'माझी योनी खुली झालीये का?' व्हर्जिनिटी, लग्न आणि लैंगिक संबंधांचा इतिहास

    • Author, सोफिया स्मिथ
    • Role, बीबीसी फ्युचर
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

गेली अनेक शतकं माणूस योनिपटलाविषयी बरीच छाननी आणि चिंता करत आलेला आहे. या संदर्भात निर्माण झालेली मिथकं पुसण्यासाठी काय करता येईल?

"मी व्हर्जिन आहे का?" अशी शंका एका अनोळखी व्यक्तीने सरासच्या इनबॉक्समध्ये पाठवली. त्या वेळी काय उत्तर द्यावं हे सरासला सुचलं नाही. तिला पहिल्यांदाच कोणीतरी असं 'व्हजायना सेल्फी' पाठवून विचारत होतं.

त्या वेळी सरास 'लव्ह मॅटर्स अरेबिक' या फेसबुक पानाची अॅडमिन होती. समाजमाध्यमांवर नातेसंबंध व लैंगिकता यासंबंधीचं शिक्षण देणारं हे पान आहे.

"शंका विचारणाऱ्या मुलीने लिहिलं होतं की, तिचं पूर्वी एकावर प्रेम होतं आणि आता तिचा दुसऱ्या पुरुषाशी साखरपुडा होतो आहे, तर ती व्हर्जिन आहे का याची तिला खातरजमा करून घ्यायची होती", सरास सांगते.

मग ती थोडं थांबून तोंड वेंगाडत म्हणते, "मफ्तुआ... मला या शब्दाचा अगदी तिटकारा आहे. तिने मला तेच विचारलं. ती 'खुली' झालेय का, असं तिने विचारलं."

आपलं योनिपटल पाहून ते 'बंद' आहे की नाही, हे सरासने तपासावं, अशी प्रश्नकर्तीची अपेक्षा होती. लग्नाआधी मुलीचा कौमार्यभंग झालेला नसावा, असा दबाव तिच्यावर तिच्या समुदायाकडून होता आणि नवऱ्यासमोर शरीरसंबंधांवेळी रक्ताच्या रूपात हे सिद्ध होणं गरजेचं होतं.

योनिपटल संबंधित स्त्रीच्या लैंगिक संबंधांचा इतिहास सांगणारा 'पुरावा असतो, हे गृहितक मान्य करून व्हर्जिनिटी चाचण्या केल्या जातात. पण, जागतिक आरोग्य संघटनेने अशा चाचण्या मानवाधिकारांचा भंग करत असल्याचं सांगत 2018 साली या प्रथेचा निषेध केला.

योनिपटल मोजण्यासाठी शारीरिक तपासणी करणं किंवा योनिपटलाचा शिथीलपणा तपासणं किंवा लग्नानंतर पहिल्या रात्री पलंगाच्या चादरीवर रक्ताचे डाग पडलेत का ते बघणं, किंबहुना वर आणि वधू यांच्या कुटुंबांना ते दाखवणं- अशा अनेक प्रकारे ही प्रथा प्रचलित आहे.

याला काही ठोस वैज्ञानिक आधार नाही, आणि मुळात 'व्हर्जिनिटी' किंवा कौमार्य ही संकल्पनाच जैविक वास्तव नसून सामाजिक रचित आहे. पण जगभरातील लाखो लोक योनिशुचितेचा आग्रह धरताना दिसतात. पहिल्यांदा शरीरसंबंध येतो तेव्हा स्त्रीच्या योनीतून रक्तस्त्राव होतो आणि तिच्या शरीरावरून तिचा लैंगिक इतिहास जोखता येतो, अशी धारणा यामागे आहे.

'लूझिंग इट' या माझ्या पुस्तकात मी योनिशुचितेच्या मिथकाचा इतिहास रेखाटायचा प्रयत्न केला आहे. सराससारखे लोक या संदर्भात कोणते प्रश्न विचारतात आणि या धारणांना कोण पुष्टी देतं आणि वैज्ञानिक संशोधनाच्या अभावापोटी अशी मिथकं टिकून राहायला बळ मिळतं का, इत्यादी प्रश्नांचा उहापोहसुद्धा त्यात केला आहे.

या मिथकाचा दंभस्फोट करणारा बराच वैज्ञानिक पुरावा मला सापडला. पण जगभरात काही डॉक्टर या कल्पनेचा पुरस्कार करतात, अनेक विधिमंडळांनी या प्रथेचं समर्थन केलं आहे, हेसुद्धा माझ्या लक्षात आलं.

योनी उघडते त्या जवळ योनिपटल हा लहानसा तंतू असतो. वरकरणी निरुद्देश वाटणाऱ्या तंतूच्या एका लहानशा भागाला इतक्या सदोष उद्देशाची जोड दिली जाते, हे खरं तर अविश्वसनीय वाटावं असं आहे. मुळात योनिपटल का अस्तित्वात असतात, याबाबत वैज्ञानिक समुदायात वाद असल्याचं दिसतं.

पाण्यातून जमिनीवर आलेल्या आपल्या प्रागैतिहासिक सस्तन पूर्वजांपैकी कोणाचा तरी हा अवशेष आपल्या शरीरात उरला असावा का? अर्भकावस्थेत जीवजंतू योनीत जाऊ नयेत, यासाठी हे आवरण असतं का? या प्रश्नांची उत्तरं खरं तर कोणालाच माहीत नाहीत. इतर काही प्रजातींमध्ये या तंतूमागे काहीएक उद्देश असल्याचं दिसतं.

उदाहरणार्थ, गिनी पिगमध्ये मादी संभोगाच्या उच्चावस्थेत जाते तेव्हा हा तंतू विरायला लागतो आणि संभोग पूर्ण झाल्यावर हा तंतू पुन्हा वाढतो. पण माणसांच्या बाबतीत असं काही होत नाही. मानवी मादीच्या योनीमधील पटलाचं प्रमाणही बरंच वेगवेगळं असू शकतं. आपल्यातील मोजक्याच जणींनी अशा प्रकारची आकृती वाढताना पाहिली असेल.

योनिपटल योनी बंद करतं, अशी काही लोकांची चुकीची समजूत असते. वास्तविक योनिपटलाचा जाडपणा व्यक्तीगणिक कमी-जास्त असतो, आपल्यातील काही मोजक्या जणींचं योनिपटल वयानुरूप बदलू शकतं, काहींना जन्मतःच योनिपटल नसतं, किंवा आपण लैंगिक प्रौढावस्थेत पोचेपर्यंत ते पूर्णतः लुप्त झालेलंही असू शकतं. किंवा व्यायामावेळी किंवा हस्तमैथुनावेळी बरीच हालचाल झाल्याने योनिपटल फाकलेलं किंवा फाटलेलं असू शकतं. आणि अर्थातच संभोगावेळी योनिपटल दूर होणं स्वाभाविक असतं.

पण तथाकथित योनिशुचिता तपासून लैंगिक कृतीचा अंदाज बांधता येतो, असा मात्र याचा अर्थ नाही. उदाहरणार्थ, 2004 साली 36 गरोदर तरुणींचा एक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार, केवळ दोनच मुलींच्या बाबतीत 'संभोगाचे ठोस निष्कर्ष काढणं वैद्यकीय चमूला शक्य झालं.

दुसरा एक अभ्यास 2004 सालीच करण्यात आला होता, त्यामध्ये लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या पौगंडावयीन मुलींच्या मुलाखती घेण्यात आल्या. यातील 52 टक्के प्रतिसादकांच्या 'योनिपटलामध्ये कोणताही ठळक बदल झालेला नव्हता.' आपण लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलो तर आपलं योनिपटल दिसत नाही, किंवा आपण लैंगिकदृष्ट्या सक्रिय नसलो तर आपलं योनिपटल जसंच्या तसं राहतं, हा समज वस्तुस्थितीला धरून नाही.

पलंगावरच्या चादरीवर रक्ताचे डाग पडलेले पाहणं, ही कौमार्यचाचणी जगभरात ठिकठिकाणी वापरली जाते, पण तीसुद्धा गैरसमजुतीवर आधारलेली आहे. संभोगाची कृती अचानकपणे केली किंवा आपण निवांत नसताना अशी कृती झाली, तरी पहिल्यांदा योनिपटल ताणलं गेल्यावर रक्त येऊ शकतं. त्याचप्रमाणे जोराने संभोग केला किंवा चिक द्रवाचं प्रमाण पुरेसं नसेल, तरीसुद्धा रक्त येण्याची शक्यता मी असते. तर, पहिल्या वेळी संभोग करताना रक्तस्त्राव होईल किंवा होणार नाहीसुद्धा.

अस्वस्थ असणं, पुरेसं उत्तेजित नसणं किंवा संसर्गासारख्या गोष्टींमुळे अवघडल्यासारखं वाटणं, अशा विविध कारणांमुळे संभोगावेळी रक्तस्त्राव होऊ शकतो. एका प्रसूतितज्ज्ञाने तिच्या 41 सहकारी स्त्रियांचं सर्वेक्षण केलं आणि त्यांचा पहिल्यांदा शरीरसंबंध आला तेव्हा रक्तस्त्राव झाला होता का, असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यातील 63 टक्के महिलांनी अशावेळी रक्तस्त्राव न झाल्याचं सांगितलं.

पण योनिशुचितेचं स्तोम माजवणाऱ्या देशांमध्ये अशा जीवशास्त्रीय तथ्याला फारशी जागा नाही. तुर्कस्तानातील डायकल विद्यापीठाने 2011 साली केलेल्या एका अभ्यासानुसार, योनिपटल कौमार्याचं निदर्शक असतं, असं 72.1 टक्के विद्यार्थिनी आणि 74.2 टक्के विद्यार्थी मानत होते. लग्नानंतर पहिल्या रात्री कुटुंबियांनी 'रक्ताचे डाग पडलेली चादर' दाखवायला हवी, असं उत्तर 30.1 टक्के पुरुषांनी दिलं.

स्त्रीला सकारात्मक लैंगिक आरोग्य राखण्याच्या मार्गात अशा गोष्टी बाधक ठरू शकतात. गिझा, इजिप्त इथे केलेल्या एका सामाजिक अभ्यासानुसार, मुलाखत घेण्यात आलेल्या बहुतांश महिलांना लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीपूर्वी चिंता व भीती वाटत होती आणि रात्रीदरम्यान व रात्रीनंतर त्यांना वेदनाही होत होत्या. कौमार्य आणि योनिपटल या संदर्भातील कल्पनांच्या दबावामुळे हे घडलं.

लेबनॉनमध्ये 2013 साली विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं एक सर्वेक्षण करण्यात आलं. त्यातील 43 टक्के महिलांनी असं उत्तर दिलं की, लग्नानंतरच्या रात्री रक्तस्त्राव होणार नाही या भीतीने त्या लग्नाआधी शरीरसंबंध ठेवायचं टाळतील. लेबनॉनमध्येच 2017 साली झालेल्या एका अभ्यासावेळी मुलाखत घेण्यात आलेल्या 416 महिलांपैकी सुमारे 40 टक्के महिलांनी सांगितलं की, लग्नापर्यंत स्वतःचं योनिपटल सुरक्षित राहावं, यासाठी त्यांनी योनीद्वारे संभोग करण्याऐवजी गुदद्वारातून किंवा मुखावाटे संभोग केला आहे.

हस्तमैथुनामुळे आपल्याला योनिपटल गमवावं लागेल, अशी भीती महिलांना वाटते. आणि काहींनी तर या भीतीपोटी स्वतःच्या शरीराला धड स्पर्शही केलेला नसतो, असं समाजमाध्यमांवरच्या असंख्य नोंदीवरून स्पष्ट होत असल्याचं मला संशोधनादरम्यान आढळलं.

योनिशुचितेच्या मिथकाचा परिणाम केवळ स्त्रियांच्या लैंगिक स्वास्थ्यावरच होतो असं नाही, तर त्यांना न्याय मिळवून देण्याच्या मार्गातही त्याचा अडथळा होतो. न्यायालयीन खटल्यांदरम्यान बलात्कार पीडितेच्या कौमार्याची चाचणी करण्यावर पाकिस्तानात अगदी अलीकडे बंदी घालण्यात आली. अनेक देशांमध्ये, विशेषतः आशिया, मध्यपूर्व आणि उत्तर व दक्षिण आफ्रिकेमधील देश इथे अजूनही अशी चाचणी केली जाते.

जगभरातील अनेक डॉक्टर विवाहपूर्व शरीरसंबंध आलेल्या महिलांना शस्त्रक्रियेद्वारे त्यांचं योनिपटल 'दुरुस्त' करून देतात आणि मोठा नफा कमावतात. मी माझ्या पुस्तकात लिहिल्यानुसार, युनायटेड किंगडममधील राजकारण्यांनी जानेवारी 2022मध्ये कौमार्य चाचण्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्याच्या एक वर्ष आधी मी लंडनमधील एका सर्जनला कौमार्य चाचणीसंदर्भात ई-मेल केला होता.

तर, मी जवळपास 30 हजार रुपये भरून डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर माझं योनिपटल सुरक्षित असल्याचं शिक्कामोर्तब करणारा वैद्यकीय अहवाल दिला जाईल, असं मला सर्जनच्या सहाय्यकाने सांगितलं. योनिपटल सुरक्षित नसेल तर 5 लाख 30 हजार भरून माझ्या योनिपटलाची दुरुस्ती केली जाईल, त्यानंतर मला तसाच वैद्यकीय अहवाल दिला जाईल.

युनायटेड किंगडममध्ये अशा योनिपटल दुरुस्तीच्या शस्त्रक्रियेवर बंदी घालणारा कायदा संसदेत प्रविष्ट आहे. अशा अटीतटीच्या काळातही काही सर्जन ही सेवा पुरवत आहेत. 'लैंगिक संभोगामुळे किंवा तणाव येणाऱ्या शारीरिक हालचालीमुळे योनिपटलाचं नुकसान झालेल्या महिलांना लाभदायक ठरेल' अशी योनिपटलाची दुरुस्ती करून देण्याचा दावा करणाला एक लंडनस्थित सर्जन ऑनलाइन जाहिरातीसुद्धा करतो.

तर, योनिशुचितेसंबंधीच्या या मिथकाला पूर्णविराम कसा द्यायचा? या संदर्भातील संशोधनाकडे लक्ष वेधणं, ही काहीअंशी सुरुवात असू शकते. तसंच कौमार्य चाचणी करणाऱ्या कायदेशीर व्यवहारांमध्ये बदल करणं आणि लोकांची दिशाभूल करण्यापासून आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना अटकाव घालणं, अशा उपायांचीही गरज आहे.

योनिपटलाचं नावच बदलून टाकणं, हा यामधील मिथकांना फाटा देण्याचा उत्तम मार्ग असल्याचं काहींना वाटतं. अरबी व चेक अशा काही भाषांमध्ये याला 'कौमार्य अस्तर' अशा अर्थाचा शब्द वापरला जातो आहे- ही चांगली कल्पना ठरेल.

योनिपटलाचं नाव बदललं, तर त्यासंबंधीचा दृष्टिकोनही बदलू शकेल, असं संशोधनातूनसुद्धा दिसतं. 2008 साली स्वीडिश असोसिएशन फॉर सेक्शुआलिटी एज्युकेशन या संस्थेने 'कौमार्य अस्तरा'साठी त्यांच्या भाषेत वापरला जाणारा 'mödomshinna' हा शब्द बदलला आणि त्याच्या ऐवजी 'कौमार्य कोरोना' अशा आशयाचा slidkrans हा शब्द वापरला. आरोग्यसेवेविषयीची पत्रकं, वृत्तपत्रं, स्वीडनमधील अधिकृत भाषा नियोजन संस्था आणि इतर सर्व संदेशनामध्ये त्यांनी हा वापर करायला सुरुवात केली.

जवळपास 10 वर्षांनी संशोधन केरीन मिलेस यांना असं आढळलं आहे की, आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांचं सर्वेक्षण केल्यानंतर त्यातील 86 टक्क्यांनी 'कौमार्य कोरोना' हा शब्द वापरला. केवळ 22 टक्के तरुण लोकांनी त्याबद्दल ऐकलं आहे, पण मोजकेच लोक या प्रथेकडे पितृसत्ताकतेचं प्रतीक म्हणून पाहतात.

भाषेतील बदल एका रात्रीत होत नाही, पण ती सुरुवात असू शकते. इंग्रजीभाषिक जगामध्ये लैंगिक शिक्षणाविषयी बोलणारे अनेक जण आहेत आणि त्यांनी vaginal corona हा शब्द वापरायला पसंती दिली आहे. इंग्रजीत योनिपटलासाठी वापरला जाणारा Hymen हा शब्द म्हणजे प्राचीन ग्रीक देवाचं नाव आहे.

हा विवाहाचा देव होता. त्यामुळे या अस्तरासी वापरला जाणारा हा शब्द आपलीच नाचक्की करणारा आहे. स्वीडनला मात्र यात यश मिळालं आहे, कारण त्यांनी केवळ शब्द न बदलता, हा शब्द का बदलला याचं स्पष्टीकरणसुद्धा देणं अपेक्षित होतं.

कौमार्य चाचणी व योनिपटलाची दुरुस्ती, यांसारख्या प्रथांवर बंदी घालण्यासाठी जगभरातील सरकारे अधिक रस घेत आहेत. अशा बंदीमागील कारणं शाला-कॉलेजांच्या वर्गांमध्ये चर्चिली जातील, अशी आशा ठेवायला हवी. अशा रितीने पावलं उचलली तर या मिथ्यकथा पुन्हा कधी समोर येणार नाहीत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)