दिनेश कार्तिकची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

लोकसभा निवडणूक 2024 साठीचं मतदान पार पडलं आहे. आता सगळ्यांना प्रतिक्षा निकालाची आहे. या घडामोडींच्या अपडेटसह इतर बातम्या आपण इथून जाणून घेणार आहोत.

थोडक्यात

  • लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सकाळीच मतदानाला सुरुवात झाली आहे.
  • सलमान खानवर आणखी एका हल्ल्याच्या कट उघड, चौघांना अटक केल्याचा पोलिसांचा दावा
  • फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी चीनला दक्षिण चीन सागरात आपली सीमा ओलांडू नये असं सांगितलं आहे.
  • बायडेन यांनी जाहीर केला गाझातील युद्ध थांबवण्यासाठीचा इस्रायलचा प्रस्ताव
  • हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातील भाजप उमेदवार कंगना रनोतनं हिमाचल प्रदेशात मोदींची लाट असल्याचं म्हटलं आहे.
  • पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईलाही पोलिसांनी अटक केली आहे.
  • देशीतील 57 लोकसभा मतदारसंघांमध्ये सातव्या टप्प्यातील मतदान सुरू झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात यावेळी इंडिया आघाडीचं सरकार येणार असल्याचा दावा केला आहे.
  • सुप्रीम कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाची मुदत वाढवून देण्यास नकार दिल्यानंतर आता त्यांना 2 जूनला तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागणार आहे.

लाईव्ह कव्हरेज

आशय येडगे

  1. टी-20 वर्ल्डकप : भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडशी

    ट्वेन्टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात यूएसए आणि कॅनडामध्ये लढत आहे.

    भारतीय वेळेनुसार 2 जूनला पहाटे 6 वाजता ही लढत रंगेल. तर भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडशी होईल.

    टी 20 वर्ल्डकप
  2. भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची निवृत्तीची घोषणा

    दिनेश कार्तिक

    फोटो स्रोत, Getty Images

    भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

    शनिवारी (1 जून)ला दिनेश कार्तिकने सोशल मीडियावर पोस्ट करून निवृत्तीची घोषणा केली आहे.

    दिनेश कार्तिकने वयाच्या 19 व्या वर्षी सप्टेंबर 2004 मध्ये भारताकडून पदार्पण केले होते. वीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीला अखेर त्याने आता पूर्णविराम दिला आहे.

    2024 च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याने खेळलेला सामना हा त्याचा शेवटचा क्रिकेट सामना ठरेल.

    एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निवृत्तीची घोषणा करताना दिनेश कार्तिकने लिहिलं की, “गेल्या काही दिवसांत मला मिळालेली आपुलकी, पाठिंबा आणि प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. मला हा अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या माझ्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार. मी बराच काळ निवृत्तीचा विचार करत होतो आणि आता अखेर मी प्रातिनिधिक क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मी अधिकृतपणे माझ्या निवृत्तीची घोषणा करत आहे. आता मी क्रिकेट खेळताना दिसणार नाही, भावी आयुष्यात येणाऱ्या नवनवीन आव्हानांसाठी मी स्वतःला तयार करणार आहे."

    दिनेश कार्तिकचं पत्र

    फोटो स्रोत, DineshKarthik/X

    “मी माझे सर्व प्रशिक्षक, कर्णधार, निवड समितीचे सदस्य, संघातील सहकारी आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्यांचे आभार मानतो. या सगळ्यांच्या सहकार्याने माझा प्रवास आनंददायी बनवला. आपल्या देशात लाखो लोक क्रिकेट खेळतात त्यापैकी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेल्या नशीबवान लोकांपैकी मी एक आहे."

    दिनेश कार्तिकने 26 कसोटी, 94 वनडे आणि 60 टी-20 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. दिनेशने आयपीएलमध्ये एकूण सहा संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. आयपीएलमध्ये त्याने 145 झेल आणि 37 स्टंपिंगसह 17 हंगामात जवळपास 5000 धावा केल्या आहेत.

  3. खरगे म्हणतात, 'इंडिया आघाडी किमान 295 जागा जिंकेल'

    लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

    मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "आज आमची बैठक झाली. कमीत कमी अडीच तास आम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. विशेषकरून निवडणुका आणि निवडणुकीच्या काळात कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात आणि काय होऊ शकतं याविषयीची तयारी करण्यासाठी आज आम्ही सविस्तर चर्चा केली आणि मतमोजणीच्या दिवशी आमच्या कार्यकर्त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे यावर आम्ही चर्चा केली. मतमोजणीच्या दिवशी काही घडू नये यासाठी आम्ही प्रतिबंधात्मक उपायांची चर्चा केली.

    "भाजप आणि त्यांचे सहकारी एक्झिट पोलवर खूप चर्चा करतील. पण आम्ही देशातील जनतेला खरं सांगू इच्छित आहोत. इंडिया आघाडीला कमीत कमी 295 जागा मिळतील, असा आम्हाला विश्वास आहे. हे जनतेचं सर्वेक्षण आहे, यानुसार कमीत कमी एवढ्या जागा आम्हाला मिळतील."

    मल्लिकार्जुन खरगे

    फोटो स्रोत, ANI

    सरकारच्या एक्झिट पोलबद्दल बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "सरकारी सर्वेक्षणं देखील होत असतात. त्यांच्याकडे आकडे बनवण्याची आणि बिघडवण्याची यंत्रणा आहे. सरकारचे माध्यमांमधील काही मित्रदेखील सरकारचे आकडे मोठ्या जोशात सांगत असतात. त्यामुळेच आम्ही भारताच्या जनतेला सत्य सांगण्यासाठी हा आकडा घोषित करत आहोत. आमच्या कार्यकर्त्यांना हा संदेश आहे की संपूर्ण मतमोजणी होऊन, निवडून आलेल्या खासदाराला प्रमाणपत्र मिळेपर्यंत मतमोजणी केंद्र सोडायचं नाही."

    निवडणूक आयोगाबद्दल बोलताना खरगे म्हणाले की, "आम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊनही आमच्या तक्रारी मांडणार आहोत. त्यानुसार त्यांना प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला सुधारित आदेश देण्याची विनंती आम्ही करणार आहोत. आम्ही त्यासाठी उद्या निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला आहे."

  4. लोकसभेसाठीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान सुरू असताना 'इंडिया'ची दिल्लीत बैठक

    इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित असलेले नेते

    फोटो स्रोत, ANI

    फोटो कॅप्शन, इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित असलेले नेते

    आज (1 जून) लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान होत आहे. देशात कुणाचं सरकार येणार, या प्रश्नाचं उत्तर 4 जूनला मिळणार आहे.

    तत्पूर्वी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक आज होत आहे.

    या बैठकीला इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.

    एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इंडिया आघाडीला उपस्थित असलेल्या नेत्यांची नावे खालीलप्रमाणे :

    मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, आणि केसी वेणुगोपाल (काँग्रेस), अखिलेश यादव (समाजवादी पक्ष), शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार), अरविंद केजरीवाल, भगवंत मान, संजय सिंह आणि राघव चढ्ढा (आप), टीआर बालू (डीएमके), तेजस्वी यादव आणि संजय यादव (आरजेडी), चंपाई सोरेन आणि कल्पना सोरेन (जेएमएम), फारूक अब्दुल्ला (जम्मू आणि केएनसी), डी. राजा (सीपीआय), सीताराम येचुरी (सीपीआयएम), अनिल देसाई शिवसेना (यूबीटी), दीपंकर भट्टाचार्य (सीपीआय (एमएल), मुकेश सहानी (व्हीआयपी)

  5. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी पीसी चाको यांची नियुक्ती

    पीसी चाको, शरद पवार आणि सुप्रिया सुळे

    फोटो स्रोत, ANI

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून पीसी चाको यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ही नियुक्ती केली आहे.

    शरद पवार यांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या आधीपासून राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आहेत.

    शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट करून चाको यांच्या नियुक्तीची माहिती दिलीय. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "पीसी चाको आणि सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे." याशिवाय राजीव झा यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.

    शरद पवारांचे पत्र

    फोटो स्रोत, Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar/X

    फोटो कॅप्शन, शरद पवारांचे पत्र

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) हा पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार गेल्या इंडिया आघाडीपासून वेगळे झाले आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारसोबत त्यांनी स्वतंत्र कारभार सुरु केला.

    शरद पवारांनी मात्र इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीची साथ सोडली नाही.

  6. फिलिपिन्सचा चीनला इशारा, 'एका जरी नागरिकाचा मृत्यू झाला, तर...'

    फर्डिनांड मार्कोस ज्युनियर

    फोटो स्रोत, Getty Images

    दक्षिण चीन समुद्रात असणारी लाल रेषा ओलांडू नका, असा इशारा फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी चीनला दिलाय.

    दक्षिण चीन समुद्र परिसरात चीन आणि फिलिपिन्स यांच्यातील संघर्ष वाढत आहे.

    राष्ट्राध्यक्ष मार्कोस ज्युनियर यांनी शुक्रवारी (31 मे) एका निवेदनात म्हटलं की, "चीनच्या कोणत्याही कृतीमुळे एका जरी फिलिपिन्सच्या नागरिकाचा मृत्यू झाला, तर फिलिपिन्स या कारवाईला 'युद्धाची कारवाई' मानेल आणि त्यानुसार प्रतिसाद देईल."

    सिंगापूरमधील सुरक्षा परिषदेत बोलताना राष्ट्राध्यक्ष मार्कोस ज्युनियर बोलत होते. या बैठकीस जगातील अनेक देशांचे संरक्षण मंत्री होते. यात अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन हेही सहभागी झाले होते.

    हा प्रदेश अमेरिकेसाठी महत्त्वाचा असून आशिया सुरक्षित राहिला, तरच अमेरिकाही सुरक्षित राहील, यावर अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी भर दिला.

    अलिकडच्या काही महिन्यांत, दक्षिण चीन समुद्रातील दाव्यांवरून चीन आणि फिलिपिन्स यांच्यातील तणाव वाढत आहे. अनेक प्रकरणांमध्ये तो संघर्षाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

    फिलिपिन्सने चिनी जहाजांनी आपल्या गस्ती नौकांवर पाण्याच्या तोफांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे, तर चीनने आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण केल्याचा दावा केला आहे.

  7. सलमान खानवरील आणखी एका हल्ल्याचा कट उघड, चौघांना अटक केल्याचा पोलिसांचा दावा

    सलमान खान

    फोटो स्रोत, GETTY IMAGES

    अभिनेता सलमान खानवर हल्ला करण्याचा आणखी एक कट समोर आणल्याचा दावा नवी मुंबई पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटकही केली आहे.

    लॉरेन्स बिश्नोई टोळीतील 16-17 जणांनी फेब्रुवारी महिन्यात पनवेलमध्ये याबाबत रेकीदेखिल केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

    सलमान खान पनवेलला जात असताना त्याच्यावर हल्ला करण्याचा हा कट रचण्यात आला होता, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी शनिवारी दिली.

    याप्रकरणी गेल्या आठवड्यात चार जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

    सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानावर गेल्या महिन्यात गोळीबार झाला होता.त्या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. त्या दोघांपैकी एकानं कारागृहात आत्महत्या केली होती.

    पोलिसांच्या मते, चित्रपट कलाकारांवर हल्ले करून मुंबईत खंडणी वसुली सुरू करण्याचा लॉरेन्स बिश्नोई गँगचा प्रयत्न आहे.

    याबाबत उपायुक्त विवेक पानसरे यांनी माध्यमांना माहिती दिली.

    “आम्ही चार जणांना अटक केली आहे. आरोपी अनेक दिवसांपासून अभिनेत्यावर हल्ल्याचा कट रचत होते. रेकी करण्यासाठी आरोप पनवेलमध्ये राहिलेही होते,"असं ते म्हणाले.

  8. मतदानानंतर कंगना म्हणाली - ‘मोदींनी राजकारणात येण्यापूर्वीही अनेक दशकं तपश्चर्या आणि ध्यान केलं'

    कंगना रनोत

    फोटो स्रोत, @KANGANATEAM

    हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातील भाजप उमेदवार कंगना रनोतनं हिमाचल प्रदेशात मोदींची लाट असल्याचं म्हटलं आहे. मतदारांना मोठ्या संख्येन बाहेर पडण्याची विनंतीही कंगनानं केली.

    पत्रकारांशी बोलताना कंगना म्हणाली की, नरेंद्र मोदी राजकारणात येण्यापूर्वीही ध्यान करायचे. त्यांनी अनेक दशकं तपश्चर्या आणि ध्यान केलं.

    “लोकशाहीच्या महापर्वात उत्साहानं सहभागी व्हावं आणि आपल्या सर्वोच्च अधिकाराचा वापर करावा. मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी कितीतरी लोकांचं रक्त सांडलं. त्यामुळं या अधिकाराचा फायदा उचलावा,” असंही कंगना म्हणाली.

    कंगनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुकही केली. “मोदीजींनी यावेळी किमान 200 सभा घेतल्या. 80-90 हून जास्त मुलाखती दिल्या. हिमाचल प्रदेश आणि संपूर्ण देशाला त्यांच्या गॅरंटीवर विश्वास आहे. आपण सगळे मोदींचे सैनिक आहोत. मला मंडीच्या लोकांचा आशिर्वाद मिळेल आणि आम्ही हिमाचलच्या चारही जागा जिंकू,” असं कंगना म्हणाली.

    अखेरच्या टप्प्यातील मतदानापूर्वी नरेंद्र मोदी कन्याकुमारीत ध्यान करत आहेत. त्यावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवरही कंगनानं प्रतिक्रिया दिली.

    “मोदी हे आज नव्हे तर नेता नव्हते, राजकारणात नव्हते तेव्हापासून ध्यान करतात. आपण त्यांचे अनेक फोटो पाहिले आहेत. अनेक दशकं त्यांनी तपश्चर्या केली आहे.

    या लोकांना त्यावरही आक्षेप आहे. कोणीही आपली मूळ जीवनशैली विसरू शकत नाही. ते ध्यान करतात आणि ही त्यांची जीवनशैली आहे,” असं कंगनानं म्हटलं.

  9. पुणे पोर्शे अपघात प्रकरण : अल्पवयीन आरोपीच्या आईलाही पोलिसांकडून अटक

    पोर्शे कार अपघात प्रकरण

    पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईलाही पोलिसांनी अटक केली आहे.

    अपघातात दोन अभियंत्यांच्या मृत्यूनंतर देशभरात यावरून संताप व्यक्त करण्यात आला होता.

    आरोपीनं रक्त तपासणीसाठी दिलेले नमुने बदलून त्याऐवजी त्याच्या आईच्या रक्ताच्या नमुने पाठवण्यात आले होते, अशी माहिती पुणे पोलिसांनी शनिवारी दिली.

    पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसंच पोलिसांनी स्थानिक न्यायालयालाही दोन दिवसांपूर्वी याबाबत माहिती दिली होती.

    अपघातानंतरच्या प्राथमिक तपासात आरोपीच्या वैद्यकीय अहवालात त्यानं दारु प्यायली नमसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, बारच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अल्पवयीन आरोपी दारू पित असल्याचं दिसून आलं.

    या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीचे वडील आणि आजोबांनाही अटक केली आहे. तसंच बनावट वैद्यकीय अहवाल तयार करणाऱ्या दोन डॉक्टरांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

    अपघातानंतर बाल न्याय मंडळानं रस्ते सुरक्षा या विषयावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देत आरोपीला सोडलं होतं.

  10. सातव्या टप्प्यातील मतदान, राहुल गांधी म्हणाले-देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार

    राहुल गांधी

    फोटो स्रोत, @INCINDIA

    देशातील 57 लोकसभा मतदारसंघांमध्ये सातव्या टप्प्यातील मतदान सुरू झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात यावेळी इंडिया आघाडीचं सरकार येणार असल्याचा दावा केला आहे.

    राहुल गांधींनी ट्विटरवर याबाबत पोस्ट केली. “आज मतदानाचा सातवा आणि अखेरचा टप्पा आहे. आतापर्यंतचा मतदानातील ट्रेंड पाहता, देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. कडक उन्हातही तुम्ही सर्वजण लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी मतदानासाठी बाहेर पडला, याचा मला अभिमान आहे"असंही राहुल गांधी म्हणाले.

    “आजही मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि अहंकार आणि अत्याचाराचं प्रतिक बनलेल्या या सरकारवर तुमच्या मताने 'अंतिम प्रहार' करा. 4 जूनचा सूर्य देशात नवी पहाट घेऊन येणार आहे," असंही राहुल गांधी म्हणाले.

    दुसरीकडं कन्याकुमारीमध्ये ध्यान करत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवर पोस्ट केली. “लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आज मतदान होत आहे. या टप्प्यातील सर्व मतदारांना लोकशाहीच्या या महान उत्सवात उत्साहानं सहभागी होण्याची विनंती करतो. तरुण आणि महिला मतदार विक्रमी संख्येने पुढे येऊन मतदान करतील, अशी आशा आहे,” असं मोदींनी म्हटलं.

  11. मतदानाचा शेवटचा टप्पा: योगी आदित्यनाथ, जेपी नड्डा आणि अफजल अन्सारी मतदानानंतर काय म्हटले?

    मतदानासाठी रांगेत उभे असलेले मतदार

    फोटो स्रोत, Huw Evans Picture Agency

    लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सकाळीच मतदानाला सुरुवात झाली आहे.

    सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात 57 जागांवर मतदान होत आहेत. त्यानंतर मंगळवारी 4 जून रोजी निकाल लागणार आहेत.

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये मतदान केले. गोरखपूरचे भाजप उमेदवार रवी किशनही यावेळी मतदान केंद्रावर रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळालं.

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हिमाचल प्रदेशात मतदानाचा हक्क बजावला. बूथवर पहिलं मतदान करण्याचा मान मिळाला, असं नड्डा मतदानानंतर म्हणाले.

    तर योगी आदित्यनाथ यांनी,“आज मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडत आहे. हवामानाचा विचार करता प्रतिकूल परिस्थिती असतानाही मतदारांनी उत्साह दाखवला,” असं म्हटलं.

    योगी आदित्यनाथ

    फोटो स्रोत, @MYOGIADITYANATH

    योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कन्याकुमारीतील ध्यानाबाबतही वक्तव्य केलं.

    “मोदीजींची ही आराधना राष्ट्र आराधना आहे. 140 कोटी लोकांच्या सेवेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित भारत मातेच्या चरणी केलेली ही आराधना आहे. भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारात गुंतलेल्यांना आध्यात्मिक आराधना समजू शकत नाही. ते समजून घेण्यासाठी भारताच्या सनातन मूल्यांप्रती निष्ठा गरजेची आहे," असं योगी म्हणाले.

    गाझीपूरमधील इंडिया अलायन्सचे उमेदवार अफजल अन्सारी यांनी4 जूनची वाट पाहा, इंडिया आघाडी सरकार सत्तेत येणार आहे, असं म्हटलं.

  12. नमस्कार

    बीबीसी मराठीच्या पेजवर आपले स्वागत आहे. भारतात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सहा टप्पे पूर्ण झाले आहेत. शेवटच्या टप्प्यातील मतदान आज होत आहे.

    तेव्हा प्रचाराची रणधुमाळी आणि त्याचसोबत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील बातम्या तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील.

    31 मे रोजीच्या बातम्या वाचण्यासाठीबीबीसी मराठीच्या या पेजला भेट द्यावी.