लेबनॉन : पैशांसाठी बँक कर्मचाऱ्यांनाच ओलीस ठेवणारा व्यक्ती ठरला लोकांचा हिरो

फोटो स्रोत, Anadolu Agency
मध्यपूर्व आशियातील लेबनॉन या देशात लोकांच्या बँकेतल्या ठेवींचे पैसे काढण्यासाठी निर्बंध तयार करण्यात आलेत. त्यानुसार लोकांना बँकांमधून मोजकेच पैसे काढता येतात.
या गोष्टीला वैतागून बैरुत मधल्या एका व्यक्तीने बँकेतील लोकांना सहा तासांपेक्षा जास्त वेळ ओलीस ठेवल्याचं प्रकरण समोर आलंय. अर्थात हा व्यक्ती आता तिथल्या नागरिकांसाठी नॅशनल हिरो ठरलाय.
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, संशयिताने रायफल घेऊन बँकेत प्रवेश केला. तिथे पेट्रोल ओतलं आणि हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी बँकेकडे पैशांची मागणी केली.
त्याच्या या कृतीमुळे लोकांनी त्याला पाठिंबा दिला. सोबतच 'तू आमचा हिरो आहेस' असं म्हणत घोषणाबाजीही केली.
एलबीसी या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या संशयिताला त्याच्या बँकेतील ठेवींपैकी 35 हजार अमेरिकन डॉलर देऊन हे प्रकरण मिटवण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
पोलिसांनी या संशयिताला आणि सोबतच ओलितांना हमारा स्ट्रीट जवळील फेडरल बँकेच्या शाखेपासून लांब नेलंय. या व्यक्तीवर गुन्हा नोंद होणार की नाही याविषयी अधिकाऱ्यांनी अजून तरी काही सांगितलेलं नाही.
एलबीसीच्या वृत्तानुसार, संशयिताच्या कुटुंबाला पैशांची मोठी निकड होती. त्याच्या कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते.

फोटो स्रोत, Reuters
संशयिताच्या भावानं पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, माझ्या भावाकडे दोन लाख दहा हजार यूएस डॉलरचे बँक सेव्हिंग्ज आहेत. त्याला हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी फक्त 5500 यूएस डॉलर हवे होते.
या संशयताचा भाऊ आणि त्याची पत्नी बँकेबाहेर उभे होते. ते म्हणाले की, जे आपल्या हक्काचं आहे ते प्रत्येकाने मिळवलंच पाहिजे.
लेबनॉनमध्ये 2019 पासूनच लोकांच्या बँकेतल्या ठेवीचे पैसे काढण्यासाठी निर्बंध तयार करण्यात आलेत. तसेच परदेशी व्यवहाराच्या हस्तांतरणावरही निर्बंध आहेत. त्यामुळे लोकांमधून मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला जातोय.
वास्तविक पाहता लेबनॉन हा मोजकीच लोकसंख्या असलेला देश कधी नव्हे ते आर्थिक संकटात सापडलाय. याचा परिणाम गहू आणि औषधाचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवतोय.
लोकांनी बँकेबाहेर गर्दी करत 'बँकांचे नियम मोडले पाहिजेत' अशा घोषणा दिल्या आहेत.
लेबनॉनच्या बँक कर्मचारी संघटनेचे प्रमुख जॉर्ज अल हज यांनी एएफपीशी बोलताना सांगितलं की, अशा घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. जानेवारीमध्ये बेका भागातील एका बँकेत अशाच चिडलेल्या ठेवीदाराने बारा पेक्षा जास्त लोकांना ओलीस ठेवलं होतं. त्याला त्याचे पैसे यूएस डॉलरमध्ये हवे होते.
ते पुढे सांगतात की, "ठेवीदारांना त्यांचे पैसे तर हवे आहेत. पण ते बँक व्यवस्थापनापर्यंत पोहोचू शकत नसल्याने सर्व राग बँकांच्या कर्मचाऱ्यांवर निघतो."
हे आर्थिक संकट सुरू झाल्यापासून लेबनॉनने त्यांच्या करन्सीचे 90% मूल्य गमावले आहे. युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, इथल्या लोकसंख्येच्या चार पंचमांश लोक आपलं जीवन गरिबीत जगत आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























