पोटातही असतो आणखी एक मेंदू? म्हणूनच भीती वाटली की पोटात खड्डा पडतो?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मायकल मोस्ले
- Role, प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
आपल्या पोटात काय चालू असतं ते रहस्य असलं तर काही नव्या अभ्यासानुसार दिसून आलंय की आपल्या पोटात जे चालू असतं त्याचा आपल्या मुडवर नक्कीच परिणाम होतो.
आपल्या पोटात खरंतर आणखी एक मेंदू असतो. गंमत नाही, खरंच! पोटात कोट्यवधी न्युरॉन्सचं एक जाळं असतं. आपल्याला एखादी गोष्ट पोटतिडिकीने वाटतं, किंवा ज्याला इंग्लिशमध्ये 'गट फिलिंग' म्हणतात, त्यामागे हेच जाळं कार्यरत असतं.
एखाद्या मांजरीच्या मेंदूत असतील म्हणजे जवळपास 10 कोटी न्युरॉन्सचं जाळं मानवी पोटात असतं.
आता हा पोटातला मेंदू काही आपल्या मुख्य मेंदूसारख्या अवघड गोष्टी करत नाही. उदाहरणार्थ, पोटातल्या मेंदूला विचार वगैरे करता येत नाही. याचं मुख्य काम असतं आपण खालेल्लं पचवणं. अन्नाचं विघटन करणं, पचनासाठी योग्य त्या संप्रेरकांचं नियोजन करणं आणि त्या अन्नातून पोषणमुल्यं काढून घेऊन शरीरात इतरत्र पोहोचवणं.
मानवी शरीरातल्या पचनसंस्थेभोवती न्युरॉन्सचं अस्तर असतं. त्यामुळे तुमच्या मेंदूला तुमच्या पोटाशी जवळचा संबंध प्रस्थापित करता येतो. याचं न्युरॉन्सच्या जाळ्यामुळे तुमच्या पोटात जे चालू आहे ते पटकन मेंदूला कळतं. ज्या नसा हे काम करतात त्यांना 'वेगास नर्व्हस्' असं म्हणतात.
आणि म्हणूनच पोटात काय चालूये यामुळे तुमच्या मनावर, भावनांवर परिणाम होतो.
मनासारखं जेवणं झालं की आनंदी वाटतं ते याचमुळे.
फक्त जेवणच नाही, जेव्हा आपल्या पोटात खड्डा पडतो किंवा पोटात गुदगुल्या होतात तेव्हा आपल्या पोटातला मेंदू, मुख्य मेंदूशी संपर्क साधत असतो.

फोटो स्रोत, Getty Images
सोप्या शब्दात सांगायचं तर तुम्ही उल्हासित असलात, आनंदी असलात की पोटात गुदगुल्या होतात किंवा भीती वाटली, धक्का बसला तर पोटात खड्डा पडतो - म्हणजे ती एक भावनिक स्थिती असते. यावेळेस तुमच्या पोटात जो रक्तप्रवाह असतो तो तुमच्या शरीरातल्या इतर स्नायूंकडे वळवला जातो.
अशावेळी पोटात खड्डा पडणं किंवा गुदगुल्या होणं हा खरंतर तुमच्या पोटातल्या मेंदूने तुमच्या डोक्यातल्या मेंदूचा केलेला निषेध असतो की बुवा का तो रक्तप्रवाह वळवला?
अगदी तसंच तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट पोटतिडिकीने जाणवते, सांगावीशी वाटते, करावीशी वाटते - ज्याला काही लॉजिकल एक्सप्लेनशन नसतं, तुम्हाला फक्त आतून जाणवतं हे करायला हवं, तेव्हा ती तुमच्या पोटातल्या मेंदूची प्रतिक्रिया असते.
भुकेचे हार्मोन्स
आपल्या जठराचा आकार असतो मुठीएवढा. पण साग्रसंगीत जेवल्यानंतर तो जवळपास 40 पटींनी वाढतो आणि त्या 2 लिटर द्रव मावू शकेल इतका मोठा होतो.
आधी संशोधकांना वाटायचं की हे आकार वाढवणारे रिसेप्टर्स डोक्यातल्या मेंदूला सांगायचे की आता पोट भरलंय. पण तसं नाहीये. पोटातल्या मेंदूने निर्माण केलेले भुकेचे हार्मोन साधेसुधे नसतात.
त्यामुळेच अनेकदा तुमच्या शरीराला गरज नसताना तुम्हाला भूक लागल्यासारखं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
आपण खातो तेव्हा आपलं जठर आणि छोटं आतडं यांच्या सीमेमवर इलियम नावाचा भाग असतो. या इलियमपर्यंत खाल्लेलं अन्न पोहचलं की तिथे PYY नावाचं संप्ररक स्रवतं ज्यामुळे आपल्याला आपलं पोट भरल्याची जाणीव होते. आपण खाल्लेलं अन्न इलियमपर्यंत पोहचायला 20 मिनिटं लागतात.
त्यामुळेच आपल्याला जेवण सावकाश, चावून-चावून खावं असा सल्ला दिला जातो, म्हणजे आपण गरजेपेक्षा जास्त खाणार नाही. हळूहळू खाल्लं तर पोटाला तुमच्या मुख्य मेंदूपर्यंत संदेश पोहचवता येतो की आता पुरेसं अन्न आलेलं आहे, पोट भरलं आहे.
आपण काय करतो काय नाही, काय निर्णय घेतो यावर संपूर्णपणे आपल्या मुख्य मेंदूचं नियत्रंण असतं असं आपल्याला वाटत असलं तरी तसं नसतं.
आपल्या निर्णयप्रक्रियेत पोटही महत्त्वाची भूमिका बजावतं. उदाहरणार्थ, गच्च पोट भरलं की आपल्याला झोपावंस वाटतं, झोप येतेच.
हे पोटातल्या मेंदूचं काम असतं, कारण भरपेट जेवल्यानंतर शरीरातला एक तृतीयांश रक्तप्रवाह तुमच्या पोटाकडे वळतो, तेव्हा इतर अवयवांनी अडचण करायला नको. पोटाला त्याचं काम शांततेत करू द्यावं.
म्हणून आपल्याला लहानपणी सांगितलेलं असतं की जेवल्या-जेवल्या लगेच धावपळ करायची नाही.
पोट आणि मानसिक आरोग्य
डॉक्टर चांगल्या खाण्या-पिण्याद्वारे मानसिक आरोग्य चांगलं ठेवता येईल असं सांगत आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या डिकिन विद्यापिठातील फेलिस जॅका सांगतात, "मेंदूचे आरोग्य आणि खाणं-पिणं यांच्यातील घनिष्ठ संबंध सिद्ध करणारी आकडेवारी उपलब्ध आहे. आपल्याला मनःशांती हवी असेल तर खाणं-पिणं चांगलं ठेवावं लागणार."
अनेकांना खूप गोड खाण्याची सवय असते. तर, काहींना जंकफूड किंवा फास्टफूड खूप आवडतं. तज्ज्ञ सांगतात, या अन्नपदार्थांचा मानसिक आरोग्याशी थेट संबंध आहे. कारण, गोड पदार्थांचं रुपांतर फॅटमध्ये होतं. त्यामुळे, मेंदूतून काही हार्मोन्स बाहेर पडण्यास सुरूवात होते.
मुंबईच्या आहारतज्ज्ञ डॉ. जिनल पटेल म्हणतात, "जास्त फॅटी डाएटमुळे, शरीरातून कॉर्टिस्टेरॉन हॉर्मोन स्रवतं. हे हॉर्मोन स्ट्रेस, चिंता याच्याशी संबंधित आहे." या हार्मोनमुळे फॅटी किंवा जंकफूड खाल्ल्यावर मेंदूवर परिणाम होतो.
खूप जास्त गोड पदार्थ खाल्यामुळे मेंदूत एक रासायनिक बदल होतो. याला न्यूरोकेमिस्ट्री म्हणतात.
"हे हार्मोन पहिल्यापासूनच स्रवण्यास सुरूवात होत नाही. अतिजास्त प्रमाणात फॅटी खाल्याने हे हॉर्मोन स्रवण्यास सुरूवात होते," डॉ. जिनल सांगतात.
खाण्या-पिण्याच्या सवयी आणि मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम यांच्यासाठी डॉ. तिळवे उदाहरण देतात.
ते म्हणतात, "जेवल्यानंतर मद्यप्राशन किंवा तंबाखूसेवन यामुळे चिंता अधिक वाढते." तर, जास्त गोड पदार्थ सेवन करणाऱ्यांना अटेंन्शन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसॉर्डर (ADHD) आणि जीवनशैलीशी निगडीत आजार होतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























