'शिवसेनेबरोबर दुजाभाव झाला', शिंदे गटाचे खासदार बारणेंनी व्यक्त केली नाराजी

महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स आपण या पेजवरून जाणून घेणार आहोत.

थोडक्यात

  • मुंबई परिसरात 9 जूनच्या रात्री मुसळधार सरी बरसल्या. मान्सून शहरात दाखल झाल्यावर पहिल्याच दिवशी एवढा पाऊस झाला.
  • जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर बस दरीत कोसळली, 9 भाविकांचा मृत्यू
  • नरेंद्र मोदींनी काल (9 जून) घेतली पंतप्रधानपदाची शपथ, नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश
  • राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 25 वा वर्धापन दिन, शरद पवार गट अहमदनगरमध्ये, तर अजित पवार गट मुंबईत साजरा करणार

लाईव्ह कव्हरेज

गणेश पोळ

  1. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन

    अमोल काळे

    फोटो स्रोत, @MumbaiCricAssoc

    मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन झालं आहे. न्यूयॉर्कमध्ये असताना हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचं निधन झालं आहे.

    मुंबई क्रिकेट संघटनेनं एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत काळे यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

    अमेरिकेमध्ये सध्या टी 20 क्रिकेट विश्वचषकाचे सामने सुरू आहेत. त्यानिमित्ताने अमोल काळे न्यूयॉर्कला गेले होते, अशी माहिती मिळाली आहे. त्याठिकाणी हृदयविकाराचा धक्का आल्यानं त्यांचं निधन झालं.

    रवी शास्त्री यांनीही एक्सवर पोस्ट करत अमोल काळेंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

  2. रक्षा खडसेंना युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्रिपद; 23 व्या वर्षी सरपंच ते केंद्रात राज्यमंत्री

  3. नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, पाहा कुणाला मिळाले कोणते खाते?

  4. शाहबाज शरीफ यांच्यानंतर नवाझ शरीफ यांनीही पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले

    नवाज शरीफ आणि नरेंद्र मोदी.

    फोटो स्रोत, INDIAN PRESS INFORMATION OFFICE/ANADOLU AGENCY/GETTY IMAGES

    पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यानंतर त्यांचे मोठे भाऊ आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीही सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहे.

    नवाझ शरीफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या.

    "निवडणुकीत तुमच्या पक्षाला मिळालेल्या यशावरून तुमच्या नेतृत्वावरील लोकांचा विश्वास दिसतो. त्यामुळं द्वेषाऐवजी आशेचा मार्ग अवलंबत या संधीचा वापर दक्षिण आशियातील दोन अब्ज लोकांच्या भवितव्याला आकार देण्यासाठी करुया," असं या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे.

    रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 72 सदस्यीय मंत्रिमंडळासह तिसऱ्यांदा शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पाकिस्तान वगळता भारताच्या सर्व शेजारी देशांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

    एक्स पोस्ट

    फोटो स्रोत, X@NAWAZSHARIFMNS

  5. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, कुणाला मिळाले कोणते खाते ?

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात कुणाला कोणते खाते दिले हे स्पष्ट करण्यात आले आहे.

    राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण खाते आहे, अमित शाह यांना गृह मंत्रालय आणि सहकार खाते देण्यात आले आहे. निर्मला सीतारामन या पुन्हा एकदा अर्थ मंत्री झाल्या आहेत. नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक खाते आहे. एस. जयशंकर हे पुन्हा परराष्ट्र मंत्री बनले आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे कृषी आणि ग्रामविकास खाते आहे.

    भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना आरोग्य आणि केमिकल्स, खते ही दोन खाती आहेत.

  6. केरळमधील भाजपच्या एकमेव खासदारांनी मोदी सरकार सोडण्याचं वृत्त नाकारलं

    सुरेश गोपी आणि नरेंद्र मोदी

    फोटो स्रोत, X@THESURESHGOPI

    केंद्रीय मंत्री आणि अभिनेते सुरेश गोपी यांनी सोमवारी त्यांच्याबाबतचे माध्यमांतून समोर येणाऱ्या बातम्या फेटाळून लावल्या. या रिपोर्ट्समध्ये गोपी हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारमधून वेगळं होऊ इच्छित असल्याचे दावे करण्यात येत होते.

    सरकारच्या मंत्रिमंडळातील समावेश आणि केरळचं प्रतिनिधित्व ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं, सुरेश गोपींनी फेसबूकवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

    रविवारी रात्री त्यांनी माध्यमांमध्ये एक प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर गोपी यांनी सोशल मीडियावर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

    गोपी यांनी त्यांना चित्रपटांत आणखी काम करण्याची इच्छा असल्याचं सांगत जबाबदारीतून लवकर मुक्त करावं असं म्हटल्याचे दावे माध्यमांतून करण्यात आले होते. पीटीआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

    गोपी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते राजीनामा देणार असल्याचं वृत्त पूर्णपणे खोटं असल्याचं म्हटलं आहे.

    काँग्रेसनंही याबाबतची एक न्यूज क्लिप पोस्ट केली होती. तसंच भाजपकडून खासदारांना नेमकं काय करायचं आहे हे आधी विचारलं जात नाही का? असा प्रश्नही उपस्थित केला होता.

    काँग्रेसची पोस्ट

    फोटो स्रोत, X@INCKERALA

  7. गाझामध्ये शस्त्रसंधीच्या प्रयत्नांना वेग, अँटनी ब्लिंकन इजिप्तला पोहोचले

    अँटनी ब्लिंकन

    फोटो स्रोत, REUTERS/HANNAH MCKAY

    अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन इजिप्तमध्ये पोहोचले आहेत. गाझा युद्ध सुरू झाल्यापासूनचा हा त्यांचा आठवा दौरा आहे.

    या तीन दिवसीय दौऱ्यातील अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांचा पहिला मुक्काम इजिप्तमध्ये आहे. ब्लिंकन यांच्या दौऱ्याचा उद्देश गाझामधील शस्त्रसंधीच्या प्रयत्नांना पाठिंबा मिळणं हा आहे.

    भेटीदरम्यान अँटनी ब्लिंकन शांतता कराराचा मसुदा स्वीकारण्यासाठी हमासवर दबाव टाकावं यासाठी अरब जगतातील नेत्यांना आवाहन करणार आहेत.

    गेल्या महिन्याच्या अखेरीस अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शांतता कराराच्या मसुद्याला अंतिम रूप देण्याची घोषणा केली होती.

    ब्लिंकन सोमवारी इस्रायलला पोहोचणार आहेत. त्याठिकाणी ते पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेणार आहेत.

    अमेरिका बेंजामिन नेतन्याहू यांच्याबाबत काहीप्रमाणात निराश असल्याचं, दौऱ्यात त्यांच्याबरोबर असलेल्या बीबीसीच्या प्रतिनिधीनं सांगितलं.

  8. शाहू महाराज छत्रपतींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

    शाहू महाराज आणि उद्धव ठाकरे

    फोटो स्रोत, @ShivSenaUBT_

    कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.

    उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी त्यांची भेट झाली. शाहू महाराज यांच्याबरोबर यावेळी कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील हेदेखिल उपस्थित होते.

    महाविकास आघाडीकडून कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.

    कोल्हापूरचा मतदारसंघ पारंपरिकपणे शिवसेनेचा मतदारसंघ होता. पण शाहू महाराज यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय झाल्यानंतर शिवसेनेनं त्यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडला होता.

    कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या प्रचारसभेलाही उद्धव ठाकरे आवर्जून उपस्थित राहिले होते.

    शाहू महाराज

    फोटो स्रोत, @ShivSenaUBT_

  9. सोनिया, राहुल गांधींनी घेतली शेख हसिना यांची भेट

    शेख हसिना यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी

    फोटो स्रोत, @INCIndia

    काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची भेट घेतली.

    यावेळी सोनिया गांधी यांच्याबरोबर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांचीही उपस्थिती होती.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शेख हसिना यांचं भारतात आगमन झालं आहे.

    या शपथविधी सोहळ्यासाठी सार्क देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

  10. मंत्रिपदावरून एनडीएत खदखद, शिंदे गटाचे बारणे म्हणतात-'शिवसेनेबरोबर दुजाभाव'

    श्रीरंग बारणे

    केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर एनडीएच्या घटकपक्षातील नाराजी समोर यायला सुरुवात झाली आहे. विशेषतः शिंदे गटातील श्रीरंग बारणेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.

    मंत्रिपद वाटपात शिवसेनेला फक्त राज्यमंत्रिपद देऊन दुजाभाव करण्यात आला, असं म्हणत बारणे यांनी नाराजी थेटपणे बोलून दाखवली.

    "शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता, आम्हाला कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवं होतं", असं श्रीरंग बारणे यांनी म्हटलं आहे.

    एनडीए मधील एक-एक खासदार निवडून आलेल्या इतर घटक पक्षांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं.मग शिंदे गटाबाबत भाजपने हा दुजाभाव का केला? असा सवालही बारणे यांनी उपस्थित केला.

    कुटुंबाचा विरोध पत्करून महायुतीत आलेल्या अजित पवारांनादेखिल एक मंत्रिपद द्यायला हवं होतं, असंही बारणेंनी म्हटलं आहे. तसंच भाजपनं साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनाही मंत्रिपद द्यायला हवं होतं, असंही बारणे म्हणाले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 71 मंत्र्यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात महाराष्ट्राच्या सहा मंत्र्यांचा समावेश असून शिंदे गटाला फक्त एक स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे.

  11. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना कोणतं मंत्रिपद हवं आहे?

    लोकसभा निवडणुकीत पुण्यातून मुरलीधर मोहोळ हे निवडून आलेले आहेत. रविवारी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. या मंत्रिमंडळात मोहोळ यांना राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली.

    ज्या खात्याची जबाबदारी मिळेल त्या माध्यमातून विकासाची कामं करण्याबरोबरच पुण्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

    व्हीडिओ कॅप्शन, मुरलीधर मोहोळ यांना कोणतं मंत्रीपद हवं आहे?
  12. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केले मोदींचे अभिनंदन

    शाहबाझ शरीफ

    फोटो स्रोत, GETTY IMAGES

    पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान बनल्याबद्दल अभिनंदन केलं आहे.

    "भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन," असं त्यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिलं.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अद्याप खातेवाटप मात्र झालेलं नाही.

    नवीन सरकारमध्ये 27 मंत्री इतर मागासवर्गीय, 10 मंत्री अनुसूचित जाती, 5 अनुसूचित जमाती आणि 5 मंत्री अल्पसंख्याक गटातील आहेत. पण मुस्लिमांना सरकारमध्ये प्रतिनिधित्व नाही.

    कॅनडाचे पीएम ट्रूडोंच्या अभिनंदनावर मोदींची प्रतिक्रिया

    कॅनडाचे पंतप्रधान यांनीही गेल्या आठवड्यात मोदींचं अभिनंदन केलं होतं. 'मानवी हक्क आणि कायद्याचं राज्य' अशा शब्दांचा वापर करत ट्रुडोंनी शुभेच्छा दिल्या.

    त्यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर दिलं आहे.

    जस्टीन ट्रुडो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.

    फोटो स्रोत, GETTY IMAGES

    “शुभेच्छांबाबत कॅनडाच्या पंतप्रधानांचे आभार. भारत एकमेकांच्या समस्यांसंदर्भात कॅनडासोबत काम करण्यास भारत उत्सुक आहे," असं मोदींनी एक्सवर लिहिलं होतं.

    कॅनडात हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून गेल्या वर्षभरापासून दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत.

  13. कोकणाला पुढच्या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट, विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

    नैऋत्य मान्सून आता नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

    मान्सूनची उत्तरेकडची सीमा डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, निझामाबाद, सुकमा, मलकानगिरी, विझिनाग्राममधून आणि बंगालच्या इस्लामपूरमधून जाते.

    मान्सून

    पुढच्या दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात आणखी आगेकूच करेल आणि गुजरातमध्ये दाखल होईल अशी अपेक्षा आहे. 9 आणि 10 जूनला मुंबई परिसरात सर्वदूर पाऊस झाला. दहा तारखेला सकाळच्या आकडेवारीनुसार पनवेलमध्ये 24 तासांत 147 मिलीमीटर पाऊस झाला.

    मुंबई शहरात, विशेषतः दक्षिण मुंबईत काही ठिकाणी 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.

    पुढील दोन दिवसांत कोकणातील काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढेल अशी अपेक्षा आहे.

    मान्सून

    पुढच्या चोवीस तासांत कोंकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    मुंबई शहरात साधारणपणे ढगाळ आकाश आणि शहर आणि उपनगरात गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

  14. माझ्या निवडणुकीत मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा झाला - कल्याण काळे

    मनोज जरांगे

    फोटो स्रोत, Facebook/Manoj Jarange

    जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवेंना पराभूत करणाऱ्या कल्याण काळेंनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली.

    निवडून आल्यानंतर जरांगे पाटील यांची भेट घ्यावी, या उद्देशाने आंतरवालीमध्ये आलो होतो, अशी प्रतिक्रिया कल्याण काळेंनी दिली.

    कल्याण काळे म्हणाले, "माझ्या मतदारसंघात जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला माझा पाठिंबा राहील."

    जरांगे पाटील यांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार असल्याचंही खासदार काळे म्हणाले.

    काळे म्हणाले, "माझ्या निवडणुकीत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा झाला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे जरांगे पाटील आणि आंदोलनाच्या विरोधात बोलले असतील तर ते चुकीचे आहे."

  15. फ्रेन्च ओपनमध्ये स्पेनच्या कार्लोस अल्काराझनं पटकावलं पुरुष एकेरीत विजेतेपद

    फ्रेन्च ओपनमध्ये स्पेनच्या कार्लोस अल्काराझनं पुरुष एकेरीत विजेतेपद पटकावलं. 9 जूनला झालेल्या फायनलमध्ये अल्काराझनं जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हला 6–3, 2–6, 5–7, 6–1, 6–2 असं हरवलं.

    अल्काराझनं पहिल्यांदाच फ्रेन्च ओपन जिंकलं असून, त्याचं हे कारकीर्दीतलं तिसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. क्ले कोर्ट आणि फ्रेन्च ओपनवर अधिराज्य गाजवणारा राफेल नदाल यंदा स्पर्धेच्या सुरुवातीलाच बाद झाला होता, पण त्याच्याच देशाच्या अल्काराझनं हे विजेतेपद मिळवलं.

    फ्रेंच ओपन

    त्याआधी शनिवारी पोलंडच्या इगा स्वियातेकनं महिला एकेरीत विजेतेपदाची ट्रॉफी जिंकली. तिनं फायनलमध्ये इटलीच्या जास्मिन पॉलिनीवर 6–2, 6–1 अशी मात केली.

    इगा स्वियातेकचं हे फ्रेन्च ओपनमधलं सलग तिसरं आणि एकूण चौथं विजेतेपद आहे. तिच्या खात्यात आता एकूण पाच ग्रँड स्लॅम विजेतीपदं जमा आहेत.

    फ्रेंच ओपन
  16. इस्रायलच्या युद्ध मंत्र्यांचा राजीनामा, पंतप्रधान नेतन्याहूंशी मतभेदाची चर्चा

    इस्रायलचे युद्धमंत्री बेनी गँट्झ यांनी राजीनामा दिला आहे.

    हमासविरुद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर इस्रायलमध्ये नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील आपत्कालीन सरकार स्थापन करण्यात आलं आहे. त्यात बेनी गँट्झ युद्धमंत्री होते.

    इस्रायल आणि हमास युद्धाबाबत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत मतभेद वाढल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचं गँट्झ यांनी म्हटलं आहे.

    रविवारी (9 जून) तेल अवीव येथे पत्रकार परिषदेत गँट्झ यांनी राजीनाम्याची घोषणा केली. जड अंत:करणाने हा निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले.

    "दुर्दैवानं नेतन्याहू आम्हाला सध्याचं संकट संपवण्यासाठी आवश्यक असलेला खरा विजय मिळविण्यापासून रोखत आहेत," असं गँट्झ म्हणाले.

    गँट्झ यांना आगामी निवडणुकांमध्ये नेतान्याहूंचे संभाव्य प्रतिस्पर्धी मानले जातायत.त्यांनी नेतन्याहू यांना देशातील निवडणुकांची तारीख लवकर निश्चित करण्याचं आवाहनही केलं आहे.

    युद्धमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर नेतान्याहू यांनी म्हटलं, "बेनी, ही मोहीम सोडण्याची वेळ नाही, ही वेळ सैन्यात सामील होण्याची आहे."

    इस्रयल

    फोटो स्रोत, Getty Images

    दरम्यान, इस्रायलचे विरोधी पक्षनेते यायर लिपिड यांनी सोशल मीडियावरून गँट्झ यांचं समर्थन केलं आहे.

    लिपिड यांनी गँट्झ त्यांच्या निर्णयाला ‘आवश्यक आणि योग्य’ म्हटलं आहे.

    गँट्झच्या राजीनाम्यानंतर लगेचच, अतिउजवे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन-गवीर यांनी युद्ध मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी केली आहे.

    बेन-गवीर हे इस्रायमधील उजव्या विचारसरणीच्या आघाडीचे सदस्य आहेत.

    इस्रायलनं अमेरिकेचा युद्धविराम प्रस्ताव मान्य केल्यास हे सरकार पाडण्याची धमकी बेन-गवीर यांनी दिली आहे.