You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 5649 वर, दिवसभरात 431 रुग्ण वाढले

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. 'लॉकडाऊन हा कोरोना उद्रेकावरचा एकमेव उपाय होता का?' - गिरीश कुबेर

  2. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनमुळे कोरोनाच्या पेशंटमध्ये घट होईल?

    कोरोनावर अद्याप कोणतंही औषध किंवा लस निघालेली नाही, पण एका औषधाने सर्वांच्या आशा वाढवल्या आहेत. कोरोनाविरोधातल्या युद्धात ही गोळी निर्णायक ठरू शकते का, असा प्रश्न विचारला जात आहे.

    या औषधामुळे पेशंटच्या संख्येत घट होईल, आजाराचा फैलाव कमी होईल आणि रुग्णांचा मृत्यूदर कमी होईल असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. पण या औषधावर जितका आपण भरवसा ठेवत आहोत तितकं ते परिणामकारक आहे का? जाणून घ्या एकदम सोप्या भाषेत

  3. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूचना

    कोरोनासंबंधीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाणाऱ्या (ज्यामध्ये हॉटस्पॉटचाही समावेश आहे) माध्यमांच्या प्रतिनिधींनी बातमीदारी करत असताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी, यासंबंधीच्या सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसिद्ध केल्या आहेत.

  4. IMA कडून डॉक्टरांचा प्रस्तावित निषेध मागे

    इंडियनन मेडिकल असोसिएशनने 22 आणि 23 एप्रिलला प्रस्तावित असलेला डॉक्टरांचा प्रतीकात्मक निषेध मागे घेतला आहे.

    आज सकाळी IMA च्या डॉक्टरांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली होती.

    या बैठकीत गृहमंत्र्यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्य कर्मचाऱ्यांना पूर्ण संरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं.

    या बैठकीनंतर IAM नं निषेध मागे घेण्याचा निर्णय घेतला.

  5. भारतात खरंच कोरोनाच्या चाचण्या व्यवस्थित होत आहेत?

    भारतात कोरोनाग्रस्तांच्या तपासण्या व्यवस्थित होत नसल्याचा दावा काही डॉक्टरांनी बीबीसीशी बोलताना केला. सुरक्षा साधनांची कमतरता असल्याचंही काहींनी म्हटलं आहे.

    मात्र, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आणि केंद्र सरकारचं आरोग्य खातं यांनी या सगळ्याचा इन्कार केला आहे.

    बीबीसीच्या प्रतिनिधी योगिता लिमयेआणि प्रियंका दुबे यांचा हा स्पेशल रिपोर्ट.

  6. संयुक्त अरब अमिरातमध्ये भारत सरकारविरोधात नाराजी का?

    भारतात तबलिगी जमात प्रकरणानंतर सोशल मीडियावरून कोरोनाच्या संसर्गाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झाला. कोरोना धर्म, जात, भाषा पाहून होत नाही, असं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनावलं. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातमध्ये मात्र भारतात मुसलमानांसोबत वाईट व्यवहार होत असल्याचा समज पसरत आहे.

    या गोष्टीचे दाखले म्हणून सोशल मीडियावरील अगदी जुन्या गोष्टींकडे बोट दाखवण्यात येत आहे. या गोष्टी मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.

    रविवारी दुबईमध्ये राहणाऱ्या नूरा अल-घुरैर यांनी तसंच सामाजिक कार्यकर्ते अब्दुर्रहमान नासर यांनी खासदार तेजस्वी सूर्या यांचं एक वादग्रस्ट ट्वीट शेअर केलं. हे ट्वीट आता संयुक्त अरब अमिरातमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

    अर्थात, हे ट्वीट पाच वर्षांपूर्वीच आहे आणि तेजस्वी सूर्या यांनी ते डिलीटही केलं होतं. मात्र सोशल मीडियावर या ट्वीटचा वापर भारत सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी होतोय. पण असं काय घडलंय, की संयुक्त अरब अमिरातमध्ये भारताविरोधात तीव्र नाराजी पसरलीये? याला नेमकी कोणती घटना कारणीभूत ठरली? वाचा सविस्तर…

  7. जितेंद्र आव्हाड रुग्णालयात दाखल

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मंगळवारी (21 एप्रिल) रात्री उशीरा ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आव्हाड यांना रात्री अचानक ताप आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

    मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असणाऱ्या आव्हाड यांची काही दिवसांपूर्वीच कोरोना चाचणी कऱण्यात आली होती. ही चाचणी निगेटीव्ह आली होती.

    मात्र आव्हाड यांच्या संपर्कात असणाऱ्या काही जणांना कोरोना झाल्याचं उघड झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते होम क्वारंटाइन होते. मात्र मंगळवारी रात्री अचानक त्यांना ताप आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं.

  8. केंद्र सरकारच्या पथकाची धारावीला भेट

    केंद्र सरकारच्या विशेष पथकानं आज धारावी आणि आणि वरळी कोळीवाडा या मुंबईतील हाॅटस्पाॅटना भेट दिली.

    महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनीही या पथकासोबत या भागांना भेट दिली.

    दरम्यान, धारावीमध्ये इतक्या वेगाने साथ का पसरतेय, याचं उत्तर तिथल्या लोकसंख्येसोबतच धारावीच्या आर्थिक आणि सामाजिक जडणघडणीत आहे. ते कसं हे या बातमीमधून सविस्तर समजून घ्या.

  9. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून डॉक्टरांच्या सुरक्षेचं आश्वासन

    कोरोनाच्या चाचणीसाठी गेलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टरांना सुरक्षेचं आश्वासन दिलं आहे.

    अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

    डॉक्टरांनी मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांना प्रतीकात्मक निषेध नोंदवू नये, अशी विनंती केली आहे. सरकार कोरोनाच्या लढाईत त्यांच्या सोबत असल्याचं आश्वासनही अमित शाह यांनी डॉक्टरांना दिलं आहे.

  10. कोरोनाच्या हाताळणीबद्दल अमेरिकेतल्या 'या' राज्यानं ठोकला चीनवरच दावा

    कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासंबंधी पुरेशा उपाययोजना न केल्याचा ठपका ठेवत अमेरिकेतील एका राज्यानं थेट चीनवरच दावा ठोकला आहे.

    अमेरिकेतील मिसुरी राज्यानं चीनवर दावा करताना म्हटलं आहे, की कोरोनामुळे राज्याला प्रचंड आर्थिक नुकसान सोसावं लागलं आहे.

    चीननं या व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी फारसे प्रयत्नच केले नाहीत, असं मिसुरीचे अॅटर्नी जनरल एरिक श्मिट यांनी आपल्या कायदेशीर नोटीसमध्ये म्हटलं आहे.

    कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला जी खीळ बसली आहे, त्यामुळे मिसुरीतील नागरिकांना अब्जावधी डॉलरचं नुकसान सोसावं लागलं असल्याचंही श्मिट यांनी म्हटलं.

    मात्र कायदेशीरदृष्ट्या विचार करता असा दावा किती व्यवहार्य आहे, असा प्रश्न कायदेतज्ज्ञ उपस्थित करत आहेत.

  11. वर्षा बंगल्यावरील महिला पोलिस इन्स्पेक्टरला कोरोनाचा संसर्ग

    मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर तैनात असलेल्या सहायक पोलिस इन्स्पेक्टरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

    या महिला इन्स्पेक्टरच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

  12. राज्य कोरोनाशी लढतंय, भाजपला राजकारणाचं पडलंय- रोहित पवार

  13. वाधवान कुटुंबीयांना ताब्यात घेण्यासंबंधी सीबीआयला विनंती

    लॉकडाऊनच्या काळात महाबळेश्वरला गेलेल्या वाधवान कुटुंबाचा क्वारंटाईन कालावधी आज संपत आहे. आम्ही सक्तवसुली संचलनालय (ED) आणि सीबीआयला पत्र लिहून त्यांना ताब्यात घेण्याची विनंती केली आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

    दरम्यान, वाधवान कुटुंबीयांचं हे प्रकरण नेमकं का होतं, हे सविस्तर वाचा.

  14. पालघर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे- अनिल देशमुख

    पालघर घटनेचा संपूर्ण तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. ही घटना घ़डल्यानंतर आठ तासांच्या आत 101 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

    अनिल देशमुख यांनी आज फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.

    "ताब्यात घेतलेल्या 101 लोकांची यादी मी व्हॉट्स अपवरून जाहीर करणार असून त्यामध्ये एकही मुस्लिम बांधव नाहीये. यामध्ये जातीचं राजकारण केलं केलं, हे दुर्दैवी आहे," असंही देशमुख यांनी म्हटलं.

  15. कोरोनाच्या चाचणीबद्दल देवेंद्र फडणवीसांचं पुन्हा प्रश्नचिन्ह

    अनेक ठिकाणी रुग्णांची माहिती लिहिताना 'कोव्हिडचा संशयित' अशी लिहिली जात आहे. त्यांच्या स्वॅब टेस्ट वेळेत होत नाहीयेत आणि मृत्यूनंतर 'कोव्हिडचा संशयित' असं म्हणून या रुग्णांचे मृतदेह ताब्यात दिले जात असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    असे दोन केसपेपर आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठविले असल्याचं सांगून अशाप्रकारच्या जवळपास 100 केसेस असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    हे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांमार्फत होणाऱ्या संसर्गाचा धोका विचारात घ्यायला हवा, असंही देवेंद्र यांनी म्हटलं.

  16. लॉकडाऊनमध्ये मुलांचं शोषण वाढलं : 1098 चाईल्डलाईनची धक्कादायक आकडेवारी

  17. लॉकडाऊनच्या 21 दिवसात घरासमोर खणली 25 फुटी विहीर

    लॉकडाऊनमुळे अनेकांसमोर जगण्याचा संघर्ष उभा राहिलाय. काहीजण हताश झालेत, तर काहीजण झगडून, धडपडून आपला मार्ग शोधताहेत. वाशिममधल्या कारखेडा गावातील गजानन पाकमोडे आणि त्यांच्या बायकोनंही परिस्थितीसमोर हार मानली नाही. लॉकडाऊनमुळे पाण्यासाठी पण घराबाहेर पडणं अवघड व्हायला लागल्यावर त्यांनी आपल्या अंगणातच 25 फूट खोल विहीर खणली…तीसुद्धा 21 दिवसात.

  18. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 19,984, मृतांचा आकडा 640

    भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 19 हजार 984 झाली आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 640 झालाय. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ही आकडेवारी प्रसिद्ध केलीय.

  19. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकडेवारीबाबत चीनची लपवाछपवी?

    चीनमध्ये नव्या केसेसमध्ये भर पडत नाहीये, चीनमधील कोरोना व्हायरस आटोक्यात आला आहे, अशा बातम्या येत असतानाच वुहानमध्ये 1290 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती चीन सरकारने दिली.

    हे मृत्यू हॉस्पिटलबाहेर झाल्यामुळे आम्हाला लवकर कळलं नाही, असं स्पष्टीकरण चीन सरकारनं दिलं आहे. पण जर चीनने हे आकडे जाणून बुजून लपवले असतील तर त्यांना गंभीर परिणामांना समोर जावं लागेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे.पण खरंच चीनने आकडेवारी लपवली का? पाहा हा व्हीडिओ.

  20. काल काय काय घडलं?

    तुम्हाला माहितीय, आम्ही दररोज हा लाईव्ह ब्लॉग चालवतोय, ज्यात देश-दुनियेतले तमाम महत्त्वाचे अपडेट्स असतात.

    काल 21 एप्रिल रोजी दिवसभरात काय काय घडलं, ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा...