You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशियाच्या हल्ल्यातून वाचलेल्या युक्रेनी निर्वासितांसमोर सेक्स ट्रेडची भीती
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला आता पाच आठवडे पूर्ण होतील. आता या देशात राहणं किती कठीण असेल याची क्षणभरासाठी कल्पना करा. बॉम्बहल्ले, रक्तपात, तणाव. मुलांसाठी शाळा नाहीत, वृद्धांसाठी आरोग्य सेवा नाहीत. देशाच्या बहुतांश भागात लोकांना राहण्यासाठी छत ही उपलब्ध नाही.
अशा स्थितीत तुम्ही पण पळून जाण्याचा प्रयत्न कराल ? युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 10 करोड युक्रेनियन नागरिकांनी देश सोडलाय.
बहुतेक लोकांनी तर युक्रेनच्या अशा भागात आश्रय घेतलाय जिथं त्यांना सुरक्षित वाटतंय. मात्र साडेतीन लाखांहून जास्त लोक सीमा ओलांडून इतर देशांमध्ये गेलेत. त्यापैकी बहुतेक तरी महिला आणि मुलं आहेत. कारण युक्रेन सरकारने 60 वर्षाखालील पुरुषांना युद्धात सामील व्हायला सांगितलं होतं.
आपल्या घरादारासहित सर्वस्व गमावलेल्या बहुतेक निर्वासितांना आता पुढं काय करायचंय याची कल्पनाच नाही. अशा परिस्थितीत अनेकदा अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवायला भाग पडतं.
युद्धातला रक्तपात आता मागे पडलाय. पण हे लोक युक्रेनच्या बाहेरही पूर्णपणे सुरक्षित नाहीत हे सत्य आहे.
संयुक्त राष्ट्रांनी दिला इशारा
संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी ट्विटरवर इशारा दिला होता की "युक्रेनमध्ये सुरू असलेल हे युद्ध मानवी तस्करांसाठी शोकांतिका नाही. त्यांना ही एक संधी आहे. महिला आणि मुलं त्यांचे लक्ष्य आहेत."
युक्रेन आणि त्याच्या शेजारील देशांमध्ये तस्करी करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्या आहेत. युद्धाच्या नावाखाली ते आपला धंदा वाढवत आहेत.
लबलिनस्थित होमो फॅबर या मानवाधिकार संघटनेच्या समन्वयक कॅरोलिना वेर्झबिन्स्का यांनी माझ्याशी बोलताना सांगितलं की त्यांना सध्या मुलांची सर्वात जास्त काळजी आहे.
अनेक तरुण एकटेच युक्रेनमधून बाहेर जात असल्याचे त्यांनी सांगितलं. पोलंड आणि इतर देशांत जाणाऱ्या या तरुणांची नोंदणी योग्य प्रकारे किंवा पूर्णच झालेली नाही. त्यामुळे ही मुलं गायब आहेत. त्यांचा सध्याच्या ठावठिकाण्याबाबत काहीही माहिती नाही.
ही परिस्थिती पाहण्यासाठी मी आणि माझे सहकारी पोलंड आणि युक्रेनच्या सीमेवर जाऊन पोहोचलो.
आम्ही एका रेल्वे स्टेशनवर पोहोचलो जिथं बहुतेक निर्वासित येतात. या ठिकाणी सगळीकडे फक्त घाबरलेल्या महिला आणि लहान मुलं दिसत होती.
सुरक्षेचा प्रश्न
तिथे उपस्थित असणारे स्वयंसेवक अनेकांना गरम जेवण देत होते. हे सगळं पाहताना तरी परिपूर्ण दिसतं, नाही का? पण खरंच असं आहे का?
आम्हाला मार्गेरिटी हुसमानोव नावाची एक तरुणी भेटली. तिचं वय अंदाजे 20 ते 25 च्या दरम्यान असेल. ती दोन आठवड्यांपूर्वी कीव्हहून सीमेवर आली होती, जेणेकरून तिला इथून इतर देशांमध्ये जाता येईल. पण तिने आता इथंच राहण्याचा निर्णय घेतलाय कारण बाकीचे निर्वासित चुकीच्या ठिकाणी जाऊ नये असा तिचा हेतू होता.
मी तिला विचारलं की, तुला असुरक्षित वाटतंय का? त्यावर ती म्हणाली, "होय, म्हणूनच मला बाकीच्या निर्वासितांच्या सुरक्षिततेची काळजी वाटते."
ती सांगते, "भीषण अशा युद्धातून आपला जीव वाचवून महिला आणि मुलं इथं येतायत. त्यांना पोलिश किंवा इंग्रजी येत नाही. इथं काय चाललंय हे ही त्यांना माहीत नाही. ते प्रत्येकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतायत"
ती पुढे सांगते, "या स्टेशनवर कुणीही येतं. मी पहिल्या दिवशी लोकांना मदत करायला गेले तेव्हा मला इटलीतील तीन लोक दिसले. ते वेश्याव्यवसायासाठी विकल्या जाऊ शकतील अशा सुंदर महिलांच्या ते शोधात होते."
"मी लगेचच पोलिसांना बोलावलं आणि नंतर कळलं की मी बरोबर होते. ते दुःस्वप्न नव्हतं तर सत्य परिस्थिती होती."
युद्धग्रस्त युक्रेनमधून सुटका...
मार्गेरिटा सांगते की स्थानिक अधिकारी आता पूर्वीपेक्षा जास्त सतर्क झालेत. पोलिस या रेल्वे स्टेशनवर दररोज गस्त घालतात.
याआधी अनेक लोक विशेषत: पुरुष हातात फलक घेऊन लोकांना चांगल्या ठिकाणी नेण्यासाठी उभे असलेले दिसायचे, पण आता तेही गायब झालेत.
पण जसं की आमच्या सूत्रांनी सांगितल, असे वाईट हेतू असलेले अनेक लोक इथं स्वयंसेवक म्हणून येतात.
एलीना मॉस्किवीतीना जनजागृती व्हावी यासाठी फेसबुकवर लिहिते, ती आता सुरक्षितपणे डेन्मार्कला पोहोचली आहे. आम्ही स्काईपवर एलीनासोबत गप्पा मारल्या. तिचा अनुभव भयानक होता.
एलीना आणि तिची मुले युद्धग्रस्त युक्रेनमधून रोमानियाला पळून गेले. हे सर्वजण सीमा ओलांडण्यासाठी कोणाकडून तरी लिफ्ट मिळण्याची वाट पाहत होते.
एलीनाने सांगितलं की, निर्वासित केंद्रात स्वयंसेवकांच्या वेशात उपस्थित असलेल्या काही लोकांनी तिला विचारलं की ती कुठे राहते.
एलीना म्हणाली की त्याच दिवशी ते लोक पुन्हा आले आणि चिडलेल्या स्वरात सांगितलं की, स्वित्झर्लंड राहण्यासाठी एक चांगली जागा आहे. ते महिलांनी खचाखच भरलेल्या व्हॅनमध्ये लिफ्ट देत होते.
एलीनाने मला सांगितले की ते तिच्याकडे आणि तिच्या मुलीकडे "अश्लीलता" भरलेल्या नजरेने पाहत होते. हे सर्व पाहून एलीनाची मुलगी घाबरली.
या लोकांनी एलीनाला तिच्या मुलाबद्दलही विचारले. तिचा मुलगा त्यावेळी दुसऱ्या खोलीत होता. एलीना म्हणाली की त्यांनी माझ्या मुलाला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं.
यानंतर त्याने सांगितलं की, एलीनाला ज्या कारमधून स्वित्झर्लंडला नेण्यात येणार आहे त्या कारमध्ये तिच्याव्यतिरिक्त कोणीही नसेल. तेव्हा एलीनाने त्याच्याकडे ओळखपत्र मागितलं तेव्हा तो संतापला.
त्या पुरुषांना तिच्या मुलांपासून दूर ठेवण्यासाठी, एलीनाने त्यांना वचन दिलं की जेव्हा व्हॅनमध्ये इतर महिलाही असतील तेव्हा ती त्यांच्यासोबत जाईल. मात्र ते निघून जाताच एलीना तिथून आपल्या मुलांसह पळून गेली.
निर्वासितांचे संरक्षण
एल्जबिएटा जार्मुलस्का पोलंडमधील एक प्रसिद्ध महिला उद्योजिका आहे. जार्मुलस्का या वुमन टेक द व्हील इनिशिएटिव्हच्या संस्थापिका आहेत. युक्रेनियन निर्वासितांना सुरक्षा प्रदान करणे हे तिचे उद्दिष्ट असल्याचे ती सांगते.
जार्मुलस्का सांगते, "या स्त्रियानी आधीच त्रास सहन करत पायी तर कधी ड्रायव्हिग करत इतका लांब पल्ल्याचा प्रवास केला आहे. त्यांना इथं ही भीती आणि छळाचा सामना करावा लागतो? त्यांना हे कसं वाटत असेल याच वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत."
पोलंड-युक्रेन सीमेवर असणाऱ्या निर्वासितांना सुरक्षितपणे नेण्यासाठी जार्मुलस्काने आतापर्यंत 650 पोलिश महिलांची भरती केली आहे. या महिलांना ती 'अमेझिंग वुमन' म्हणते.
लोक एल्जबिएटाला एला देखील म्हणतात. मी एलासोबत एका निर्वासित छावणीत गेले, जिथे तिने प्रवेश करण्यापूर्वी अधिकाऱ्यांना तिचं ओळखपत्र आणि रहिवासी पुरावा दाखवला. त्यानंतर तिने लोकांना विचारलं की वॉरसॉला जाण्यासाठी कोणाला लिफ्टची गरज आहे का.
मानवी तस्करी आणि छळ
डोळ्याची पापणी लवते तोच गाडी भरली होती. यामध्ये नादिया नावाची शरणार्थी तिच्या तीन मुलांसह बसली होती.
गाडीत बसल्यानंतर एलाने या कुटुंबाला पाणी, चॉकलेट्स आणि प्रवासात औषधांची गरज आहे का, अशी विचारणा केली.
याच दरम्यान, नादियाने मला युक्रेनमधील खारकीव्ह मधून बाहेर पडतानाच्या तिच्या धोकादायक प्रवासाबद्दल सांगितले. आता पोलंडला पोहोचल्यानंतर नादियाला महिला ड्रायव्हरसोबत खूप रिलॅक्स वाटत आहे.
नादियाने युक्रेनियन रेडिओवर मानवी तस्करी आणि छळाविषयी ऐकलं होतं, पण तरीही ती पळून आली.
ती सांगते, आमच्या घरावर हल्ला झाला होता. तिथे त्यांना जास्त धोका होता.
एला निर्वासितांसाठी काम करते आहे. पण सीमेवरून सुखरूप बाहेर पडलं म्हणजे धोका टळला असं नाही.
मानवाधिकार संघटना म्हणतात...
आम्ही ज्यांच्याशी बोललो त्यांच्यापैकी बहुतेक लोक तरी आशावादी होते. युद्ध थांबल्यानंतर लवकरच ते त्यांच्या घरी परत जातील असं त्यांना वाटत होतं.
पण तोपर्यंत म्हणजे पुढचे काही दिवस, आठवडे किंवा महिने त्यांना झोपण्यासाठी, खाण्यासाठी, मुलांना शाळेत पाठवण्यासाठी आणि स्वत:साठी नोकरी शोधण्यासाठीही सुरक्षित आश्रयस्थान हवं आहे.
या गरजाचं निर्वासितांना असुरक्षित बनवतायतं
EU नेत्यांनी एकमताने युक्रेनियन लोकांसाठी रोजगार मेळावे, शाळा आणि आरोग्य सेवा उघडण्यास मान्यता दिली आहे. पण मानवाधिकार संघटना म्हणतात की निर्वासितांना नोंदणी करण्यास आणि त्यांचे हक्क घोषित करणारी मदत आवश्यक आहे.
पोलंड-युक्रेन सीमेवर भेटलेल्या एका स्वयंसेवकाने मला सांगितलं की जेव्हा तुम्ही थकलेले असता, आजूबाजूला मित्र नसतात आणि अशात तुम्हाला पैशांची गरज असते तेव्हा तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल अशा गोष्टी करण्यास तुम्ही सहज तयार होता.
तपास प्रक्रिया
या महिला स्वयंसेविकेला लहान वयातच आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ढकललं. याच कारणामुळे ती आता युक्रेनमधील निर्वासितांना मदत करत आहे.
ती सांगते "मला त्यांचे रक्षण करायचं आहे. मला त्यांना सावध करायचं आहे." त्या महिलेने मला सांगितलं की तीच नाव छापू नका. आपल्या मुलांना आपल्या भूतकाळाविषयी कळावं अशी तिची इच्छा नव्हती.
युक्रेनमध्ये रशियाच्या कारवाईला आता पाच आठवडे उलटून गेलेत. पण संपूर्ण युरोपमध्ये युक्रेनियन लोकांना मदत करणाऱ्या संस्थांची तपासणी अद्यापही पूर्ण झालेली नाही.
मानवी अवयवांची तस्करी ही एकच गोष्ट नाही तर निर्वासितांचा वेगवेगळ्या लोकांकडून ही छळ सुरू आहे.
पोलंड, जर्मनी, यूके तसेच इतरत्रही लोकांनी निर्वासितांसाठी आपले दरवाजे उघडले आहेत. त्यापैकी बहुतेक लोक तरी हे चांगल्या हेतूने मदत करत आहेत. पण दुर्दैवाने सर्वांचा हेतू सारखाच नाही.
आम्ही एका युक्रेनियन महिलेची सोशल मीडियावर पोस्ट पाहिली जी आता जर्मनीला पोहोचली आहे. इथं ज्या व्यक्तीने तिच्यासाठी छताची व्यवस्था केली, तिची ओळखपत्र असलेली कागदपत्र गोळा केली त्या व्यक्तीने तिला त्याचं घर विनामूल्य साफ करायला सांगितलं. यानंतर त्या व्यक्तीने आक्षेपार्ह मागणी करण्यास सुरुवात केली. मात्र तिने या गोष्टींना नकार दिला तेव्हा या व्यक्तीने तिला घराबाहेर काढलं.
महिला आणि बालकांच्या शोषणाची प्रकरणे
वॉर्सामधील मानवी तस्करीच्या विरोधात काम करणाऱ्या एनजीओ ला स्ट्राडाच्या मुख्य कार्यकारी आईरीना डेव्हिड यांनी मला सांगितले की, अशा प्रकारच्या कथा सामान्य आहेत. युद्ध असो वा नसो, पण अशी प्रकरणे समोर येत राहतात. मात्र युक्रेनमधील वाढत्या संघर्षामुळे महिला आणि बालकांच्या शोषणाच्या घटनांमध्येही वाढ होणार आहे.
किशोरवयीन निर्वासित ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचं ती मानते. ती म्हणते, "आपण सर्व किशोरवयीन मुलांना ओळखतो. त्यांना असुरक्षित वाटतं. त्यांना स्वीकार आणि ओळख हवी आहे."
"आणि जर ते निर्वासित असतील आणि घरापासून आणि मित्रांपासून दूर असतील तर त्यांच शोषण करणं सोपे होत."
"या वयातील मुलींना त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या पुरुषांच लक्ष वेधून घेणे आवडतं. त्यांना त्यांच्या वयाच्या चांगले कपडे घालणाऱ्या आणि त्यांना पार्ट्यांमध्ये बोलवणाऱ्या इतर 'कुल' मुलींबद्दल जाणून घ्यायला आवडतं.
"हे सर्व अशा प्रकारे सुरू होत. विसरू नका. पुरुषचं फक्त तस्कर किंवा शोषण करणारे नसतात."
युद्धाच्या या काळात युक्रेनच्या महिलांना ऑनलाइन मदतीची ऑफर दिली जात आहे.
ओळख न सांगता, आईरीनाने आम्हाला ला स्ट्राडा येथे आलेल्या अनेक प्रकरणांबद्दल सांगितलं. यात युक्रेनियन मुलींना त्या कधी भेटल्या नव्हत्या अशा पुरुषांकडून मेक्सिको, तुर्की, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेची तिकीट ऑफर करण्यात आले.
ती सांगते, "माझे सहकारी 19 वर्षांच्या एका मुलीला मनवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या मुलीला एका पुरुषाच्या घरी राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीकडे जाऊ नये असं पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत."
"तिला माहित आहे की तो व्यक्ती तिच्या मैत्रिणीला मारहाण करतोय. पण तो माणूस तिला तिच्या मोबाईलवर कॉल करून आणि गोड बोलून तिला भुलवतोय."
"जर तिने जाण्याचा आग्रह धरलाचं तर आम्ही त्या मुलीला तिची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांना देण्याची विनंती करू. जर तिने तसं केलं नाही तर तिच्याकडे आमचा फोन नंबर आहे."
"मला आशा आहे की गरज पडली तर ती आम्हाला कॉल करेल."
युरोपातील सर्व देशांच्या सरकारांनी युक्रेनला पाठिंबा देऊ केलाय.
जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्या या जीवांचे सरकारांनी रक्षण करावे अशी मानवाधिकार संघटनांची इच्छा आहे. त्यांना संरक्षणाची गरज आहे.रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला आता पाच आठवडे पूर्ण होतील. आता या देशात राहणं किती कठीण असेल याची क्षणभरासाठी कल्पना करा.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)