अॅन फ्रँक: ज्यूंच्या शिरकाणात बळी पडलेली लेखिका

फोटो स्रोत, AFP PHOTO /ANNE FRANK FONDS
अॅन फ्रँकचा जन्म 12 जून 1929 रोजी झाला आणि ज्यूंचे नृशंस शिरकाण झाले तेव्हा ती नेदरलँड्समधील एक तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेली किशोरी होती. या वर्षी तिचा 93 वा जन्मदिन असता.
या वर्षी अॅन फ्रँकचे घर जनतेसाठी खुले करून 62 वर्षे पूर्ण झाली आहेत. फ्रँकचे प्रिसेन्ग्राट येथील 263 क्रमांकाचे घर पुनर्स्थापित करून जनतेसाठी 3 मे 1960 साठी खुले करण्यात आले.
अॅन आपल्या कुटुंबासोबत अॅमस्टरडॅममध्ये राहत होती. पण 1942 मध्ये फ्रँक कुटुंबाला युरोपातील सर्व ज्यूंचा निर्वंश करू इच्छिणाऱ्या नाझींपासून लपून राहावे लागले. या लपण्याच्या कालावधीत अॅनने एक डायरी लिहिली. ही डायरी संपूर्ण जगातील सर्वाधिक लोकप्रिय पुस्तकांपैकी एक ठरली आहे.
परंतु, आपले लेखक होण्याचे स्वप्न सत्यात उतरताना तिला जिवंतपणी पाहता आले नाही. ज्यूंच्या शिरकाणादरम्यान तिचीही हत्या झाली. तिचे वडील दुसऱ्या जागतिक युद्धातून बचावले आणि त्यांनी तिच्या डायरीचे पुस्तकरूपात प्रकाशन केले. आधुनिक इतिहासातील सर्वांत भयंकर घटनांपैकी एक घटना आपल्या डायरीद्वारे जगापुढे आणणाऱ्या या शूर मुलीबद्दल आणखी जाणून घेऊया.
अॅन फ्रँकचे सुरूवातीचे आयुष्य कसे होते?
अॅनेलिस मेरी फ्रँक- किंवा अॅन फ्रँकचा जन्म 1929 मध्ये फ्रँकफूर्ट या जर्मन शहरात ज्युईश कुटुंबात झाला. तिची मर्गोट नावाची बहीण तिच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी होती आणि तिच्या आईवडिलांचे नाव एडिथ आणि ओट्टो होते.
पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात जर्मनीमध्ये दारिद्र्य पसरले होते आणि अनेकांसाठी रोजचे जगणे मुश्किल झाले होते. अॅडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वाखालील नाझी पक्षाची लोकप्रियता वाढू लागली होती. त्यांनी देशाच्या अनेक समस्यांसाठी ज्यूंना दोष दिला होता. (रॉयटर्स)
अॅन आणि तिचे कुटुंब शिरकाणाच्या कालावधीत ज्या गुप्त ठिकाणी लपले होते ते एका पुस्तकाच्या कपाटामागे होते.

फोटो स्रोत, Reuters
नाझी 1933 मध्ये निवडणुकीनंतर सत्तेत आले तेव्हा त्यांनी ज्यू समाजाचा नितांत छळ करणे सुरू केले. त्यांचे रोजचे जगणे शिक्षा असल्याप्रमाणे केले गेले.
फ्रँक कुटुंबाने जर्मनीबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. ते नेदरलँड्समधील अॅमस्टरडॅम शहरात स्थलांतरित झाले. त्यांना तेथे सुरक्षित वाटत होते. अॅनने शाळेत जाण्यास सुरूवात केली, तिला नवीन मित्रमैत्रिणी मिळाले, डच भाषा शिकून घेतली. एकंदरीत सर्व सुरळीत सुरू होते.
जर्मनीने 1 सप्टेंबर 1939 रोजी, म्हणजे ती अवघ्या 10 वर्षांची असताना पोलंडवर हल्ला केला आणि दुसऱ्या महायुद्धाचे रणशिंग फुंकले गेले.
त्यानंतर एक वर्षापेक्षाही कमी काळात म्हणजे 10 मे 1940 रोजी जर्मन सैन्याने नेदरलँड्सवर हल्ला केला आणि नाझींनी तेथेही ज्यूंचा छळ करण्यास सुरूवात केली.
हत्याकांडादरम्यान अॅन फ्रँकचे काय झाले?
अॅनला तिच्या 13 व्या वाढदिवसाला एक डायरी भेट मिळाली. तिचे नाव तिने किट्टी असे ठेवले. या डायरीतील तिची पहिली नोंद 12 जून 1942 ची आहे. त्यादरम्यान नाझींनी नेदरलँड्समधील ज्यूंचा अतोनात छळ सुरू केला होता.
1942 च्या उन्हाळ्यात अॅनची बहीण मर्गोट हिला नाझींनी एका कॅम्पमध्ये कामावर जाण्याचा आदेश दिला. परंतु तिथे तिचे आणि उर्वरित कुटुंबाचे काय होईल या भीतीने ग्रासलेल्या फ्रँक कुटुंबाने ओट्टोच्या व्यवसायाच्या ठिकाणी मागच्या बाजूला एका गुप्त ठिकाणी लपण्याचा निर्णय घेतला. ओट्टो ही जागा मागील काही आठवड्यांपासून सज्ज करत होती.
त्यांच्यासोबत आणखी चार लोक लपले होते- व्हॅन पेल्स कुटुंब (हर्मन, ऑगस्टे आणि त्यांचा मुलगा पीटर) आणि फ्रित्झ फेफर. ओट्टोच्या जवळच्या मित्रांनी या सर्वांना खूप मदत केली. त्यांनी त्यांना अन्नपाणी आणि बाहेरील जगातल्या बातम्या आणून दिल्या. अॅनला या लपण्याच्या काळात लेखनाची खूप सोबत झाली. तिने डायरीत अनेक नोंदी लिहिल्या, कविता आणि कथाही लिहिल्या. लेखनामुळे तिला या परिस्थितीत मोठा आधार मिळाला.

फोटो स्रोत, ANN FRANK MUSEUM
एके दिवशी इंग्लंडमधल्या डच सरकारच्या शिक्षणमंत्र्यांचे रेडिओवरील भाषण तिने ऐकले. त्यांनी युद्धाच्या डायऱ्या आणि कागदपत्रे जपून ठेवण्याचे आवाहन जनतेला केले होते. ते भाषण ऐकल्यावर तिला आपल्या डायरीचे रूपांतर पुस्तकात करण्याची प्रेरणा मिळाली. तिने आपली कादंबरी हेत एचेटह्युस (दि सिक्रेट अॅनेक्स) लिहायला सुरूवात केली. परंतु ही कादंबरी पूर्ण होण्यापूर्वीच तिच्या कुटुंबाला वाटत असलेली भीती सत्यात उतरली. दोन वर्षे लपून बसल्यानंतर नाझींना या गुप्त घराचा पत्ता लागला. त्यांना हे नेमके कसे कळले हे आजही कोणालाही माहीत नाही.
4 ऑगस्ट 1944 रोजी त्यांनी या घरात लपून बसलेल्या सर्वांनाच अटक केली आणि त्यांना ऑशेवित्झ-बर्कनाऊ या छळछावणीत नेण्यात आले. अॅनच्या डायरीतील शेवटची नोंद अवघ्या तीन दिवसांपूर्वीची म्हणजे 1 ऑगस्ट 1944 रोजीची आहे.
अॅन फ्रँकला ताब्यात घेतल्यानंतर पुढे काय झाले?
फ्रँक कुटुंब ऑशेवित्झ-बर्कनाऊ आले तेव्हा त्यांची प्रकृती चांगली होती. त्यामुळे त्या सर्वांकडून प्रचंड काम करून घेण्यात आले. ओट्टोला आपली पत्नी आणि दोन्ही मुलींपासून वेगळे करण्यात आले. त्यानंतर अॅन आणि मर्गोटलाही त्यांच्या आईपासून दूर करण्यात आले.
ऑशेवित्झ छावणीतील प्रसिद्ध गेटवर 'आर्बेट मॅच फ्रेई' असा जर्मन भाषेतील फलक आहे. त्याचा अर्थ 'काम तुम्हाला मोक्ष देते' असा होतो.
त्याचवेळी अॅमस्टरडॅममध्ये या कुटुंबाला मदत करणाऱ्या ओट्टोच्या माईप गाइस आणि बेप वोस्कुइजल या ओट्टोच्या मित्रांना अॅनचे लिखाण सापडले. ती भविष्यात परत आली तर तिला ते देता येईल या हेतूने त्यांनी ते जपून ठेवले. परंतु दुर्दैवाने तसे घडायचे नव्हते. अॅन आणि मर्गोटला नोव्हेंबर 1944 च्या सुरूवातीला बर्जन- बेल्सन छळछावणीत पाठवण्यात आले. तिथे त्यांची प्रकृती ढासळली. फेब्रुवारी १९४५ मध्ये त्या दोघी काही दिवसांच्या अंतराने टायफसने मरण पावल्या. त्यांची आई एडिथ हिलाही ठार करण्यात आले. या शिरकाणातून त्यांचे वडील ओट्टो हे कुटुंबातील एकमेव सदस्य वाचले.
माइप आणि बेप या दोघांनी तिचे लिखाण त्यांच्याकडे सोपवले. त्यांनी ते वाचले तेव्हा या लिखाणाद्वारे तिने केवढा मोठा खजिना मागे सोडला आहे आणि "आपल्या मृत्यूनंतरही हे जिवंत राहायला हवे" अशी तिची इच्छा होती, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तिच्या डायरीचे रूपांतर पुस्तकात केले आणि अशा रितीने हे ऐतिहासिक पुस्तक जगासमोर आले.

फोटो स्रोत, Getty Images
अॅनची डायरी जगभरात लाखो लोकांनी वाचली आहे. 25 जून 1947 रोजी तिच्या हेत एचेटह्युस (दि सिक्रेट अॅनेक्स)च्या फक्त ३००० प्रती छापण्यात आल्या होत्या. अवघ्या काही वर्षांमध्ये हे पुस्तक जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले, त्याचे नाटकात आणि चित्रपटात रूपांतर झाले आणि जगभरातील लाखो लोकांनी अॅनची गोष्ट ऐकली.
आपल्या लपण्याच्या कालावधीतील आयुष्याची कथा सांगणारे पुस्तक प्रकाशित करून लेखक होण्याचे तिचे स्वप्न सत्यात आले. 1960 साली अॅमस्टरडॅममधील हे गुप्त घर अॅन फ्रँक हाऊस हाऊस या नावाने वस्तुसंग्रहालयात परावर्तित करण्यात आले. तिची मूळ डायरी आजही तिथे पाहायला मिळते. आपण आजही या घराला भेट देऊ शकतो.
तुम्ही अॅन फ्रँकची डायरी वाचलीय किंवा अॅमस्टरडॅममधल्या या गुप्त घराला भेट दिलीय का? अॅनची गोष्ट तुम्हाला कशी वाटते? आम्हाला खाली कमेंट करून कळवा.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























