डोनाल्ड ट्रंप तुरुंगात गेले तरी ते निवडणूक लढणार असल्याची घोषणा
आजपासून अमेरिकेत T-20 वर्ल्ड कप सुरू होत आहे.
देशातील मतदान आता संपले असून 4 जून रोजी निकाल लागणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. अंतरिम जामिनाचा कालावधी संपला असून रविवारी (02 जून) त्यांना पुन्हा तिहार तुरुंगात जावं लागणार आहे.
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. सरकार बनवण्यासाठी त्यांना आता इतर पक्षांसोबत आघाडी करावी लागणार आहे.
संजय राऊत म्हणाले, "एक्झिट पोल हा पैश्यांचा खेळ, इंडिया आघाडी महाराष्ट्रात 35 जागा जिंकणार."
कर्नाटकात बंगळुरूसह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली असून, 2 जूननंतर दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
लाईव्ह कव्हरेज
'या' भारतीय बॉक्सरना मिळालं पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट
फोटो स्रोत, SAI MEDIA
फोटो कॅप्शन, अमित पंघाल आणि जास्मिन लांबोरिया
भारतीय बॉक्सर अमित पंघाल आणि जास्मिन लांबोरिया यांची पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे.
जागतिक पात्रता स्पर्धेत 51 किलो वजनी गटात अमित पंघालने चीनच्या चुआंग लिऊचा 5-0 असा पराभव केला, तर जास्मिन लांबोरियाने 57 किलो वजनी गटात हा मरीनचा 5-0 असा पराभव करून पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे.
भारताच्या सचिन सिवाचने देखील 57 किलो वजनी गटात पॅरिस ऑलिम्पिकसाठीची जागा पक्की केली आहे.
याआधी भारताकडून निशांत देव (71 किलो), निखत जरीन (50 किलो), प्रीती पवार (54 किलो) आणि लव्हलिना बोरगोहेन (75 किलो) हे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.
निकालापूर्वी 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट
फोटो स्रोत, ANI
फोटो कॅप्शन, निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी माध्यमांशी बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आहे.
निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी, सलमान खुर्शीद, द्रमुकचे टीआर बालू, डाव्या पक्षाचे सीताराम येचुरी आणि डी राजा यांचाही समावेश होता.
निवडणूक आयोगासमोर ईव्हीएम मोजणी, पोस्टल बॅलेट आणि निवडणूक निकालांशी संबंधित मुद्दे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मांडले.
निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, "पहिला मुद्दा पोस्टल मतदानाचा आहे, ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. पोस्टल मतदान निकालात निर्णायक ठरतात, म्हणून निवडणूक आयोगाने पोस्टल मतदानाची मोजणी आधी करण्याची तरतूद केलेली आहे."
अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, "निवडणूक आयोगाने 2019 च्या मार्गदर्शक तत्त्वांमधून पोस्टल मतमोजणीचा हा नियम काढून टाकला आहे. त्यामुळे ईव्हीएमचं संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतरही पोस्टल बॅलेटची मोजणी शेवटपर्यंत घोषित करणे आता बंधनकारक नाही. त्यामुळे पोस्टल मतदानाची मोजणी आधी होणं अनिवार्य आहे."
याशिवाय मतमोजणीवेळी कडक देखरेख ठेवण्याची मागणीही या नेत्यांनी केली आहे.
अरविंद केजरीवाल दिल्लीच्या तिहार तुरुंगात परतले
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी 21 दिवसांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर रविवारी (२जून) दिल्लीच्या तिहार तुरुंगात जाऊन आत्मसमर्पण केलं.
याबाबत बोलताना दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी म्हणाल्या की, "निवडणुका हा लोकशाहीचा पाया आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना 21 दिवसांचा जामीन दिला होता. न्यायालय आणि संविधानाचा आदर करत केजरीवाल यांनी ठरलेल्या तारखेला आत्मसमर्पण केलं आहे."
फोटो स्रोत, X/Arvind Kejriwal
केजरीवाल यांच्या तब्येतीबाबत बोलताना आतिशी म्हणाल्या की, "त्यांची प्रकृती ठीक नाही हे खरं आहे. त्यांच्या शरीरातली केटोनची पातळी खूप वाढली आहे, त्यांचं वजनही सहा किलोने कमी झालं आहे पण आमच्या पक्षातला एकही नेता तुरुंगात जायला घाबरत नाही."
अरविंद केजरीवाल दिल्लीतल्या कथित मद्य धोरणाशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी तुरुंगवास भोगत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 10 मे 2024 रोजी केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता.
फोटो स्रोत, ANI/X
केजरीवालांनी निवडणूक प्रचारात सहभागी होण्यासाठी काही दिवसांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. मतदान संपल्यानंतर त्यांना आत्मसमर्पण करावं लागेल असं न्यायालयाने सांगितलं होतं.
1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीची कोल्हापुरातील कळंबा जेलमध्ये हत्या
कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या दोन गटात झालेल्या मारहाणीत एका कैदाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.
मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता असे हत्या झालेल्या कैद्याचे नाव असून, तो 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी होता.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता हा मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटामधील आरोपी होता. सध्या तो कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
आज (2 जून) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारागृहातील कैदी हौदावर आंघोळ करण्यासाठी गेले असता. यावेळी येथील न्यायालयीन कोठडीत असलेले प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत,संदीप शंकर चव्हाण,ऋतुराज विनायक इनामदार,सौरभ विकास सिद्ध या पाच आरोपींनी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता यांच्यात वाद झाला,
ज्यातून मारामारी सुरू झाली.
यावेळी यातील एका आरोपीने ड्रेनेजवरील असणारे लोखंडी झाकण उचलून थेट
मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता याच्या
डोक्यात घातले ,ज्यामध्ये तो जागीच ठार झाला आहे.सदर घटनेमुळे कारागृहामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या हत्येच्या घटनेनंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सदर खुनाच्या घटनेची नोंद झाली आहे.
जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "सकाळच्या सुमारास आंघोळीसाठी सर्व कैदी गेले असता, त्या ठिकाणी मयत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता आणि 5 कैद्यांमध्ये मारामारी झाली, ज्यातून
ही घटना घडली आहे.
घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येत आहे,त्याचबरोबर 5 संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून नेमका ही हत्या कोणत्या कारणातून झाली,
याचा तपास सुरू असल्याचं पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले आहे.
उत्तरेत होरपळ तर दक्षिणेत पावसाचं आगमन, यापुढे मान्सूनची वाटचाल कशी राहील?
दक्षिणेत मान्सूनमुळे पाऊस आणि उत्तरेत उष्णतेची लाट, अशी स्थिती सध्या भारतात परिस्थिती दिसून येते आहे. मान्सून कुठे पोहोचला आहे, पुढच्या काही दिवसांसाठी हवामानाचा अंदाज काय सांगतो जाणून घेऊयात.
नैऋत्य मोसमी वारे पुढच्या दोन तीन दिवसांत आणखी आगेकूच करतील.
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार अरबी समुद्र, कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेशचा किनारी भाग तसंच बंगालच्या उपसागरात आणखी पुढे सरकतील.
कर्नाटकात बंगळुरूसह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली असून, 2 जूननंतर दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
फोटो स्रोत, IMD
तीन जूनसाठी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातुर, नांदेड तसंच विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत वादळी वारा आणि पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर उत्तर कोकणात ठाणे आणि पालघरमध्ये उष्णतेसाठी यलो अलर्ट आहे.
दरम्यान, वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेच्या लाटेची तीव्रता थोडीशी कमी झाली आहे, तरी इथे पुढचे तीन दिवस उन्हाचा तडाखा जाणवेल, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
उष्णतेमुळे उत्तर भारतात हिमालयीन प्रदेशातील जंगलांमध्ये अनेक ठिकाणी वणवे पेटत आहेत. गेल्या दोन तीन दिवसांत हिमाचल प्रदेशात शिमलाच्या आसपास तर जम्मू काश्मिरमध्येही मोठे वणवे पेटले. या आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलं, वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासन प्रयत्न करत आहे.
फोटो स्रोत, IMD
उन्हाळ्याच्या दिवसांत कडक उष्णतेच्या काळात अशा आगी लागण्याचं प्रमाण वाढतं. यंदा किती दिवस अशी उष्णतेची लाट होती, याची आकडेवारी हवामान विभागानं जाहीर केली आहे.
जास्त काळ राहणाऱ्या उष्णतेच्या लाटेकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला हवं असं तज्ज्ञांना वाटतं.
एक्झिट पोलच्या अंदाजांवर संजय राऊत काय म्हणाले?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी असा दावा केला आहे की, इंडिया आघाडीला महाराष्ट्रात कमीत कमी 35 जागा मिळतील.
एक्झिट पोलचे अंदाज धुडकावून लावत राऊत म्हणाले की, "एक्झिट पोल हा पैश्यांचा खेळ आहे."
संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, "आपले पंतप्रधान दहा दहा कॅमेरे लावून जी ध्यानधारणा करत आहेत, त्याच कॅमेऱ्यांचा आकडा हा एक्झिट पोलमध्ये आलेला दिसतो आहे.
"एक्झिट पोल, ओपिनियन पोल हे सगळे कॉर्पोरेट खेळ आहेत. तुम्ही पुरेसे पैसे फेकले की तुम्हाला हवा तो आकडा काढला जाईल. उद्या आमची सत्ता आली की आमच्याकडेही पैसे असतील, आम्हीदेखील आम्हाला हवा तो आकडा अशा पोल्समधून काढू शकू."
राऊत म्हणाले की, "देशात 295 ते 310 जागा मिळवून इंडिया आघाडी सत्तेत येईल. एक्झिट पोलमधून जे आकडे समोर आले आहेत हा निव्वळ व्यवसाय आहे. कारण हे लोक काही स्वयंसेवी संस्था चालवत नाहीत, त्यांना जसे आणि जिथून पैसे मिळतात तसे अंदाज ते लावत असतात."
फोटो स्रोत, @RAUTSANJAY61
सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून निकाल बदलण्याचा प्रयत्न सरकारकडून होऊ शकतो असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले की, "काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी कालच अशी माहिती दिली आहे की गृहमंत्री अमित शहा यांनी आतापर्यंत 150 हून अधिक जिल्हाधिकाऱ्यांना फोन केले आहेत. त्यांना नेमकं काय करायचं आहे? अधिकाऱ्यांना, निवडणूक कर्मचाऱ्यांना धमकावून, घाबरवून निवडणूक निकाल बदलायचे आहेत का? मतमोजणीत फेरफार करून त्यांना विजय मिळवायचा आहे का?"
"आम्ही प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. देशात इंडिया आघाडीचंच सरकार येईल. महाराष्ट्रात आम्ही 35 पेक्षा जास्त जागी विजयी होऊ."
शनिवारी (1 जून) मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलवर भाष्य करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा 'मोदी मीडिया पोल' असल्याचं म्हटलं.
सध्या बहुतांश न्यूज टीव्ही चॅनेल्सच्या एक्झिट पोलनुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 543 पैकी 350 पेक्षा जास्त जागा मिळतील.
पत्रकारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एक्झिट पोलबद्दल विचारले असता ते म्हणाले, “याचे नाव एक्झिट पोल नाही, हा मोदी मीडिया पोल आहे, हा मोदीजींचा पोल आहे, हा त्यांच्या कल्पनेचा कौल आहे.”
जेव्हा पत्रकारांनी राहुल गांधींना विचारले की INDIA आघाडीला किती जागा मिळतील? तेव्हा ते म्हणाले, “तुम्ही सिद्धू मुसेवालाचं गाणे ऐकलंय का? 295”
दिवंगत गायक सिद्धू मुसेवाला यांनी 295 नावाचे गाणे रिलीज केले होते.
राहुल गांधी यांच्या दाव्यानुसार, INDIA आघाडीला 295 जागा मिळतील
विरोधी नेत्यांनी एक्झिट पोल नाकारले आहेत आणि 4 जून रोजी येणाऱ्या निकालांमध्ये INDIA आघाडीने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे.
7 टप्प्यातील मतदानानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सत्ता मिळवतील, असे सर्व एक्झिट पोल सध्या दाखवतायत.
T20 World Cup : अमेरिकेची कॅनडावर सात विकेट राखून मात
फोटो स्रोत, Getty Images
टीम यूएसएनं कॅनडाला सात विकेट राखून हरवलं आणि ट्वेन्टी20 विश्वचषक 2024 ची दणक्यात सुरुवात केली.
टेक्सास राज्यातल्या डलास इथे खेळवल्या गेलेल्या सामन्यात कॅनडानं 20 षटकांत पाच बाद 194 रन्सची मजल मारली होती.
विजयासाठी 195 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएसएचा उपकर्णधार अॅरॉन जोन्स आण अँड्रीज गाऊस यांनी तुफान फलंदाजी केली आणि तिसऱ्या विकेटसाठी 131 रन्सची भागीदारी केली.
गाऊसनं 65 रन्स केल्या तर अॅरॉन जोन्सनं नाबाद 94 रन्स केल्या आणि अमेरिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. जोन्सनं या खेळीदरम्यान दहा षटकार ठोकले.
या विश्वचषकाचे सहयजमान असलेल्या अमेरिकेचा हा पहिलाच वर्ल्ड कप सामना होता.
डोनाल्ड ट्रंप तुरुंगात गेले तरी ते निवडणूक लढणारच?
फोटो स्रोत, Reuters
न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक खटल्यात दोषी ठरल्यानंतरही डोनाल्ड ट्रंप यांचा अमेरिकेतील सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचार सुरूच राहणार आहे.
ट्रंप यांच्या वकिलाने बीबीसीला ही माहिती दिली आहे
न्यूयॉर्कमधील कोर्टाने ट्रंप यांना 2016 च्या निवडणूक प्रचारापूर्वी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला लाच देण्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.
एखाद्या गुन्ह्यात दोषी आढळलेले ट्रंप हे अमेरिकचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत.
मात्र, हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असून न्यायालयीन कामकाजात फसवणूक झाल्याचे ट्रंप यांचा दावा आहे.
ट्रंप यांच्या वकील अलिना हुब्बा यांनी बीबीसीला सांगितलं की, ट्रंप हे 'राजकीय आणि निवडक खटल्याचा बळी ठरले आहेत.'
मॅनहॅटन न्यायालयात 7 आठवड्यांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर, डोनाल्ड ट्रंप हे एकूण 34 आरोपांमध्ये दोषी आढळले आहेत.
ट्रंप यांना 11 जुलै रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पण, त्याआधी आपण कोर्टात या निर्णयाविरोधात अपील करणार असल्याचे ट्रंप यांनी म्हटलं आहे.
या दरम्यान ट्रंप यांना तुरुंगवास झाला तरीही ते नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवारी कायम ठेवतील, असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं आहे.
ऋषभ पंत रिटायर्ड आऊट, क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याच्या 'या' आहेत 11 पद्धती
नमस्कार
बीबीसी मराठीच्या या पेजवर आपले स्वागत आहे. देश विदेशातील ताज्या घडामोडी तुम्हाला या पानावर पाहायला मिळतील.