इस्रायलचे युद्धमंत्री बेनी गँट्झ यांनी राजीनामा दिला आहे.
हमासविरुद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर इस्रायलमध्ये नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील आपत्कालीन सरकार स्थापन करण्यात आलं आहे. त्यात बेनी गँट्झ युद्धमंत्री होते.
इस्रायल आणि हमास युद्धाबाबत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत मतभेद वाढल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचं गँट्झ यांनी म्हटलं आहे.
रविवारी (9 जून) तेल अवीव येथे पत्रकार परिषदेत गँट्झ यांनी राजीनाम्याची घोषणा केली. जड अंत:करणाने हा निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले.
"दुर्दैवानं नेतन्याहू आम्हाला सध्याचं संकट संपवण्यासाठी आवश्यक असलेला खरा विजय मिळविण्यापासून रोखत आहेत," असं गँट्झ म्हणाले.
गँट्झ यांना आगामी निवडणुकांमध्ये नेतान्याहूंचे संभाव्य प्रतिस्पर्धी मानले जातायत.त्यांनी नेतन्याहू यांना देशातील निवडणुकांची तारीख लवकर निश्चित करण्याचं आवाहनही केलं आहे.
युद्धमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर नेतान्याहू यांनी म्हटलं, "बेनी, ही मोहीम सोडण्याची वेळ नाही, ही वेळ सैन्यात सामील होण्याची आहे."
दरम्यान, इस्रायलचे विरोधी पक्षनेते यायर लिपिड यांनी सोशल मीडियावरून गँट्झ यांचं समर्थन केलं आहे.
लिपिड यांनी गँट्झ त्यांच्या निर्णयाला ‘आवश्यक आणि योग्य’ म्हटलं आहे.
गँट्झच्या राजीनाम्यानंतर लगेचच, अतिउजवे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन-गवीर यांनी युद्ध मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी केली आहे.
बेन-गवीर हे इस्रायमधील उजव्या विचारसरणीच्या आघाडीचे सदस्य आहेत.
इस्रायलनं अमेरिकेचा युद्धविराम प्रस्ताव मान्य केल्यास हे सरकार पाडण्याची धमकी बेन-गवीर यांनी दिली आहे.