नूर सजात : देश सोडून पळण्याची वेळ आलेल्या मलेशियातील मुस्लीम ट्रान्सजेंडर मॉडेल

फोटो स्रोत, NUR SAJAT
- Author, जोनॉथन हॅड
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
सप्टेंबर महिन्यात थायलंडच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी बँकॉकमध्ये एक महिलेला अटक केली.
ताब्यात घेण्यात आलेल्या महिला 36 वर्षीय नूर सजात कमरुझ्झमा होत्या. त्या मलेशियातील प्रसिद्ध मॉडेल आणि कॉस्मॅटिक उद्योजिका आहेत.
मलेशियाच्या प्रशासनानं इस्लामचा अपमान केल्याच्या आरोपात लगेचच त्यांच्या प्रत्यर्पणाची मागणी केली.
नूर सजात यांच्या विरोधात जानेवारी महिन्यात हे आरोप लावण्यात आले होते. आरोप सिद्ध झाल्यास त्यांना तीन वर्षांपर्यंत शिक्षा होण्याची शक्यता होती.
2018 मध्ये एका खासगी धार्मिक कार्यक्रमात बाजू कुरूंग (मलेशियातील महिलाचा कुर्त्यासारखा पारंपारिक पोषाख, ज्याच्या बाह्या लांब असतात) हा पोशाख त्यांनी परिधान केला होता, तोच नूर यांचा गुन्हा होता.
नूर सजात एक ट्रान्सजेंडर महिला आहेत. त्यामुळं त्यांना निर्वासितांचा दर्जा देण्यात आला. तसंच थायलंडनं त्यांना ऑस्ट्रेलियात शरण मागण्याची परवानगी दिली.
तर, मलेशियातील अधिकारी त्यांना एक पुरुष मानतात. त्यामुळं इस्लामी कायद्यानुसार त्या महिलांचे कपडे परिधान करू शकत नाहीत.
सिडनीहून बीबीसीबरोबर बोलताना नूर यांनी त्यांच्याकडे पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता असं म्हटलं. नूर यांच्या विरोधात सेलेनगोर प्रांताच्या धार्मिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसंच त्यांच्यावर आरोप निश्चित केले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, असंही नूर म्हणाल्या.
"माझ्याबरोबर गैरवर्तन होत होतं, त्यामुळं मला पळून जावं लागलं. मला मारहाण केली बेड्या घालण्यात आल्या. माझ्या आई वडिलांसमोर हे सर्वकाही घडलं. मला अत्यंत वाईट वाटलं. मी त्यांना सहकार्य करत होते, तरीही माझ्याबरोबर असं वर्तन करण्यात आलं," असं त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, NUR SAJAT
"कदाचित ते माझ्याकडे एक ट्रान्स महिला म्हणून पाहत होते, त्यामुळं असं झालं. मला अटकेत ठेवण्यात आलं, मारहाण झाली याचा त्यांना काही फरक पडला नाही. माझ्या सारख्या ट्रान्स महिलांनाही भावना असतात. आम्हालाही इतर लोकांप्रमाणे जीवन जगायचं आहे. आम्हालाही सामान्य जीवन जगण्याचा अधिकार आहे," असं त्या म्हणाल्या.
नूर सजात या यशस्वी उद्योजिका आहेत. त्यांनी स्वतः त्याचं करिअर उभं केलं आहे. सात वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःला सोशल मीडियावर प्रमोट करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी त्यांची सौंदर्य प्रसाधनं तयार केली. त्यानंतर त्यांच्या ब्रँडचं नाव होऊ लागलं.
सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. तसंच मलेशियामध्ये त्यांना सेलिब्रिटी म्हणून ओळखलं जातं. त्या प्रसिद्ध झाल्या त्यावेळी त्यांच्या लैंगिक ओळखीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले.
पण, त्यांनी काहीही लपवलेलं नव्हतं. 2013 मध्ये त्यांनी थायलंडमध्ये एका ट्रान्सजेंडर स्पर्धेत सहभाग घेतला होता. तसंच डान्ससाठी बक्षीसही जिंकलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
पण, त्या खासगी जीवनात इस्लाम धर्माचं पालन करतात. अनेकदा त्यांनी हिजाबसह फोटोदेखील पोस्ट केले आहेत. त्यावरच मलेशियातील लोकांना आक्षेप आहे.
पण त्यांचा जन्म पुरुष आणि महिला दोघांच्या अवयवासह झाला होता असं त्यांनी प्रश्नांची उत्तर देताना सांगितलं होतं. या स्थितीला इंटरसेक्स म्हणतात आणि इस्लाम धर्म हा लिंग परिवर्तन करणाऱ्यांच्या तुलनेट इंटरसेक्स लोकांबाबत बराच सहिष्णू आहे.
2017 मध्ये नूर सजात यांनी त्या आता पूर्णपणे महिला बनल्याचं जाहीर केलं होतं. त्याचा पुरावा म्हणून त्यांनी डॉक्टरांचं प्रमाणपत्रंही सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं.
त्यानंतर प्रशासनानं तपास सुरू केला. मलेशियामध्ये इस्लाम विकासचा विभाग असलेल्या जाकिमनं त्यांना इंटरसेक्स जन्म झाला होता, याचे पुरावे द्यावे लागतील असं म्हटलं. विभागानं नूर सजात यांना त्यांची लैंगिक ओळख मिळवून देण्यासाठी मदत देऊ केली होती.
मात्र, गेल्या वर्षी जेव्हा नूर सजात कुटुंबासह मक्का येथे धार्मिक यात्रेला गेल्या होत्या, त्यावळी त्यांच्या महिलेच्या पोशाखातील फोटोंमुळं वाद निर्माण झाला.
त्यांनी लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या मुद्द्यावर माफीही मागितली, मात्र तो विषय तिथं संपला नाही. त्यांच्या विरोधात गुन्हेदारी तपास सुरू झाला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
"पवित्र धर्मिक स्थळी होते त्यावेळी मी स्वतःला एक प्रश्न विचारत होते. कदाचित मी अशी जन्मण्यामागे काहीतरी कारण असेल असं मला वाटत होतं. एक मुस्लीम आणि ट्रान्सजेंडर महिला म्हणून मलाही माझ्या पद्धतीनं धर्म मानण्याचा अधिकार आहे, असं मला वाटलं. त्यांच्याकडे मला शिक्षा करण्यासाठी काहीही कारण नाही. ते ईश्वराचं काम करत आहेत, असंही नाही," असं नूर सजात म्हणतात.
बीबीसीनं नूर सजात यांच्या प्रकरणी मलेशियाच्या धार्मिक प्रकरणांच्या विभागाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला काहीही प्रतिक्रिया मिळाली नाही.
"जर त्या परत आमच्याकडे आल्या आणि चूक मान्य केली तसंच त्यांच्या मूळ ओळख स्वीकारणार असतील तर आम्हाला काही अडचण नाही. आम्हाला त्यांना शिक्षा द्यायची नाही, तर त्यांना समजवायचं आहे," असं सप्टेंबर महिन्यात धार्मिक प्रकरणांचे मंत्री इदरीश अहमद म्हणाले होते.
आम्ही मलेशियातील ज्येष्ठ मुस्लीम सल्लागार आणि मुफ्ती मोहम्मद असरी जैनुल आबीदीन यांना मलेशियाचे मुस्लीम ट्रान्सजेंडर लोकांचा स्वीकार करतात का? असं विचारलं. त्यावर त्यानी सजात यांचं प्रकरणं त्यांच्यासाठी अनोखं प्रकरण असल्याचं म्हटलं.
"सजात यांनी अनेक अशी कृत्यं केली, ज्यामुळं धार्मिक अधिकाऱ्यांना भूमिका घ्यावी लागली. इस्लाम साधारणपणे लोकांच्या खासगी जीवनात हस्तक्षेप करत नाही. हा अल्लाह आणि तुमच्यामधला मुद्दा आहे. पण आम्ही हा गुन्हा कधीही मान्य करणार नाही. केवळ तुम्हाला महिला असल्याची भावना निर्माण होते म्हणून तुम्हाला महिलांच्या टॉयलेटमध्ये जायची इच्छा असेल, तर तुम्ही तसं करू शकत नाहीत," असं ते म्हणाले.
मलेशियामध्ये दुहेरी कायदेव्यवस्था आहे. याठिकाणच्या तेरा प्रांत आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये कौटुंबिक आणि नैतिक मुद्द्यांसाठी इस्लामच्या शरिया कायद्याचा वापर होतो. त्यामुळं एलजीबीटीक्यू समुदायाला अडचणी येतात.
शरिया कायद्यामुळं सर्वच प्रांतांमध्ये ट्रान्सजेंडर समुदायाला लक्ष्य केलं जातं, असं ट्रान्सजेंडर कार्यकर्ता निशा अयूब म्हणाल्या. अयूब यांनाही एकदा महिलांचे कपडे परिधान केल्यामुळं तुरुंगात जावं लागलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
"शरिया कायद्यामुळं नेते आणि धार्मिक अधिकारी आमच्या समुदायाबाबत अनेक नकारात्मक वक्तव्ये करतात. त्यामुळं आमच्यासाठी असुरक्षित आणि आमच आत्मविश्वास कमी करणारं वातावरण तयार होतं," असंही अयूब म्हणाल्या.
पण अशी स्थिती आधीपासूनच होती, असं नाही.
एक काळ असा होता, जेव्हा मलेशिया ट्रान्सजेंडर समुदायाबाबत सहिष्णू होतं आणि आम्हाला स्वीकारलं जात होतं, असं नूर सजात प्रकरणात त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि महिला अधिकारांसाठी काम करणाऱ्या सिस्टर्स इन इस्लाम संघटनेचत्या संस्थापक रोझाना ईसा म्हणाल्या.
"असे लोक आमच्या कुटुबांमध्ये अगदी मोकळेपणे राहायचे. आमच्या समुदायात आणि सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे. पण गेल्या तीन दशकांपासून आम्ही इस्लामीकरणाचं धोरण अवलंबलं आहे. नवे कायदे आणले जा आहेत आणि इस्लामच्या अनेक व्याख्या समोर आणल्या जात आहेत. विविधतेला स्वीकारण्याबाबत मात्र ते संकुचित आहेत."
इस्लाम केवळ मलेशियाचा अधिकृत धर्म नाही, तर मलय लोकांची ओळख म्हणूनही याकडं पाहिलं जातं. मलय लोक हे मलेशियातील सर्वात मोठ्या वंशाच्या समुहातील आहेत.
निवडणुका जिंकण्यासाठी मलय भागांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल, हे राजकीय पक्षांना ठाऊक आहे. याठिकाणी साधारणपणे लोक पारंपरिक विचारसरणीचे आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी याठिकाणी कठोर इस्लामीक मुल्यांचं संरक्षण करण्याचं आश्वासन दिलं जातं.
मलेशियातील राजकारण सध्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. कोव्हिड-19 नंतर अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. त्यामुळं नूर सजातवरील कठोर कारवाई ही मूळ धार्मिक काळजीऐवजी कमकुवत सरकारचा मुस्लिमाना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे, असंच अनेकांना वाटतं.
पण असं असलं तरी ट्रान्सजेंडर लोकांच्या अधिकारांचं संरक्षण करणं हीदेखील सरकारची जबाबदारी आहे. मग याबाबत इस्लामची वेगवेगळी भूमिका असली तरी ईराण आणि पाकिस्तानसारख्या देशांनी यासाठी कायदेल बदलले आहेत, असं त्या सांगतात.
"आपले नेते, अल्पसंख्याकांना समाजाचा भाग समजले तर परिस्थिती बदलू शकते. प्रत्येक गोष्टीची सुरुवात कायद्यापासून होते आणि त्यात बदल करणं गरजेचं आहे. जोपर्यंत समुदायावर थेट हल्ला करणारे कायदे आहेत, तोपर्यंत स्थिती बदलणार नाही," असं त्या म्हणाल्या.
नूर सजात यांना त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलाची आणि मुलीची कमतरता जाणवते. मलेशियात त्याचं कुटुंब या मुलांचा सांभाळ करतं. पण ऑस्ट्रेलियात इतर ट्रान्सजेंडर लोकांबरोबर अनुभवांची देवाण घेवाण करण्याबाबत त्या उत्साही आहेत.
लोकांना सोशल मीडियाबाबतचे विचार आणखी प्रगल्भ करावे लागतील, असं रोझाना ईसा म्हणाल्या.
"आपण सजात यांच्यावर एवढे आरोप करत आहोत. पण त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणालाही नुकसान पोहोचवत नव्हत्या. मक्कामध्येही त्यांनी कुणाचं नुकसान केलं नाही. आपण इतरांवर लक्ष ठेवण्याऐवजी स्वतःवर नजर ठेवायला हवी."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























