You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या

1 मे च्या ताज्या बातम्या चालू घडामोडी.

थोडक्यात

  • अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने पोलिस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं वृत्त आहे.
  • नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केली आहे.
  • शिवसेना शिंदे गटाकडून ठाण्यात नरेश मस्के तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पुढच्या पाच दिवसांपर्यंत उष्णतेची लाट राहील, तर मध्य भारतात 3 ते 5 मे पर्यंत उष्णतेचा कडाका राहील.
  • इस्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात निदर्शनं, कॅम्पसमध्ये पोलीस दाखल
  • आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे.

लाईव्ह कव्हरेज

ओंकार आणि तुषार

  1. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर 48 तासांसाठी प्रचारबंदी

    निवडणूक आयोगाने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांना पुढचे 48 तास प्रचार करण्यापासून मनाई केली आहे.

    प्रचार न करण्याची त्यांची मुदत बुधवार, 1 मे रोजी रात्री आठ वाजल्यापासून सुरू होत आहे.

    तेलंगणा काँग्रेस प्रदेश समितीचे उपाध्याक्ष जी निरंजन यांनी 6 एप्रिल रोजी एक तक्रार केल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे.

    निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या तक्रारीत निरंजन यांनी म्हटलं होतं की, केसीआर यांनी 5 एप्रिलमध्ये तेलंगणातल्या सिरसिल्लामधील सभेत काँग्रेस विरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता.

    तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने तेलंगणामधील मुख्य निवडणूक कार्यालयाकडून एक अहवाल मागवला.

    हा अहवाल मिळाल्यानंतर 16 एप्रिलला निवडणूक आयोगाने केसीआर यांना आचार संहिता उल्लंघनाच्या आरोपामध्ये कारणं दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर प्रदीर्घ प्रक्रियेनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.

  2. कथित लैंगिक शोषण व्हीडिओ प्रकरणी प्रज्वल रेवन्ना यांनी मांडली आपली बाजू

    कथित लैंगिक शोषण व्हीडिओ प्रकरणी कर्नाटकमधील हासन लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांनी पहिल्यांदाच आपली बाजू मांडली आहे.

    प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक शोषण, शेकडो सेक्स व्हीडिओ रेकॉर्ड करणे, धमकावणे आणि कट रचण्याचे आरोप आहेत. अनेक व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रज्वल रेवन्ना हे जर्मनीला निघून गेल्याचं समोर आलं.

    सोशल मीडियावर आपली बाजू मांडताना त्यांनी लिहिलं की, “चौकशीमध्ये सहभागी होण्यासाठी मी बंगळुरूमध्ये नाहीये. त्यामुळे मी माझ्या वकिलांमार्फत सीआयडी बंगळुरूच्या संपर्कात आहे. सत्य जे आहे ते लवकरच समोर येईल.”

    जनता दलाचे (सेक्युलर) आमदार एचडी रेवन्ना आणि त्यांचे पुत्र प्रज्वल रेवन्ना यांना विशेष तपास पथकाने मंगळवारी (30 एप्रिल) नोटीस बजावली होती.

    ही नोटीस कथित लैंगिक शोषण प्रकरणात बजावण्यात आली आहे. दोघांनाही एसआयटी समोर हजर होण्यासाठी सांगण्यात आलं आहे.

  3. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या

    अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने पोलिस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं वृत्त आहे.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे. याविषयी रुग्णालयाकडून अथवा पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया अजून मिळालेली नाही. पण ANI आणि PTI या वृत्तसंस्थांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे.

    सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. सलमानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी दोघांना गुजरातमधून अटक करण्यात आलेली, तर या आरोपींना पिस्तूल पुरवल्याप्रकरणी दोघांना पंजाबमधून अटक करण्यात आलेली. सोनू चंदर आणि अनुज थापन अशी पंजाबमधून अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

    काय होतं हे संपूर्ण प्रकरण?जाणून घ्या.

  4. महाराष्ट्रात 5 मे पर्यंत उष्णतेची लाट, हवामान विभागाचा इशारा

    पूर्व भारतात 2 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, तर दक्षिणेकडील भागात 3 मेपर्यंत उष्णतेच्या झळा पाहायला मिळतील. त्यानंतर परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

    महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पुढच्या पाच दिवसांपर्यंत उष्णतेची लाट राहील, तर मध्य भारतात 3 ते 5 मे पर्यंत उष्णतेचा कडाका राहील.

    ईशान्य भारतात मात्र वीजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

  5. नाशिक लोकसभेचा महायुतीचा तिढा सुटला, शिंदे गटाकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर

    नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केली आहे.

    इतके दिवस नाशिक लोकसभा कोण लढवणार याचे चित्रच स्पष्ट होत नव्हते. उमेदवारच काय पण महायुतीकडून ही जागा कोणता पक्ष लढवणार हेच ठरत नव्हते.

    नाशिक लोकसभेसाठी शांतिगिरी महाराज देखील इच्छुक होते. त्यांनी शक्तिप्रदर्शन देखील केले होते पण आज शेवटी शिंदे गटाकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली.

  6. शिवसेना शिंदे गटाकडून ठाण्यात नरेश मस्के तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना तिकीट

    शिवसेना शिंदे गटाकडून ठाण्यात नरेश मस्के तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना तिकीट देण्यात आले आहे. गेले अनेक दिवस या मतदारसंघांची चर्चा सुरू होती. त्याला आता पूर्णविराम देण्यात आला आहे.

  7. कोलंबिया विद्यापीठात आतापर्यंत काय काय घडलं? ताज्या घडामोडी वाचा

    • कोलंबिया विद्यापीठात गेले अनेक दिवस विद्यार्थी गाझाच्या युद्धावरुन आंदोलन करत होते
    • विद्यार्थ्यांनी आवारातील हॅमिल्टन हॉलवर ताबा घेऊन त्याच्या खिडक्या तोडल्या
    • त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांनी आवारात येण्याची विनंती केली.
    • मंगळवारी रात्री न्यूयॉर्क पोलीस आवारात आले
    • विद्यापीठ आवारात त्यांनी विद्यार्थ्यांना अटक केली.
    • हॅमिल्टन हॉल मोकळा केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
  8. कोलंबिया विद्यापीठात पोलीस, विद्यार्थ्यांची धरपकड

    अमेरिकेत न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापिठाच्या आवारात न्यूयॉर्क पोलीस रात्रीच दाखल झाले आहेत.

    विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या मुलांना नेण्यासाठी न्यूयॉर्क पोलिसांची एक बस काही अंतरावरच 116 स्ट्रीट एंड ब्रॉडवेवर पोहोचली आहे. असं कोलंबियाच्या स्टुडंट रेडिओनंसांगितलंआहे.

    यूएसटीव्ही नेटवर्कवर प्रसारित होत असलेल्या दृश्यात आंदोलकांना अशा बसमध्ये बसवलं जातआहे. आतापर्यंत किती मुलांना अटक झाली आहे हे समजलेलं नाही.

    सीएनएनला एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की न्यूयॉर्क पोलिसांनी आजच्या मोहिमेत अश्रूधुराचा वापर केलेला नाही, तर फ्लॅश बँगग्रेनेड वापरले आहेत.

    गाझातील युद्धाच्या मुद्द्यावरून अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू आहेत. ही आंदोलनं थांबवण्यासाठी आणि आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याचा पोलीस आणि स्थानिक प्रशासन प्रयत्न करत आहे.

    सोशल मीडियावर सध्या या आंदोलनाशी संबंधित पोस्ट दिसत आहेत. त्यात 'इंतेफादा' असा शब्द वापरला जात आहे. या शब्दाचा वापर अरबी भाषेत क्रांती किंवा बंड या अर्थानं केला जातो.

  9. नमस्कार

    आज कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आहे. देशात आणि राज्यभरात आज अनेक गोष्टी सुरू आहेत. त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.

    इस्रायल आणि हमासमधील तणावाचे पडसाद अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातही पडले आहेत.

    रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास संघर्ष सुरू आहे. त्याचे अपडेट्स देखील या पानावर तुम्हाला वाचायला मिळतील.