तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर 48 तासांसाठी प्रचारबंदी
निवडणूक आयोगाने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांना पुढचे 48 तास प्रचार करण्यापासून मनाई केली आहे.
प्रचार न करण्याची त्यांची मुदत बुधवार, 1 मे रोजी रात्री आठ वाजल्यापासून सुरू होत आहे.
तेलंगणा काँग्रेस प्रदेश समितीचे उपाध्याक्ष जी निरंजन यांनी 6 एप्रिल रोजी एक तक्रार केल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या तक्रारीत निरंजन यांनी म्हटलं होतं की, केसीआर यांनी 5 एप्रिलमध्ये तेलंगणातल्या सिरसिल्लामधील सभेत काँग्रेस विरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने तेलंगणामधील मुख्य निवडणूक कार्यालयाकडून एक अहवाल मागवला.
हा अहवाल मिळाल्यानंतर 16 एप्रिलला निवडणूक आयोगाने केसीआर यांना आचार संहिता उल्लंघनाच्या आरोपामध्ये कारणं दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर प्रदीर्घ प्रक्रियेनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.








