You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानः खासदारावर त्यांच्या तिसऱ्या पत्नीने केले गंभीर आरोप
पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीचे सदस्य आणि लोकप्रिय टीव्ही सेलिब्रेटी आमीर लियाकत यांचं तिसरं लग्नही फार काळ टिकू शकलेलं नाहीय.
49 वर्षीय लियाकत यांनी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात 18 वर्षीय सैयदा दानिया शाह हिच्याशी लग्न केलं. मात्र, दानिया शाहने लियाक यांच्यापासून घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केलाय.
दानिया शाहने लियाकत यांच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत. तसंच, हे लग्न रद्द करण्याची मागणी अर्जाद्वारे तिने कोर्टाकडे केलीय.
आमीर लियाकत हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे सदस्य आहेत.
दानिया शाहने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आमीर लियाकत यांच्यापासून वेगळे होत असल्याच्या वृत्तांना दुजोरा दिला आणि यासाठीच कोर्टात गेले होते, असंही सांगितलं. दानिया शाहनं व्हीडिओत म्हटलंय की, याबाबत अधिक माहिती माध्यमांना दिली जाईल.
दानियानं स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "त्यांनी मला तीन ते चार दिवस एकाच खोलीत बंद करून ठेवलं. त्यांनी मला वेळेवर जेवायलाही दिलं नाही."
आमीर लियाकत यांनी गोळी मारून मारण्याची धमकी दिली, तसंच गळा दाबून मारहाणही केल्याचं दानिया म्हणाली.
"जर माझ्या भावाला किंवा माझ्या कुटुंबाला काही झालं तर त्यास आमीर लियाकत जबाबदार असतील," असंही दानिया म्हणाली.
लग्न रद्द करण्याच्या दाव्यात काय आहे?
दानिया शाहने आमीर लियाकत यांच्यावर नशा करणं, छळ करणं, जबरदस्तीनं अश्लील व्हीडिओ बनवण्याचा आरोप केलाय. तसंच, त्यांच्याविरोधात हुंडा आणि देखभालीचाही दावा दाखल केला होता.
सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या कागदपत्रांनुसार, दानिया शाहने आमीर लियाकत यांच्याकडून महिन्याला एक लाख रुपये देखभालीचे पैसे मागितले असून, 11 कोटी रुपयांच्या बंगला आणि वाहनाची मागणी केली आहे.
जियो न्यूजच्या माहितीनुसार, दानिया शाहने आरोप केलाय की, "पीटीआय खासदार आमीर लियाकत मला एका छोट्याशा खोलीत बंद ठेवत असत आणि व्यसनाधीन अवस्थेत मारहाण करत. मला आणि माझ्या कुटुंबाला धकमी देत असत. आमीर लियाकत सैतानापेक्षाही वाईट आहेत."
दानिया शाह यांच्या याचिकेवर 17 जून 2022 रोजी सुनावणी होणार आहे.
दानियानं केलेल्या आरोपांवर आमीर लियाकत हुसैननं ट्विटरवरील प्रतिक्रियेत म्हटलं की, "घटस्फोटाच्या अर्जावेळी दानियानं केलेले सर्व आरोप खोटे आहेत."
दानिया आणि आमीर लियाकत यांच्यातील हा वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)