You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

बिहार विधानसभा निकाल : NDAला 200 हून अधिक जागांसह स्पष्ट बहुमत, महागठबंधनला धक्का

भारतीय जनता पक्ष, जनता दल युनायटेड, लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) या प्रमुख पक्षांच्या NDAनं कलांमध्ये बहुमत मिळवत महागठबंधनला धक्का दिला आहे.

थोडक्यात

  • बिहार विधानसभा निवडणुकांत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.
  • निकाल समोर आल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमारांनी मोदींसह सर्व सहकारी पक्षांचे आभार मानले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर नेत्यांचे अभिनंदन केले.
  • पंतप्रधानांनी M-Y फॉर्म्युल्याचा उल्लेख करत आता महिला आणि युवक अशी नवी ओळख या फॉर्म्युलाची झाल्याचं म्हटलं.
  • अमित शहांनी हे निकाल म्हणजे, भारताच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या घुसखोर आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध मोदी सरकारच्या धोरणावर दाखवलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे, असं म्हटलं.
  • राहुल गांधीही निकाल आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं. तसंच संविधानाच्या रक्षणासाठी लढा सुरू राहील असंही त्यांनी म्हटलं.

लाईव्ह कव्हरेज

टीम बीबीसी मराठी

  1. महुआ मतदारसंघातून तेज प्रताप यादव पिछाडीवर

    बिहारमधील महुआ मतदारसंघातून उभे असलेले जनशक्ती जनता दलाचे अध्यक्ष आणि लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव हे पिछाडीवर आहेत.

    निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार महुआतून लोक जनशक्ती पार्टी ( रामविलास) चे संजय कुमार सिंह हे आघाडीवर आहेत. ते 2,294 मतांनी पुढे आहेत.

    राजदचे मुकेश कुमार रोशन हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर AIMIM चे अमित कुमार आहेत तर चौथ्या क्रमांकावर तेज प्रताप यादव आहेत.

    राजदमधून बाहेर काढल्यानंतर तेज प्रताप यांनी जनशक्ती जनता दलाची स्थापना केली आणि स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला.

  2. बिहार निवडणूक निकाल : अलीनगर मतदारसंघातून मैथिली ठाकूर आघाडीवर

    बिहारच्या अलीनगर या मतदारसंघातून भाजप उमेदवार मैथिली ठाकूर आघाडीवर आहे. मैथिली ठाकूरच्या विरोधात राष्ट्रीय जनता दलाचे विनोद मिश्रा आहेत तर जनसुराज पार्टीकडून बिप्लव कुमार चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

    मैथिली ठाकूर ही 25 वर्षांची असून ती लोकप्रिय गायिका आहे.

    ताज्या आकडेवारीनुसार NDA 165 जागांवर आघाडीवर आहे तर महागठबंधन 73 जागांवर आघाडीवर आहे.

  3. राघोपूर मतदारसंघातून तेजस्वी यादव आघाडीवर बिहारच्या राघोपूर मतदारसंघातून राष्ट्रीय जनता

    बिहारच्या राघोपूर मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार तेजस्वी यादव आघाडीवर आहेत. त्यांचा सामना भारतीय जनता पक्षाचे सतीश कुमार आणि जन सुराज पक्षाचे चंचल कुमार यांच्या विरोधात आहे.

    सध्या हाती आलेल्या कलांनुसार 153 जागांवर NDA पुढे आहे तर महागठबंधन 85 जागांवर आघाडीवर आहे.

    जनसुराज पक्ष तीन जागांवर पुढे आहे.

  4. नितीश कुमार : आधी सातच दिवस, मग तब्बल 19 वर्षे; बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचं गणित जुळवणारा नेता

    बिहारच्या राजकारणातील प्रमुख चेहऱ्यांपैकी नितीश कुमार एक आहेत.

    जीतनराम मांझी यांचा कालखंड सोडला तर नितीश कुमार जवळपास सलग 17 वर्षं बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपशी युती तोडून नितीश कुमार यांनी लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवली आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.

    मे 2014 मध्ये मुख्यमंत्रिपद सोडणाऱ्या नितीश कुमार यांनी फेब्रुवारी 2015मध्ये जीतनराम मांझी यांना पक्षातून काढून टाकलं आणि स्वतः 130 आमदारांसोबत राज भवनात पोहोचले. त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला.

    लालूप्रसाद यादव यांच्या 15 वर्षांच्या कार्यकाळाविरोधात लढून सत्तेवर येणाऱ्या नितीश कुमारांना नंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळेस लक्षात आलं की, बिहारमध्ये कोणाच्यातरी सोबत गेल्याशिवाय सरकार बनवणं शक्य नाहीये.

    त्यामुळेच जेपी आणि कर्पूरी ठाकूर यांच्या हाताखाली राजकारणाचे धडे गिरवलेले लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार एकत्र आले.

    नितीश कुमार यांचा राजकीय प्रवास तुम्हाला या ठिकाणी वाचता येईल.

  5. तेजस्वी यादव : क्रिकेटसाठी नववीतून शिक्षण सोडण्यापासून राजकीय मैदानात उतरण्यापर्यंत, असा आहे प्रवास

    बिहार विधानसभेचा आज निकाल स्पष्ट होईल. बिहारमध्ये विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार सत्ता राखतात की तेजस्वी यादव मुसंडी मारतात, हे ठरेल.

    तेजस्वी यादव हे वयाने तरूण, अनुभवाने नवखे असले, तरी राजकारणाचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालंय.

    माजी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे त्यांचे वडील. मात्र, तेजस्वी यांना काही राजकारणात यायचं नव्हतं. त्यांची पहिली पसंती होती क्रिकेट या खेळाला.

    नुसती पसंतीच नव्हे, तर त्यांनी क्रिकेटच्या मैदानात नशीबही अजमावलं, जे यशस्वी ठरत असतानाच ते राजकारणाकडे वळले.

    तेजस्वी यांचा संपूर्ण प्रवास तुम्हाला या ठिकाणी वाचता येईल.

  6. बिहार विधानसभा निकाल : मतमोजणीला सुरुवात, कोण आहे पुढे?

    विधानसभा निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून कल येत आहेत. राज्यात 243 विधानसभा जागांसाठी 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान झाले.

    या निवडणुकीत तेजस्वी यादव, नितीश कुमार, सम्राट चौधरी, प्रशांत किशोर यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष आहे.

    बिहारमध्ये बहुमत गाठण्यासाठी 122 जागा लागतात.

    सकाळी 8.30 वाजता NDA 32 जागांवर आघाडीवर आहे तर महाआघाडी 21 जागांवर आघाडीवर आहे.

    तीन ठिकाणी जन सुराज पार्टी आघाडीवर आहे.

  7. बिहार निवडणुकीविषयी या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

    बिहार निवडणूक निकाल मतमोजणी सुरू होण्याआधी या गोष्टी जाणून घ्या थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. बिहार निवडणुकीवर सर्व देशाचे लक्ष आहे. मुख्य लढत ही राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि महागठबंधन यांच्यात असेल.

    नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जनता दल युनायटेड, भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) या प्रमुख पक्षांचा NDA मध्ये समावेश आहे. तर लालू प्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेस हे महागठबंधनचे प्रमुख पक्ष आहेत.

    याच बरोबर राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा जन सुराज्य पक्ष देखील निवडणुकीच्या मैदानात आहे.

    2025 ची विधानसभा निवडणूक ही विशेष आहे. 1951 नंतर यावेळी सर्वाधिक मतदान झाले आहे. गेल्या विधानसभेच्या तुलनेत या वर्षी 9.6 टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे.

    यावेळी बिहारमध्ये मतदानाची टक्केवारी 67.13 टक्के इतकी होती. पुरुषांपेक्षा महिलांच्या मतदानाची टक्केवारी 8.15 ने जास्त आहे. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ही 62.98 % इतकी आहे तर महिलांचे मतदानाचे प्रमाण 71.78 टक्के इतके आहे.

    बिहारमध्ये एकूण 7.45 कोटी मतदार आहेत. त्यापैकी महिला मतदारांची संख्या 3.51 कोटी आहे तर पुरुष मतदारांची संख्या 3.93 कोटी आहे.

  8. नमस्कार

    बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर आपले स्वागत आहे. मी बीबीसी मराठी प्रतिनिधी तुषार कुलकर्णी दुपारी दोन वाजेपर्यंत बिहार निवडणुकीसंबंधित महत्त्वपूर्ण बातम्या पोहचवणार आहे.

    बिहार निवडणुकीवर सर्वांचे लक्ष आहे. बिहार विधानसभा ही देशातील सर्वांत मोठ्या विधानसभांपैकी एक आहे.

    बिहार निवडणुकीचे ताजे निकाल पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

    धन्यवाद.