कोरोना लस : 5-11 वयोगटातील मुलांना फायझरची लस देण्याची तयारी

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेतील सरकारच्या पॅनलनं फायझर/बायोटेकची लस 5 ते 11 वयोगटातील मुलांना दिली जावी, यासाठी शिफारस केली आहे.
अन्न आणि औषध व्यवस्थापन (FDA)च्या तज्ज्ञांनी मंगळवारी याची शिफारस केली. त्यामुळं आता काही आठवड्यात अमेरिकेत या लशीच्या मुलांसाठी वापराला परवानगी मिळू शकते.
ही लस संबंधित वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित असल्याचं चाचण्यांमधील माहितीवरून समोर आलं असल्याचं कंपनीनं सप्टेंबर महिन्यात म्हटलं होतं.
अमेरिकेत 12 वर्षांच्या पुढील वयोगटातील मुलांना यापूर्वीच लसीकरण केलं जात आहे.
या नव्या निर्णयामुळं अमेरिकेतील जवळपास 2 कोटी 80 लाख मुलांना फायदा होणार आहे.
अमेरिकेत यासंबंधी निर्णयासाठी FDA आणि सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC)ची मान्यता आवश्यक आहे. ही मान्यता 2 नोव्हेंबरला मिळण्याची शक्यता असून, त्याच्या दुसऱ्याच दिवशी या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
ही लस घेतल्यामुळं होणारे फायदे हे आरोग्यासंबंधीच्या इतर कोणत्याही धोक्यांपेक्षा अधिक असल्याचं FDA मधील तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
या वयोगटातील लस घेणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या अँटिबॉडी तयार झाल्याचं कंपनीनं नियंत्रकांना सादर केलेल्या चाचण्यांच्या अहवालात म्हटलं आहे. सप्टेंबर महिन्यात ही माहिती सादर करण्यात आली होती.
प्रौढांना दिल्या जाणाऱ्या लसीच्या डोसच्या तुलनेत या वयोगटातील मुलांना एक तृतीयांश डोस देण्यात आला.
मात्र, नियंत्रकांनी हृदयात जळजळ होण्याच्या दुष्परिणामाचाही अत्यंत काळजीपूर्वक विचार केला. फायझर आणि मॉडर्नाच्या लसींमधील हा एक दुर्मिळ दुष्परिणाम आहे.
अमेरिकेतील अधिकृतच आकड्यांचा विचार करता 5 ते 11 वयोगटातील 160 मुलांचा आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेतील एकूण मृतांचा आकडा हा 7 लाख 40 हजार एवढा आहे.
लाखो लोकांना यामुळं आजारांचा सामना करावा लागला. त्यापैकी हजारोंना रुग्णालयात दाखल व्हावं लागलं होतं. अमेरिकेत कोव्हिडशी संबंधित शरीरात जळजळ किंवा दाह निर्माण होणाऱ्या दुर्मिळ आजाराची सुमारे 5 हजार प्रकरणं पाहायला मिळाली. त्यात 46 लहान मुलांचा मृत्यू झाला.
मॉडर्नानं त्यांच्या चाचणीचा अहवालही लवकरच नियंत्रकांना सादर करणार असल्याचं सोमवारी सांगितलं. त्यांनी तयार केलेल्या लशीच्या चाचणीत 6 ते 11 वयोगटातील मुलांमध्ये अँटिबॉडी तयार होण्याची क्षमता वाढत असल्याचं म्हटलं आहे.
इंग्लंडमध्ये नुकतंच 12 ते 15 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. देशातील प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या वयोगटातील मुलांना लशीचा एक डोस देण्याची शिफारस केली आहे. इतर देशांचा विचार करता हा निर्णय वेगळा आहे.

विश्लेषण - मिशेल रॉबर्ट्स, आरोग्य संपादिका
अमेरिकाच नव्हे तर इतर देशांवरही मोठा परिणाम करणारा असा हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे.
या निर्णयाचं अनुकरण करण्याचा विचार करत असल्याचं इस्रायलसारख्या काही देशांनी आधीच कळवलं आहे.
अमेरिकेतील नियंत्रकांनी या लशीसंदर्भात काळजीपूर्वक अभ्यास केला असून, लहान वयातील मुलांना ही लस द्यायला हवी असं म्हटलं आहे.
बहुतांश लहान मुलांमध्ये कोरोना विषाणू आढळला तरी त्यांची गंभीर आजारी पडण्याची शक्यता अत्यंत कमी असते. पण लक्षणं नसली तरी त्यांना कोरोनाची लागण होऊ शकते आणि ते त्याचा संसर्ग पसरवू शकतात.
या लशीमुळं त्यांच्या मार्फत कोरोनाचा संसर्ग इतरांपर्यंत पोहोचवण्यापासून रोखता येऊ शकेल.
शिवाय काही लहान मुलंही कोरोनामुळं आजारी पडत आहेतच. त्यांनाही या लशीमुळं संरक्षण मिळू शकेल.
फायझरच्या या लशीचे नेमके कसे परिणाम समोर येतात आणि त्याचा या साथीवर कसा परिणाम होतो, हे लवकरच पाहायला मिळेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























