध्ये रुग्णांची एकूण संख्या आता 27 हजार 635 इतकी झालीय.

    नवे रुग्ण डोरमेट्रीमध्ये राहणारे स्थलांतरित मजूर असल्याची माहिती सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयानं दिलीय.

    सिंगापुरात आतापर्यंत 21 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय.

  4. 'ओमान, दुबई, इराणमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणा'

    जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी केंद्रीय सचिवांना पत्र लिहून ओमान, दुबई आणि इराणमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्याची विनंती केलीय.

  5. आतापर्यंत 14 लाख लोकांना रेल्वेनं घरी पोहोचवलं

    भारतीय रेल्वेतर्फे आतापर्यंत 14 लाख लोकांना आपापल्या राज्यात पोहोचवलं गेलं. आतापर्यंत संपूर्ण देशात 1074 श्रमिक ट्रेन धावल्या.

    गेल्या तीन दिवसात तर दोन लाख लोकांना आपापल्या राज्यात नेण्यात आलं.

    रेल्वे मंत्रालयानं ही माहिती दिली.

  6. भारताला व्हेंटिलेटर्सची मदत करू - डोनाल्ड ट्रंप

    कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अमेरिकेकडून भारताला व्हेंटिलेटर पुरवले जाणार आहेत. तसंच, लस तयार करण्यासाठीही अमेरिका भारताला सहकार्य करेल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीच यासंदर्भात घोषणा केली.

    या घोषणेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रंप यांचे आभार मानले आणि भारत-अमेरिका मैत्रीचाही उल्लेख केला.

  7. स्थलांतरित कामगारांसाठी महाराष्ट्रातून आतापर्यंत 191 ट्रेन सोडल्या - अनिल देशमुख

    "महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगारांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी आतापर्यंत 191 रेल्वेगाड्या सोडण्यात आल्यात. 2 लाख 45 हजार स्थलांतरित कामगारांना आपापल्य राज्यात पोहोचवलं," अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

    उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा, झारखंड, राजस्थाना, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यात ट्रेन सोडण्यात आल्या.

    "पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांनी परवानगी दिली नसल्यानं ट्रेन पाठवू शकलो नव्हतो. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी स्वत: ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांच्याशी बोलल्यानंतर आजपासून पश्चिम बंगाल आणि बिहारसाठी पहिली गाडी सोडली," असं अनिल देशमुखांनी सांगितलं.

    पश्चिम बंगाल आणि बिहार या दोन्ही राज्यात रोज 10 ट्रेन सोडण्याची आवश्यकता आहे.

    "या सर्व स्थलांतरित कामगारांना आपापल्या राज्यात पाठवण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 55 कोटी रुपयांचा निधी दिला गेलाय. कुणाकडूनही तिकिटाचे पैसे घेतले गेले नाहीत," असं देशमुख म्हणाले.

  8. ट्रक उलटून झालेल्या अपघातात 5 स्थलांतरित मजूरांचा मृत्यू

    ट्रक उलटून झालेल्या रस्ते अपघातात 5 स्थलांतरित मजूरांचा मृत्यू झाला आहे.

    मध्य प्रदेशातल्या सागर जिल्हातल्या बांदा इथं ही घटना घडली आहे. हे मजूर महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला चालले होते.

  9. देशात दारू खपते किती आणि फायदा कुणाला?

  10. सिंगापूरमध्ये कोरोनाचे 465 नवीन रुग्ण

    सिंगापूरमध्ये कोरोनाचे 465 नवीन रुग्ण आढळले असून यापैकी बहुसंख्य स्थलांतरित मजूर आहेत.

    सिंगापूरमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 27,635 रुग्ण आढळले आहेत, तर 21 जणांचा मृत्यू झालाय, अशी माहिती देशाच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

  11. हजारो मराठी कामगार लेकराबाळांसोबत पायी गावाकडे निघालेत

    पुणे, मुंबई आणि इतर शहरांत रोजंदारी आणि घरकाम काम करणारे महाराष्ट्रातले कामगार सध्या गावी परत जात आहेत.

    पुणे सोलापूर महामार्गावर एक चिमुकली आणि तिच्या कुटुंबाची गाठ पडली. ते लोक पुण्यात काम करत होते. पण लॉकडाऊनमुळे शहरात पोटाला खायला काहीच मिळत नाही. त्यामुळे ती चिमुकली तिच्या आईसोबत नांदेडला चालत निघाली आहे. हा जवळजवळ 450 किलोमीटरचा प्रवास आहे.

    पाहा यासंबंधीचा हा व्हीडिओ रिपोर्ट -

  12. राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतले 9 मुद्दे

  13. CBSEच्या दहावी-बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक आज 5 वाजता जाहीर होणार

    CBSEच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक आज 5 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ही माहिती दिली आहे.

  14. महाराष्ट्रात 1,140 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

    महाराष्ट्रात आतापर्यंत 1,140 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 10 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

  15. राहुल गांधींची पत्रकार परिषद लाईव्ह

  16. ब्रेकिंग, केंद्र सरकारनं आर्थिक पॅकेजचा पुनर्विचार करावा – राहुल गांधी

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेतली.

    त्यांनी मांडलेले मुद्दे –

    1.केंद्र सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज हे एकप्रकारचं कर्ज आहे. सरकारनं शेतकरी आणि मजूरांच्या खिशात डायरेक्ट पैसे जमा केले पाहिजेत.

    2.सरकारनं कर्ज देऊ नये. सावकाराचं काम करू नये. मजूरांना कर्जाची नव्हे, तर पैशाची गरज आहे. पैसे त्यांच्या खिशात डायरेक्ट जमा करावेत.

    3.आज भुकेल्या पोटानं रस्त्यावर चालणारे लोक भारताचं भविष्य आहे.

    4.केंद्र सरकारनं आर्थिक पॅकेजचा पुनर्विचार करावा आणि मोदींनी डायरेक्ट पैसे जमा करण्याचा विचार करावा.

    5.भारत संकटात सापडला आहे. आपले कोट्यवधी लोक बिना अन्नपाण्याचं रस्त्यावर हिंडत आहे. त्यामुळे मला दु:ख होत आहे.

    6.रस्ते अपघातांत मजूरांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे मनाला यातना होत आहे.

    7.लॉकडाऊन उठवण्याचा विचार अभ्यासपूर्ण करावा लागणार आहे. हा एक इव्हेंट नाहीये. आपल्या ज्येष्ठ नागरिकांचं आपल्याला रक्षण करायचं आहे.

    8.कोरोनाच्या संकटाला आता नुकतीच सुरुवात झाली आहे. हे एक वादळ आहे, त्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. यापेक्षा मोठं वादळ आता येईल. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर मोठं संकट येणार आहे.

    9.कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यांचे हात बळकट करायला पाहिजे.

  17. कोल्हापूरमध्ये आज 7 जण कोरोनाबाधित.

    कोल्हापूरमध्ये आज 7 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी दोघे सोलापूरहून कोल्हापूरला आले, तर 5 जण मुंबईहून कोल्हापूरला आले आहेत.

    यातील एकानं मुंबई ते कोल्हापूर चालत आल्याचं सांगितलं, अशी माहिती CPR रुग्णालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांनी दिली आहे.

  18. पुणे : बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 'कोव्हिड-19 केअर सेंटर' उभारण्याचं काम सुरू

    कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्याकरता पुण्यातल्या बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 'कोव्हिड-19 केअर सेंटर' उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

    कॉम्प्लेक्समधील 3 हॉल पुणे महापालिकेनं ताब्यात घेतले आहेत.

    1500 खाटांच्या क्षमतेचं सेंटर बनवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

  19. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातल्या औरेयामध्ये झालेल्या दुर्घटनेविषयी दु:ख व्यक्त केलं आहे.

    मोदींनी ट्वीट करत म्हटलं, "उत्तर प्रदेशच्या औरेयामध्ये झालेला अपघात दु:खद आहे. सरकारनं तत्परतेनं मदतकार्य सुरू केलं आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त करतो. तसंच जखमींच्या उपचारात यश मिळो, अशी प्रार्थना करतो."

    उत्तर प्रदेशच्या औरेयामध्ये शनिवारी सकाळी झालेल्या दोन ट्रकच्या अपघातात 24 मजूरांचा मृत्यू झाला आहे.

  20. फक्त घोषणाबाजी करणं, हेच सरकारचं काम आहे का? – प्रियंका गांधींचा सवाल

    काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी औरेया येथील घटनेनंतर सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

    ट्वीट करत त्यांनी म्हटलं, "स्थलांतरित मजूरांना घरी पोहोचवण्यासाठी सरकार योग्य व्यवस्था का करत नसेल, हा प्रश्न औरेयाच्या घटनेनंतर पुन्हा एका उपस्थित झाला आहे. प्रदेशातल्या प्रदेशात मजूरांना गावी पाठवण्यासाठी बसची सुविधा कशामुळे उपलब्ध करून दिली जात नाही? एकतर सरकारला काहीच दिसेल नसेल किंवा मग सगळं काही दिसत असूनसुद्धा सरकार त्याकडे बघत नसेल. फक्त घोषणाबाजी करणं, हेच सरकारचं काम आहे का?"

    उत्तर प्रदेशच्या औरेयामध्ये शनिवारी सकाळी झालेल्या दोन ट्रकच्या अपघातात 24 मजूरांचा मृत्यू झाला आहे.