मंकीपॉक्स : 'गुप्तांगाजवळ आग लागल्याप्रमाणे जळजळ व्हायची'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ज्युलिया ब्राऊन,
- Role, बीबीसी न्यूज ब्राझील.
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
मंकीपॉक्स आजाराचा प्रादुर्भाव जगभरात सुरू आहे. नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्स हे जागतिक आरोग्य संकट असल्याची घोषणा केली होती.
मंकीपॉक्समुळे जुलै 2022 पर्यंत जगभरात 5 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर सुमारे 14 हजार जणांना आजपर्यंत मंकीपॉक्सची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
ब्राझीलच्या साओ पावलो शहरात राहणाऱ्या थियागो यांनाही मंकीपॉक्सने गाठलं होतं. तीव्र ताप, थकवा, कंप सुटणे आणि अंगभर जखमा अशा लक्षणांसह थियागो स्थानिक हॉस्पिटमध्ये दाखल झाले होते.
पण गुतांगाच्या आजूबाजूच्या भागातील पुरळ, जखमा, सूज आणि जळजळ ही त्यांची मुख्य तक्रार होती. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांच्या गुप्तांगाजवळील भागात तब्बल 9 जखमा आढळून आल्या होत्या.
हे अतिशय वेदनादायक आहे. इथे खूपच जळजळ होते, असं थियागो यांनी बीबीसी न्यूज ब्राझीलशी बोलताना म्हटलं.
आजूबाजूच्या सगळ्या भागावर सूज आली आहे. कधी कधी तर आग लागल्याप्रमाणे वाटतं, असंही त्यांनी सांगितलं.
मंकीपॉक्स हा आजार देवी रोगाच्या विषाणूच्या कुटुंबाचा सदस्य आहे. पण देवीपेक्षा याची तीव्रता खूप कमी असते.

फोटो स्रोत, Getty Images
माकड, उंदीर किंवा खार यांच्यासारख्या प्राण्यांपासून मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ शकतो.
मंकीपॉक्सचा माणसाकडून माणसाला संसर्ग होण्याचं प्रमाण तसं कमी आहे. पण संसर्ग झालेल्या व्यक्तीशी अत्यंत जवळून संपर्कात आल्यास या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.
शरीरावरील पुरळ, जखमा, श्वासोच्छवास, डोळे किंवा तोंडावाटे याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे.
संसर्गग्रस्त व्यक्तीचे कपडे, अंथरूण-पांघरूण किंवा टॉवेल वापरणे, त्याच्या जखमांना स्पर्श करणे या गोष्टींमुळेही इतरांना त्याचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.
मंकीपॉक्सच्या संसर्गात काय होतं?
मंकीपॉक्सची लागण झाल्यानंतर 10 जुलै रोजी थियागो यांना त्याची लक्षणे दिसू लागली.
ते सांगतात, "पहिल्यांदा मला खूपच तीव्र अशी हुडहुडी भरून आली होती. नंतर ताप, डोकेदुखीचा त्रास सुरू झाला आणि अस्वस्थही वाटू लागलं. संपूर्ण शरीर वेदनांनी दुखत होतं."
"सुरुवातीला हे म्हणजे फ्ल्यू किंवा कोव्हिड-19 तर नाही ना, असा संशय मला आला. पण पुढच्या दिवशी माझ्या पाठीवर आणि गुप्तांगावर पुरळ आणि जखमा असल्याचं माझ्या निदर्शनास आलं."
त्यावेळी थियागो यांनी संपूर्ण शरीर तपासलं असता पाठ, मांड्या, हात, पोट, छाती, चेहरा आणि जननेंद्रीय असा प्रत्येक भाग पुरळ व जखमांनी भरलेला होता.
"हे पुरळ सुजलेले, एखाद्या चेहऱ्यावरील मुरुमाप्रमाणे होते," असं त्यांनी सांगितलं.
एका आठवड्यापूर्वी थियागोंच्या यांच्या संपर्कात आलेल्या एका मित्राला मंकीपॉक्सचं निदान झाल्याचं समजल्यानंतर तेसुद्धा रुग्णालयात गेले.
लक्षणं दिसून आल्याच्या तिसऱ्या दिवशी ते रुग्णालयात पोहोचले. एका आठवड्यापूर्वी संपर्कात आल् संपर्कात असलेल्या एका मित्रा आलेल्या रुग्णालयात गेले.
थियागो यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आल्यानंतर त्यांना मंकीपॉक्सच्या विषाणूने गाठल्याचं समजलं.
याव्यतिरिक्त थियागो यांनी लैंगिक संसर्गांचीही तपासणी केली, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
"मला रुग्णालयात दाखल होण्यास विलंब झाला, कारण मी कपडेच घालू शकत नव्हतो. कपडे घालताना खूप वेदना व्हायच्या. कार चालवतानाही शरीराच्या सूजेमुळे मला खूप त्रास झाला."
थियागो रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना वेदनाशामक गोळ्या दिल्या. तसंच जळजळ कमी होण्यासाठी मलमही दिलं. त्यानंतर त्यांना काहीसं बरं वाटलं.
"मलम लावल्यानंतर थोडं बरं वाटलं, पण चार तासांनी पुन्हा जळजळ सुरू झाली," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
थियागो आणि त्यांच्या मित्राने गेल्या काही महिन्यांत कधीच परदेश प्रवास केलेला नाही.
ते सांगतात, "मंकीपॉक्स संसर्गाबद्दल कळल्यानंतर माझ्या संपर्कात आलेल्या सर्व मित्रांना फोन केला. माझ्या मंकीपॉक्सविषयी त्यांना कळवलं."
अपराध्यासारखी वागणूक
मंकीपॉक्सच्या लक्षणांमुळे त्रास होत होता तो वेगळा. पण त्याच्याव्यतिरिक्तही विचित्र अशा परिस्थितीचा सामना थियागो यांना करावा लागला.
ते म्हणतात, "माझ्या जखमा कशा स्वच्छ कराव्यात, याविषयी मला काहीही सांगितलं गेलं नव्हतं. मी किती दिवस आजारी असेन, आयसोलेशनमधून बाहेर कधी पडू शकतो, याविषयी काहीच कल्पना देण्यात आली नाही. ही सगळी माहिती मी इंटरनेटवर शोधत होतो किंवा डॉक्टर मित्रांना विचारत होतो."
"मंकीपॉक्स झालेल्या रुग्णांची स्वतंत्र सोय नव्हती. रुग्ण कुठेही, कसेही फिरायचे. त्यांनी यासाठी योग्य तयारी केलेली नव्हती," असंही त्यांनी सांगितलं.
याशिवाय, डॉक्टर आणि नर्सकडून अपमानजनक वागणूक मिळाल्याविषयीही त्यांनी खंत व्यक्त केली.
"मी रुग्णालयात कुठेही जायचो. तिथे मला HIV ची किंवा इतर कोणत्या तरी लैंगिक आजारांची लागण झालीय का, असा प्रश्न विचारला जायचा. मंकीपॉक्स झाल्यामुळे मला अपराधीपणाची वागणूक देण्यात येत होती."
LGBTQIA+ कम्युनिटीमध्ये मंकीपॉक्स पसरल्याची बातमी सुरुवातीला आली होती.
WHO च्या माहितीनुसार, सुरुवातीचा काळात समलैंगिक पुरुषांमध्ये या आजाराचे केसेस आढळून आले होते. पण कोणत्याही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास मंकीपॉक्स होऊ शकतो, असा इशाराही संस्थेने दिला होता.
युकेमध्ये मंकीपॉक्सचं प्रमाण गे आणि बायसेक्शुअल पुरुषांमध्ये जास्त आढळून आल्याने तेथील हेल्थ सिक्युरिटी संस्थेनेही या कम्युनिटीतील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. याच्याशी आपल्या आजाराचा संदर्भ जोडत थियागो यांनी आपली व्यथा मांडली.
मंकीपॉक्सविषयी जाणून घ्या -
मंकीपॉक्स साधारणपणे मध्य आफ्रिका आणि पश्चिम आफ्रिका परिसरात जास्त आढळून येतो. विशेषतः वर्षा वन असलेल्या परिसरात तो जास्त आढळतो.
घनदाट जंगलांचा भाग असलेल्या डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये या वर्षी 1200 पेक्षाही जास्त रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
WHO च्या माहितीनुसार, 1 मे 2022 पर्यंत त्यापैकी 57 जणांचा मृत्यूही झालेला आहे.
मंकीपॉक्सच्या व्हायरसचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.
1. पश्चिम आफ्रिकन
2. मध्य आफ्रिकन
दोन्ही विषाणू कमी धोकादायक आहेत. पण ते आता आफ्रिकेबाहेरच्या देशांमध्येही पसरत असल्याची माहिती समोर येत आहे.
आफ्रिकेबाहेरही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेल्या अनेकांना याची लागण झाल्याची माहिती मिळते. याचा अर्थ समाजात काही प्रमाणात हा व्हायरस पसरण्यास सुरुवात झाली आहे.
युके येथील हेल्थ सिक्युरिटी संस्थेच्या सूचनेनुसार, संसर्गाची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तीने तत्काळ लैंगिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. संबंधित व्यक्तींनी केंद्राला भेट देण्याऐवजी फोन किंवा इमेलवर आपल्याबाबत माहिती द्यावी, असंही संस्थेने सांगितलं आहे.
याशिवाय, मंकीपॉक्सची लागण झाल्याचा संशय असलेल्या लोकांनी कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध ठेवणं टाळावं. लागण झाल्यानंतर आठ आठवड्यांपर्यंत काँडमचा वापर करूनच लैंगिक संबंध ठेवावेत, अशी सूचनाही त्यांनी केलेली आहे.
सध्या जगात आढळून येणाऱ्या रुग्णांचं निरीक्षण केल्यास ते फारसे गंभीर नाहीत. कांजण्यांप्रमाणे ते काही दिवसांत स्वतःहून बरे होत असल्याचं दिसून येतं. शिवाय, मृत्यूंची नोंद केवळ आफ्रिकन देशांमध्येच झालेली आहे.
मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्यानंतर 5 ते 21 दिवसांत सुरुवातीची लक्षणे आढळून येतात. या प्रक्रियेदरम्यान, सुरुवातीला चेहऱ्याला खाज सुटणं सुरू होतं. त्यानंतर शरीराच्या विविध भागांमध्ये ही खाज व जळजळ पसरते. विशेषतः हात आणि तळपायांमध्ये त्याचं प्रमाण जास्त असतं.
ही खाज आणि जळजळ काहीवेळा जास्त वेदनादायकही असू शकते. त्याचं स्वरूप कांजिण्यांसारखंही असू शकतं. या पुरळांमुळे झालेल्या जखमांवर खपली चढून ती निघून जाते.
संसर्ग झाल्याच्या 14 ते 21 दिवसांनंतर त्याचा परिणाम दिसणं संपून रुग्ण पूर्वस्थितीत येतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























