You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशियाचा युक्रेनच्या 4 प्रांतांवर ताबा, पुतिन यांनी केली घोषणा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या चार राज्यांचा ताबा मिळवल्यासंदर्भातल्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली असून मॉस्को येथे झालेल्या एका समारंभात त्यांनी त्याबाबत भाषणही केलं आहे. येत्या काही दिवसांत या राज्यांचा रशियात औपचारिकपणे समावेश करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
याच पद्धतीनं रशियानं 2014 साली युक्रेनच्या क्रायमिया द्वीपकल्पावर ताबा मिळवला होता. हा भाग अजूनही रशियाच्या ताब्यात आहे.
क्रेमलिनमध्ये पुतिन यांनी अधिग्रहणाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली तेव्हा रशियन लष्करी अधिकारी आणि नेते टाळ्या वाजवत होते.
युक्रेनच्या या राज्यांचा रशियामध्ये समावेश करण्याची घोषणा करताना पुतिन म्हणाले की, "लोकांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे आणि या राज्यांना रशियाचा भाग बनवण्याची लोकांची इच्छा आहे."
क्रेमलिनमधील सेंट जॉर्ज हॉलमध्ये झालेल्या या घोषणेसह रशियाने अधिकृतपणे युक्रेनचे दोनेत्स्क, लुहान्स्क, खेरसन आणि झोपोरिझिया प्रदेश ताब्यात घेतले आहेत.
ज्या सार्वमताअंतर्गत रशियाने हे क्षेत्र आपल्या ताब्यात घेतले आहे, ते संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय जगाच्या बहुतांश देशांनी बेकायदेशीर मानले आहे.
त्यांनी युक्रेनला लष्करी कारवाई थांबवून रशियाशी चर्चा सुरू करण्यास सांगितलं आहे. तर पुतिन यांनी ताब्यात घेतलेल्या नवीन प्रदेशांबद्दल कोणतीही चर्चा होणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. त्याचवेळी युक्रेननं आपण आपला प्रदेश मुक्त करण्यासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचं म्हटलं आहे.
दुसरीकडे, पुतिन यांनी रशियातील सर्वोच्च राजकारणी आणि लष्करी अधिकार्यांना संबोधित करताना सांगितलं की, रशिया या नवीन क्षेत्रांचे आपल्या संपूर्ण क्षमतेनुसार रक्षण करेल.
झेलेन्स्की यांची प्रतिक्रिया
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय की, ते नाटोला लवकरात लवकर सदस्यत्वात सहभागी करुन घेण्यासाठी आवाहन करत आहेत. पुतिन यांनी युक्रेनमधील चार प्रदेश ताबात घेतल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.
टेलिग्राम संदेशात झेलेन्स्की म्हणाले की, "आम्ही नाटो सदस्यत्वासाठीची पात्रता आधीच सिद्ध केली आहे. नाटो सदस्यत्वासाठीच्या याचिकेवर स्वाक्षरी करून आम्ही निर्णायक पाऊल उचलत आहोत."
युक्रेनने झेलेन्स्की यांच्या वक्तव्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे.
शुक्रवारी काय घडलं?
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की म्हणाले की, या जनमताला काहीही अर्थ नाही आणि त्यामुळे वास्तव बदलत नाही. ते म्हणाले, "युक्रेनचं सार्वभौमत्व पुन्हा एकदा प्रस्थापित केली जाईल. रशियाने जे जनमत घेतलं त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटेल.
रशियाने ज्या चार भागात जनमत घेतलं त्याची कोणाच्याही निगराणीखाली केलेलं नाही. त्याचं जे चित्र समोर आलं आहे त्यात निवडणूक अधिकारी म्हणून सगळीकडे सशस्त्र सैनिक दिसत आहेत.
या दरम्यान युक्रेनच्या पूर्व भागात दोन फुटीरवादी नेता आणि दक्षिण रशियामध्ये स्वाक्षरी करतील.
रशियाची संसद हा ताबा मिळवण्याच्या प्रक्रियेवर मोहोर उमटवेल. क्रायमिया प्रकरणातही असंच झालं होतं. 70 व्या वाढदिवसाच्या तीन दिवस आधी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन संसदेच्या सभागृहाला 4 ऑक्टोबरला संबोधित करण्याची शक्यता आहे.
अमेरिका, युरोपियन महासंघ करतील कारवाई
युक्रेनच्या चार भागात जनमत घेण्याबद्दल अमेरिका रशियावर निर्बंध लावतील. तसंच युरोपियन महासंघ नवीन कारवाई करण्याची योजना करत आहे. त्या मतदानात जो सामील झाला, त्यावरही निर्बंध लागण्याची शक्यता आहे.
तसंच जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अनालेना बायरेबॉक यांनी गुरुवारी म्हटलं की, या जनमतासाठी ज्या भागावर ताबा मिळवला आहे त्यांच्या घरावर आणि ऑफिसेसमध्ये धमक्या दिल्या आणि काहींच्या डोक्यावर बंदूक ठेवून तिथे आणलं गेलं. त्या सांगतात, "हे निष्पक्ष निवडणुकीच्या विरोधात आहे आणि शांततेच्या विरोधात आहे. ही एक प्रकारची बळजबरी आहे."
जनमत चाचणी गेल्या 15 दिवसात काही भागात चालू झाली होती. रशियाच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी सांगितलं की सशस्त्र सैनिकांचा वापर सुरक्षेसाठी केला होता. मात्र तिथल्या काही लोकांना धमकावलं गेलं हे स्पष्ट आहे.
इनरहोरदार मध्ये एक महिला बीबीसीशी बोलताना म्हणाली, "तुम्हाला तोंडी उत्तर द्यायचं होतं आणि सैनिक ते कागदावर मार्क करत होते."
ज्या चार भागावर रशियाने ताबा मिळवण्याचा निर्णय घेतला त्यावर त्यांचं पूर्ण नियंत्रण नाही. लुहान्स्क भागाचा बहुतांश भाग रशियाच्या ताब्यात आहे. त्याचवेळी दोनेत्स्क भागाचा केवळ 60 टक्के भाग त्यांच्याकडे आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सात महिन्यानंतरही पूर्व आणि दक्षिण भागात युद्ध सुरू आहे. दक्षिण भागातील झापोरिझियाची राजधानी पूर्णपणे युक्रेन सरकारच्या नियंत्रणात आहे. त्याचवेळी खेरसोन मध्ये युक्रेनकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे.
युक्रेनच्या सैन्याने ईशान्य भागात मोठा भाग त्यांच्या ताब्यात घेतला आहे. गुरुवारी ते म्हणाले की युक्रेनच्या सैन्याने दोनेत्स्क मधील महत्त्वाच्या लीमॅन शहराला रशियन सैन्याला घेरलं होतं.
गेल्या आठवड्यात पुतिन यांनी रशियाला वाचवण्यासाठी सर्व प्रकारची हत्यारं वापरण्याची घोषणा केली होती. त्यात अणुबॉम्बचाही समावेश आहे. युक्रेनच्या भागावर ताबा मिळवून पाश्चिमात्य देश रशियाच्या सीमेवर हल्ला करत आहेत हा वाद रशिया सुरू करेल. यामुळे युक्रेनला मिळणारी मदत थांबेल असा त्यांचा उद्देश आहे.
मात्र या चार भागांवर ताबा मिळवल्याने युद्धभूमीवर कोणताच फरक पडणार नाही, असं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री म्हणाले.
रशिया सोडून जात आहेत लोक
युक्रेनमध्ये हजारो सैनिक पाठवून चूक केल्याचं पुतिन यांनी स्वीकारलं आहे. रशियात या युद्धाच्या विरोधात लोकांनी निदर्शनं केली. त्यात 2400 लोकांना अटक करण्यात आली आहे तसंच रशियाच्या सीमावर्ती भागात मोठ्या संख्येने लोक देश सोडून जात आहेत.
कझाकिस्तानने त्यांच्या देशात 98 हजार लोक आल्याची माहिती दिली आहे. तसंच जॉर्जियाला लागून असलेल्या सीमेवर लोकांच्या रांगा लागल्या आहेत.
फिनलँडने घोषणा केली आहे की शुक्रवारी रशियाहून येणाऱ्या पर्यटकांवर किंवा ज्या रशियन लोकांना त्यांच्या देशातून जाऊन युरोपियन देशात फिरायचं आहे त्यांच्यावर बंदी घालण्याचा ते विचार करत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की ते या जनमताला अजिबात मान्यता देणार नाही. हे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन आहे असं ते म्हणाले.
पॅसिफिक देशातील नेत्यांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी ते म्हणाले, "मी हे अत्यंत स्पष्ट करू इच्छितो की रशिया कडून युक्रेन बाबत जे दावे केले जात आहेत त्यांना मी कधीही मान्यता देणार नाही. मी या जनमताच्या विरोधात आहे. तो फक्त दिखावा आहे. खोटं आहे. या जनमताचा निकाल मॉस्कोमध्ये तयार केला आहे.
युक्रेनचे लोक त्यांच्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. त्यातून युक्रेनच्या लोकांना काय हवंय ते पुरेसं स्पष्ट आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)