रोज डे : गुलाब भारतीय आहे का? ही फुलं प्रेमाचं प्रतीक का बनली?

गुलाबाचं फुल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गुलाबाचा रंगीत इतिहास
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

चार्वाक, सुश्रुत, शेक्सपियर आणि बाबर या सगळ्यांमध्ये समान गोष्ट काय आहे? या सगळ्यांचा एका फुलाशी संबंध आहे.

असं फुल ज्याला सौंदर्याचं, विलासाचं प्रतीक मानलं जातं, तरीही ते एकेकाळी युद्धाचं चिन्ह बनलं होतं. जवळपास सगळ्याच प्राचीन संस्कृतींमध्ये या फुलाचे उल्लेख आहेत. त्याच्या उमलत्या पाकळ्यांनी करोडो प्रेमिकांना घायाळ केलंय आणि हजारो-लाखो लेखक-कवींना प्रेरणा दिली आहे.

ही त्या फुलाची, गुलाबाची गोष्ट आहे.

या गोष्टीत इतिहास, धर्म, राजकारण, कला, विज्ञान, कथा, कविता, दंतकथा हे सगळे एकमेकांत गुंफून गेले आहेत. माणसाचा इतिहास सुरू होण्याआधीच गुलाबाची कहाणी सुरू होते.

तब्बल साडेतीन कोटी वर्षांपूर्वीही गुलाबवर्गीय वनस्पतींचं अस्तित्व होतं, असं जीवाष्मांवरून दिसून आलं आहे. अमेरिकेच्या कोलोराडोमधील फ्लॉरिसंट खोऱ्यात हे जीवाष्म आढळून आले होते.

हा तो काळ होता जेव्हा डायनासॉर्स नष्ट झाले होते आणि पृथ्वीवर सस्तन प्राणी वावरू लागले होते. अर्थात तेव्हापासून आतापर्यंत गुलाबाचं रूपही बदलत गेलं आहे.

भारतासह आशियात आढळणाऱ्या जंगली गुलाबाच्या प्रजाती असोत, जुन्या काळात बगिच्यांमध्ये विकसित झालेले गुलाब असोत वा आधुनिक काळातले अशक्य वाटणाऱ्या रंगांचे गुलाब.

Blue Rose

फोटो स्रोत, Mattia Pistoia/Getty Images

फोटो कॅप्शन, निळ्या रंगछटांचे गुलाब

आशियातल्या चीन, भारतापासून अमेरिकेतल्या मेक्सिकोपर्यंत गुलाबातलं वैविध्य थक्क करणारं आहे.

प्रत्येक देशानं, प्रदेशानं त्यात भर घातली आहे. इतकी की गुलाब मुळचा आमचा, असं आज कुणी म्हणूही शकणार नाही.

रानटी फुलं अशी बनली प्रेमाचं प्रतीक

उत्तर गोलार्धातील अनेक प्रदेशांत गुलाबाच्या नैसर्गिक प्रजाती आढळतात. अन्नापासून औषधापर्यंत या फुलांचा वापर केला गेला आहे.

पण फुलझाडं म्हणून गुलाबांची लागवड पहिल्यांदा चीनमध्ये साधारण पाच हजार वर्षांपूर्वी सुरू झाली असावी, असं बहुतांश तज्ज्ञ मानतात.

तिथून गुलाबाच्या नव्या प्रजाती विकसित झाल्या आणि रेशीम मार्गावरून पश्चिम आशियावाटे त्या युरोपात पोहोचल्या.

रोझा रुबिजिनोसा. रानटी गुलाबाची एक प्रजाती

फोटो स्रोत, By Eve Livesey/Getty Images

फोटो कॅप्शन, रोझा रुबिजिनोसा. रानटी गुलाबाची एक प्रजाती

प्राचीन इजिप्तच्या चित्रांत आणि कबरींमध्ये गुलाबाच्या पाकळ्या सापडल्या आहेत. पर्शिया म्हणजे आजच्या इराणमधील बगिच्यांत गुलाबाला महत्त्वाचं स्थान होतं.

ग्रीक लेखक अचिलस टॅटियसनं गुलाबाला 'फुलांची राणी' संबोधलं. पण युरोपात या फुलांचा खरा प्रसार रोमन साम्राज्याच्या काळात झाला.

रोमन लोकांनी गुलाबाची झाडं पूर्वेकडील देशांतून आयात केली होती. त्यांच्यासाठी या फुलांचा उपयोग फक्त बागेत सजावटीपुरता मर्यादित नव्हता.

रोममधल्या श्रीमंतांच्या घरी गुलाबजलाचा उपयोगही होऊ लागला होता. सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी तसंच वाईन आणि खाद्यपदार्थांमध्ये गुलाबाचा वापर व्हायचा.

उत्सवाच्या दिवशी महत्त्वाच्या व्यक्तींसाठी गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या घातल्या जायच्या.

The Roses of Heliogabalus

फोटो स्रोत, Heritage Images/Getty Images

फोटो कॅप्शन, रोमन काळात गुलाबाच्या पाकळ्यांची बरसात केली जायची. हे 19व्या शतकातलं पेंटिंग आहे.

रोमन लोक 'रोझालिया' नावाचा गुलाबाचा उत्सवही साजरा करायचे, ज्यात मृत प्रियजनांच्या कबरींवरही गुलाबाची फुलं वाहिली जायची.

पण गुलाब आणि त्यातही लाल गुलाब प्रेमाचं प्रतीक कसं बनला?

त्याला कारण ठरली ग्रीकांची देवी अ‍ॅफ्रोडाईटी, जिला रोमन लोक व्हीनस म्हणून ओळखत. या दोन्ही देवता सौंदर्य, कामभावना आणि प्रेमाशी जोडल्या गेल्या होत्या आणि गुलाबपुष्प हे त्यांचं प्रतीक होतं.

पण मग लालच रंगाचा गुलाब का? यामागेही एक गोष्ट सांगितली जाते. ग्रीक लेखक पॉसानियस लिहितो की, "मृत्यूशय्येवर असलेला आपला प्रियकर अडोनिसला भेटण्यासाठी अ‍ॅफ्रोडाईटी घाईनं निघाली, तेव्हा गुलाबाच्या काट्यांवर पाय पडल्यानं तिच्या पायातून रक्त वाहू लागलं आणि पांढरी फुलं लाल झाली."

लाल गुलाबाचं प्रेमाशी हे असं काल्पनिक नातं आहे, जे या भावनेसोबत येणाऱ्या विरह आणि वेदनेचीही आठवण करून देतं.

लाल गुलाब प्रेमाचं प्रतीक मानला जातो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लाल गुलाब प्रेमाचं प्रतीक मानला जातो

मृत्यू आणि प्रेम या दोन टोकाच्या भावनांशी जोडलं गेल्यामुळेच गुलाबानं साहित्यिकांनाही वेळोवेळी भुरळ पाडली आहे. पर्शियन कवी हाफेजच्या दृष्टीनं हे फुल म्हणजे सौंदर्याची परिसीमा आहे.

इंग्लिश लेखक शेक्सपियरनंही गुलाबाचा रूपक म्हणून वापर केला आहे. कधी तो प्रेयसीच्या गालांची गुलाबाशी तुलना करतो. तर रोमियो अँड ज्युलिएट सारख्या नाटकात तो म्हणतो, "नावात काय आहे? गुलाबाला दुसरं काही नाव दिलं, तरी त्याचा सुगंध तेवढाच तर राहील."

'वॉर ऑफ रोझेस'

गुलाबाची फुलं इंग्लंडच्या इतिहासातल्या एका अशा घटनेशी निगडीत आहे, ज्यानं त्या देशालाच नाही तर जगाला एका नव्या विचाराची वाट मोकळी करून दिली.

पंधराव्या शतकात, इसवी सन 1455 ते 1487 या काळात, इंग्लंडच्या सिंहासनासाठी हाऊस ऑफ लँकास्टर आणि हाऊस ऑफ यॉर्क या दोन घराण्यांमध्ये सत्तासंघर्ष सुरू होता.

War of Roses

यॉर्कचं चिन्ह होतं पांढरा गुलाब तर लँकास्टरचं चिन्ह होतं लाल गुलाब. त्यामुळेच या दोन घराण्यांमधल्या तीन दशकांच्या लढाईला 'वॉर ऑफ रोझेस' (गुलाबांचं युद्ध) म्हणून ओळखलं जातं.

अखेर लँकास्टर घराण्याचा वारसदार म्हणून हेन्री ट्यूडर आणि यॉर्क घराण्याची एलिझाबेथ यांच्या विवाहानंतर हे युद्ध संपुष्टात आलं. इंग्लंडचा राजा सातवा हेन्री म्हणून हेन्री ट्यूडर मग सत्तेत आला. दोन्ही रंगांच्या गुलाबांचं मिश्रण असलेलं चिन्ह ट्यूडर घराण्याचं चिन्ह बनलं.

आता जगासाठी हे युद्ध महत्त्वाचं का होतं? तर याला कारण ठरला या जोडप्याचा पुत्र हेन्री आठवा, ज्यानं घटस्फोटाच्या मुद्द्यावरून रोमन कॅथलिक चर्चसोबत फारकत घेतली. इंग्लंडमध्ये मग प्रोटेस्टंट पंथ अस्तित्वात आला आणि धार्मिक सुधारणांचं युग सुरू झालं.

Damask Rose

फोटो स्रोत, LOUAI BESHARA/Getty Images

फोटो कॅप्शन, दमास्कस गुलाब म्हणजे रोझा दमास्काना

काही वर्षांपूर्वी सीरियातील गृहयुद्धातही गुलाबाची फुलं चर्चेत आली.

सीरीयाची राजधानी दमास्कसच्या नावानं रोझा दमास्काना ही गुलाबाची एक नाजूक आणि नितांतसुंदर प्रजाती ओळखली जाते.

पण गृहयुद्धानं या दमास्कस गुलाबाच्या तिथल्या अस्तित्वावरही संकट आलं होतं.

गुलाब भारतीय आहे का?

भारतात मुघल काळातल्या चित्रांमध्ये अनेकदा बादशाहच्या हातात गुलाबाचं फुल दिसतं. तर गुलाबाच्या अनेक प्रजाती इंग्रजांनी इथे आणल्या आहेत.

त्यामुळे गुलाब बाहेरूनच भारतात आला, अशी अनेकांची कल्पना झालेली दिसते.

पण गुलाबाच्या अनेक प्रजाती केवळ भारतीय उपखंडातच, हिमालयातच आढळतात, हे तुम्हाला माहिती आहे का?

हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये उमललेला गुलाब

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये उमललेला गुलाब

रानटी गुलाबाच्या प्रजातींचा वापर भारतात औषधी म्हणून केला जात असे. आयुर्वेदात, चरक आणि सुश्रुत संहितेत गुलाबाचे उल्लेख आहेत आणि संस्कृतमध्ये हे फुल शतपत्री, शिवप्रिया, सौम्यगंधा अशा नावांनी ओळखलं जायचं. काही हिंदू आख्यायिकांमध्ये या फुलाचा विष्णूशी संबंध जोडला आहे.

इसवीसनपूर्व काळात तयार केलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या गांधार शैलीतील काही शिल्पांमध्येही पाच पाकळ्यांचे गुलाब कोरले आहेत. चीनमधून भारतात आलेले प्रवासी गौतम बुद्धांच्या मूर्तींना वाहिलेल्या गुलाबाच्या माळांविषयी लिहितात.

वात्स्यायनाच्या कामसूत्रात गुलाबाचा उल्लेख येतो. विजयनगर साम्राज्याच्या बाजारांतील गुलाबाच्या फुलांनी भरलेल्या टोपल्यांचं वर्णन पोर्तुगीज प्रवाशांनी केलं आहे.

पण मुघलांच्या काळात गुलाबाला नवी शाही ओळख मिळाली असं म्हणता येईल. मुघल सम्राट बाबर गुलाबाचा चाहता होता.

पर्शियन शैलीवर आधारीत मुघल बगिच्यांमध्येही गुलाबाला मानाचं स्थान होतं.

बादशाह जहांगीरनं त्याची पत्नी नूरजहान हिच्यासाठी काश्मीरमध्ये उभारलेली शालिमार बाग आजही अनेकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. याच नूरजहानला गुलाबाचं अत्तर तयार करण्याचं श्रेय दिलं जातं.

कल्पना चावला गुलाब

फोटो स्रोत, Pundalik Nimhan

फोटो कॅप्शन, कल्पना चावला गुलाब

गुलाबाची कलमं आणि नव्या प्रजाती विकसित करण्याची पद्धत पुढे ब्रिटिश राजवटीत आणखी विकसित होत गेली.

नंतर रोझ फेडरेशन ऑफ इंडियामार्फत मृणालिनी, सुगंधा, राजा राममोहन रॉय, कल्पना चावला असे खास भारतीय नावांचे गुलाब विकसित करण्यात आले.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि सातवे राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांच्या कोटवरही नेहमी गुलाबाचं फुल झळकताना दिसत असे.

नेहरू आपली पत्नी कमला यांच्या स्मरणार्थ रोज कोटवर रोज एक ताजं गुलाबाचं फुल लावत असत, असं सांगितलं जातं.

गुलाबाच्या रंगछटांनी साहित्यिकांनाही भुरळ पाडली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पिवळ्या गुलाबाला मैत्रीचं प्रतीक मानलं जातं.

अगदी अलीकडच्या काळात व्हॅलेंटाईन डे आणि त्याभोवतीच्या मार्केटिंगनं वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबांना मैत्री, प्रेम असा अर्थ दिला. तर 'लगे रहो मुन्नाभाई'सारख्या चित्रपटानं गुलाबाला 'गांधीगिरी'शी जोडलं.

गुलाब हा असा प्रत्येकासाठी वेगवेगळ्या कारणांमुळे महत्त्वाचा ठरला आहे.

तसं जगभरात फुलांच्या प्रजातींची संख्या 3,69,000 हून अधिक आहे असं 2016 सालच्या एका अभ्यासातून समोर आलं होतं.

त्यातलं प्रत्येक फुल खासच आहे. पण कधीकधी एखाद्या फुलाचं महत्त्व देश-स्थळ-काळ-धर्माच्या सीमा ओलांडून पलीकडे जातं. गुलाबाचं तसंच आहे. या फुलानं सगळ्या जगालाच एका कहाणीत एकत्र आणलं आहे.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)