You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

एक्झिट पोलची आकडेवारी समोर, कोणत्या पक्षाला किती मिळणार जागा?

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान पार पडले. महायुती, महाविकास आघाडी या दोन युत्या-आघाड्यांसह अनेक पक्ष रिंगणात आहेत. त्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे.

थोडक्यात

  • महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदानाला सुरुवात
  • राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
  • सत्ताधारी महायुती, विरोधक महाविकास आघाडी या प्रमुख दोन आघाड्यांसह इतरही अनेक पक्ष मैदानात
  • राज्यातील 288 जागांवर विविध पक्षांचे एकूण 4 हजार 136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
  • आज मतदान पार पडल्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे 23 नोव्हेंबरला निकाल लागणार
  • आष्टी विधानसभा मतदारसंघातील बेदरवाडी गावात दोन गटात तुंबळ हाणामारी

लाईव्ह कव्हरेज

ओंकार करंबेळकर, बीबीसी मराठी प्रतिनिधी

  1. राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिन स्वत: धावणार की इतरांना धडक देणार?

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मुख्य लढत भाजपप्रणित महायुती आणि काँग्रेसप्रणित महाविकास आघाडी यांच्यात असली, तरी इतर पक्षांची लढतही दुर्लक्ष करता न येण्यासारखी आहे. त्यात महत्त्वाचा पक्ष म्हणजे राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

    राज ठाकरेंनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत ते स्वबळावर उतरले आहेत. मनसेनं राज्यातील 288 पैकी 125 मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

    मनसेनं 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 125 उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात काही ठिकाणी उतरवले आहेत.

    मुंबई आणि ठाण्यात 54 मतदारसंघ आहेत. मनसे या भागात प्रबळ मानली जाते आणि यंदा या 54 पैकी 41 जागा मनसे लढवतेय. म्हणजेच, या 41 जागी महाविकास आघाडी, महायुती आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल.

    मनसेने मुंबईत 27 आणि ठाण्यात 14 उमेदवार दिले आहेत.

    मनसेचे उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडी उमेदवारांना आव्हान देणार असल्यानं मनसेमुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची गणितं बिघडू शकतात, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.

    संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा- मनसेमुळे ‘या’ मतदारसंघात चुरशीची लढत

  2. एक्झिट पोल्स कसे केले जातात? एक्झिट पोलचे अंदाज अचूक असतात का?

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.

    23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. मात्र, निकालापूर्वी चर्चा सुरू होते ती विविध संस्था आणि वृत्तवाहिन्यांकडून प्रसिद्ध होणाऱ्या एक्झिट पोल्सची.

    आता विधानसभेसाठी एक्झिट पोलमध्ये कुणाची सत्ता येण्याची शक्यता असेल हे तर बुधवारी समजेलच. पण त्याआधी या एक्झिट पोल्सबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊ.

    सोबतच 2024 ची लोकसभा निवडणूक, हरियाणा विधानसभा निवडणूक आणि त्याआधीच्या काही निवडणुकांचे एक्झिट पोल्स आणि प्रत्यक्ष निकाल काय होते हे देखील पाहू.

    एक्झिट पोल म्हणजे काय आणि ते कसे करतात?

    एक्झिट म्हणजे बाहेर पडणं. हा शब्दच या चाचण्या म्हणजे Polls बद्दल खूप काही सांगतो.

    जेव्हा मतदार निवडणुकीसाठी मत देऊन केंद्रामधून बाहेर पडत असतो, तेव्हा त्यांना विचारलं जातं - तुम्ही कोणत्या पक्षाला वा उमेदवाराला मत दिलं, हे सांगाल का?

    एक्झिट पोल्स करणाऱ्या संस्था त्यांच्या लोकांना मतदान केंद्राच्या बाहेर उभं करतात. जसजसे मतदार मतदान करून बाहेर येतात, त्यांना विचारलं जातं की त्यांनी कुणाला मत दिलं. इतरही काही प्रश्न त्यांना विचारले जातात. उदा. पंतप्रधान पदासाठी तुमचा आवडता उमेदवार कोण वगैरे.संपूर्ण माहितीसाठी हा व्हीडिओ पाहा.

  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनातला सजग मतदार कसा हवा? डॉ. गोपाळ गुरू यांचं विश्लेषण

    महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं बीबीसी मराठी महत्वाच्या राजकीय विश्लेषकांशी बोलून राजकीय प्रक्रिया उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

    याच अनुषंगाने ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. गोपाळ गुरू यांच्याशी बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी चर्चा केली आहे.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेतील सजग मतदार कसा असावा? परिघावरील समूहाने विचारपूर्वक मतदान कसे करावे? सरकारी योजनांकडे मतदारांनी कसे पाहायला हवे ? यावर डॉ. गुरू यांनी विश्लेषण केले आहे.

  4. नाशिक जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 31 % मतदान

    नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघात दुपारी 1 वाजे पर्यंत सरासरी 31 टक्के मतदान पार पडले आहे.

    नाशिक मध्य - 31%, नाशिक पूर्व- 28%, नाशिक पश्चिम- 28%, देवळाली- 28%, इगतपुरी- 32%, सिन्नर- 36%, दिंडोरी- 44%, निफाड - 32%, येवला- 36%, चांदवड- 34%, कळवण- 36%, बागलाण - 28%, मालेगाव मध्य- 36%, नांदगाव - 30% मालेगाव बाह्य 28%

  5. मतदान सुरू झाल्यापासून आतापर्यंत काय झालं?

    महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. गेले दोन ते तीन महिने विविध आघाड्या, राजकीय नेत्यांची भाषणं, पक्षांतरं, आरोप-प्रत्यारोप, प्रचारसभा यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.

    महाराष्ट्रात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

    • दमदाटी करुन बोगस मतदान करायला लावलं जात असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे. शर्मिला पवार यांच्या आरोपांचा रोख अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर आहे. शर्मिला पवार या बारामतीतील शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई आहेत. त्यासोबतच, कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकीही अजित पवार गटाकडून दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
    • नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सुहास कांदे आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला.
    • बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर भाजपनं बिटकॉईनवरून गंभीर आरोप केले आहेत. मात्र, भाजपचे सर्व आरोप सुप्रिया सुळे यांनी फेटाळले असून, याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचंही सुळेंनी सांगितलंय.

    या काळातल्या सर्व बातम्या तुम्ही पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करुन वाचू शकता.

  6. हेमा मालिनी यांनी केलं मतदान

    महाराष्ट्र विधानसभेसाठी सुरू असलेल्या मतदानामध्ये अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनीही सहभाग घेतला. सर्वांनी आपल्या देशाच्या चांगल्या भविष्यासाठी मतदान करावं, असं त्या यावेळेस म्हणाल्या.

  7. दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान

    महाराष्ट्रात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

    राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.

    अहमदनगर - 32.90 टक्के, अकोला - 29.87 टक्के, अमरावती - 31.32 टक्के, औरंगाबाद- 33.89 टक्के, बीड - 32.58 टक्के, भंडारा- 35.06 टक्के, बुलढाणा- 32.91 टक्के, चंद्रपूर- 35.54 टक्के, धुळे - 34.05 टक्के, गडचिरोली - 50.89 टक्के, गोंदिया - 40.46 टक्के, हिंगोली - 35.97 टक्के, जळगाव - 27.88 टक्के, जालना- 36.42 टक्के, कोल्हापूर- 38.56 टक्के, लातूर - 33.27 टक्के, मुंबई शहर- 27.73 टक्के, मुंबई उपनगर- 30.43 टक्के, नागपूर - 31.65 टक्के, नांदेड - 28.15 टक्के, नंदुरबार- 37.40 टक्के, नाशिक - 32.30 टक्के, उस्मानाबाद- 31.75 टक्के, पालघर - 33.40 टक्के, परभणी - 33.12 टक्के, पुणे - 29.03 टक्के, रायगड - 34.84 टक्के, रत्नागिरी - 38.52 टक्के, सांगली - 33.50 टक्के, सातारा - 34.78 टक्के, सिंधुदुर्ग - 38.34 टक्के, सोलापूर - 29.44, ठाणे - 28.35 टक्के, वर्धा - 35.55 टक्के, वाशिम - 29.31 टक्के, यवतमाळ - 34.10 टक्के

  8. स्वातंत्र्यसैनिक जी.जी. पारिख यांनी वयाच्या 103 व्या वर्षी केलं मतदान

    103 वय वर्ष असणारे स्वातंत्र्यसैनिक जी.जी. पारिख यांनी मलबार हिल मतदार संघात मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी गांधींच्या 'चले जाव' चळवळीमध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्याविषयी तुम्हाला इथे अधिक वाचता येईल.

  9. प्रकाश आंबेडकर यांनी बजावला मताधिकार

    वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर व नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी अकोल्यातील पोद्दार इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल, अकोला येथे मतदानाचा अधिकार बजावला.

  10. बारामतीमध्ये बोगस मतदानाचा आरोप अजित पवारांनी फेटाळला, युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केले आरोप

    दमदाटी करुन बोगस मतदान करायला लावलं जात असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे. शर्मिला पवार यांच्या आरोपांचा रोख अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर आहे.

    शर्मिला पवार या बारामतीतील शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई आहेत. त्यासोबतच, कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकीही अजित पवार गटाकडून दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

    मात्र, अजित पवार गटाच्या समर्थकांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

    गोंधळ झालेल्या ठिकाणी अजित पवार दाखल झाले.

    स्लीपवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला होता.

    याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, "स्लीपवर एका बाजूला चिन्ह असतंच. ते घरुन येताना फाडायचं असतं. हे आज नव्हे तर याआधीपासूनच केलं जातं. जास्तीतजास्त लोकांनी मतदान करावं. दुपारचा एक वाजला आहे, मात्र, मतांची टक्केवारी अजूनही कमी असल्याने अधिकाधिक लोकांनी घराबाहेर पडून मतदान करावं, असं आवाहन मी करतो. इथे कोणत्याही प्रकारचे बोगस मतदान झालेले नाही. हे आरोप खोटे आहेत."

    युगेंद्र पवार यांच्या समर्थकांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोपांवर ते म्हणाले की, "हा आरोप धादांत खोटा आहे. असा काही आरोप केला असेल तर इथे सीसीटीव्ही आहेत. निवडणूक आयोग बघेल. आजवर एवढ्या निवडणुका पार पाडल्या मात्र आमच्या कार्यकर्त्यांनी आजवर असे आरोप कधीही केलेले नाहीत. आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेचे आहोत, असे जीवे मारण्याचे आरोप आम्ही कधीही केले नाहीत आणि करणारही नाही."

  11. नांदगाव मतदारसंघात भुजबळ-कांदे समर्थकांमध्ये तणाव

    नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सुहास कांदे आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला.

    सुहास कांदे यांनी त्यांच्या कॉलेजवर ऊसतोड कामगारांना डांबून ठेवल्याचा आरोप समीर भुजबळ यांच्या समर्थकांनी केला.

    आमनेसामने आलेल्या दोन्ही बाजूच्या समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेतली.

  12. उद्धव ठाकरेंचं सहकुटुंब मतदान

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मतदान केलं.

  13. राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14 टक्के मतदान

    निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 18.14 टक्के मतदान झालं आहे.

    आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच 30 टक्के मतदान गडचिरोली जिल्ह्यात झालं आहे.

    राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे.

    अहमदनगर - 18.14 टक्के, अकोला - 16.35 टक्के, अमरावती - 17.45 टक्के, औरंगाबाद - 18.98 टक्के, बीड - 17.41 टक्के, भंडारा - 19.44 टक्के, बुलढाणा - 19.23 टक्के, चंद्रपूर - 21.50 टक्के, धुळे - 20.11 टक्के, गडचिरोली - 30 टक्के, गोंदिया - 23.32 टक्के, हिंगोली - 19.20 टक्के, जळगाव - 15.62 टक्के, जालना- 21.29 टक्के, कोल्हापूर - 20.59 टक्के, लातूर - 18.55 टक्के, मुंबई शहर- 15.78 टक्के, मुंबई उपनगर - 17.99 टक्के, नागपूर - 18.90 टक्के, नांदेड - 13.67 टक्के, नंदुरबार - 21.60 टक्के, नाशिक - 18.71 टक्के, उस्मानाबाद - 17.07 टक्के, पालघर - 19.40 टक्के, परभणी - 18.59 टक्के, पुणे - 15.64 टक्के, रायगड - 20.40 टक्के, रत्नागिरी - 22.93 टक्के, सांगली - 18.55 टक्के, सातारा - 18.72 टक्के, सिंधुदुर्ग - 20.91 टक्के, सोलापूर - 15.64, ठाणे - 16.63 टक्के,वर्धा - 18.86 टक्के, वाशिम - 16.22 टक्के,यवतमाळ - 16.38

  14. महाराष्ट्राचा निकाल काय असेल? जाणून घ्या या पाच राजकीय विश्लेषकांचं मत

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. मात्र, या निवडणुकीचा निकाल काय असेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे.

    महाराष्ट्रातील पाच प्रमुख राजकीय विश्लेषक तसेच ज्येष्ठ पत्रकारांकडून आम्ही हेच जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

    निखिल वागळे, सुहास पळशीकर, राही भिडे, गिरीश कुबेर आणि प्रकाश पवार यांनी काय विश्लेषण केलंय, ते इथे वाचा.

  15. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं मतदान

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब मतदान केलं.

    मतदानानंतर बोलताना ते म्हणाले की, "आज लोकशाहीचा पवित्र दिवस आहे. सर्वांनी मिळून या उत्सवात सहभागी झालं पाहिजे. यामुळे, महाराष्ट्र आणि लोकशाही मजबूत होईल. जो विकास थांबला होता, तो आम्ही सुरु केला. लाडकी बहिणसारख्या योजना आम्ही सुरु केल्या."

  16. सुप्रिया सुळेंवर बिटकॉईनवरून भाजपचे गंभीर आरोप, काय आहे प्रकरण?

    महाराष्ट्रात आज एकीकडे मतदान सुरू असताना, दुसरीकडे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर भाजपनं बिटकॉईनवरून गंभीर आरोप केले आहेत. मात्र, भाजपचे सर्व आरोप सुप्रिया सुळे यांनी फेटाळले असून, याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचंही सुळेंनी सांगितलंय.

    नेमकं काय प्रकरण आहे?

    पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा आणि अनेक आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केला आहे.

    त्यानंतर भाजपचे खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी मागणी केली की, "परदेशी चलनाचा वापर करून सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी निवडणुकीवर, मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी केली जावी."

    तसंच, भाजपने सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर केलेल्या आरोपानंतर यासंबंधीचे पुरावे म्हणून काही कॉल रेकॉर्डिंग्स आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट सादर केले आहेत.

    दरम्यान, भाजपच्या या आरोपानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावत, याविरोधात सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार दाखल केलीय. तसंच, सुधांशु त्रिवेदी यांना बदनामीची नोटीस पाठवणार असल्याची माहिती दिली.

    सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

    आज सकाळी मतदान केल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "काल अशा पद्धतीची फेक रेकॉर्डिंग माझ्याकडे आल्यानंतर मी लगेच सायबर विभागाकडे यासंदर्भातली तक्रार दाखल केली. भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप निराधार आहेत.

    "मी वकिलांतर्फे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. मी लोकसभेत अनेकवेळा बिटकॉइनच्या संपूर्ण यंत्रणेविरोधात भाषणं केली आहेत, त्यामुळे माझ्यावरच असे आरोप होणं हास्यास्पद आहे."

    देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

    सुप्रिया सुळे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत बोलताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बिटकॉइन, नाना पाटोलेंसंदर्भात मीडियात मी बघितलं आहे. या संदर्भात योग्य चौकशी झाली पाहिजे. काय खरं आहे, हे सर्वांसमोर आलं पाहिजे. आरोप खरंच गंभीर आहेत. गंभीर आरोपाची सखोल चौकशी होऊन त्यातून सत्य बाहेर येणं हा जनतेचा अधिकार आहे."

    सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, "व्हॉईस रेकॉर्डिंग हा सुप्रिया सुळेंचा असल्याचा जाणवत आहे. चौकशीनंतर 'दूध का दूध' होईल. बिटकॉइन हा विषय शेकडो करोडोंचा असून, तो विषय जनतेसमोर आला पाहिजे आणि या प्रकरणातला सत्यही लवकरात लवकर समोर आलं पाहिजे."

    जयंत पाटील काय म्हणाले?

    सुप्रिया सुळे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत बोलताना राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, "संपूर्ण महाराष्ट्राने या निवडणुकीत भाजपा काय करतंय, हे पाहिलं आहे. केवळ हे प्रकरण दडपण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्याबद्दलची क्लिप समोर आणली आहे. पण तो आवाज सुप्रिया सुळे यांचा नाही, त्यामुळे खोटंनाटं कुंभाड रचणं हे भाजपाचे वैशिष्ट्य झालं आहे."

  17. देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब केलं मतदान

    देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब मतदान केलं. यावेळी ते म्हणाले की, "मतदान हा उत्सव आणि आपलं कर्तव्य देखील आहे. तो आपला अधिकार आहे. मी आज कुटुंबासोबत मतदान केल आहे. महाराष्ट्रातील सर्व बंधू-भगिनी महाराष्ट्रातील जनतेला आव्हान आहे की सर्वांनी मतदान करा."

    "लोकसभा निवडणुकीवेळी मतदार याद्यांमध्ये घोळ होता. तो काही प्रमाणात दूर झालेला आहे. लोकसभेसारखं ऊन आज नाहीये; त्यामुळे निश्चित टक्का वाढेल, असंही ते म्हणाले.

  18. जयंत पाटील यांचं सहकुटुंब मतदान

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सहकुटुंब मतदान केलं. मतदानानंतर विनोद तावडे यांच्या कथित पैसे वाटप प्रकरणावरून भाजपावर टीका करताना ते म्हणाले की, "संपूर्ण महाराष्ट्राने या निवडणुकीत भाजप पक्ष काय करतोय हे पाहिलं आहे. केवळ हे प्रकरण दडपण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्याबद्दलची क्लिप समोर आणली आहे. पण तो आवाज सुप्रिया सुळे यांचा नाही. त्यामुळे खोटं नाटं कुंभाड रचणे हे भाजपाचे वैशिष्ट्य झालं आहे."

  19. तृतीयपंथी आणि वरिष्ठ नागरिकांचं मतदान

    नागपुरातील तृतीयपंथी आणि वरिष्ठ नागरिकांनी केलं मतदान

  20. ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात मतदान

    छत्रपती संभाजीनगरच्या डोनवडा गावातील मतदार