You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोहन मांझी होणार ओडिशाचे नवे मुख्यमंत्री
आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही इथे वाचू शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच राज्यातील सर्व अपडेट्सही इथे वाचता येतील.
थोडक्यात
- ओडिशामध्ये भाजपा विधिमंडळ पक्षाने मोहन मांझी यांना नेतेपदी निवडलं आहे. ते आता ओडिशाचे नवे मुख्यमंत्री होतील.
- सुप्रीम कोर्टांनं नीट-युजी परीक्षा 2024 चे निकाल रद्द करुन परत परीक्षा घेण्याच्या मागणीच्या याचिकेवर नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एनटीएकडून उत्तर मागितलं आहे.
- बांगलादेशात रोहिंग्या आश्रितांच्या छावणीत झालेल्या हिंसाचारात 3 रोहिंग्याचा मृत्यू झाला आहे. तसेच 7 लोक जखमी झाले आहेत.
- पंतप्रधानपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी पीएम किसान सन्मान निधी या योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे.
- पूर्व आफ्रिकेतील देश मालावी देशाच्या उपराष्ट्रपतींना घेऊन जाणाऱ्या विमानाचा ढिगारा सापडला आहे. यामध्ये कोणीही जिवंत असल्याचं दिसलेलं नाही. या विमानात उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा यांच्यासह काही इतर प्रवासी होते.
- मनोज जरांगे यांची उपोषणस्थळी जाऊन अंबडच्या तहसिलदारांनी भेट घेतली आहे. आज जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जरांगे यांना दिला उपचार घेण्याचा सल्ला दिला होता, मात्र जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
लाईव्ह कव्हरेज
ओंकार करंबेळकर
सांगली जिल्ह्यातला 400 वर्षं जुना वटवृक्ष अजूनही वाचवता येईल का? तज्ज्ञांनी सांगितले 3 पर्याय
मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील मंत्र्यांकडे 'या' खात्यांची जबाबदारी
नरेंद्र मोदी यांनी 9 जून 2024 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातल्या एनडीए आघाडीला 292 जागा मिळाल्या. त्यानंतर एनडीएने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी महाराष्ट्रातून कोण कोण असेल याची उत्सुकता सगळ्यांना होती. एकूण 6 नेत्यांना महाराष्ट्रातून मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.
प्रेस इंफर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार नितीन गडकरी यांना रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्रालय देण्यात आलं आहे. तर पियुष गोयल यांना वाणिज्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. यासोबतच आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
रामदास आठवलेंना पुन्हा एकदा सामाजिक न्याय मंत्रालयाचं राज्यमंत्रिपद देण्यात आलंय.
रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली असून आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना सहकार आणि नागरी उड् राज्यमंत्रिपद देण्यात आलंय.
संपूर्ण यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा,
'इस्रायलनं रेस्क्यू ऑपरेशनमध्ये 274 नागरिकांना मारलं', हमासच्या आरोग्य मंत्रालयाचा आरोप
इस्रायल-हमास संघर्ष: अमेरिकेच्या युद्धबंदी योजनेला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा पाठिंबा
अॅपल आणि ChatGPT एकत्र येण्याच्या घोषणेमुळे इलॉन मस्क इतके का चिडले ?
सौदी अरेबिया पुन्हा खुले करणार अरामकोचे शेअर्स, काय आहे कारण?
मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ आकाश तसंच गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्र आणि तेलंगणात आणखी आगेकूच केली आहे. मान्सूनची उत्तरेकडची सीमा नवसारी, जळगाव, पुसद, रामगुंडम, सुकमा, मल्कानगिरी, विझिनाग्राम आणि ईशान्येला इस्लामपूरमधून जाते आहे.
पुढच्या 48 तासांत मान्सून तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये आणखी पुढे सरकू शकतो, असं हवामान विभागनं म्हटलं आहे. 11 आणि 12 जूनला महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तेलंगणात पावसाच्या सरी कोसळतील. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज आहे. त्यानंतर साधारण 8-10 दिवसांत मान्सूनचा वेग थोडा मंदावू शकतो, असं काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
पृथ्वी मंत्रालयाचे माजी सचिव आणि ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माधवन राजीवन यांनी ट्वीट केलं आहे की उत्तर भारतात मान्सून पोहोचायला थोडा वेळ लागेल. त्यामुळे दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यांत उष्णतेच्या लाटेचा धोका वाढू शकतो. 12 जून आणि 13 जून रोजी उत्तर प्रदेश, बिहार आणि छत्तीसगडमध्ये उष्णतेच्या लाटेसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात यादरम्यान विदर्भातला काही भाग वगळता इतर कुठेही धोक्याचा इशारा नाही. पुढच्या चोविस तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ आकाश तसंच गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईत भर पावसाळ्यात या झोपडपट्ट्यांमधील कुटुंबं रस्त्यावर का आली?
खासदार संदीपान भुमरे यांच्याकडून चर्चेसाठी प्रयत्न, मात्र जरांगेंकडून प्रतिसाद नाही
छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले. खासदार भुमरे यांच्याकडून मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र जरांगे यांच्याकडून चर्चेसाठी कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही.
मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी अशी विनंती छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटलांकडे केलीय.
आज नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी जालन्यातल्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी भुमरे यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्याचे खूप प्रयत्न केले मात्र जरांगे यांनी त्यांच्या चर्चेला प्रतिसाद दिला नाही. आम्हाला आपली गरज आहे असं भुमरे जरांगेंना म्हणालेत.
सरकार सकारात्मक आहे, निश्चित याबाबत मार्ग निघेल अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे यांनी जरांगेंच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दिलीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी स्वतः बोलेन आणि जितक्या लवकर या प्रश्नाबाबत मार्ग काढता येईल तितक्या लवकर आम्ही मार्ग काढू अशी प्रतिक्रिया खासदार संदीपान भुमरे यांनी दिलीय.
प्रियंकाकडे हात करून राहुल गांधी म्हणाले, हिनं वाराणसीतून निवडणूक लढवली असती तर..
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशातील रायबरेलीचा दौरा केला. तिथं केलेल्या भाषणात ते म्हणाले, जर प्रियंका गांधी यांनी वाराणसीतून निवडणूक लढवली असती तर नरेंद्र मोदी पराभूत झाले असते.
रायबरेलीत कार्यकर्त्यांना धन्यवाद देताना त्यांनी आपण सर्वांनी रायबरेली आणि अमेठीच काँग्रेसला विजयी केलं असं सांगितलं.
ते म्हणाले, फक्त अयोध्या नाही, तर पंतप्रधान वाराणसीतून थोडक्यात जीव वाचवू शकले आहेत, मी तुम्हाला सांगतो आणि बहिणीलाही सांगतोय, जर हिनं निवडणूक वाराणसीतून लढवली असती तर हिंदुस्तानचे पंतप्रधान दोन-तीन लाख मतांनी हरले असते.
अॅपल आणि ChatGPT एकत्र येण्याच्या घोषणेमुळे इलॉन मस्क इतके का चिडले?
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या स्पर्धेत सहभागी होत आता अॅपल कंपनी त्यांच्या सिरी व्हॉईस असिस्टंट आणि ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ओपनAI कंपनीचं ChatGPT आणणार आहे.
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातल्या अॅपलच्या मुख्यालयात कंपनीची वार्षिक डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) 10 जूनला पार पडली. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने Siri नव्या रूपात आणण्यासोबतच इतरही काही नवीन फीचर्स कंपनीने जाहीर केली.
या नव्या पर्सनलाईज्ड AI प्रणालीला - Apple Intelligence असं नाव देण्यात आलं असून अॅपलयुजर्सना अधिक सोपेपणाने अॅपलची डिव्हाईसेस वापरता यावी हा यामागचा उद्देश्य असणार आहे.
यासाठी चॅट जीपीटी (ChatGPT) विकसित करणाऱ्या ओपन एआय (OpenAI) कंपनीसोबत अॅपलने करार केला आहे. आयफोन आणि मॅक ऑपरेटिंग सिस्टीमच्या अपडेट्सद्वारे ChatGPT ला अॅक्सेस देण्यात येईल.
टेक्स्ट आणि इतर प्रकारच्या साहित्य (Content) निर्मितीसाठीही या ChatGPTची मदत होणार आहे.
मोहन मांझी होणार ओडिशाचे नवे मुख्यमंत्री
ओडिशामध्ये भाजपा विधिमंडळ पक्षाने मोहन मांझी यांना नेतेपदी निवडलं आहे. ते आता ओडिशाचे नवे मुख्यमंत्री होतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा १२ जून रोजी शपथविधी होईल. मोहम मांझी केओंझार येथून आमदार झाले आहेत.
भाजपानं यावर्षी झालेल्या निवडणुकीत बहुमत मिळवलं असून. बिजू जनता दलाचं गेल्या २४ वर्षांचं शासन आता समाप्त झालं आहे. ओडिशात भाजपाचं हे पहिलंच सरकार आहे.
मालावीच्या उपराष्ट्रपतींच्या अपघातग्रस्त विमानाचा ढिगारा सापडला, कोणीही जिवंत सापडले नाही
मालावी देशाच्या उपराष्ट्रपतींना घेऊन जाणाऱ्या विमानाचा ढिगारा सापडला आहे. यामध्ये कोणीही जिवंत असल्याचं दिसलेलं नाही.
या विमानात उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा यांच्यासह काही इतर प्रवासी होते. हे विमान शोधण्यामध्ये दाट धुकं आणि जंगलामुळे अडथळे येत होते.
या कोसळलेल्या विमानाचा ढिगारा सापडला मात्र कोणीही जिवंत असल्याचं दिसलं नाही असं मालावीचे राष्ट्रपती लझारेस चकवेरा यांनी स्पष्ट केलं.
या लष्करी विमानानं हवामान खराब असताना उड्डाण केलं होतं, त्यात उपराष्ट्रपतींसह इतर 9 लोक होते.
हे विमान दाट जंगलात कोसळलं असं एका वरिष्ठ सैन्यअधिकाऱ्यानं सांगितलं.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही- नाना पटोले
"विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूक एकत्र लढवण्याचा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा विचार आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला परंतु संपर्क होऊ शकला नाही."
अर्ज मागे घेण्यास अजून वेळ असून लवकरच यावर निर्णय होईल, अशी आशा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, "कोकण, मुंबई व नाशिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून निवडणुका होत आहेत. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर व नाशिकच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने जाहीर केली होती. परंतु शिवसेनेने परस्पर कोकण, नाशिक व मुंबई मतदार संघासाठीचे उमेदवार जाहीर केले."
"विधान परिषद निवडणुकीचा निर्णय एकत्र बसून केल्यास महाविकास आघाडीला लोकसभेप्रमाणे चांगले यश मिळू शकेल यासाठी काँग्रेसचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांना संपर्क केला तेव्हा ते परदेशात होते. आज मातोश्रीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, चर्चेतून मार्ग निघू शकतो", असेही नाना पटोले म्हणाले.
नीट परिक्षाच रद्द करा..
"नीट परिक्षेत घोटाळा झालेला असून डॉक्टर बनण्याचे लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. या परिक्षेचे सर्व नियंत्रण केंद्र सरकारकडे असते, ही परीक्षाच भ्रष्टाचाराचे केंद्र बनले आहे. आपला मुलगा डॉक्टर व्हावा यासाठी पालक लाखो रुपये खर्च करतात पण या भ्रष्टाचारामुळे पालक व विद्यार्थ्यांची घोर निराश होत आहे. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलांनी डॉक्टर होऊ नये हे भाजपाचे षडयंत्र आहे."
"नीट परीक्षा जुन्याच पद्धतीने घेतली पाहिजे अशी मागणी करत नीट परिक्षेत झालेल्या भ्रष्टाचाराची सीबीआय मार्फत चौकशी करून दोषींना शिक्षा केली पाहिजे", असेही नाना पटोले म्हणाले.
भाजपाला आता आरएसएसची गरज नाही..
सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारला दिलेल्या सल्ल्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोहन भागवत यांनी भाजपा सरकारला काहीही सल्ला दिला तरी ते सरकार मानेल असे वाटत नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले नवनियुक्त परराष्ट्र् राज्यमंत्र्यांचे स्वागत
'नोकरभरती नाही केली तर, येत्या विधानसभेलासुद्धा वाईट लोकसभेपेक्षा वाईट चित्र दिसणार'
NEET परीक्षाः सुप्रीम कोर्टानं मागितलं एनटीएकडून उत्तर, कौन्सिलिंग थांबवण्यास नकार
सुप्रीम कोर्टांनं नीट-युजी परीक्षा 2024 चे निकाल रद्द करुन परत परीक्षा घेण्याच्या मागणीच्या याचिकेवर नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एनटीएकडून उत्तर मागितलं आहे.
सुप्रीम कोर्टानं याची नोटीस काढून या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जुलै होईल असं स्पष्ट केलं आहे.
नीट परीक्षेच्या निकालाला आव्हान देणाऱ्या इतर याचिकाही याबरोबरच सुनावणीसाठी घेतल्या जातील.
वकील मॅझ्यूज जे नेदुमपारा यांनी सर्वोच्च न्यायालयात यावेळेस प्रवेशासाठी सुरू असलेल्या कौन्सिलिंगला थांबवावे असं अपिल केलं, मात्र न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि अहसानुद्दिन अमानुल्लाह यांच्या खंडपीठानं त्यास नकार दिला. नीट-यूजी 2024 परीक्षा 5 मे रोजी झाली होती आणि 3 जूनला त्याचे निकाल आले होते.
देशात वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस, बीडीएस आणि आयुष प्रवेशांसाठी एनटीए या पात्रता परीक्षेचं आयोजन करते. नीटमध्ये मिळालेल्या गुणांवर विद्यार्थ्यांना खासगी आणि सरकारी महाविद्यालयांत प्रवेश मिळतो. या परीक्षेचा पेपर फुटला होता असा आरोप काही याचिकांत करण्यात आला आहे, मात्र एनटीएने हे आरोप फेटाळले आहेत.
बांगलादेशात रोहिंग्या आश्रितांच्या छावणीत हिंसा, 3 मृत्युमुखी
बांगलादेशात रोहिंग्या आश्रितांच्या छावणीत झालेल्या हिंसाचारात 3 रोहिंग्याचा मृत्यू झाला आहे. तसेच 7 लोक जखमी झाले आहेत.
दोन समुहांमध्ये झालेल्या हिंसाचाराचं हे प्रकरण आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कॉक्सबझार जिल्ह्यात उखिया छावणीत गस्त घालणाऱ्या आश्रितांवर अराकार रोहिंग्या साल्वेशन आर्मीच्या लोकांनी हल्ला केला.
कॉक्स बझार म्यानमारच्या सीमेजवळ आहे. या घटनेत मारले गेलेले लोक रोहिंग्या सॉलिडॅरिटी ऑर्गनायझेशनचे सदस्य आहेत.
बांगलादेशी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी छावण्यांमध्ये झालेल्या हिंसक घटनांमध्ये आतापर्यंत वीस लोकांचे प्राण गेले आहेत.
म्यानमारमध्ये 2017 साली सैन्यानं रोहिंग्यांवर हल्ले केल्यानंतर साधारणपणे 10 लाख रोहिंग्या बांगलादेशात आले आहेत. हे लोक बांगलादेशात आश्रितांच्या छावणीत राहातात, बहुतांश छावण्या कॉक्स बझार जिल्ह्यात आहेत.