You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

गुजरातच्या भूमीत औरंग्या जन्मला, महाराष्ट्राच्या भूमीत शिवराय जन्मले - उद्धव ठाकरे

भारतात सध्या लोकसभा निवडणुकांचं वातावरण आहे. आतापर्यंत दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे. या दरम्यान राजकीय नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. बीबीसी मराठीच्या या पानावर तुम्हाला देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचायला मिळतील.

थोडक्यात

  • महादेव सट्टा ॲप प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेता साहिल खानला अटक केली आहे.
  • मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने पूनम महाजन यांना डावलून ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांना तिकीट दिलं.
  • इराकमध्ये समलैंगिक संबंधांना बेकायदेशीर ठरवणारं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.
  • ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकाचा व्हीडिओ प्रसारित केला आहे.
  • देशात मतदानाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला.

लाईव्ह कव्हरेज

  1. गुजरातच्या भूमीत औरंग्या जन्मला, महाराष्ट्राच्या भूमीत शिवराय जन्मले - उद्धव ठाकरे

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप, नारायण राणे आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.

    रत्नागिरीतील प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "कोकणाचा प्रचाराची गरज नाही. शिवसेना चोरली, गद्दारांना धनुष्यबाण दिला आणि ज्यांना दिला त्यांच्याकडून कोकणातून धनुष्यबाण गायब केला."

    ते पुढे म्हणाले, "मोदींना सूरच लागत नाही. आता आयपीएलचं सुरू आहे. तसंच राजकारणाचं झालं आहे. कोण कोणाकडून आहे हेच होतं. 2019 मध्येही आपण फसलो होतो. एक अकेला सब पे भारी अशी त्यांची मस्ती होती... पण एक अकेला सब पे भारी, आजुबाजुला सब भ्रष्टाचारी अशी स्थिती झाली आहे. अटलजींचा आत्मा हे पाहून रडत असेल."

    शिवसेना आणि भाजपच्या संबंधांवर बोलताना ठाकरे म्हणाले की, "शिवसेना सोबत होती तेव्हा महाराष्ट्रात यायची त्यांना गरज नव्हती. पण त्यांचा विनाश व्हायचा होता त्यामुळंच त्यांच्यापासून नियतीनं शिवसेनेला वेगळं केलं.

    "पदं, मंत्रिपदं घेतली तरी त्यांना कोकणासाठी काही आणता आलं नाही. शिवसैनिक ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहेत. मोदी म्हणतात घराणेशाही, पण आमची घराणेशाही लोकांना मंजूर आहे. शिवसेनेची घराणेशाही नको पण गुंडांची घराणेशाही तुम्हाला हवी आहे.

    "सरकार आल्यानंतर बारसू सारखे विरोध डावलून त्यांना हवं ते करतील. पण आम्ही कोणताही विनाशकारी प्रकल्प येऊ देणार नाही. जसे ते यांना मत म्हणजे त्यांना मत म्हणत आहे, तसं मोदींना मत म्हणजे विनाशाला मत आहे. यांचा महाराष्ट्रावर असलेला आकस अगदी टोकाला पोहोचला आहेत."

  2. कर्नाटकातील खासदाराच्या कथित अश्लील व्हीडिओ प्रकरणात SIT ची स्थापना

    कर्नाटक सरकारने जनता दल सेक्युलर पक्षाचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या अनेक महिलांसोबतच्या कथित 'अश्लील व्हीडिओ'ची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त डीजीपी स्तरावरील अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.

    खासदार रेवण्णा यांच्यावर महिलांचा छळ केल्याचेही आरोप होत आहेत.

    कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, 'हासन जिल्ह्यात अश्लील व्हीडिओ शेअर केले जात आहेत, यावरून महिलांविरोधात गुन्हे घडल्याचं दिसत आहे.'

    कर्नाटक महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी यासंदर्भात राज्याचे पोलीस प्रमुख आलोक मोहन यांना पत्र लिहून एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यानंतरच राज्य सरकारने तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे.

    पीडित महिलेच्या तक्रारीनंतर महिला आयोगाने पोलिसांना पत्र लिहून तक्रार केली होती. तिच्या जीवाला धोका असल्याचेही पीडितेने सांगितले होते.

    याप्रकरणी हसन येथील पोलीस ठाण्यात एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. गेल्या रविवारी, कथितरित्या पेन ड्राइव्हमध्ये उपलब्ध असलेले हे व्हीडिओ हासन लोकसभा मतदारसंघात व्हायरल होऊ लागले. या जागेसाठी 26 एप्रिल रोजी मतदान झाले होते.

    प्रज्वल रेवन्ना हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत. हासन या जागेवरून रेवन्ना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

    रेवन्ना हे होलेनरसीपूरचे आमदार एचडी रेवन्ना यांचे पुत्र आहेत.

    कर्नाटक पोलिसांनी सरकारला सांगितले आहे की, प्रज्वल रेवन्ना कालच भारतातून जर्मनीला रवाना झाले आहेत.

    प्रज्वल रेवन्ना यांचे निवडणूक एजंट पूर्णचंद्र तेजस्वी यांनी 21 एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीत नवीन गौडा आणि इतरांवर रेवन्ना यांचा 'फेक व्हीडिओ' व्हायरल केल्याचा आरोप केला होता. राजकीय हेतूने रेवण्णाचे व्हीडिओ घरोघरी पोहोचवले जात असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

    या व्हीडिओ आणि आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीचे प्रमुख एडीजीपी बीके सिंह असतील. सिंह यांनी यापूर्वी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीचं प्रमुखपद भूषवलं आहे.

    या एसआयटीमध्ये सहाय्यक आयजीपी सुमन डी. पेणेकर आणि म्हैसूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक सीमा लाटकर यांचा समावेश आहे.

    दरम्यान, पत्रकारांशी बोलताना जेडीएस नेते आणि माजी मंत्री जीटी देवेगौडा म्हणाले की, एसआयटीच्या स्थापनेचं आम्ही स्वागत करतो.

  3. तिरंदाजी विश्वचषकात दीपिका कुमारीला रौप्य पदक

    शांघायमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषकात माजी अव्वल मानंकित तिरंदाज दीपिका कुमारीननं रौप्य पदकाची कमाई केली आहे.

    अंतिम सामन्यात दीपिका कुमारीला पराभूत करून दक्षिण कोरियाची तिरंदाज लिम सी हायन ही सुवर्ण पदकाची मानकरी ठरली.

    स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियानं याबाबत माहिती दिली आहे.

    साई मीडियानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर, "दीपिका कुमारीनं तिरंदाजी विश्वचषकात रौप्य पदक जिंकलं आहे," अशी पोस्ट केली.

    "भारतानं स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत पाच सुवर्ण पदकांसह एकूण आठ पदकांची कमाई केली आहे."

    शनिवारी भारताच्या ज्योती, आदिती आणि परनीत यांनी महिला इव्हेंटमध्ये इटलीच्या टीमचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं होतं.

  4. 'देशात हुकूमशहापेक्षा आघाडीचं सरकार असणं कधीही चांगलं'

    देश चालवण्यासाठी हुकूमशहापेक्षा आघाडीचं सरकार असणं कधीही चांगलं, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

    ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “एक हुकूमशहा 10 वर्षांपासून देशावर राज्य करत आहेत. आपण त्यांना लोकशाही पद्धतीने निवडून दिलं. पण नंतर ते हुकूमशहा बनले.

    त्यापेक्षा आघाडीचं सरकार स्थापन करून देश चालवला तर बरे होईल. आपण आपल्या मर्जीनुसार पंतप्रधान बनवू शकतो. मग चार बनवू किंवा दोन पंतप्रधान बनवू. पण देश हुकूमशाहीकडे जाऊ देणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.

    शनिवारी (27 एप्रिल) कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दावा केला होता की, INDIA आघाडीचं सरकार स्थापन झालं तर त्यांनी दरवर्षी पंतप्रधान बदलण्याची योजना आखली आहे.

    त्यानंतर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

  5. महादेव सट्टा ॲप प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेता साहिल खानला केली अटक

    छत्तीसगडमधील महादेव सट्टा ॲप प्रकरणी मुंबई पोलिसांनी चित्रपट अभिनेता साहिल खानला बस्तर येथून अटक केली आहे.

    बस्तर पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे. साहिल खानवर या ऑनलाइन सट्टा ॲपची वेबसाइट चालवण्याचा आणि त्याचा प्रचार केल्याचा आरोप आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल खानने या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती, परंतु न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता.

    अटक केल्यानंतर अभिनेता साहिल खानला छत्तीसगडहून मुंबईत आणण्यात आले आहे.

    ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना साहिल खान म्हणाला की, माझा भारतीय न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

    गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अभिनेता संजय दत्त आणि तमन्ना भाटिया यांनाही समन्स बजावले होते.

    भारत सरकारचे अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी हजारो कोटींच्या महादेव सट्टा ॲपच्या प्रकरणाची आधीच चौकशी करत आहे.

    महादेव ॲपचे मालक सौरभ चंद्राकरने गेल्या वर्षी दुबईत झालेल्या लग्नात 200 कोटी रुपये खर्च केल्याच्या बातम्यांनंतर पहिल्यांदाच प्रसिद्धीझोतात आला होता.

    गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, ईडीने छत्तीसगड पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रभूषण वर्मा, सतीश चंद्राकर, हवाला ऑपरेटर अनिल दममानी आणि सुनील दममानी यांना मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित कायद्यानुसार अटक केली होती.

    यानंतर, 15 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात ईडीने सांगितले की, कोलकाता, भोपाळ, मुंबईसह 39 शहरांमध्ये छापे टाकून 417 कोटी रुपयांची रोकड, मालमत्ता आणि इतर पुरावे जप्त केले.

    मुंबई फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार महादेव सट्टा ॲपची जाहिरात करत होते.

  6. समलैंगिक संबंधांना बेकायदेशीर ठरवणारं विधेयक 'या' देशात मंजूर

    इराकच्या संसदेत समलैंगिक संबंधांना बेकायदेशीर ठरवणारं विधेयक मंजूर करण्यात आले आहे.

    या विधेयकात समलैंगिक संबंध ठेवल्यास 10 ते 15 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. नव्या कायद्यानुसार ट्रान्सजेंडर व्यक्तीला पण एक ते तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो.

    यामुळे देशातील धार्मिक मूल्ये जपण्यास मदत होईल, असा विश्वास नव्या कायद्याच्या समर्थकांना आहे. त्याचवेळी या विधेयकाला विरोध करणाऱ्या गटांचे म्हणणे आहे की, इराक या कायद्याद्वारे LGBT समुदायाच्या अधिकारांचे उल्लंघन करत आहे.

    या विधेयकाचा पूर्वीचा मसुदा 1980 मध्ये पारित झालेल्या वेश्याव्यवसाय विरोधी कायद्यात सुधारणा करण्यासाठी आणण्यात आला होता आणि त्यात मृत्युदंडाची तरतूद होती. मात्र, अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या विरोधानंतर त्यात बदल करण्यात आला.

  7. पूनम महाजन यांनी खासदारकीचं तिकीट नाकारल्यानंतर काय म्हटलं?

    मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांना डावलून ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांना तिकीट दिलं आहे.

    त्यानंतर महाजन यांनी 10 वर्षं खासदार म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल भाजप आणि नरेंद्र मोदी यांचं आभार मानलं आहे.

    “मला 10 वर्षे खासदार म्हणून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल भाजप आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे आभार. तर फक्त खासदार म्हणूनच नव्हे तर एक मुलगी म्हणूनही माझ्यावर प्रेम केल्याबद्दल मतदारसंघातील लोकांची मी सदैव ऋणी राहीन,” अशी प्रतिक्रिया पूनम महाजन यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

    माझे आराध्य दैवत, माझे वडील दिवंगत प्रमोद महाजन जी यांनी मला 'आधी राष्ट्र, मग आम्ही' हा मार्ग दाखवला, तोच मार्ग मला आयुष्यभर चालवता यावा अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव या देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल, असं त्यांनी पुढं म्हटलं आहे.

    मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी मतदान होणार आहेत.

    याठिकाणी महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड यांनी तिकीट देण्यात आलं आहे.

  8. 'नरेंद्र मोदींना काळजी वाटतेय, भाजपही घाबरलंय'

    'पंतप्रधान नरेंद्र मोदी चिंतेत आहेत आणि भाजप घाबरला आहे,' असं आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी रविवारी (28 एप्रिल) म्हटलं आहे.

    अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षा 'जेल का जवाब वोट से' ’ ही मोहीम राबवत आहे.

    सौरभ भारद्वाज रविवारी (28 एप्रिल) सकाळी दक्षिण दिल्लीत या मोहिमेशी संबंधित कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्या दरम्यान, ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सौरभ भारद्वाज म्हणाले की, "पंतप्रधान चिंतेत आहेत आणि भाजप घाबरले आहे. त्यांच्या प्रचारात अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येतेय. प्रचार सुरू झाला तेव्हा पंतप्रधान सांगत होते की, माझ्याकडे 2048 चा रोडमॅप आहे. मी हे 20 वर्षांत अमुक गोष्टी करेन. लोकसभेत 400 खासदार निवडून आल्यानंतर मी तमुक करेन.

    "पण आता मोदींची भाषा बदलतेय. विरोधक सत्तेत आले तर काय होईल याची ते भीती घालत आहेत. याचा अर्थ मोदींना कळलंय की, विरोधी पक्ष निवडून येतोय.

    आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 21 मार्चपासून दिल्लीतील तिहार तुरुंगात आहेत. त्यानंतर मोदी सरकारवर आंतरराष्ट्रीय पातळीवरून टीका झाली आहे.

  9. ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकाचा व्हीडिओ हमासकडून प्रसारित

    गाझामधील कट्टरवादी संघटना हमासने एक नवीन व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यानंतर ओलीस ठेवलेले दोन इस्रायली नागरिक जिवंत असल्याचा हा पुरावा असल्याचं सांगण्यात येत आहे.

    संबंधित व्हिडीओमध्ये इस्रायली नागरिक ओमरी मिरान सांगतात की, त्यांना 202 दिवसांपासून कैद करण्यात आलं आहे. तर कीथ सिगल यांनी गेल्या आठवड्यातील सुटीचा उल्लेख केला आहे.

    यावरून हा व्हीडिओ नुकताच रेकॉर्ड करण्यात आल्याचं दिसून येतंय. या दोन्ही इस्रायली नागरिकांचं हमासने ऑक्टोबर 2023 मध्ये केलेल्या हल्ल्यादरम्यान अपहरण केले होतं.

    हा व्हीडिओ पाहिल्यानंतर ओमरी आणि कीथच्या कुटुंबीयांनी म्हटलं की, ते त्यांच्या सुटकेपर्यंत लढा देत राहतील.

    तसंच कुटुंबियांनी इस्रायली सरकारला त्यांच्या सुटकेसाठी करार करण्याचं आवाहन केलं आहे.

    इस्रायलसोबत आपण युद्धबंदीसाठी प्रस्ताव देण्याच्या विचारात आहोत, असं हमासने म्हटल्याच्या बातम्या येत असतानाच हा व्हीडिओ प्रसारित करण्यात आला आहे.

    दरम्यान (27 एप्रिल) इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी सांगितले की, ओलिसांच्या सुटकेसाठी करार झाला तर ते रफाहवरील नियोजित हल्ल्याचा निर्णय मागे घेऊ शकतात.

  10. नमस्कार

    बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर आपले स्वागत आहे. देशात मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला आहे. त्याच बरोबर इतर अनेक घडामोडी देखील सुरू आहेत.

    आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायल आणि हमासमध्ये संघर्ष सुरू आहे. युक्रेन-रशियातील युद्ध देखील सुरू आहे. या सर्व घडामोडी तुम्हाला बीबीसी मराठीच्या या पानावर वाचायला मिळतील.