उमाजी नाईक: इंग्रज अधिकाऱ्यांचे मुंडके छाटून खलिता पाठवणारे आद्यक्रांतीकारक

उमाजी नाईक
    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

इंग्रजांच्या विरोधातील 1857 चा उठाव हा पहिला स्वातंत्र्यासाठीचा उठाव म्हणून ओळखला जातो. परंतु या आधी देखील भारतात इंग्रजांविरुद्ध लढा पुकारण्यात आला होता आणि तो लढा पुकारला होता उमाजी नाईक यांनी.

उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 ला पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर भिवडी येथे झाला. त्यांनी इंग्रजांच्या विरोधात पहिले बंड पुकारले होते. तब्बल 14 वर्ष त्यांनी इंग्रजांशी लढा दिला होता. परंतु 15 डिसेंबर 1831 ला भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजी नाईकांना इंग्रजांनी पकडले. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवत त्यांना इंग्रजांनी फाशीची शिक्षा सुनावली होती.

उमाजी नाईक यांचे वडील दादोजी खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते. उमाजी नाईकांच्या कुटुंबाकडे पुरंदर आणि वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. त्यांनी पारंपरिक रामोशी हेर कला आत्मसात केली होती. त्यांनी त्यांच्या वडीलांकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते.

याच काळात इंग्रज त्यांचे साम्राज्य वाढवत होते. इंग्रजांनी एक एक करत पुणे देखील ताब्यात घेतले. 1803 मध्ये इंग्रजांनी दुसऱ्या बाजीराव पेशवा यांना स्थानापन्न केले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांचे पाल्य म्हणून काम सुरू केले. पुढे पुरंदर किल्ल्याच्या वतनदारीचे काम रामोशी समाजाकडून काढून घेण्यात आले. त्यामुळे रामोशी समाजाला अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले.

इंग्रजांचे अधिपत्य सुरू झाल्यानंतर इंग्रजांचे अत्याचार वाढू लागले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श ठेवत 'माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही' असा निश्चय उमाजी नाईक केला. विठोजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळस्कर या सहकाऱ्यांना बरोबर घेत इंग्रजांविरुद्धच्या बंडाला त्यांनी सुरुवात केली.

जेल

उमाजी नाईक आणि त्यांच्या साथीदारांनी इंग्रज तसेच सावकार यांसारख्या धनाढ्य लोकांना लुटून ते गरिबांमध्ये वाटण्यास सुरुवात केली.

इंग्रजांविरोधातील बंडामुळे त्यांना 1818 मध्ये एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली. या काळात ते वाचण्यास आणि लिहिण्यास शिकले.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या कारवाया आणखी वाढल्या. इंग्रजांविरोधात उमाजी नाईक लढत असल्याने जनतेने देखील त्यांना साथ दिली.

उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी पाच जाहीरनामे प्रसिद्ध केले. त्यात माहिती देणाऱ्यास भरघोस बक्षिसाची देखील घोषणा करण्यात आली.

'राजे उमाजी नाईक यांची कागदपत्रे' हे पुस्तक डॉ. अनिल बैसाणे यांनी प्रकाशित केले आहे. ज्यात उमाजी नाईक यांच्या संदर्भातील हजारो पत्रांचा अनुवाद करण्यात आला आहे. त्यातून त्यावेळच्या इतिहासाची माहिती समोर येते.

जेल

उमाजी नाईक यांच्याबद्दल अधिक माहिती देताना बैसाणे म्हणाले, "कॅप्टन मॅकन्टॉश यांच्यासह 24 ते 25 अधिकारी उमाजी नाईक यांना कैद करण्याचा प्रयत्न करत होते. आधुनिक शस्त्राने युक्त असलेल्या ब्रिटिश फौजांना राजे उमाजी नाईक यांना पकडता आलं नाही. शेवटी मॅकन्टॉश यांनी आमिष दाखवून उमाजी नाईक यांच्या जवळच्या लोकांना फितूर केलं आणि उमाजी नाईक यांना कैद केलं.

"उमाजी नाईकांचे लष्कर अफाट होते. साकुर्डी जवळच्या डोंगर दरीमध्ये दरबार करुन त्यांनी स्वतः 'राजे' ही उपाधी धारण केली. या कालखंडात त्यांनी इतकं मोठं सैन्य उभं केलं की जंजिरेकर सिद्धी यांनी राजे उमाजी नाईक यांच्या सहकार्याची याचना केली. याबाबी कागदपत्रांमध्ये येऊन गेल्या आहेत. या देशातले आद्यक्रांतीकारक आणि पहिले हुतात्मा उमाजी नाईक ठरतात."

पुढे अधिक माहिती देताना बैसाणे म्हणतात, ''इंग्रजांच्या विरोधात उमाजी नाईक यांनी शिव नीतीचा अवलंब केला. सामान्य जनतेला त्यांनी त्रास दिला नाही. ब्रिटिश धार्जिन सावकार, अधिकाऱ्यांकडून त्यांनी खंडणी वसूल केली.

"परकीय राजवट आपल्या देशात स्थिरावू नये यासाठी त्यांनी इंग्रजांच्या विरोधात व्यापक लढा उभा केला. उमाजी नाईक यांना 1832 साली फाशी दिली. त्यामुळे ते इतर क्रांतीकारकांच्या आधी हुतात्मा झाले म्हणून त्यांना आद्यक्रांतीकारकच म्हटले गेले पाहिजे," असं बैसाणे सांगतात.

इंग्रजांनी उमाजी नाईकांच्या दोन सैनिकांना पकडून त्यांचे मुंडके कापले होते. त्यामुळे जशाच तसे उत्तर देण्यासाठी उमाजी नाईक यांनी इंग्रजांच्या अधिकाऱ्यांचे मुंडके कापून त्यांनी त्याबरोबर खलिता पाठवला. 'त्यात आमच्याशी मित्रत्वाशी वागा नाहीतर त्याचे परिणाम काय होतील' हे त्यांनी दाखवून दिले.

पिंपळ

बुधाजी नाईक हे त्यांचे जवळचे सहकारी होते. बुधाजी नाईक यांनी शपथ घेतली होती की, 'जीवंत असेपर्यंत शत्रुच्या हाती मी पडणार नाही, आणि तसे झाले तर मी स्वतःहून स्वतःचा अंत घडवून आणेल.' जेव्हा ते इंग्रजांच्या हाती सापडले तेव्हा त्यांना शस्त्र त्याग करण्यास सांगितले. तेव्हा ते म्हणतात, ''शस्त्राचा त्याग आमच्या जीवन अंतानंतरच होईल," अशी माणसे त्यांच्यासोबत होती.

उमाजी नाईक यांनी 16 फेब्रुवारी 1831 ला इंग्रज सत्तेविरुद्ध एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता.

त्यात म्हटले होते की, 'सर्व राजे, जहागीरदार, सरदार आणि इतर लोकांनी जे जे इंग्रज युरोपियन भेटतील त्यांचा नाश करावा. नवीन स्थापन होणारे सरकार, वकील हत्याकांडात प्रमुखपणे भाग घेणाऱ्या लोकांस जहागिरी ईनाम व रोख बक्षीस देईल.'

'भारतातील सर्व रहिवाशांनी एकदम उठाव करुन देशात गोंधळ व अराजकता माजेल अशी दंगल उडवून द्यावी,' अशा गोष्टी त्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आल्या होत्या.

15 डिसेंबर 1831 ला भोर तालुक्यातील उतरोली या गावात रात्री बेसावध असताना इग्रजांनी उमाजी नाईक यांना पकडले. त्यांना अटक करुन पुण्यातील मामलेदार कचेरी येथील काळ कोठडीमध्ये त्यांना 35 दिवस ठेवण्यात आले. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालविण्यात आला.

उमाजी नाईक यांना न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. 3 फ्रेब्रुवारी 1832 ला खडकमाळ येथील मामलेदार कचेरी येथील एका विहिरीवर त्यांना फाशी देण्यात आली.

उमाजी नाईक यांचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळस्कर यांनाही फाशी देण्यात आली. इतकंच नाही तर इतरांना याची दहशत बसावी तसेच कोणीही पुन्हा उठाव करण्यासाठी धजावू नये यासाठी उमाजी नाईक यांचे प्रेत त्यात ठिकाणी असलेल्या पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून देखील ठेवण्यात आले होते.

आजही पुण्यातील मामलेदार कचेरीमध्ये उमाजी नाईक यांना ठेवण्यात आलेले जेल, त्यांच्यावर खटला चालविण्यात आला ते न्यायालय आणि फाशीचं ठिकाण पाहायला मिळतं. त्याचबरोबर ज्या झाडावर त्यांचे प्रेत लटकवत ठेवण्यात आले होते, ते पिंपळाचे झाड आजही मामलेदार कचेरीमध्ये इतिहासाची साक्ष देतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)