'पिंगू' पेंग्विनची कमाल! 3000 किलोमीटर्सचा प्रवास करत अंटार्क्टिकाहून पोचला न्यूझीलंडला

फोटो स्रोत, HARRY SINGH
अंटार्क्टिकामधील नैसर्गिक अधिवासामध्ये आढळणारा दुर्मिळ पेंग्विन 3000 किलोमीटर दूर असलेल्या न्यूझीलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळला आहे.
हरवलेल्या आणि भेदरलेल्या नजरेनं किनाऱ्याकडं आणि समुद्राकडं पाहणारा हा अॅडले प्रजातीचा पेंग्विन न्यूझीलंडमध्ये आढळला. स्थानिकांनी त्याचं नाव पिंगु असं ठेवलं आहे.
सर्वात आधी हा पेंग्विन स्थानिक रहिवासी असलेले हॅरी सिंग यांना दिसला होता. पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ते एखादं खेळणं (सॉफ्ट टॉय) आहे, असं वाटल्याचं ते म्हणाले.
न्यूझीलंडच्या किनाऱ्यावर अॅडले प्रजातीचा पेंग्विन आढळण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे.
ख्राईस्टचर्च शहराच्या दक्षिणेला असलेल्या बर्डलिंग्स फ्लॅट बीचवर हॅरी सिंग आणि त्यांची पत्नी दिवसभराच्या कामानंतर थकवा घालवण्यासाठी फेरफटका मारत होते. त्यावेळी त्यांना हा पेंग्विन आढळला.
"सुरुवातीला मला वाटलं ते एखादं सॉफ्ट टॉय आहे. पण अचानक पेंग्विननं त्याचं तोंड हलवलं. त्यावेळी ते खेळणं नसून खराखुरा पेंग्विन असल्याचं माझ्या लक्षात आलं," असं सिंग यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
सिंग यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केलेल्या दृश्यांमध्ये एकटा पेंग्विन हरवलेल्या आणि भदरलेल्या नजरेनं पाहत असल्याचं दिसतंय.
"तो जवळपास तासभर हलला नाही आणि थकलेलाही जाणवत होता," असं सिंग म्हणाले.
पेंग्विन बराच वेळ पाण्यात शिरला नाही. त्यामुळं किनाऱ्यावर फिरणाऱ्या इतर प्राण्यांपासून त्याला धोका असल्यामुळे सिंग यांनी पेंग्विनची सुटका करण्यासाठी बचाव करणाऱ्यांना कॉल करायला सुरुवात केली.
"पिंगू एखाद्या कुत्र्या किंवा मांजरीचं भक्ष्य ठरु नये, असं आम्हाला वाटत होतं," असं ते म्हणाले.
अखेर त्यांनी थॉमस स्ट्रेक यांच्याशी संपर्क साधला. थॉमस हे जवळपास 10 वर्षांपासून न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावर पेंग्विनच्या पुनर्वसनासाठी काम करतात.
किनाऱ्यावर आढळेला हा पेंग्विन अॅडले प्रजातीचा असल्याचं पाहून स्ट्रेक यांना धक्का बसला. कारण पेंग्विनची ही प्रजाती केवळ अंटार्क्टिका पेनिनसुला इथेच आढळते. प्राण्यांच्या डॉक्टरांच्या मदतीनं त्याच सायंकाळी स्ट्रेक यांनी त्या पेंग्विनची सुटका केली.
कमी वजन आणि शरीरातील पाण्याची घट
पिंगुच्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यात त्याचं वजन थोडं कमी असल्याचं आढळून आलं तसंच त्याच्या शरीरातील पाण्याचं प्रमाणही कमी होतं. त्यानंतर त्याला नळीच्या माध्यमातून द्रव स्वरुपात अन्न देण्यात आलं.
कुत्रे नसलेल्या सुरक्षित समुद्रकिनाऱ्यावर या पेंग्विनला पूर्ण बरं झाल्यानंतर सोडण्यात येणार आहे.
न्यूझीलंडच्या किनाऱ्यावर अॅडले प्रजातीचा पेंग्विन आढळण्याची ही इतिहासातील तिसरीच घटना आहे. यापूर्वी 1962 आणि 1993 मध्ये याठिकाणी पेंग्विन आढळले होते.
न्यूझीलंडमध्ये अॅडले पेंग्विन आढळणं दुर्मिळ आहे. पण भविष्यात जर ते वारंवार आढळू लागले, तर ती चिंतेची बाब ठरू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
"जर याठिकाणी दरवर्षी अॅडले प्रजातीचे पेंग्विन आढळले, तर समुद्रामध्ये जाऊन अधिवासात काही बदल झाला आहे का याचा अभ्यास करावा लागेल," असं ओटागो विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक फिलिप सेडन यांनी द गार्डियनशी बोलताना म्हटलं.
"पेंग्विन कुठे जातात, ते काय करतात किंवा त्यांची संख्या नेमकी किती असू शकते याबाबत अधिक अभ्यासावरून माहिती मिळू शकेल. त्यांच्यामुळे सागरी भागातील नेमकी परिसंस्था आणि या परिसंस्थेची स्थिती नेमकी कशी आहे, याची माहिती मिळू शकेल."
रिपोर्टिंग - झुबैदा अब्दुल जलील, बीबीसी
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

























