पाकिस्तान: मध्यरात्री अविश्वास ठरावावर मतदानाला सुरुवात, इम्रान खान सरकार पडणार

मध्यरात्री विरोधी पक्षांचे खासदार संसदेत मतदानाची वाट पाहत होते.
फोटो कॅप्शन, मध्यरात्री विरोधी पक्षांचे खासदार संसदेत मतदानाची वाट पाहत होते.
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत (संसदेत) इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास ठरावावर (पाकिस्तानी वेळेनुसार) मध्यरात्रीच्या 5 मिनिटं आधी मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर दोघांनी राजीनामा दिला आहे.

मतदानाला सुरुवात होताच मध्यरात्र झाल्यामुळे कामकाज 2 मिनिटांसाठी बरखास्त करण्यात आलं. आता पाकिस्तानी वेळेनुसार रात्री 12 वाजून 2 मिनिटांनी मतदान पुढे सुरू राहील.

दरम्यान, इम्रान खान यांनी पंतप्रधान निवासस्थान सोडलं आहे.

इम्रान खान सरकारमधील मंत्री फवाद हुसैन यांनी ट्विट करून या संपूर्ण प्रकरणाबाबत दुःख व्यक्त केलं आहे.

"आजचा दिवस पाकिस्तानसाठी अतिशय दुःखद आहे. एका चांगल्या व्यक्तीला घरी पाठवून लुटारुंनी सत्ता हस्तगत केली," असं म्हणत हुसैन यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

याआधी काय घडलं?

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आज मध्यरात्रीपर्यंत अविश्वास दर्शक ठरावावर मतदान होणं बंधनकारक होतं.

पण इम्रान खान सरकार आणि संसदेचे स्पीकर मतदान घेण्याचं टाळत आहेत, असं चित्र दिसून आलं. त्यातच पाकिस्तानचं सुप्रीम कोर्ट मध्यरात्री उघडण्यात आलं आणि पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर बंदियाल सुप्रीम कोर्टात पोहोचले. मध्यरात्रीपर्यंत मतदान न झाल्यास ते कोर्टाच्या अवामानाची दखल घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली.

सुप्रीम कोर्टात रात्री होणाऱ्या सुनावणीदरम्यान माध्यमांना मात्र प्रवेशाची परवानगी नाकारण्यात आली.

न्यायमूर्ती अतहर मिनाअल्लाह हे एका नागरिकाकडून दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेतली.

या याचिकेत लष्करप्रमुखांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. तर इम्रान खान हे संसदेच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती बीबीसीचे प्रतिनिधी सिकंदर किरमाणी यांनी दिली.

इस्लामाबाद हायकोर्टसुद्धा रात्रीच्या वेळी उघडण्यात आलं.

पाकिस्तान

दरम्यान, पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्करप्रमुख कमर बाजवा यांचं निलंबन केल्याची चर्चा काही माध्यमांमध्ये दिसून आली. पण, पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद हुसैन यांनी हे वृत्त फेटाळून लावलं.

त्यांनी म्हटलंय, "पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि लष्कराचं संस्थात्मक महत्त्व सरकारला अगदी योग्य प्रकारे माहीत आहे. लष्कराचे प्रमुख बदलण्यात येणार असल्याच्या सर्व चर्चा बिनबुडाच्या आहेत. या चर्चांना काहीच अर्थ नाही. या सर्व बातम्या आम्ही फेटाळून लावत आहोत. या अफवा पसरवण्यामागे मोठं षड्यंत्र आहे."

संसदेतील पत्रकारांसाठीच्या सभागृहात मोठ्या संख्येनं पत्रकार जमले आहेत.
फोटो कॅप्शन, संसदेतील पत्रकारांसाठीच्या सभागृहात मोठ्या संख्येनं पत्रकार जमले आहेत.

दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे आपल्या पदाचा राजीनामा न देण्याच्या निर्णयावर ठाम होते.

या संपूर्ण राजकीय नाट्यादरम्यान, माझ्याविरोधात अमेरिका इत्यादी परकीय शक्ती षड्यंत्र रचत आहेत, असं इम्रान खान वारंवार सांगत आहेत. पण त्याविषयीचे पुरावे ते दाखवू शकले नाहीयेत.

याच गोष्टीवरून विरोधकांनी पंतप्रधान आणि संसदेच्या अध्यक्ष यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप केला.

पाकिस्तान

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) उपाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्या मरियम नवाझ शरीफ यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली.

त्यांनी पंतप्रधान इम्रान खान, संसदेचे सभापती आणि उप-सभापती यांना अटक करण्याची मागणी केली.

दुसरे विरोधी पक्षनेते बिलावल भुट्टो झरदारी यांनी आरोप केलाय की, इम्रान खान अविश्वास प्रस्तावावर मतदानास उशीर करून घटनात्मक संकट निर्माण करण्याचा आणि देशाच्या राजकीय कारभारात लष्करी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)