अफगाणिस्तान : काबूलमध्ये मशिदीत मोठा स्फोट, अनेकांचा मृत्यू

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे एका मशिदीत जोरदार स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

हा स्फोट बुधवारी (17 ऑगस्ट) सायंकाळच्या नमाजवेळी घडला. एका NGO ने दिलेल्या बातमीनुसार या स्फोटात कमीत कमी 3 जणांचा मृत्यू झाला. तर 12 पेक्षाही जास्त जण या स्फोटात जखमी झाले आहेत.

बीबीसी पश्तोच्या बातमीनुसार, काही माध्यमांमध्ये मृतांचा आकडा हा 20 च्या आसपास असल्याचंही सांगण्यात आलं आहे. पण या आकडेवारीची अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

काबुलमध्ये तालिबान पोलिसांचे प्रवक्ते म्हणून कार्यरत असलेले खालिद जदरान यांच्या हवाल्याने स्थानिक मीडियाने या स्फोटाची बातमी दिली. काबूलच्या वायव्य भागात हा स्फोट झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

काही माध्यमांच्या बातमीनुसार, सिद्दिकी मशिदीचे इमामसुद्धा या स्फोटात मारले गेले आहेत.

या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतली नाही. त्यामुळे हा स्फोट नेमका कुणी केला, याविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

एका आठवड्यापूर्वी काबूल येथे तालिबान समर्थक मौलवींची आत्मघाती हल्ल्यात हत्या करण्यात आली होती. त्या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट संघटनेने घेतली होती.

काबूलमध्ये काम करणाऱ्या इटलीच्या एका NGO ने मशिदीतील स्फोटात तिघांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. त्यांनी एक ट्विट करून 27 जण जखमी झाल्याचीही माहिती दिली. मृतांमध्ये 5 बालकांचा समावेश असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

तर तालिबानच्या एका गुप्त अधिकाऱ्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेला याविषयी माहिती देताना किमान 35 जणांच्या मृत्यूची शक्यता वर्तवली आहे.

प्रत्यक्ष साक्षीदारांच्या माहितीनुसार, मशिदीतील स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की आजूबाजूच्या इमारतींच्या काचाही फुटल्या आहेत.

एका अधिकाऱ्यांनी आपली ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं की काबूलमधील खैर खाना परिसरातील मशिदीत हा स्फोट झाला. याठिकाणी तालिबानची विविध पथके पोहोचली असून तपास सुरू असल्याचं त्यांनी कळवलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)