You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

ममता बॅनर्जी यांचा आरोप : 'भाजपने 100 हून अधिक जागा लुटल्या, त्यांचा विजय अनैतिक'

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभांचे आज (4 मे) निकाल जाहीर होत आहेत.

थोडक्यात

  • विधानसभा निवडणूक 2026 चे ताजे निकाल याठिकाणी पाहा
  • गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत कमळ फुलले आहे, भाजपच्या विजयानंतर काय म्हणाले पंतप्रधान मोदी
  • ममता बॅनर्जी यांचा सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर मतदारसंघातून पराभव केला
  • तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांची आश्चर्यकारक कामगिरी, डीएमकेला पछाडत टीव्हीके पहिल्या स्थानी
  • तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांना कोलाथूर मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला.
  • आसाममध्ये भाजपाला स्पष्ट आघाडी मिळत असल्याचं चित्र
  • केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला मोठी आघाडी
  • पुद्दुचेरीमध्ये भाजपप्रणित आघाडी पुढे

लाईव्ह कव्हरेज

नितीन सुलताने आणि प्रविण सिंधू

  1. पश्चिम बंगाल: मोदींनी जिथं झालमुरी खाल्ली त्या मतदारसंघात भाजपची कामगिरी कशी आहे?

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. प्राथमिक कलानुसार आतापर्यंत भाजपाने तृणमूल काँग्रेसवर आघाडी कायम ठेवली आहे.

    झारग्राम मतदारसंघात भाजपा आघाडीवर आहे. याच मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान झालमुरी खाल्ली होती.

    येथे भाजपा उमेदवार लक्ष्मीकांत साव 29 हजार 882 मतांनी आघाडीवर आहेत.

    तर, तृणमूल काँग्रेसचे मंगल सरीन भाजपाच्या उमेदवारापेक्षा 8 हजार मतांनी मागे आहेत.

    हे प्राथमिक कल आहेत आणि विविध टप्प्यांमध्ये मतमोजणी जसजशी पुढे जाईल तसतसे यात बदल होऊ शकतात.

    पश्चिम बंगालमधील 294 जागांसाठीचे मतदान 23 आणि 29 एप्रिलला झाले, परंतु फाल्टा मतदारसंघात 21 मे रोजी पुन्हा मतदान होणार आहे.

  2. 'पश्चिम बंगालमध्ये आम्ही सरकार स्थापन करू'; भाजपा नेते शुभेंदु अधिकारी यांनी काय दावा केला?

    पश्चिम बंगालमधील 293 विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. प्राथमिक कलानुसार सत्ताधारी टीएमसी मागे पडत असून भाजपाने आपली आघाडी कायम ठेवली आहे.

    सध्या, भाजपा 153 जागांवर, तर टीएमसी 122 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर आहे.

    दरम्यान, भाजपा नेते शुभेंदु अधिकारी यांनी "भाजप पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करेल" असा दावा केला आहे.

    विशेष म्हणजे, शुभेंदु अधिकारी पुन्हा नंदीग्राममधून निवडणूक लढवत असून भवानीपूरमधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आव्हान देत आहेत.

  3. तामिळनाडू: अभिनेता विजयच्या पक्षाच्या सुरुवातीच्या ट्रेंडमधील कामगिरीने अनेकजण चकित

    तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत यावेळी डीएमके आणि एआयएडीएमके युतीसोबतच एका तिसऱ्या पक्षानेही आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. हा पक्ष म्हणजे प्रसिद्ध तामिळ चित्रपट अभिनेता विजयचा टीव्हीके पक्ष आहे.

    तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांसाठी मतमोजणी सुरू असून बहुमताचा आकडा 118 आहे.

    टीव्हीके 49 जागांवर आघाडीवर आहे, तर एआयएडीएमके 61 जागांवर आघाडीवर आहे. डीएमके 97 जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमधील टीव्हीकेच्या कामगिरीने अनेकांना चकित केले आहे.

    एआयएडीएमके आणि टीव्हीके एकत्रितपणे डीएमकेपेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहेत.

  4. आसाम विधानसभा निवडणुका: या 6 प्रमुख जागा आहेत चर्चेत

    प्रेरणा, बीबीसी प्रतिनिधी

    आसाममध्ये 126 विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. पोस्टल मतांची मोजणी पूर्ण झाली असून आता ईव्हीएम उघडण्यास सुरुवात झाली आहे.

    भाजपच्या नेतृत्वाखालील नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (एनडीए) तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस आपली निसटलेली राजकीय पकड पुन्हा घट्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. आसाम विधानसभा निवडणुकीतील 6 जागा सर्वांत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या जागा ‘हाय-प्रोफाईल’ मानल्या जात आहेत.

    जालुकबारी – हा राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचा मतदारसंघ आहे. 2001 पासून ते सातत्याने इथे विजयी होत आहेत. यावेळी त्यांच्यासमोर काँग्रेसच्या विदिशा नियोग यांचे आव्हान आहे.

    जोरहाट – हा काँग्रेसचे लोकसभा खासदार गौरव गोगोई यांचा मतदारसंघ आहे. ते आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र आहेत. लोकसभा खासदार असूनही त्यांनी यावेळी विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे हितेंद्र नाथ गोस्वामी निवडणूक लढवत आहेत. ते या मतदारसंघातून याआधीही निवडून आले आहेत.

    बीनाकांडी – एआययूडीएफ पक्षाचे संस्थापक बदरुद्दीन अजमल यांचा हा मतदारसंघ. यावेळी त्यांची लढत आसाम गण परिषदचे शहाबुद्दीन मजूमदार आणि आसाम जातीय परिषदचे रेजाउल करीम चौधरी यांच्यासोबत आहे. आसाम गण परिषद एनडीएचा, तर आसाम जातीय परिषद महाजोट आघाडीचा भाग आहे. मागील निवडणुकीत बदरुद्दीन अजमल यांचा पक्ष काँग्रेससोबत आघाडीत होता, मात्र यावेळी पक्षाने एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत 27 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मागील वेळी पक्षाने 16 जागा जिंकल्या होत्या. या पक्षाचा प्रभाव लोअर आसाम आणि बराक व्हॅली भागात आहे.

    नजीरा– नजीरा ही अप्पर आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील जागा आहे. इथं काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देबाब्रत सैकिया यांची लढत भाजपचे मयूर बोरोघैन यांच्याशी आहे. मागील निवडणुकीतही याच दोघांमध्ये चुरशीची लढत झाली होती आणि विजयाचा फरक खूपच कमी होता.

    शिवसागर – हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. कारण रायजोर दलचे संस्थापक अखिल गोगोई इथून निवडणूक लढवत आहेत. ते सध्या इथले आमदारही आहेत. त्यांचा सामना एनडीएतील आसाम गण परिषदचे प्रदीप हजारिका आणि भाजपचे कुशाल दोवारी यांच्याशी आहे.

    ही जागा आणखी एका कारणासाठी महत्त्वाची आहे. कारण एकाच आघाडीचा भाग असूनही भाजप आणि एजेपीने इथं स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. अखिल गोगोई 2019-2020 दरम्यान सीएएविरोधातील आंदोलनांचे प्रमुख चेहरा होते. त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि ते जवळपास दोन वर्षे तुरुंगात होते.

    दिसपूर – हीदेखील एक हाय-प्रोफाइल सीट आहे. भाजपचे उमेदवार प्रद्युत बोरदोलोई, जे पूर्वी काँग्रेसचे खासदार होते, त्यांनी निवडणुकीआधीच पक्ष बदलून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयानंतर भाजपचे वरिष्ठ नेते जयंत कुमार दास यांनी पक्ष सोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.

    काँग्रेसने या जागेवर मीरा बोरठाकुर गोस्वामी यांना उमेदवारी दिली आहे.

  5. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी: शेअर बाजारावर कसा परिणाम?

    पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू आहे.

    सुरुवातीच्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपा आघाडी यांच्यात अटीतटीची लढत असल्याचे दिसून येत आहे.

    देशाच्या राजकारणासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या निवडणुकांच्या निकालाचा शेअर बाजारावरही परिणाम होताना दिसत आहे.

    दिवसाच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून येत आहे. निफ्टी 200 हून अधिक अंकांनी, तर सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला आहे.

    विश्लेषकांच्या मते, विधानसभा निवडणुकांचे कल आणि निकाल अधिक स्पष्ट झाल्यावर शेअर बाजारात त्याचे आणखी पडसाद उमटताना दिसू शकतात.

  6. विधानसभा निवडणूक 2026 : पश्चिम बंगालमध्ये प्राथमिक कलात भाजपा टीएमसीच्या पुढे

    देशातील 4 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे.

    पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांनुसार भाजपा सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर (टीएमसी) आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

    डेटानेटनुसार, टीएमसी 127 जागांवर आणि भाजप 147 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर आहे.

  7. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस-भाजपमध्ये अटीतटीची लढत, कल काय सांगतात?

    गेल्या महिन्यात 4 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे.

    प्राथमिक कलानुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) यांच्यात अटीतटीची लढत असल्याचे दिसून येत आहे.

    डेटानेटनुसार, तृणमूल काँग्रेस 111 जागांवर आणि भाजप 145 जागांवर आघाडीवर आहे. आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये 9 एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान झाले. तामिळनाडूमध्येही 23 एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान झाले.

  8. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल 2026 : प्राथमिक कल येण्यास सुरुवात; कोणत्या राज्यात कोण पुढे कोण मागे?

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालाचे प्राथमिक कल येण्यास सुरुवात झाली आहे.

    पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांसाठी 23 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी दोन टप्प्यांत मतदान झालं.

    या निवडणुकीत चौथ्यांदा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तृणमूल काँग्रेस आणि राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यात मुख्य लढत आहे. आज (4 मे) या निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल.

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालाच्या महत्त्वाच्या अपडेट्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा

  9. पश्चिम बंगाल : मतमोजणीदरम्यान भाजप राज्य अध्यक्ष समिक भट्टाचार्य काय म्हणाले?

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (4 मे) सकाळी सुरू झाली. यानंतर भाजपचे पश्चिम बंगाल राज्याध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी दणदणीत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

    कोलकाता येथील एका मतमोजणी केंद्राबाहेर समिक भट्टाचार्य म्हणाले, "राज्यातील जनतेने तृणमूल काँग्रेस सरकारला आधीच नाकारले आहे."

    "काही तासांमध्येच बहुसंख्य जागांवरून हे स्पष्ट होईल की, ममता बॅनर्जी आणि जनता यांच्यातील लढाईत जनतेने ममता बॅनर्जी यांना नाकारले आहे," असं मत त्यांनी व्यक्त केलं.

    पश्चिम बंगालमधील 293 जागांची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू झाली. प्राथमिक कलानुसार तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत दिसत आहे.

    तृणमूल काँग्रेस सलग चौथ्यांदा सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत आहे, तर भाजप राज्यात पहिल्यांदाच सरकार स्थापन करण्याची आशा करत आहे.

  10. सर्वप्रथम टपाल मतपत्रिकांची मोजणी, 8:30 वाजल्यापासून ईव्हीएम मतमोजणी

    पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.

    सर्वप्रथम टपाल मतपत्रिकांची मोजणी केली जात आहे. त्यानंतर सकाळी 8:30 वाजता ईव्हीएम मतमोजणी सुरू होईल.

    पश्चिम बंगालमधील 293, तामिळनाडूमधील 234, केरळमधील 140, आसाममधील 126 आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांचे निकाल जाहीर केले जातील.

    पश्चिम बंगालमधील 294 जागांसाठी 23 आणि 29 एप्रिलला मतदान झाले होते, परंतु फाल्टा जागेवर 21 मे रोजी पुन्हा मतदान होणार आहे. त्यामुळे, पश्चिम बंगालमधील 293 जागांचे निकाल जाहीर होत आहेत.

  11. 5 विधानसभा निवडणुकांचे प्राथमिक कल येण्यास सुरुवात; कोणत्या राज्यात कोण पुढे, कोण मागे?

    पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांचे कल येण्यास सुरुवात झाली आहे.

    पश्चिम बंगालमधील 294 जागांसाठीचे मतदान 23 आणि 29 एप्रिल रोजी संपले, परंतु फाल्टा मतदारसंघात 21 मे रोजी फेरमतदान होणार आहे. यामुळे आज पश्चिम बंगालमधील 293 जागांचा निकाल लागेल.

  12. 5 विधानसभा निवडणुकांचे प्राथमिक कल लवकरच; पश्चिम बंगालमध्ये तयारी कशी सुरू आहे?

    पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांचे कल लवकरच येण्यास सुरुवात होईल.

    पश्चिम बंगालमधील मतमोजणीसाठी केलेल्या व्यवस्थेबाबत, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल म्हणाले, "293 जागांची मतमोजणी सोमवारी (4 मे) होणार आहे. 35 जिल्हा मुख्यालय आणि 42 उपविभागीय मुख्यालयांसह एकूण 77 ठिकाणी मतमोजणी होईल."

    पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, ते म्हणाले, "निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बहुतेक केंद्रे जिल्हा स्तरावर असावीत. राज्यभरात एकूण 459 मतमोजणी हॉल आहेत. मतमोजणीवर देखरेख ठेवण्यासाठी 533 निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत."

    पश्चिम बंगालमधील 294 जागांसाठीचे मतदान 23 आणि 29 एप्रिल रोजी संपले, परंतु फाल्टा मतदारसंघात 21 मे रोजी फेरमतदान होणार आहे. यामुळे आज पश्चिम बंगालमधील 293 जागांचा निकाल लागेल.

  13. चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशाच्या निकालावर देशाचे लक्ष

    नमस्कार,

    आज चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकांचे आज (4 मे) निकाल आहेत.

    आसाम, केरल आणि पुदुच्चेरी या ठिकाणी 9 एप्रिल रोजी मतदान झाले तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी एका टप्प्यात मतदान झाले.

    पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान झाले. बहुतांश लोकांचे लक्ष पश्चिम बंगालच्या निकालावर आहे. एक्झिट पोलमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होईल असा अंदाज वर्तवला आहे.

    या लाईव्ह पेजच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर ताज्या निकालाचे अपडेटस, बातम्या, चुरशीच्या लढतींचे निकाल, ताज्या घडामोडी आणि विश्लेषण घेऊन येऊ.

    धन्यवाद