लोकसभा निवडणुकीच्या घडामोडींसह महाराष्ट्र, भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स तुम्हाला इथे वाचायला मिळतील.
थोडक्यात
सनरायझर्स हैदराबादनं राजस्थान रॉयल्सला हरवून IPLया फायनलमध्ये प्रवेश केला. चेन्नईत झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादनं राजस्थानला 36 रन्सनी हरवलं.
टी-20 वर्ल्ड कप 2024 : आयसीसीने समालोचकांची यादी केली जाहीर, चार भारतीयांना संधी
इस्रायलने गाझावरील आक्रमण तात्काळ थांबवावे - आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आदेश
छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 8 माओवादी ठार झाल्याचा दावा
लाईव्ह कव्हरेज
आशय येडगे आणि अमृता कदम
पहिल्या पाच टप्प्यात किती मतदान झालं? निवडणूक आयोगानं जारी केली आकडेवारी
लोकसभा निवडणुकीसाठी सहाव्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. यापूर्वीपर्यंत झालेल्या पाच टप्प्यात किती मतदान झालं, हे निवडणूक आयोगानं जाहीर केलंय.
भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत म्हणजे 5 व्या टप्प्यांत 50 कोटी 72 लाख 97 हजार 288 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
पाचव्या टप्प्यापर्यंत 62.20 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
निवडणूक आयोगाने आज (25 मे) ही आकडेवारी जाहीर केली.
फोटो स्रोत, ANI
निवडणूक आयोगाने सांगितलं की, पाचव्या टप्प्यापर्यंत 70 कोटी 64 लाख 80 हजार 337 मतदारांपैकी 50 कोटी 72 लाख 97 हजार 288 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
भारतात 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांत मतदान होत आहे.
पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान झाले होते. 20 मे रोजी पाचव्या टप्प्यासाठी मतदान झाले.
पहिल्या ते पाचव्या टप्प्यापर्यंत देशातील लोकसभेच्या 543 जागांपैकी 428 जागांवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
आज, 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात मतदान होत आहे.
1 जूनला सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार असून, लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत.
पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर 11 दिवसांनी निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात किती टक्के मतदान झालं हे सांगितलं होतं.
ही आकडेवारी उशिरा जाहीर झाल्यामुळे विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते.
किती जणांनी मतदानाचा हक्क बजावला याची आकडेवारी निवडणूक आयोग का जाहीर करत नाही, असा सवाल विरोधी पक्ष उपस्थित करत होते.
भारताची बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने मलेशिया मास्टर्स टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत जागा मिळवलीय.
उपांत्य फेरीत पीव्ही सिंधूने थायलंडच्या बुसानन ओंगबामरूंगफानला 13-21, 21-16, 21-12 ने मात केली.
सिंधूने उंपात्य फेरीच्या समान्यात पहिला सेट 13-21 ने गमावला होता. मात्र, त्यानंतर सिंधूनं जोरदार पुनरागमन केलं.
दुसऱ्या सेटमध्ये 21-16 ने विजय मिळवला आणि शेवटच्या सेटमध्ये 21-12 ने विजय मिळवत सामना आपल्या नावे केला.
सिंधू आणि बुसनान यांच्यातील हा सामना जवळपास 88 मिनिटं चालला.
टूर्नामेंटचा अंतिम सामना रविवारी (26 मे) खेळवला जाणार असून, त्यात चीनच्या वांग झियीशी पीव्ही सिंधूची टक्कर होईल.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही केलं मतदान
फोटो स्रोत, ANI
25 मे रोजी देशात लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे. देशातली सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधल्या 58 मतदारसंघांमध्ये आज मतदान केलं जाणार आहे.
राजधानी दिल्लीतल्या सर्व सात जागांवर आज मतदान सुरु आहे.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला. मतदान झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना मतदान केल्याची खूण म्हणजेच शाई लावलेलं बोट दाखवलं. यासोबत त्यांनी मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहनही केलं आहे.
फोटो स्रोत, ANI
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती मुर्मू यांनी दिल्लीतल्या एका मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तसेच, भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनीही दिल्लीत सपत्निक मतदान केलं.
राहुल गांधींनी मतदानानंतर शेअर केला आई सोनिया यांच्याबरोबर सेल्फी
फोटो स्रोत, X/RAHULGANDHI
फोटो कॅप्शन, राहुल गांधी आणि सोनिया गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत मतदान केल्यानंतर सोनिया गांधी यांच्याबरोबरचा एक सेल्फी शेअर केला आहे.
"आईने आणि मी लोकशाहीच्या या उत्सवात मतदान करत योगदान दिलं आहे," असं त्यांनी लिहिलं.
राहुल गांधींनी या ट्वीटमध्ये दावा केला की, पहिल्या पाच टप्प्यांमध्ये लोकांनी मतदान करताना असत्य, द्वेष आणि खोटा प्रचार नाकारत जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं आहे.
त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं की, "आज सहाव्या टप्प्यातील मतदान आहे. तुमचं प्रत्येक मत ठरवेल की-
- तरुणांसाठी 30 लाख रिक्त सरकारी पदांवरील भरती आणि वर्षाला 1 लाख रुपयांच्या नोकरीची पक्की योजना सुरू होईल.
- गरीब कुटुंबांच्या महिलांच्या खात्यांमध्ये 8,500 रुपये महिन्याला यायला सुरुवात होईल.
- शेतकरी कर्जमुक्त होईल आणि त्यांना पिकाला चांगला हमीभाव मिळेल.
- मजुरांना 400 रुपयांचा दैनिक भत्ता मिळेल.
तुमचं मत तुमचं जीवन आणखी सुखकर बनण्याबरोबरच लोकशाही आणि संविधानाचं संरक्षणही करेल. तुम्हीही मोठ्या संख्येनं घराबाहेर पडा. आपले अधिकार आणि कुटुंबाच्या भवितव्यासाठी मतदान करा."
युकेमध्ये निवडणूक जाहीर : जाणून घ्या, प्रमुख उमेदवार, नेते आणि महत्त्वाचे मुद्दे
उकाडा इतका भयंकर की माकडं झाडांवरून खाली पडून मरतायत
व्हीडिओ कॅप्शन, Heatwave: उकाडा इतका भयंकर की माकडं झाडांवरून खाली पडून मरतायत
बीड: ‘तरुणांनी एकमेकांवर दगडफेक केली, आता त्यांना पाणी पाजायलासुद्धा नेतेमंडळी येत नाहीयेत’
'हे असंच उन्हातान्हाचं कसं तरी तडफडून पोट भरायचं', भीषण दुष्काळामुळे बिघडले जगण्याचेच गणित
मेहबुबा मुफ्ती यांचं आंदोलन, कार्यकर्ते आणि पोलिंग एजंटना विनाकारण ताब्यात घेतल्याचा आरोप
फोटो स्रोत, Getty Images
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती आंदोलनाला बसल्या आहेत.
मेहबुबा मुफ्ती यांचा आरोप आहे की त्यांच्या पक्षाचे पोलिंग एजंट आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी विनाकारण ताब्यात घेत आहेत.
मेहबूबा मुफ्ती या अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
मेहबूबा मुफ्ती यांनी रात्री उशिरा ट्विट करत म्हटलंय की, "आमच्या अनेक पीडीपी पोलिंग एजंट आणि कार्यकर्त्यांना मतदानापूर्वी ताब्यात घेतले जात आहे. जेव्हा त्यांचे कुटुंबीय पोलिस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की हे सर्व अनंतनाग आणि दक्षिण काश्मीरच्या डीआयजी यांच्या आदेशाप्रमाणे करण्यात आलं आहे. आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. वेळेवर कारवाई केली जाईल हीच अपेक्षा आहे.
मेहबूबा मुफ्ती यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितलं की, "पीडीपी कार्यकर्त्यांना विनाकारण पोलिस स्टेशनमध्ये बंद केलं जातंय. डीजी, एलजी आणि वरपासून खालपर्यंतचे सर्व अधिकारी यात गुंतले आहेत. तुम्ही निष्पक्ष निवडणुका होतील असे सांगितले होते पण तुम्ही हे सर्व करत आहात. ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणांहून आल्या आहेत."
लोकसभा निवडणुकीच्या 6 व्या टप्प्यातील मतदान सुरू
फोटो स्रोत, Getty Images
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात एका केंद्रशासित प्रदेशासह आठ राज्यांमधील 58 जागांसाठी शनिवारी मतदान सुरू झालं आहे.
या आठ राज्यांमध्ये दिल्लीच्या सात आणि हरियाणाच्या 10 जागांवर मतदान होत आहे.
याशिवाय बिहारमधील आठ, जम्मू-काश्मीरमधील एक, झारखंडमधील चार, ओडिशातील सहा, उत्तरप्रदेशातील 14 आणि पश्चिम बंगालमधील आठ जागांवर मतदान होत आहे.
ओडिशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसोबत विधानसभेच्याही निवडणुका होत आहेत. ओडिशात शनिवारी 42 जागांसाठी निवडणूक होत आहे.
ओडिशामध्ये चार टप्प्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. इथे 13 मे आणि 20 मे रोजी दोन टप्प्यात मतदान झालं असून 25 मे रोजी तिसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे.
1 जून रोजी अंतिम टप्प्यातील मतदान होणार आहे.
सहाव्या टप्प्यात 58 पैकी नवी दिल्ली, ईशान्य दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली आणि चांदनी चौक आणि उत्तरप्रदेशातील सुलतानपूर आणि आझमगड इथे मतदान होणार आहे.
याशिवाय जम्मू-काश्मीरची अनंतनाग-राजौरी, पश्चिम बंगालच्या तमलूक मेदिनीपूर, कर्नाल, कुरुक्षेत्र, गुडगाव, हरियाणाची रोहतक आणि ओडिशाची भुवनेश्वर, पुरी आणि संबलपूर या महत्त्वाच्या जागा आहेत.
दिल्लीत निवडणुकीच्या मुद्द्यावरून आम आदमी पार्टी आणि उपराज्यपाल आमने-सामने
फोटो स्रोत, ANI
फोटो कॅप्शन, दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
दिल्लीमध्ये मतदानापूर्वीच शुक्रवार रात्री उपराज्यपाल व्हीके सक्सेना आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पार्टीचे नेते यांच्यात वाकयुद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळालं.
लोकसभेच्या सात मतदारसंघांसाठी होत असलेल्या मतदानाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.
रात्री 9 वाजून 47 मिनिटांनी आम आदमी पार्टीच्या सरकारमधील मंत्री आतिशी यांनी एक्सवर एक पोस्ट केली.
"ज्याठिकाणी इंडिया आघाडीचे मतदार मोठ्या संख्येनं आहेत, त्याठिकाणी लोकांना अडचणी याव्या म्हणून मतदान संथ गतीनं करायचे आदेश दिल्लीच्या उपराज्यपालांनी पोलिसांनी दिल्याची माहिती मिळत आहेत," असं आतिशी यांनी त्यात लिहिलं.
आतिशी म्हणाल्या की, प्रशासनाद्वारे भाजपला जिंकवण्यासाठीचा असा प्रसाय बेकायदेशीर, लोकशाहीविरोधी आणि घटनाबाह्य आहे. निवडणूक आयोग याची दखल घेऊन अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
फोटो स्रोत, GETTY IMAGES
फोटो कॅप्शन, आतिशी
आतिशी यांच्या ट्विटला कोट करतं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही एक ट्विट केलं. "हे धक्कादायक आहे. निवडणूक आयोगानं दिल्लीन विनाअडथळा मतदान प्रक्रिया पार पाडावी," अशी पोस्ट त्यानी केली.
एक्सवर ही चर्चा मध्यरात्रीपर्यंत चालली. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनीही त्यावर पलटवार केला.
त्यांनी लिहिलं की, "केजरीवाल साहेब, तुम्ही तर ही सवयच लावून घेतली आहे. कुठल्याही परिस्थितीत कायम रडत राहायचं."
उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी हे दावे वीके अस्वीकार्य आणि बिनबुडाचे असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, हे कपोलकल्पित दावे मतदारांची दिशाभूल करून लोकशाहीला हानी पोहोचवण्याचा कट आहे. त्यावर कठोर कारवाई केली जाईल.
T20 वर्ल्ड कप अमेरिकेत का खेळवला जातो आहे? क्रिकेटला यानं काय फायदा होईल? वाचा
सनरायझर्स हैदराबाद IPL फायनलमध्ये, राजस्थान रॉयल्सचा 36 धावांनी केला परभव
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, संजू सॅमसन आणि पॅट कमिन्स
आयपीएलच्या 17 व्या हंगामाच्या फायनलमध्ये आता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा सामना रंगणार आहे.
सनरायझर्स हैदराबादनं शुक्रवारी झालेल्या क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्सचा 36 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला.
त्यामुळं आता कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ त्यांचं तिसरं विजेतेपद मिळवण्यासाठी रविवारी मैदानात उतरतील.
राजस्थान रॉयल्सनं या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. संपूर्ण स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणाऱ्या एसआरएचच्या संघानं प्रथम फलंदाजी करत राजस्थान रॉयल्ससमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं.
तर प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सच्या संघाला फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश आलं. त्यांना 20 ओव्हरमध्ये 139 धावाच करता आल्या.
या कामगिरीच्या जोरावर पॅट कमिन्सच्या नेतृत्वात हैदराबादच्या संघानं स्पर्धेत चौथ्या वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
फोटो स्रोत, Getty Images
क्लासेनचे अर्धशतक
प्रथम फलंदाजी करणाऱ्या SRH च्या संघाला पहिल्याच ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर फटका बसला. तडाखेबाज सलामीवीर अभिषेक शर्मा अवघ्या 12 धावांवर बाद झाला.
पण स्पर्धेत सर्वाधिक धावांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचलेल्या ट्रॅविस हेडनं पुन्हा एकदा संघाला सावरलं. त्यानं राहुल त्रिपाठीच्या साथीनं चांगली भागिदारी केली.
हेडनं 28 चेंडूंमध्ये 34 धावा केल्या. तर त्रिपाठीनं 15 चेंडूंमध्ये 37 धावांची फटकेबाजी करत गोलंदाजांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर झालेल्या पडझडीनंतर हेनरिक क्लासेननं 34 चेंडूंमध्ये 50 धावांची खेळी करत हैदराबादला मजबूत स्थितीपर्यंत पोहोचवलं. त्या जोरावर हैदराबादनं 9 विकेट गमावत 175 धावा केल्या.
राजस्थानच्या ट्रेंट बोल्ट आणि आवेश खान यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर संदीप शर्मानं दोघांना बाद केलं. गेल्या सामन्यात अत्यंत किफायती ठरलेल्या अश्विनच्या 4 ओव्हरमध्ये हैजराबादनं 43 धावा केल्या आणि त्याला विकेटही मिळाली नाही.
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, हेनरिक क्लासेन
राजस्थानच्या फलंदाजांचे अपयश
हैदराबादच्या संघानं विजयासाठी दिलेलं 176 धावांचं आव्हान यंदाच्या स्पर्धेतील धावांचा पाऊस पाहता फार मोठं नव्हतं. पण मोठ्या सामन्यांच्या दबावात पाठलाग करताना कोणतीही धावसंख्या मोठी ठरू शकते. राजस्थानच्या बाबतीत तसंच झाल्याचं पाहायला मिळालं.
यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरैल वगळता राजस्थानच्या एकाही फलंदाजांचा हैदराबच्या गोलंदाजांसमोर टिकाव लागला नाही.
सलामीला आलेल्या जैस्वालनं 21 चेंडूंमध्ये 42 धावांची फटकेबाजी करत संघाला एक चांगली सुरुवात करून दिली होती. पण मधल्या फळीतील फलंदाजांना धावसंख्या तशी ठेवता आली नाही. कोहलर, सॅमसन आणि रियान पराग लवकरत बाद झाले.
त्यानंतर आलेल्या ध्रुव जुरैलनं फकटेबाजी करत सामन्यावर परत पकड मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानं 35 चेंडूंमध्ये 52 धावा केल्या. पण त्याची झुंज एकाकी ठरली. त्याला दुसऱ्या बाजुनं एकाही फलंदाजाची साथ मिळाली नाही.
अखेर राजस्थानच्या संघाला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावत 139 धावाच करण्यात यश आलं.
हैदराबादच्या गोलंदाजीचा विचार करता, फलंदाजीमध्ये अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्मानं गोलंदाजीमध्ये उणीव भरून काढली. त्यानं सॅमसन आणि हेटमायर या दोन प्रमुख फलंदाजांना बाद केलं.
तर इॅम्पॅट्क प्लेयर म्हणून मैदानात उतरलेल्या शाहबाज अहमदनं जैस्वाल, पराग आणि अश्विन या तिघांचे बळी घेत सामना हैदराबादच्या बाजुनं झुकवला.
फोटो स्रोत, Getty Images
स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी सायंकाळी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर या हंगामाचा विजेता मिळणार आहे.
नमस्कार
बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजमध्ये आपले स्वागत आहे. राज्यात पुणे कार अपघातावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. देशात पाच टप्प्यांचे मतदान संपले आहे.
युनायटेड किंगडममध्ये निवडणुकांची घोषणा झाली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन आणि युक्रेन-रशिया संघर्ष सुरू आहे.
या सर्व घडामोडी, तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर बातम्या तुम्हाला या पेजवर वाचायला मिळतील.