सलमान रश्दी यांच्या तब्येतीत सुधारणा, व्हेंटिलेटर काढला

फोटो स्रोत, Getty Images
ज्येष्ठ साहित्यिक सलमान रश्दी यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत आहे.
रश्दी यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात होतं.
पण, आता रश्दींचे एजंट अँड्र्यू वायली यांनी अमेरिकन मीडियाला त्यांच्या प्रकृतीबाबत ताजी माहिती दिली आहे.
त्यानुसारस रश्दींचा व्हेंटिलेटर काढण्यात आला असून आता ते बोलूही शकत आहेत.
याआधी वायली म्हणाले होते की, या हल्ल्यामुळे रश्दींचा एक डोळा जाऊ शकतो.
अॅन्ड्र्यू वायली यांनी शनिवारी (13 ऑगस्ट) सांगितलं होतं की, "सध्या सलमान रश्दी यांच्या प्रकृतीबाबत जी माहिती येत आहे ती फारशी चांगली नाही. त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेल्याची भीती आहे. त्यांच्या हाताच्या काही नसा कापल्या गेल्या आहेत आणि त्याच्या यकृतावरही वार करण्यात आले आहेत."
प्राणघातक हल्ला
न्यूयॉर्कच्या शटाक्वा इन्स्टिट्यूटमधील एका कार्यक्रमात भाषणासाठी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला होता.
त्यांच्यावरील हल्ल्याच्या वृत्ताने अमेरिकेसह संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील जवळपास सर्वच प्रमुख माध्यम संस्थांनी सलमान रश्दी यांच्यावरील हल्ल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.
रश्दी यांच्यावरील हल्ल्याचं वृत्त प्रकाशित करताना यूएसए टुडेने त्यांच्या बातमीच्या हेडिंगमध्ये 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या वादग्रस्त पुस्तकाचा संदर्भ दिला आहे.
यूएसए टुडेने आपल्या वृत्तात म्हटलय, "यूएसए टुडेचे बेस्टसेलिंग ऑथर सलमान रश्दी यांना त्यांच्या लिखाणामुळे सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. शुक्रवारी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्या गळ्यावर सुऱ्याने वार करण्यात आलेत."
1947बाँबे (आताच्या मुंबई) मध्ये जन्म
14कादंबऱ्या 1975 ते 2019 दरम्यान लिहिल्या, यात लहान मुलांसाठीच्या दोन कादंबऱ्यांचाही समावेश
5वेळा बुकर पुरस्कारांसाठी नामांकन, 1981 मध्ये मिडनाइट्स चिल्ड्रन या कांदबरीसाठी गौरव
9वर्षं अज्ञातवासात घालवली कारण इराणच्या नेत्याने द सॅटेनिक व्हर्सेस पुस्तकावर ईशनिंदेचा आरोप ठेवत त्यांना धमकी दिली होती
2007साली साहित्यातील योगदानासाठी नाईट हा किताब प्रदान
ट्रॅवीस सिवर्ड हल्ला झाला त्याठिकाणी उपस्थित होते. सिवर्ड यांचा हवाला देत यूएसए टुडेने आपल्या वृत्तात म्हटलय की, "हल्लेखोर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होता. तो प्रेक्षकांमध्येच होता. प्रेक्षकांच्या गराड्यातून बाहेर पडत रश्दी स्टेजजवळ पोहोचले."
"स्टेजवर जाऊन ते खाली कोसळले. आम्ही त्या माणसाला ओरडताना किंवा बोलताना पाहिलं नाही. रश्दी मात्र त्या माणसापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते."
यूएसए टुडेने सिवर्ड यांच्या हवाल्याने पुढे म्हटलय की, तिथं उपस्थित असलेल्या सर्व लोकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून शांत राहणं कठीण होतं. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू होता तिथं खूप शांतता होती. त्यामुळे असं काही घडेल असं कोणाच्याही ध्यानीमनी आलं नाही.
या घडलेल्या प्रकारानंतर सुरक्षा यंत्रणा शटाक्वा इन्स्टिट्यूटच्या संपर्कात आहेत.
पेन अमेरिकेच्या सीईओ सुझान नोसेल यांचा हवाला देत यूएसए टुडेने लिहिलंय की, सलमान यांच्या लिखाणामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आलंय.
सलमान रश्दींच्या सहा कादंबऱ्या यूएसए टुडे बेस्टसेलर म्हणून निवडल्या गेल्या आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
लेखिका तस्लिमा नसरीन यांनी रश्दी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा निषेध केला आहे. "इस्लामवर टीका करणाऱ्यांना पहिल्यांदा सातव्या शतकात मारण्यात आलं. एकविसाव्या शतकातही हेच सुरू आहे. इस्लाममध्ये सुधारणा होत नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं जात नाही, हिंसाचाराला मान्यता नाही हे ठसवलं जात नाही तोपर्यंत असे हल्ले सुरूच राहतील. कट्टरतावादाला खतपाणी घालणारी केंद्र नष्ट केली जात नाहीत तोवर असे प्रकार घडणार".
अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे हा प्रकार घडला का?
सीएनएन या वृत्तसंस्थेने सलमान रश्दी यांच्यावरील हल्ल्याची ठळक बातमी प्रसिद्ध केली आहे.

फोटो स्रोत, HORATIOGATES3/BBC
सीएनएनने त्या कार्यक्रमाविषयीची इत्यंभूत बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे, "हल्लेखोराची ओळख पटली असून त्याचं नाव हदी मातर असं आहे. तो एकटाच होता का या संबंधी माहिती मिळवण्यासाठी तसेच या घटनेचा खोलात जाऊन तपास करण्यासाठी पोलीस प्रशासन, एफबीआय आणि स्थानिक अधिकारी एकत्रितरित्या काम करत आहेत."
या बातमीत पुढं म्हटलंय की, "हल्लेखोर ऑडियन्समध्ये बसला होता. तो तिथून उठला आणि स्टेजवर गेला. तिथं त्याने पहिला वार रश्दींच्या गळ्यावर आणि दुसरा वार पोटावर केला. रश्दींना वाचवण्यासाठी उपस्थित कर्मचारी स्टेजकडे धावले. तर हॉलमध्ये उपस्थित असणाऱ्या इतर लोकांनी हल्लेखोराला पकडलं आणि नंतर पोलिसांच्या हवाली केलं."

फोटो स्रोत, Reuters
दोन सूत्रांच्या हवाल्याने सीएनएनने आपल्या बातमीत म्हटलंय की, कार्यक्रमात साधी सुरक्षा जसं की बॅग चेकिंग, मेटल-डिटेक्टर आदी गोष्टी पण नव्हत्या. शटाक्वा संस्थेच्या उच्चपदस्थांना भीती होती की अशा सुरक्षा यंत्रणेमुळे स्पीकर आणि प्रेक्षक यांच्यात भेदभाव होईल.
कार्यक्रमाच्या ठिकाणी जर या सुरक्षा उपाययोजना केल्या असत्या तर हा हल्ला झालाच नसता असं म्हणणं थोडं अवघड ठरेल. पण जर या उपाययोजना असत्या तर कदाचित हल्लेखोराला कार्यक्रमाच्या ठिकाणी चाकू घेऊन जाता आलं नसतं. आणि परिस्थिती काहीतरी वेगळी असती.
नाव न छापण्याच्या अटीवर एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणा नव्हती. साधी मेटल-डिटेक्टरची सोयही नव्हती.
या संपूर्ण प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सीनएनने शटाक्वा संस्थेच्या हेडशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण अद्याप त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.
न्यूयॉर्क टाइम्सने लिहिलंय की, "द सॅटॅनिक व्हर्सेस प्रकाशित झाल्यानंतर इराणने त्यांच्याविरुद्ध मृत्यूचा फतवा जारी केला. जीवाच्या भीतीने ते बराच काळ लपून होते. पण पुढे सामान्य जीवन जगायचं म्हणून ते सार्वजनिक ठिकाणी बाहेर पडायला लागले. बऱ्याचदा ते कोणत्याही संरक्षणाशिवाय दिसायचे."
"पण भूतकाळातील ती भीती या शुक्रवारी खरी ठरली."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























