इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याबद्दल अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचं मौन
काल रात्री इस्रायलने इराणच्या इस्फहानवर क्षेपणास्त्र डागलं. इराणवरील या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी कोणतंही विधान केलेलं नाही.
शुक्रवारी पत्रकारांनी त्यांना विचारलं की, इस्रायल आणि इराणच्या प्रतिक्रिया मोजून मापून दिलेल्या आहेत, याचा अर्थ मोठा संघर्ष टळला आहे का? ब्लिंकन यांना असंही विचारण्यात आलं की, राफाहबाबत अमेरिकेची भूमिका काय आहे?
या प्रश्नांच्या उत्तरात ते म्हणाले, "तणाव कमी करण्यावर त्यांचा भर असून संबंधित पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे." बीबीसीच्या प्रतिनिधी जेसिका पार्कर यांनी ब्लिंकन यांना विचारलं की काल रात्री घडलेल्या घटनेबद्दल तुम्ही काही विधान का केलेलं नाही?
यावर ते म्हणाले, "मी जे काही बोलेन ते रटाळवाणंच असेल" असं म्हणत त्यांनी पुन्हा काही बोलण्यास नकार दिला. मात्र त्यांनी पुनरुच्चार केला की अमेरिका कोणत्याही प्रकारच्या लष्करी कारवाईत सहभागी नसेल आणि तणाव कमी करण्यासाठी आम्ही काम करत राहू. इराणनेही या हल्ल्याकडे फारसं लक्ष दिलेलं नाही. या हल्ल्याबाबत इस्रायलने अद्याप कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.
हे सर्व 1 एप्रिल रोजी सीरियातील इराणी वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्यापासून सुरू झालं. यात 13 लोक मारले गेले. यात रिव्होल्युशनरी गार्डचे टॉप कमांडर आणि डेप्युटीही मारले गेले. या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचं मानलं जात आहे.
यानंतर 13 एप्रिल रोजी इराणने इस्रायलवर 300 रॉकेट-क्षेपणास्त्र डागले. मात्र, बहुतेक क्षेपणास्त्रे जमिनीवर येण्यापूर्वीच इस्रायलने हवेत उडवून लावले.