लोकसभा निकाल : राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड

लोकसभा निवडणूक निकालासंदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स त्याचप्रमाणे देशातील, राज्यातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही इथे वाचू शकता.

थोडक्यात

  • राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विविध सहकारी पक्षांनी नरेंद्र मोदी यांची आघाडीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड केली.
  • भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सना घेऊन बोईंग स्पेस कंपनीचं 'स्टारलायनर' अंतराळ यान आज अखेर अवकाशात झेपावलं.
  • भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआला लोकसभेत बहुमत मिळाल्याबद्दल चीननं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे.
  • नैऋत्य मोसमी वारे येत्या तीन चार दिवसांत दक्षिण महाराष्ट्रात दाखल होतील असं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे.
  • इंडिया आघाडीने सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले आहेत का असं विचारल्यावर राष्ट्रीय लोकदलाचे नेते तेजस्वी यादव यांनी, थोडं थांबा, काय काय होतं ते पाहात राहा असं उत्तर दिलं आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळासह पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दिला आहे.
  • महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. येत्या निवडणुकीसाठी नेतृत्वाने मला सरकारमधून मोकळं करावं आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची संधी द्यावी असं देवेंद्र म्हणाले आहेत.

लाईव्ह कव्हरेज

ओंकार करंबेळकर

  1. तेजस्वी यादव - नितीश कुमार एकाच विमानाने दिल्लीला, मीडियाला म्हणाले...

    तेजस्वी यादव - नितीश कुमार एकाच विमानाने दिल्लीला, मीडियाला म्हणाले...

    फोटो स्रोत, Getty Images

    इंडिया आघाडीने सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले आहेत का असं विचारल्यावर राष्ट्रीय लोकदलाचे नेते तेजस्वी यादव यांनी, थोडं थांबा, काय काय होतं ते पाहात राहा असं उत्तर दिलं आहे.

    तेजस्वी यादव इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत आले आहेत.

    तेजस्वी यादव ज्या विमानातून दिल्लीला आले त्याच विमानात बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमारही होते. नितिशकुमार रालोआच्या बैठकीसाठी दिल्लीत आले आहेत.

    दिल्लीत पोहोचल्यावर तेजस्वी म्हणाले, थोडा धीर धरा, काय काय होतं ते पाहात राहा.

    नितिशकुमार यांच्याशी विमानात काय बोलणं झालं असं विचारल्यावर ते म्हणाले, आम्ही फक्त एकमेकांना नमस्कार केला. पुढं काय होतं ते पाहात रहा.

    जनतादल युनायटेडला बिहारमध्ये 12 जागा मिळाल्या आहेत.

  2. सुप्रिया सुळेंचा विजय शरद पवारांची ताकद दाखवणारा की अजित पवारांना धडा शिकवणारा?

    सुप्रिया सुळेंचा विजय शरद पवारांची ताकद दाखवणारा की अजित पवारांना धडा शिकवणारा?

    फोटो स्रोत, Getty Images

    'बारामती कुणाची? शरद पवारांची की अजित पवारांची?'

    हा प्रश्न बारामतीसह महाराष्ट्र आणि देशाला पडला होता. या प्रश्नाचं उत्तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानं 4 जूनला दिला.

    बारामतीत सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवार यांचा तब्बल 1 लाख 53 हजार मतांनी पराभव केला.

    नणंद भावजयीच्या निवडणुकीत सुळेंची नुसती सरशीच झाली नाही, तर खडकवासला विधानसभा मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघात त्यांना आघाडीही मिळाली आहे.

    पोस्टल मतदानाची पहिली फेरी वगळता पुढच्या जवळपास सर्वच फेऱ्यांमध्ये सुप्रिया सुळे आघाडी मिळवत गेल्या. महायुतीतल्या नेत्यांची नाराजी आणि दुसरीकडे भावनिक मुद्दयांवर गेलेली निवडणूक याच्या आधारे हा विजय मिळाल्याचे चित्र दिसते आहे.

    मात्र, हा विजय म्हणजे जनतेने सुळेंना दिलेला कौल की शरद पवारांना दिलेला पाठिंबा? असा प्रश्नही उपस्थित होतोय.

    सुप्रिया सुळेंचा विजय शरद पवारांची ताकद दाखवणारा की अजित पवारांना धडा शिकवणारा?

    फोटो स्रोत, Getty Images

  3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडे दिला राजीनामा

    PRESIDENT OF INDIA

    फोटो स्रोत, PRESIDENT OF INDIA

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळासह पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दिला आहे.

    राष्ट्रपती मुर्मू यांनी हा राजीनामा स्विकारला आहे. नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत कार्यभार सांभाळावा असं निवेदन राष्ट्रपतींनी त्यांना केले.

    लोकसभा निवडणूक 2024 चे सर्व जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडे दिला राजीनामा

    फोटो स्रोत, ANI

    देशात एनडीएला292 तर इंडिया आघाडीला 234 जागांवर यश मिळालं.

    महाराष्ट्रातील परिस्थितीचा विचार करायचा झाल्यास लोकसभेच्या 48 जागांपैकी महायुतीला 18 जागांवर तर महाविकास आघाडीला 30 जागांवर यश मिळाल्याचं पाहायला मिळालं.

    या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपप्रणित एनडीए तसंच विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या आज दिल्लीत बैठका आहेत.

  4. 'मला सरकारमधून मोकळं करा' - देवेंद्र फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना विनंती

    मला सरकारमधून मोकळं करा- देवेंद्र फडणवीसांची विनंती

    फोटो स्रोत, Getty Images

    काल लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यावर आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये चर्चा आणि मंथनाचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. येत्या निवडणुकीसाठी नेतृत्वाने मला सरकारमधून मोकळं करावं आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची संधी द्यावी असं देवेंद्र म्हणाले आहेत.

    मला सरकारमधून मोकळं करा- देवेंद्र फडणवीसांची विनंती

    ते म्हणाले, "मला विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळे मला मंत्रिमंडळाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला करणार आहे."

    ते म्हणाले, "ज्याप्रकारे महाराष्ट्रात जागा मिळतील असं वाटलं होतं ते झालं. नाही त्यामागे काही कारणं आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला स्वीकारलं आणि आम्हाला नाकारलं हे नॅरेटिव्ह चुकीचं आहे. लोकांना समान मतं दिली आहेत. कुठेही आम्हाला नाकारलं असं झालेलं नाही. आम्हाला फक्त 2 लाख मतं कमी पडली आहेत. मात्र यात जागेचं अंतर जास्त असल्यामुळे मविआला 30 आणि आम्हाला 17 जागा मिळाल्या आहे. मुंबईत मविआला 4 आणि आम्हाला 2 जागा मिळाल्या. मुंबईत मविआपेक्षा आम्हाला 2 लाख मतं जास्त आहेत. "

    "या निवडणुकीवर आता मोठं ब्रेन स्टॉर्मिंग आम्ही करत आहोत, कार्यकर्त्यांनी जीव पणाला लावून काम केले. आमच्या जागा कमी झाल्या आहेत, त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतली. मी आणखी तयारीने मैदानात उतरणार, नव्या तयारीने लोकांचा विश्वास संपादित करू.", असंही ते म्हणाले.

  5. बारामतीत कोणत्या विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना आघाडी?

    बारामती मताधिक्य
  6. बारामतीत पिपाणीमुळे तुतारीची मतं कमी झाली, साताऱ्यात काय झालं?

    एकाच नावाची दोन माणसं निवडणूकीला उभी रहाणं काही नवीन नाही. पण एक सारख्या दिसणाऱ्या चिन्हामुळे मात्र या निवडणूकीत मताधिक्यात मोठा फरक पडल्याचं दिसतं आहे.

    तुतारी आणि ट्रम्पेट या चिन्हांमुळे साताऱ्यासारख्या मतदारसंघात तर विनींग मार्जिन पेक्षाही जास्त फरक पडला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीसाठी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं. त्यानंतर अपक्षांना ट्रम्पेट हे चिन्ह दिलं जाऊ नये अशी मागणी त्यांनी केली होती. पण निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य केली नाही. त्याचाच परिणाम साताऱ्यात दिसला.

    साताऱ्यात संजय गाडे यांना पिपाणी चिन्ह मिळालं. त्यांना या निवडणुकीत 37062 मतं पडली. इथे भाजपच्या उदयनराजे भोसले यांचं मताधिक्य आहे 32 हजार मतांचं

    दिंडोरीमध्ये मताधिक्यात नाही, पण हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भास्कर भगरे या उमेदवाराशी नावसाधर्म्य सांगणाऱ्या बाबू भगरेंना तब्बल 1 लाख मतं पडली आहेत.

    बीडची निवडणूक चुरशीची झाली इथं मतांचा फरक आहे 6553 मतांचा. इथल्या पिपाणी चिन्हाच्या उमेदवाराला पडलेली मतं आहेत 54 हजार तर बारामतीत मताधिक्यात फरक नसला तरी इथल्या पिपाणी चिन्ह असणाऱ्या शेख या उमेदवाराने 14917 मतं घेतली आहेत.

    एकूणच चिन्ह आणि नामसाधर्म्याचा परिणाम निवडणुकीत दिसला हे नक्की

  7. एकनाथ शिंदे, अजित पवार यांचं आता काय होणार? पाहा विश्लेषण

    व्हीडिओ कॅप्शन, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचं आता काय होणार? गिरीश कुबेर म्हणतात...
  8. वारंवार राजकीय भूमिका बदलणारे नितीश कुमार लोकसभा निकालानंतर पुन्हा का आले आहेत चर्चेत?

  9. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा करणार का? पवार म्हणतात, 'नाही'

    सत्ता स्थापनेच्या चर्चा या आकडे काय आहेत हे पाहूनच कराव्यात असं माझं वैयक्तिक मत आहे. आता आकडे आहेत की नाही याचा अंदाज मला नाहीये, असं म्हणत शरद पवार यांनी इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार की नाही याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली.

    आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

    इंडिया आघाडीत नितीश कुमारांना पंतप्रधानपद देण्याची चर्चा असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार यांनी म्हटलं की, याबद्दल मला माहीत नाही. पण नितीश कुमारांचं विधान मी वाचलं. त्यांनी म्हटलं आहे की, मी एनडीएसोबत आहे.

    चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार यांच्याशी इंडिया आघाडीत येण्याबद्दल चर्चा करणार का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी 'नाही' असं दिलं. आमच्या युतीत जे ठरेल त्यानुसार निर्णय घेऊ. त्याआधी उगीचच का कोणाचं नाव घ्यावं, असं त्यांनी म्हटलं.

    शरद पवार

    त्यांनी पुढे म्हटलं, "आज आमची पहिली मीटिंग आहे. आमची पुढची रणनीती काय असेल यावर आज चर्चा होईल. जोपर्यंत गोष्टी ठरत नाहीत तोपर्यंत नेता कोण असेल वगैरे चर्चा करण्यात काय अर्थ आहे."

    आज इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक आहे. त्यासाठी शरद पवार दिल्लीला जाणार आहेत.

  10. प्रकाश आंबेडकर, पंजाबराव डख ते वसंत मोरे, 'वंचित'च्या 34 उमेदवारांना किती मतं मिळाली?

  11. क्लायमेट रेफ्युजी, कचरावेचक ते आंतरराष्ट्रीय संघटनेच्या उपाध्यक्ष

    आपल्या घरातला कचरा तापमान वाढीत भर घालतो, हे शास्त्रीय पद्धतीने आकडेवारीसह प्रसिद्ध झालेलं आहे. त्यानुसार कचरावेचकांची भूमिका महत्त्वाची ठरते.

    वर्ल्ड बँक, युएनडीपी, युएनइपी यांच्यासारख्या मातब्बर संस्थांनीही क्लायमेट चेंजचा सामना करण्यात त्यांचं योगदान अधोरेखित केलं आहे.

    इंटरनॅशनल अलायन्स ऑफ वेस्ट पिकर्स या कचरावेचकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने नुकतीच आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस निवडून आणली. त्यावेळी संघटनेच्या उपाध्यक्षपदी मुंबईच्या सुशीला साबळे यांची निवड झाली. त्या स्वतः क्लायमेट रेफ्युजी (हवामान संकटाचा फटका बसल्याने निर्वासित) आहेत.

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाहा हा खास रिपोर्ट

    रिपोर्ट - प्राजक्ता धुळप

    शूट - शरद बढे, प्राजक्ता धुळप

    व्हीडिओ एडिट - शरद बढे

    व्हीडिओ कॅप्शन, जागतिक पर्यावरण दिन : सुशीला साबळे आंतरराष्ट्रीय कचरावेचक संघटनेच्या उपाध्यक्ष कशा बनल्या?
  12. लोकसभा निकाल : महाराष्ट्राच्या निकालाचं अंतिम चित्र

    कोणाला किती जागा
  13. बीडमध्ये शेवटपर्यंत चुरस, अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडेंचा पराभव

    बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात निवडणूक जितकी चुरशीची झाली, तितकीच रस्सीखेच निकालातही दिसून आली. महाराष्ट्रातील सर्वात उशिरा लागलेला निकाल म्हणून बीडची नोंद झाली.

    बजरंग सोनवणे यांना 6 लाख 81 हजार 585 मतं, तर पंकजा मुंडे यांना 6 लाख 74 हजार 569 मतं मिळाली.

    पंकजा मुंडे यांचा 6 हजार 585 मतांनी बजरंग सोनवणेंनी पराभव केला.

    पंकजा मुंडे- बजरंग सोनावणे

    बीडमधील मतमोजणी दरम्यान काहीसा गोंधळही पाहायला मिळाला. मात्र, अखेरीस बजरंग सोनवणेंना घोषित करण्यात आलं.

  14. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या बैठकीला कोणाकोणाची उपस्थिती?

    शरद पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे

    फोटो स्रोत, Getty Images

    लोकसभा निवडणूक 2024 चे सर्व जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.

    देशात एनडीएला 292 तर इंडिया आघाडीला 234 जागांवर यश मिळालं.

    महाराष्ट्रातील परिस्थितीचा विचार करायचा झाल्यास लोकसभेच्या 48 जागांपैकी महायुतीला 18 जागांवर तर महाविकास आघाडीला 30 जागांवर यश मिळाल्याचं पाहायला मिळालं.

    या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपप्रणित एनडीए तसंच विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या आज दिल्लीत बैठका आहेत.

    महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या बैठकीला कोणाची उपस्थिती असेल, हे अजून समजलं नाहीये.

    दुसरीकडे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित असतील.

    काल (4 जून) निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी आपण दुपारी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार असल्याचं म्हटलं होतं.

    उद्धव ठाकरे यांनीही माध्यमांशी संवाद साधताना इंडिया आघाडीने सत्तास्थापनेचा दावा करायला हवा, असं म्हणत सकाळी संजय राऊत, अनिल देसाई हे दिल्लीला रवाना होतील आणि आपण स्वतः संध्याकाळी दिल्लीला जाऊ असं सांगितलं होतं.

    त्यामुळे या बैठकांमधून आता काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचचं लक्ष असेल.

  15. नमस्कार,

    लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण, ताजे अपडेट्स आणि राज्यातील, देशातील तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही इथे वाचू शकता.

    काल (4 जून) दिवसभरातले महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा.