हमासचा इस्रायलच्या तेल अवीव शहरावर रॉकेट हल्ला

देश-विदेशातील ताज्या अपडेट्स तुम्हाला या पेजवर मिळतील.

थोडक्यात

  • उत्तर प्रदेश : शाहजहांपूरमध्ये ढाब्यावर उभ्या बसला ट्रक धडकला, 11 जणांचा मृत्यू
  • राजकोट आगीतील मृतांचा आकडा 27 वर गेला आहे.
  • भारतीय दिग्दर्शिका पायल कपाडियांच्या चित्रपटाला कान चित्रपट महोत्सवात ज्युरी पुरस्कार मिळाला आहे.
  • आयपीएलच्या अंतिम सामन्यात हैदराबादचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय
  • नाशिकमध्ये प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमध्ये आतापर्यंत 26 कोटी रुपयांची रोकड आणि 90 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

लाईव्ह कव्हरेज

आशय येडगे

  1. आयपीएलच्या फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबादचा डाव 113धावांमध्ये आटोपला

    हर्षित राणा

    फोटो स्रोत, g

    आयपीएल फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी 114 धावांचं लक्ष्य असून शाहरूखच्या टीमला तिसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याची संधी मिळाली आहे. कोलकात्याच्या गोलंदाजांनी सनरायझर्स हैदराबादला अवघ्या 113 धावांत गुंडाळलं.

    खरंतर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेेतला होता. पण मिचेल स्टार्कनं अभिषेक शर्माला माघारी धाडलं तर वैभव अरोरानं ट्रॅव्हिस हेडची विकेट काढली आणि हैदराबादला सुरुवातीलाच दणके दिले. सनरायझर्सचा संघ त्यातून सावरू शकला नाही.

    कोलकात्याकडून आंद्रे रसेलनं 19 रन्समध्ये तीन विकेट्स काढल्या. मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा प्रत्येकी दोन तर वैभव अरोरा, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्तीनं प्रत्येकी एकेक विकेट घेतली.

  2. मुंबई : महिलेला कारखाली चिरडल्याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टरला केली अटक

    मुंबईतील सायन रुग्णालयात भरधाव कारने दिलेल्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.

    एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितलं की ज्या कारच्या धडकेने या महिलेचा मृत्यू झाला ती कार सायन रुग्णालयातीलच एक डॉक्टर चालवत होता.

    मृत महिलेचं नाव झुबेदा शेख आहे.

    झुबेदा यांना मधुमेहाचा त्रास होता आणि त्या मागच्या दोन आठवड्यांपासून सायन रुग्णालयात उपचार घेत होत्या. एका आठवड्यापूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता आणि त्या नंतरच्या तपासण्यांसाठी रुग्णालयात येत असत.

    झोन-4 चे पोलीस उपयुक्त प्रशांत कदम

    फोटो स्रोत, ANI

    फोटो कॅप्शन, झोन-4 चे पोलीस उपयुक्त प्रशांत कदम

    झोन-4 चे पोलीस उपयुक्त प्रशांत कदम यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "24मे ला आम्हाला माहिती मिळाली एक वृद्ध महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली आहे, तसेच या महिलेच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आहेत. जेव्हा आम्ही त्यांच्या दुखापतींची पडताळणी केली तेव्हा आम्हाला अपघात झाला असल्याचं लक्षात आलं.

    "आम्ही चौकशी केली असता एका काळ्या रंगाच्या कारने त्यांना उडवलं असल्याची माहिती आम्हाला मिळाली. ही कार रुग्णालयातील डॉक्टरच चालवत असल्याचं कळलं. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे."

    एएनआयला काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार सायन रुग्णालयातील डॉक्टर राजेश ढेरे चालवत होते. डॉ. ढेरे हे सायन रुग्णालयातल्या फॉरेन्सिक औषध आणि विषशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.

    या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या झुबेदा शेख यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी कलम 304(अ), 388, 279, 203, 177 सह भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा नोंदवला आहे.

    पोलिसांनी डॉ. ढेरे यांना या प्रकरणी अटक केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार पोलीस हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

  3. अंतिम सामन्यात कोलकाताची धमाकेदार सुरुवात, हैदराबादच्या सलामीवीरांना तंबूत पाठवलं

    वैभव अरोरा आणि ट्रेव्हिस हेड

    फोटो स्रोत, Getty Images

    आयपीएल 2024च्या अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण स्पर्धेत आक्रमक फलंदाजी केलेल्या अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेडने मात्र हैदराबादची निराशा केली.

    कोलकाताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडला भोपळाही फोडू दिला नाही तर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने कोलकाताकडून गोलंदाजी करताना पहिल्याच ओव्हरमध्ये अभिषेक शर्माला तंबूचा रस्ता दाखवला.

    पहिल्या दोन ओव्हरमध्ये दोन गडी बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठी आणि दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमवर हैदराबादचा डाव सांभाळण्याची जबाबदारी आली होती. पण एलिमिनेटरमध्ये चांगली फलंदाजी केलेल्या राहुल त्रिपाठीला फारसं काही करता आलं नाही. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर तोही बाद झाला.

  4. राजकोट आणि दिल्ली आग दुर्घटनेतील पीडितांना पंतप्रधान मोदींची मदतीची घोषणा

    नरेंद्र मोदी

    फोटो स्रोत, ANI

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट आणि दिल्लीतील अपघातग्रस्तांसाठी मदत जाहीर केली आहे.

    एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून पंतप्रधान मोदींनी मदतीची घोषणा केली आहे. राजकोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीतून दोन लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

    तसेच जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. दिल्लीतील रूग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या मृत्यूनंतर मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत असंही त्यांनी जाहीर केलं आहे.

    नरेंद्र मोदींची पोस्ट

    फोटो स्रोत, PMO INDIA/X

    राजकोटच्या एका मॉलमधील गेम झोनमध्ये शनिवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत लहान मुलांसह 27 जणांचा मृत्यू झाला आहे.

    गुजरात सरकारने या घटनेच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या पाच सदस्यीय एसआयटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सीआयडी क्राइमचे पोलिस महासंचालक सुभाष त्रिवेदी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

    शनिवारी पूर्व दिल्लीतील विवेक विहार भागातील हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत 6 नवजात बाळांचा मृत्यू झाला. दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 मुलांना रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले, परंतु त्यापैकी सहा मुलांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य सहा मुलांना रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

  5. नाशिक : सराफा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचा छापा, तब्बल 26 कोटींची रोकड जप्त

    जप्त केलेली रोकड

    नाशिक शहरातील सराफा व्यापाऱ्यांवर आयकर विभाग गेल्या दोन दिवसांपासून छापे टाकत आहे.

    नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागातील ज्वेलर्सचे दुकान, तसेच त्याचे निवासस्थान आणि इतर ठिकाणांची आयकर अधिकाऱ्यांनी 30 तास झडती घेतली.

    एकाच ज्वेलर्सच्या दोन आस्थापनांमध्ये तपास सुरू होता. नाशिक, नागपूर आणि जळगावच्या पथकातील 50 अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कारवाई केली आहे.

    या छाप्यात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंगल्यातील फर्निचर फोडून नोटा हस्तगत केल्या. तब्बल 30 तास हा छापा सुरू होता.

    छापा टाकण्यात आलेला सुराणा ज्वेलर्स

    50 ते 55 अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्सच्या आवारात तसेच त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयावर छापे टाकले.त्याचवेळी राका कॉलनीत असलेल्या त्याच्या आलिशान बंगल्यावरही स्वतंत्र पथकाने छापा टाकला.

    शहरातील विविध ठिकाणचे त्यांचे कार्यालय, वैयक्तिक लॉकर आणि बँक लॉकर्सचीही तपासणी करण्यात आली.नाशिकमधील मनमाड आणि नांदगाव येथील त्याच्या कुटुंबीयांच्या घरांचीही झडती घेण्यात आली.

    प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमध्ये आतापर्यंत 26 कोटी रुपयांची रोकड आणि 90 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. आयकर चोरीच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

  6. आयपीएलच्या अंतिम सामन्यात हैदराबादचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय

    श्रेयस अय्यर आणि पॅट कमिन्स

    फोटो स्रोत, Getty Images

    आयपीएल-2024 च्या अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

    या स्पर्धेत हैदराबादचा संघ धावांचा पाठलाग करताना बऱ्याचदा अडचणीत सापडला होता पण अंतिम सामन्यात हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना याचा फायदा होऊ शकतो.

    दुसरीकडे कोलकाताने क्वालिफायर-1 मध्ये सनरायजर्सचा पराभव केला होता. त्याही सामन्यात हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी केली होती त्यामुळे आता कोलकाता त्या सामन्याची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक असेल.

    श्रेयस अय्यर आणि पॅट कमिन्स

    फोटो स्रोत, Getty Images

    आयपीएलच्या अंतिम सामन्यात सहभागी झालेले दोन्ही संघ असे आहेत :

    सनरायझर्स हैदराबाद (अंतिम अकरा): ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन

    कोलकाता नाईट रायडर्स (अंतिम अकरा): रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरीन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

  7. हमासचा इस्रायलच्या तेल अवीव शहरावर रॉकेट हल्ला

    प्रातिनिधिक फोटो

    फोटो स्रोत, Getty Images

    इस्रायलमधील तेल अवीव शहरावर रॉकेट डागल्याचं हमासने म्हटलं आहे. मागच्या चार महिन्यात हमासने पहिल्यांदाच इस्रायलच्या हद्दीत असलेल्या तेल अवीववर असा हल्ला केला आहे.

    इस्रायली लष्कराने यावर सांगितलं आहे की, "गाझामधील रफाह येथून 8 रॉकेट डागण्यात आले असून त्यापैकी बहुतांश रॉकेट पाडण्यात आले आहेत."

    इस्त्रायली लष्कर रफाहमध्ये मोठी लष्करी कारवाई करत आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले की, रफाहमध्ये मोठी कारवाई केल्याशिवाय हमासचा पराभव होऊ शकत नाही.

    हमासची लष्करी शाखा, इज्जेदिन अल-कासम ब्रिगेड्सने त्यांच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलवर सांगितलं की त्यांनी 'मोठ्या क्षेपणास्त्रांनी' इस्रायलवर हल्ला केला आहे.

    त्याचवेळी अमेरिकेसह अनेक मानवतावादी संघटनांनी रफाहमध्ये सुरु असलेल्या इस्रायलच्या लष्करी कारवाईमुळे पॅलेस्टिनी लोकांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे.

    हमासद्वारे चालवल्या जाणाऱ्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबरपासून इस्रायलच्या हल्ल्यांमुळे 35 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

    यापूर्वी हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. हमासच्या हल्ल्यात 1200 लोकांचा मृत्यू झाला होता. हमासच्या सैनिकांनी 252 लोकांना ओलीसही ठेवलं होतं.

  8. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार जिंकणाऱ्या पायल कपाडियांबद्दल मोदी काय म्हणाले?

    कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायल कपाडिया यांचं अभिनंदन केलं आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिलं आहे की, "भारताला पायल कपाडियाचा अभिमान वाटतो. पायल कपाडियाने 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटासाठी ग्रांप्री पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे."

    नरेंद्र मोदी

    फोटो स्रोत, Getty Images

    मोदींनी पुढे लिहिलं की, "पायल कपाडिया ही पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी आहे आणि तिच्या प्रतिभेची चमक जागतिक स्तरावर दिसली आहे. हा सन्मान तिच्या प्रतिभेचे प्रतीक तर आहेच, पण त्यामुळे नव्या पिढीतील चित्रपट निर्मात्यांनाही प्रेरणा मिळेल."

    केरळमधून आलेल्या आणि मुंबईत राहणाऱ्या परिचारिकांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला ग्रांप्री पुरस्कार मिळाला आहे.

    या पुरस्कारासह, 38 वर्षीय पायल कपाडिया फ्रान्सिस, फोर्ड कोपोला, योर्गोस लॅन्थिमोस, अली अब्बास, जॅक ऑडियर्ड आणि जिया झांगके यांसारख्या दिग्दर्शकांच्या श्रेणीत सामील झाली आहे.

  9. राजकोट गेम झोन दुर्घटना : दोघांना अटक, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    गुजरातच्या राजकोटमधील गेम झोनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेवर राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितलं की, "आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

    राजू भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीसीच्या कलम 304, 308, 336, 338 आणि 114 अंतर्गत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    राजकोटच्या गेम झोनमध्ये शनिवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत लहान मुलांसह 27 जणांचा मृत्यू झाला आहे.

    राजकोटचे पोलिस आयुक्त राजू भार्गव

    फोटो स्रोत, ANI

    फोटो कॅप्शन, राजकोटचे पोलिस आयुक्त राजू भार्गव

    पोलिस आयुक्त राजू भार्गव यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "काल संध्याकाळी गेम झोनमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी आयपीसीच्या कलम 304, 308, 336, 338 आणि 114 अंतर्गत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    "पोलिस दोन आरोपींना अटक करत आहेत. गुन्हे शाखेचे पथक उर्वरित चार आरोपींच्या शोधात आहे. लवकरात लवकर तपास पूर्ण करून या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याचा आमचा प्रयत्न असेल."

    गुजरात सरकारने या घटनेच्या तपासासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या पाच सदस्यीय एसआयटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सीआयडी क्राइमचे पोलिस महासंचालक सुभाष त्रिवेदी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

  10. मलेशियन मास्टर्सच्या अंतिम सामन्यात पीव्ही सिंधूचा पराभव

    पीव्ही सिंधू

    फोटो स्रोत, Getty Images

    भारताची बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूला मलेशियन मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

    अंतिम फेरीत चीनच्या वांग झीयीने पीव्ही सिंधूचा 13-21, 21-16, 21-12 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. पीव्ही सिंधूने पहिल्या सेटमध्ये वांग झीयीचा 21-13 असा पराभव करत चांगली सुरुवात केली होती.

    मात्र यानंतर वांग झीयीने दमदार पुनरागमन केले. यानंतर वांग झीयीने दुसरा सेट 21-16 आणि तिसरा सेट , 21-12 असा जिंकला.

    पीव्ही सिंधू

    फोटो स्रोत, Getty Images

    याआधी उपांत्य फेरीत पीव्ही सिंधूने थायलंडच्या बुसानन ओंगबामरूंगफानला 13-21, 21-16, 21-12 ने मात केली होती.

    पीव्ही सिंधूचा उपांत्य फेरीचा सामनाही तीन सेटपर्यंत चालला होता. पीव्ही सिंधूने ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा पदक जिंकले आहे. सिंधू पॅरिस ऑलिम्पिकमध्येही खेळताना दिसणार आहे.

  11. 'कितीही पैसे दिले तरी आता ते लोक परत येतील का?' राजकोट आगीतील पीडितांच्या नातेवाईकांचा सवाल

  12. उत्तर प्रदेश : शाहजहांपूरमध्ये ढाब्यावर उभ्या बसला ट्रक धडकला, 11 जणांचा मृत्यू

    अपघात

    फोटो स्रोत, ANI

    उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये एका ढाब्यावर उभ्या असलेल्या खासगी बसला ट्रकनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 10 जण जखमीही झाले आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका छाब्यावर उभ्या असलेल्या बसवर खडीनं भरलेला ट्रक पलटी झाल्यानं अपघात घडला आहे. बसवर ट्रक पलटी झाल्यानं बसमद्ये बसलेले अनेक भाविक आत अडकले होते.

    एसएसपींच्या मते, “या बसमध्ये काही भाविक बसलेले होते. ते लोक सीतापूरहून पूर्णागिरीला जात होते. काही लोक ढाब्यावर जेवण करत होते, तर काही बसमध्ये बसलेले होते. तेव्हा खडीनं भरलवेला ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसवर पलटी झाला.”

    पोलिसांच्या मते, अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 10 जखमी आहेत. सर्व मृत सीतापूरच्या बडा जेठा गावचे रहिवासी आहेत.

  13. दिल्लीत हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 6 नवजात बालकांचा मृत्यू, 6 व्हेंटिलेटरवर

    दिल्लीत बाल रुग्णालयात लागलेली आग.

    फोटो स्रोत, ANI

    दिल्लीच्या विवेक विहारमध्ये असलेल्या नवजात बालकांच्या हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीत 6 बालकांचा मृत्यू झाला आहे.

    दिल्ली अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार रात्री 11 वाजून 32 मिनिटांनी रुग्णालयात आग लागल्याची माहिती मिळाली होती.

    अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयातून 12 बालकांना बाहेर कढण्यात आलं होतं. पण त्यापैकी 6 बालकांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

    इतर सहा बालकांना रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

    अग्निशमन अधिकारी राजेश अटवाल यांनी आगीचं कारण अद्याप समजू शकलं नसल्याचं सांगितलं आहे.

    रुग्णालयाच्या आजुबाजुला असलेल्या इमारतींचंही आगीमुळं नुकसान झालं आहे.

    दिल्ली आग
  14. राजकोट : मॉलच्या गेम झोनमधील आगीतील मृतांचा आकडा 27 वर, अनेक चिमुकल्यांचा समावेश

    राजकोटच्या गेम झोनमधील आग

    फोटो स्रोत, ANI

    राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या आगीत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण घटनेतील मृतांचा आकडा अजूनही वाढत आहे. मृतांमध्ये मोठ्या प्रमाणावर लहान मुलांचाही समावेश आहे.

    बीबीसीचे सहयोगी पत्रकार बिपिन टंकारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग एवढी भीषण होती की पाच किलोमीटर दूरुनही धुराचे लोट स्पष्टपणे दिसत होते.

    गेम झोनमध्ये बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता, त्यामुळं अनेक लोक आत अडकले होते असंही त्यांनी सांगितलं. मॉलच्या गेम झोनमध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते, तर स्थानिकांनी शॉर्टसर्किट झाल्याचंही सांगितलं आहे.

    राजकोटच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

  15. कान फिल्म फेस्टिव्हल : पायल कपाडियांच्या चित्रपटाला ज्युरी अवॉर्ड तर अनसूया सेनगुप्ता अन-सर्टन रिगार्ड श्रेणीत 'बेस्ट अॅक्ट्रेस'

    ऑल वी इमॅजिन अॅज लाइट चित्रपटातील दृश्य

    भारतीय चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया यांच्या 'ऑल वी इमॅजिन अॅज लाइट'चित्रपटाला कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी अवॉर्ड मिळाला आहे.

    हा चित्रपट समकालीन मुंबई शहरातील पार्श्वभूमीवर आधारित असला तरी, त्यात बॉलिवूड स्टार आणि अब्जाधीश उद्योजकांच्या धनाढ्य मुंबईचं चित्रण पाहायला मिळत नाही.

    निर्मात्यांनी मुंबई शहरातील गल्ल्यांबरोबरच याठिकाणी इतर शहरांतून आलेल्यांचा आवाज चित्रपटातून सर्वांसमोर आणला आहे. कारण तेच या शहराची ओळख आहेत.

    कपाडिया यांची ही पहिली नरेटिव्ह फिचर फिल्म आहे. गुरुवारी रात्री कान फिल्म फेस्टिव्हलच्या मुख्य स्पर्धा गटात हा चित्रपट सादर झाला. चित्रपट संपल्यानंतर याठिकाणी उपस्थित प्रेक्षक जवळपास आठ मिनिटं उभे राहून टाळ्या वाजत होते.

    फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला ज्युरी अवॉर्ड मिळाला आहे.

    हे फक्त चित्रपट निर्मात्यांसाठीच नव्हे तर भारतासाठीचं मोठं यश आहे. गेल्या तीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच कान फिल्म फेस्टिव्हलच्या मुख्य स्पर्धा गटात भारतीय चित्रपट सादर झाला.

    या चित्रपटानं दिग्दर्शिका पायल कपाडियाही चर्चेत आल्या आहेत.

    अनसूया सेनगुप्ता 'बेस्ट अॅक्ट्रेस'

    दरम्यान, भारतीय अभिनेत्री अनसुया सेनगुप्ता यांना कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये अन-सर्टन रिगार्ड श्रेणीत उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. बुल्गारियामधील दिग्दर्शक कोन्सटेंटिन बोजानोव्ह यांच्या ‘द शेमलेस’साठी त्यांना हा पुरस्कार मिळाला.

    अनसूया सेनगुप्ता

    फोटो स्रोत, @CUP_O_T

    फोटो कॅप्शन, अनसूया सेनगुप्ता

    अनसर्टेन कॅटेगिरी कान फिल्म फेस्टिव्हलच्या अधिकृत सलेक्शनचं एक सेक्शन आहे. 1978 मध्ये जाइल्स जेकब यांनी त्याची सुरुवात केली होती.

    इस सेक्शनमध्ये अपारंपरिक शैलीतील 20 चित्रपटांचं सादरीकरण केलं जातं. नवे प्रयोग असलेल्या चित्रपटांचा शोध घेणं हा या सेक्शनचा उद्देश आहे.

    ‘द शेमलेस’ दिल्लीच्या वेश्यालयांत काम करणाऱ्या रेणुका यांची कहाणी आहे. एका रात्री पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करून ती फरार होते, यावर चित्रपट आधारित आहे.

  16. लोकसभा निवडणूक 2024: सहाव्या टप्प्यात 58 जागांवर सायंकाळी 7.45 पर्यंत 59.06 टक्के मतदान

    मतदान

    फोटो स्रोत, Getty Images

    लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात शनिवारी सायंकाळी 7.45 वाजेपर्यंत 59.06 टक्के मतदान झाल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

    निवडणुकीच्या या सहाव्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत लोकसभेच्या 58 जागांवर मतदान झालं.

    निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या आठ जागांवर 78.19 टक्के मतदान झालं.

    झारखंडमधील लोकसभेच्या चार जागांवर 62.74 टक्के आणि ओडिशातील लोकसभेच्या सहा जागांवर 60.07 टक्के मतदान झालं.

    हरियाणातील लोकसभेच्या सर्व 10 जागांवर 58.37 टक्के आणि दिल्लीच्या सातही जागांवर 54.48 टक्के मतदान झालं.

    उत्तर प्रदेशातील 14 जागांवर 54.03 टक्के मतदान झालं. तर जम्मूच्या एका जागेवर 52.28 टक्के मतदान झालं.

    बिहारमधील लोकसभेच्या आठ जागांवर 53.30 टक्के मतदान झालं. ही सर्व आकडेवारी सायंकाळी 7.45 वाजेपर्यंतची आहे.

    सहाव्या टप्प्यातील प्रमुख जागा

    सहाव्या टप्प्यात 58 पैकी प्रमुख मतदारसंघ नवी दिल्ली, ईशान्य दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली आणि चांदनी चौक तसंच उत्तर प्रदेशातील सुलतानपूर आणि आझमगड हे होते.

    याशिवाय जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी, पश्चिम बंगालमधील तमलूक मेदिनीपूर, कर्नाल, कुरुक्षेत्र, गुडगाव, हरियाणाचे रोहतक आणि ओडिशाचे भुवनेश्वर, पुरी आणि संबलपूर या महत्त्वाच्या जागा होत्या.

    संबित पात्रा, मेनका गांधी, मेहबुबा मुफ्ती, कन्हैय्या कुमार, मनोज तिवारी यासह अनेक नेत्यांचं भवितव्य या मतदानावर अवलंबून आहे.

  17. नमस्कार

    देशात निवडणुकीच्या सहा टप्प्यातले मतदान पूर्ण झाले आहे. आता एक टप्प्यातील मतदान बाकी राहिले आहे.

    शनिवारी राजकोट येथे लागलेल्या आगीत 24 जणांचा मृत्यू झाला आहे.

    इस्रायल आणि पॅलेस्टाइनचा संघर्ष, युक्रेन-रशियाचा संघर्ष सुरू आहे. तेव्हा या सर्व घडामोडी तुम्हाला बीबीसी मराठीच्या या पेजवर वाचायला मिळतील.

    25 मे रोजीच्या बातम्या तुम्हाला या पानावर वाचायला मिळतील.