You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फिनलँडच्या पंतप्रधानांच्या घरी पाहुणे झाले टॉपलेस, फोटो व्हायरल
फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन एका पार्टीत सहभागी झाल्या होत्या. आता त्यांच्यावर आणखी एका प्रकरणात माफी मागण्याची वेळ आली आहे. त्यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी बोलावलेल्या पाहुण्यांचे टॉपलेस फोटो समोर आले आणि पंतप्रधानांना पुन्हा माफी मागण्याची वेळ आली आहे.
त्याच्या काही दिवसांआधी त्यांचा पार्टी करतानाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला. त्यात त्या गाताना, आणि काहीतरी पिताना दिसत होत्या. या प्रकरणावरून त्यांच्यावर खूप टीका झाली. त्यानंतर त्यांनी स्वत:ची ड्रग टेस्ट केली. ती काही दिवसांनी निगेटिव्ह आली होती.
आता जे फोटो समोर आले आहेत त्यात अनेक सोशल इन्फ्लुएन्सर्स पंतप्रधान निवासस्थानी दिसत आहेत. मंगळवारी 23 ऑगस्टला हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाले होते.
सना मरीन यांनी मान्य केलं की हे फोटो अनुचित आहेत आणि त्यांनी यासाठी माफी मागितली आहे.
फोटो मध्ये दोन महिला एक दुसऱ्याचं चुंबन घेत आहेत. त्यांनी स्वतःला झाकण्यासाठी एका फलकाचा आधार घेतला आहे. त्यावर फिनलँड लिहिलं आहे.
सना मरीन यांनी सोमवारी सांगितलं की जुलैमध्ये रुईसरॉक म्युझिक फेस्टिव्हलनंतर राजधानी हेलिन्सिकीच्या पंतप्रधान कार्यालयाच्या केंसरेटा मध्ये झाली होती. फिनलँडच्या प्रसारमाध्यांच्या नुसार हे फोटो पाहुण्यांसाठी तयार केलेल्या वॉशरुममध्ये घेतले आहेत.
सना मरीन म्हणाल्या, "आम्ही सॉना, स्विमिंगचा वापर केला होता आणि तिथे एकत्र वेळ घालवला. अशा प्रकारे फोटो घ्यायला नको होतो. मात्र याशिवाय तिथे आक्षेपार्ह काहीही झालेलं नाही."
वाद वाढला म्हणून दिली ड्रग टेस्ट
36 वर्षांच्या सना मरीन 2019 मध्ये सत्तेवर आल्या. तेव्हा त्या जगातील सर्वांत तरुण पंतप्रधान होत्या.
सना मरीन यांच्यावर अनेकदा टीका झाली तरीही आपल्या मित्र मैत्रिणींशी भेटीगाठी, जुलैमध्ये म्युझिक फेस्टिव्हल अशा अनेक गोष्टी त्यांनी जगापासून लपवून ठेवल्या नाही.
मात्र पार्टी करत असलेला त्यांचा एक व्हीडिओ समोर आला आणि गेल्या काही आठवड्यांपासून त्या पक्षाचे नेते आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या टीकेच्या सामना करत आहेत.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मागणी केल्यावर त्या ड्रग टेस्टसाठी तयार झाल्या. पण सना मरीन यांनी सांगितलं की त्या फक्त दारू प्यायल्या. इतर कोणत्याही पदार्थांचं त्यांनी सेवन केलं नाही.
फोटो आल्यानंतर अनेक प्रश्न
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर फिनलँड नाटोचा सदस्य होणार की नाही याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
युरोपियन युनियनच्या इतर देशांप्रमाणे फिनलंड ने रशियाच्या लोकांसाठी पर्यटक व्हिसावर बंदी घालण्याला पाठिंबा दिला होता. रशिया बरोबर फिनलँडची पूर्व सीमा लागून आहे. तिथून रशियन लोक फिनलँड मध्ये प्रवेश करतात.
सध्या फिनलँडच्या पंतप्रधानांचं खासगी आयुष्य चर्चेचा विषय झालं आहे. त्यावरून फिनलँड मध्ये संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
उपपंतप्रधान अन्निका सराईको म्हणाल्या की फोटोत दिसणारी भिंत त्या ओळखतात. फिनलँड मध्ये अनेकांना आयुष्य जगण्याची भ्रांत आहे.
तरीही नैतिकता शिकवणं हे त्यांचं काम नाही असंही त्या पुढे म्हणतात.
कोण आहेत सना मरीन?
काही वृत्तांनुसार मरीन या एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये त्यांची आई आणि तिच्या महिला पार्टनरबरोबर वाढल्या. "लहानपणी माझं कुणी काही ऐकायचंच नाही, मला मोकळेपणाने बोलताच येत नव्हतं, अगदी अदृश्य असल्यासारखं वाटायचं," असं त्यांनी 2015 साली एका फिन्निश वेबसाईट 'मेनायसेट'ला सांगितलं होतं.
पण त्यांची आई सांगते की त्यांची सना पदवीचं शिक्षण घेणारी त्यांच्या कुटुंबातील पहिली व्यक्ती आहेत. त्यानंतर त्यांनी सोशल डेमोक्रॅटिक पक्षात राजकीय प्रवेश केला आणि लवकरच वर चढत गेल्या. वयाच्या 27व्या वर्षी त्या टॅपियर शहराच्या प्रशासकीय प्रमुख होत्या आणि 2015 साली त्या राष्ट्रीय संसदेच्या सभासद झाल्या.
जून 2018 मध्ये त्यांच्याकडे परिवहन आणि संचार खातं देण्यात आलं.
सना मरीन त्यांच्या कुटुंबाला रेनबो फॅमिली म्हणतात. त्यांच्या घरची आर्थिक स्थिती चांगली नाही.
सना मरीन यांना वयाच्या विसाव्या वर्षी राजकारणात आवड निर्माण झाली होती. दोन वर्षांत त्या काऊन्सिलर पदावर नियुक्त झाल्या. 2005 मध्ये त्या खासदार झाल्या.
त्या डाव्या विचाराच्या असल्याचं त्यांच्या पक्षात समजलं जातं. फिनलँडला कल्याणकारी देश करायचा त्या सातत्याने पुनरुच्चार करत असतात. त्यांच्या सरकारमध्ये चार महिला नेत्या आहेत. त्यांच्यापैकी एकाचं वय 35 च्या वर आहे.
कोव्हिड काळात त्यांच्यासमोर मोठी आव्हानं निर्माण झाली होती. त्याचदरम्यान त्यांनी लग्नही केलं. त्याबदद्ल फारशी माहिती नाही. त्यांना दोन वर्षांची मुलगी सुद्धा आहे.
सतत वादात
दोन वर्षांच्या कार्यकाळात त्या अनेकदा वादात सापडल्या. एकदा त्या कोव्हिड पॉझिटिव्ह असलेल्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटायला गेल्या आणि मग पार्टीला गेल्या. त्याही वेळेला त्यांना माफी मागावी लागली होती.
आता त्या सरकारी निवासस्थानी पार्टी करण्यावरुन वादात सापडल्या आहेत.
पंतप्रधानांना अशा प्रकारची वागणूक शोभत नाही असं त्यांच्या विरोधकांचं म्हणणं आहे. अचानक काही संकट आलं तर त्या निर्णय घेऊ शकतील का असा प्रश्न त्यांचे विरोधक उपस्थित करतात.
त्यांच्या असा वागण्याचा त्यांच्या निर्णयावर परिणाम होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे.
त्यांच्या समर्थकांच्या मते मरीन यांना त्यांचं खासगी आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. सामान्य तरुणांना रुचेल पचेल अशी त्यांची काम करण्याची शैली आहे असं त्यांचं मत आहे.त्यांच्या समर्थनार्थ लोकांनी डान्स करून फोटोही टाकले आहेत.
सना मरीन फिनलँडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. पहिल्या पंतप्रधान 2003 साली दोन महिन्यांसाठी आणि दुसऱ्या पंतप्रधान 2010-11 मध्ये एका वर्षांसाठी होत्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)