You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुरानंतर दुबई एअरपोर्टवरील उड्डाणे पुन्हा सुरू
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. सर्वच पक्षांनी आपल्या प्रचाराला जोरात सुरुवात केली आहे. काही ठिकाणी तर मतदान अगदी आठवड्याभरावरच येऊन ठेपले आहे. तर त्याच वेळी देशाबाहेर इराण-इस्रायल, रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास हा संंघर्ष सुरू आहे.
थोडक्यात
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे.
- ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) 2002 अंतर्गत व्यापारी राज कुंद्रा यांची 97.79 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त केली आहे.
- जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात स्थलांतरित कामगाराचा गोळी लागून मृत्यू
- या आयपीएल सीझनच्या 32 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटनचा पराभव केला
लाईव्ह कव्हरेज
पुरानंतर दुबई एअरपोर्टवरील उड्डाणे पुन्हा सुरू
संयुक्त अरब अमिरात आणि जवळपासच्या देशांमद्ये झालेल्या प्रचंड पावसामुळं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतुकीवर परिणाम झाला होता.
मंगळवारी वादळ आणि जोरदार पावसामुळं युएईच्या रस्त्यांसह विमानतळावरही सगळीकडं पाणीच पाणी साचलं होतं. ओमानमध्ये पूरपरिस्थितीमुळं 20 जणांचा मृत्यू झाला. तर यूएईमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, गुरुवारी दुबई एअरपोर्टवर येणाऱ्या काही विमानांसाठी पुन्हा विमानतळ सुरू करण्यात आलं. पण प्रचंड व्यस्त असणाऱ्या या विमानतळावर अद्याप हवाई वाहतूक पूर्ववत होऊ शकलेली नाही.
जगात दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात व्यस्त विमानतळ असलेल्या दुबई विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी टर्मिनल 1 वर विदेशातून येणाऱ्या विमानांना परवानगी दिली जात असल्याची माहिती दिली. पण दुबईतून उड्डाण घेणाऱ्या विमानांचं वेळापत्रक अद्याप कोलमडलेलंच आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एमिरेट्स आणि फ्लायदुबई या सर्वात मोठ्या एअरलाइनच्या उड्डाणांसाठी टर्मिनल 3 वर चेक इन सुरू असल्याची घोषणा केली होती. पण विमाानांची वाट पाहणाऱ्यांची संख्या पाहता उड्डाणांचा विलंब होणार असल्याचा इशारा आधीच देण्यात आला आहे.
गुरुवारी दुबई एअरपोर्ट अथॉरिटीनं लोकांना बुकींग असेल तर विमानतळावर जाण्याची विनंती केली आहे.
ईव्हीएमच्या चाचणीत भाजपला मत जाण्याच्या बातमीवर निवडणूक आयोगाचे सुप्रीम कोर्टात उत्तर
केरळमधील ईव्हीएम चाचणीदरम्यान भाजपला अतिरिक्त मत दाखवलं जात असल्याची बातमी चुकीची असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं गुरुवारी सुप्रीम कोर्टात दिलं. "ही बातमी चुकीची असून याबाबत आम्ही कोर्टात सविस्तर माहिती सादर करू," असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
जस्टीस संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या पीठासमोर याचिकाकर्ता असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सकडून सादर झालेले वकील प्रशांत भूषण यांच्याकडून या बातमीचा उल्लेख करण्यात आला आहे. 17 एप्रिलला केरळमध्ये चाचणी सुरू असताना त्यात मशीनमध्ये भाजपच्या चिन्हाची अतिरिक्त चिठ्ठी निघाली, असा दावा त्यात करण्यात आला आहे.
दुपारनंतर कोर्टाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना नीतेश कुमार व्यास यांनी न्यायालयात ही बातमी खरी नसल्याचं सांगितलं. "आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत चौकशी केली आहे. त्यामुळं ही माहिती खोटी असल्याची शक्यता वाटत आहे. आम्ही कोर्टाला याबाबत सविस्तर अहवाल सादर करू," असं ते कोर्टात म्हणाले.
17 एप्रिलला ऑनमनोरमानं एक बातमी दिली होती. त्यात केरळमध्ये ईव्हीएमनं चाचणीत चुकून भाजपच्या बाजुनं मत दिल्याचा दावा करण्यात आला होता.
इराणचा इस्रायलवर हल्लाः कोण जिंकलं, कोण हरलं?
क्लाऊड सीडिंग म्हणजे काय? दुबईत त्यामुळे पूर आला का?
इराणच्या ताब्यात असलेल्या जहाजावर काम करणारी महिला भारतात परतली
इराणच्या ताब्यात असलेल्या जहाजावर काम करणारी महिला भारतात परतलीइराणच्या ताब्यात असलेल्या मालवाहू जहाज एमएससी एरिजवर काम करणारी महिला एन. टेसा जोसेफ भारतात परतली आहे. ती मूळची केरळची आहे.13 एप्रिल रोजी हे जहाज इराणच्या नौदलानं ताब्यात घेतलं होतं. हे जहाज भारतात येत होतं. यावर जहाज चालक दलातील 25 लोकआहेत. त्यात 17 भारतीयआहेत. या लोकांची तात्काळ सुटका व्हावी अशी मागणी त्या लोकांच्या नातलगांनी केली होती.
त्यानंतर यापुढील घडामोडी घडत आहेत.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपला तेहरान दुतावास उर्वरित 16 जणांच्या सुटकेसाठी चर्चा करत आहे अशी माहिती दिली. हे सर्व लोक सुखरुप असून त्यांना आपल्या नातलगांशी बोलू दिलं जात असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री आमिर अब्दोल्लाहाइ यांच्याशी चर्चा केली आहे असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
साक्षी मलिक, आलिया भट आणि सत्या नाडेलांचा, जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश
टाईम या नियतकालिकाच्या 2024च्या जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिकला स्थान देण्यात आलं आहे.
साक्षी मलिकशिवाय आलिया भट्ट, जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्याही नावांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे.
टाईमच्या या यादीत नाव समाविष्ट झाल्यानंतर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यक्त होताना साक्षी मलिक यांनी लिहिलं की , "एवढ्या महत्त्वाच्या यादीत नाव असल्यामुळे मला स्वतःचा अभिमान वाटतो आहे."
साक्षी मलिक गेल्या एक वर्षापासून तिचे सहकारी पैलवान विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासोबत लैंगिक छळ प्रकरणी आरोपी ब्रिजभूषण शरण सिंह विरुद्ध लढत आहे.
ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधातील आंदोलनामुळे साक्षी मलिक हिचा टाईम मासिकाच्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी साक्षी मलिक ही भारतातील एकमेव महिला कुस्तीपटू आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिक कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरली होती.
ईडीकडून राज कुंद्रांची 97 कोटींची मालमत्ता जप्त
अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) 2002 अंतर्गत व्यापारी राज कुंद्रा यांची 97.79 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त केली आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मालमत्तेत राज कुंद्राची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेल्या जुहू येथील फ्लॅटचाही समावेश आहे.
याशिवाय राज चंद्रा यांच्या नावे पुण्यात असलेला फ्लॅट आणि इक्विटी शेअर्सही जप्त करण्यात आले आहेत.
मुंबई पोलिसांनी जुलै 2021 मध्ये राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट बनवण्याच्या आणि ॲपद्वारे त्यांचा प्रसार केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. नंतर राज कुंद्रा यांना या प्रकरणात जामीन मिळाला होता.
विदर्भातल्या पाच जागांसाठी उद्या मतदान; देशात 102 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान
देशभरातल्या 102 लोकसभा मतदारसंघांसाठी उद्या (19 एप्रिल) मतदान होणार आहे. एकूण 21 राज्यांमधले मतदार उद्या त्यांचा कौल देतील.
महाराष्ट्रातील पूर्व विदर्भाच्या पाच जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदिया अशा पाच जागांवर मतदान होणार आहे.
या पाचही जागांवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी स्पष्ट लढत असेल.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात या जागांसाठी होणार मतदान :
1. नागपूर - नितीन गडकरी (भाजप) विरुद्ध विकास ठाकरे (मविआ)
2. रामटेक - राजू पारवे (शिवसेना) विरुद्ध शामकुमार बर्वे (मविआ)
3. चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार (भाजप) विरुद्ध प्रतिभा धानोरकर (मविआ)
4. गडचिरोली - अशोक नेते (भाजप) विरुद्ध नामदेव किरसान (मविआ)
5. भंडारा-गोंदिया - सुनील मेंढे (भाजप) विरुद्ध डॉ. प्रशांत पडोळे (मविआ)
मागच्या निवडणुकीचा विचार करता यापैकी चार जागांवर भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार निवडून आले होते तर एका चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसचा खासदार निवडून आला होता.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार असे मातब्बर उमेदवार पहिल्या टप्प्यात निवडणुकीला सामोरे जातील.
भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांसारख्या नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या आहेत तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सभा घेतल्या आहेत.
रत्नागिरी सिंधुदुर्गमधून अखेर नारायण राणेंना भाजपची उमेदवारी
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ही जागा होती.
मात्र आज (18 एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच नारायण राणेंची उमेदवारी जाहीर केली.
पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, "रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आम्ही पुढाकार घेऊन भाजपसाठी सोडली आहे. त्यामुळे नारायण राणेंची उमेदवारी निश्चित झाली आहे. आम्ही जो प्रचार किरण सामंतांसाठी करणार होतो तोच नारायण राणेंसाठी करू. नाराजी आहे. पदाधिकाऱ्यांना समजवू. उद्या नारायण राणे फॉर्म भरणार आहेत. त्यातही आम्ही सहभागी होऊ. माझी पत्रकार परिषद सुरू असताना नारायण राणेंची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा."
नारायण राणेंना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली नव्हती तेव्हाच ते लोकसभा लढवतील अशा चर्चा सुरु होत्या. आता अखेर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या राजकीय आखाड्यात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना होणार आहे.
नमस्कार
नमस्कार, बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर आपले स्वागत आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. सर्वच पक्षांनी आपल्या प्रचाराला जोरात सुरुवात केली आहे. काही ठिकाणी तर मतदान अगदी आठवड्याभरावरच येऊन ठेपले आहे.
तर त्याच वेळी देशाबाहेर इराण-इस्रायल, रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास हा संंघर्ष सुरू आहे.
तुम्हाला 17 एप्रिलच्या बातम्या वाचायच्या असतील तर तुम्ही या ठिकाणी त्या वाचू शकता.