Post-partum psychosis: मी माझ्याच मुलीला मारेन अशी भीती मला का वाटत होती?

पोस्ट-पार्टम डिप्रेशन

फोटो स्रोत, SALLY WILSON

फोटो कॅप्शन, सॅली विल्सन यांचे कुटुंब
Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

आई होणं सुखदायक मानलं जात असलं तरी अनेकदा हा अनुभव आईसाठी कष्टप्रदही असतो. काही महिलांसाठी तर तो सगळं भावविश्व उद्ध्वस्त करुन टाकणारा असतो.

साधारणतः 500 आयांपैकी एकीला पोस्ट पार्टम सायकोसिस म्हणजेच प्रसुतीपश्चात मनोविकाराला सामोरे जावे लागते.

सॅली विल्सन या त्यापैकीच एक होत्या. आपला अनुभव त्यांनी बीबीसीला सांगितला.

वर दिसत असलेला फोटो मी, माझा नवरा जेमी, आमची दोन वर्षांची मुलगी एला यांचा आहे. आम्ही फ्रान्सला गेलो होतो तेव्हा हा फोटो काढला होता.

हा फोटो पाहिला की इतर लोकांच्या फॅमिली फोटासारखा दिसत असला तरी तशी परिस्थिती नव्हती.

ही गोष्ट एखाद्या दुःखद स्वप्नासारखी होती. उद्ध्व्स्त करणारी होती. हा अनुभव इतका वेदनादायी होता की वाटायचं उठावं आणि आमच्या घराजवळ असलेल्या समुद्रात चालत आत आत जावं असं वाटायचं.

एलाला जन्म देण्याआधी पोस्ट पार्टम सायकोसीस सारखी काही स्थिती असते हेच मला माहिती नव्हतं.

दोन वर्षांनी माझी स्थिती थोडीशी सुधारली. हा प्रवास सोपा नव्हता.

सॅली विल्सन यांचा विवाह

फोटो स्रोत, SALLY WILSON

फोटो कॅप्शन, सॅली विल्सन यांचा विवाह

2013मध्ये जेमी आणि माझा विवाह झाला. आमच्या नियोजनाप्रमाणं आमचं कुटुंब तयार व्हायला सुरुवात झाली. माझा गरोदरपणाचा काळ चांगला होता.

प्रसुतीच्या आधी एक आठवडाभर माझ्यामध्ये प्री-एक्लेम्पसिया (गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात होणार आजार) ची लक्षणं दिसू लागली. जर उपचार झाले नाहीत तर ते धोकादायक ठरलं असतं.

मला प्रसुतीवेदना सुरू झाल्या. पण काही तासांनंतर माझी तब्येत बिघडत गेली. मी पार गोंधळून गेले. मला काळवेळाचं काहीच भान राहिलं नाही. मला झोपता येत नव्हतं आणि ताप आल्यासारखं वाटू लागलं.

प्रसुतीसाठी मला हार्मोन्सची औषधं देण्यात आली, वेदना कमी करण्यासाठीही प्रयत्न सुरू झाले. एलाच्या हृद्याचे ठोके मंदावत गेले आणि तिलाही त्रास होऊ लागला.

नुकतीच जन्मलेली एला

फोटो स्रोत, SALLY WILSON

फोटो कॅप्शन, नुकतीच जन्मलेली एला

2015च्या मार्चमध्ये एके सकाळी सिझेरियनद्वारे तिचा जन्म झाला.

माझी भूल उतरत होती परंतू काहीतरी विचित्र, भयानक घडत असल्यासारखं वाटलं.

माझी गोंधळलेली अवस्था वाढली होती. हे माझ्याबरोबर काय सुरू आहे? या खोलीत डॉक्टर्स का आहेत असे प्रश्न मी सतत विचारत होते.

मेंदूच्या तपासणीमध्ये मला स्ट्रोक आला असावा अशी शंका उपस्थित झाली मात्र रक्ताची चाचणी निगेटिव्ह येत होती. मला आठवतंय या सगळ्या अवस्थेचा कडेलोट झाला आणि मी बेडमध्येच कोसळले.

मला फार भीती वाटत होती म्हणून मी नर्सेसना रात्री माझ्याबरोबरच बसायला सांगितलं. इथल्या दाया माझ्याबद्दल बोलत असाव्यात अशा शंकेनं मला पछाडून टाकलं.

एक महिन्याची एला

फोटो स्रोत, SALLY WILSON

फोटो कॅप्शन, एक महिन्याची एला

आता मला संताप येऊ लागला होता. मी काहीतरी चुकीचं करतेय असं वाटून अस्वस्थ होऊ लागले.

काही दिवसांनी ही स्थिती आणखी बिघडली. शौचाला जायला मी उठले आणि कोसळले. मला उठताच येत नव्हतं.

मी मेलेय असं मला मनातून वाटत होतं. माझ्य़ासभोवती सगळे लोक असलेले मला दिसत होते. दाया, जेमी वगैरे. एका दाईनं एलाला बाजूला घेतल्याचं दिसलं, माझ्यामुळे एलाला दुखापत होईल अशा भीतीनं तिनं ते केलं असावं असं मला वाटतं.

यानंतर मी एका वेगळ्याच मानसिक अवस्थेत गेले. माझं असं वास्तव बदलून गेलं. मी मेलेय असं मला वाटलं आणि मी मृत्यूनंतरचं जीवन जगतेय असं वाटत होतं. मला भास व्हायला लागले होते.

तिथल्या बाळांच्या रडण्याचा आवाज कानाला दडे बसवणारा वाटत असे, एअर कंडिशनिंग युनिटचा आवाज नको करुन टाकायचा, कॅन्टिनमधल्या ट्रॉल्यांचा आवाज ट्रेनसारखा वाटे. दिव्यांची बटणं दाबणं स्फोटासारखी वाटे. सगळ्या भिंतीवर मला सावल्या दिसत असत.

सॅली आणि एला

फोटो स्रोत, SALLY WILSON

फोटो कॅप्शन, सॅली आणि एला

मी माझ्याच बाळाला मारेन, मी मेलेय आणि मृत्यूनंतरचं जीवन म्हणजे एकप्रकारच्या नरकात जगतेय अशी मला खात्री वाटत होती.

माझं जगणं एखाद्या सर्वात दुःखदायक, भयानक अशा दुःस्वप्नासारखं झालं होतं.

नर्सेस एलाला घेऊन यायच्या. ती सुखरुप आहे हे सांगण्यासाठी त्या तिला घेऊन यायच्या. पण मला वाटायचं ते वेगळंच बाळ आहे. ते माझं बाळ नाही. माझं बाळ मेलंय. मी तिला ठार मारलंय.

मग विचित्र संवाद सुरू व्हायचा

"जेमीला काय झालंय? तो का रडतोय?"

- "अगं सॅली, तो रडत नाहीये, तो बरा आहे."

"बाहेर ते पांढरे कोट घालून आलेले लोक कोण आहेत?"

-"सॅली, अगं तिथं कोणीही नाहीये..."

"नाही, तिथं माणसं आहेत. ते मला तुरुंगात न्यायला आलेत. बापरे... मी माझ्याच मुलीला कसं मारलं?"

असं सगळं भीतीदायक सुरू होतं.

मला आता सायकिअट्रिक वॉर्डमध्ये ठेवलेलं. मला पोस्ट पार्टमचा त्रास होत असल्याचं जेमीला सांगण्यात आलं होतं. मला मनोविकार बरा होण्यासाठी आणि अँन्झायटी कमी करण्यासाठी औषधं सुरू करण्यात आली होती.

एक महिन्याची एला

फोटो स्रोत, SALLY WILSON

फोटो कॅप्शन, एक महिन्याची एला

मी एका भयंकर चक्रव्युहात सापडलेय आणि माझ्या भोवतालचे लोक विचित्र व्यंगचित्राप्रमाणे आहेत असं मला वाटायचं.

माझ्याविरोधात कट सुरूये असं मला वाटायचं.

जेमी आणि माझे पालक एलाला घेऊन यायचे. मी तिला घ्यायचे पण ती माझीच आहे का हे समजायचं नाही. तिच्याशी कोणतं नातंच वाटायचं नाही.

Post-partum psychosis: मी माझ्याच मुलीला मारेन अशी भीती मला का वाटत होती?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

आम्ही रुग्णालयाच्या कॅफेत गेलो असताना एकदा तिचं डाय़पर बदलावं लागणार होतं. प्रसुती विभागाजवळच स्वच्छतागृह होतं. पण मला एकदम ताण आल्यासारखं वाटलं, त्या विभागाच्या जवळ कुठेही जाऊ नये असं वाटत होतं.

तिकडे गेले तर मी माझ्या बाळाला काहीतरी करेन असं वाटत होतं.

काही दिवसांनी मला थोडं बरं वाटत असल्याचं मी डॉक्टरांना सांगितलंय

माझी घरीच काळजी घ्यायला लोक येत असत मात्र स्थिती फारशी सुधारली नाही. मी एलाच्या मूलभूत गरजा भागवू शकत होते. तिला दूध पाजणं, कपडे बदलणं वगैरे मी करू शकत होते. मात्र भावनांचा कल्लोळ मात्र सुरू होताच. माझ्या बाळाला मी ठार मारलंय असं मला अजूनही वाटत होतं.

एला आणि सॅली

फोटो स्रोत, SALLY WILSON

फोटो कॅप्शन, एला आणि सॅली

माझी मानसिक स्थिती ढासळतच होती.

मला मानसिक धक्का बसला तेव्हा त्याच दिवशी मी एका पार्कमध्ये खून झाल्याचं वाचलं होतं. मी खून केल्याचं माझ्या डोक्यात सुरूच होतं.

पक्ष्यांचा आवाज मला फारच कर्कश वाटायचा. त्यातही कावळ्यांचा. मग कावळ्यांचं सामूहिक नाम 'मर्डर' असल्याचं मला समजलं.

मी घर सोडलं की विशिष्ट नंबरची बस जातेय असं मला वाटायचं. हा सगळा एक कट आहे आणि त्याचा काहीतरी अर्थ आहे असं मला वाटायचं.

मी घराजवळच्या समुद्रात आत चालत गेलेय आणि सगळं संपवलंय अशी एक प्रतिमा सतत डोळ्यांसमोर येत राही.

घरी आल्यावर 10 महिन्यांनंतर मात्र मी थकले. आता सहन होत नाहीये असं मी जेमीला सांगितलं.

पण मला या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा चंगच त्याने बांधला होता. त्यानं पोस्ट पार्टमवरचं सगळं उपलब्ध साहित्य वाचलं. मला इलेक्ट्रो-कनवल्सिव थेरपी (ईसीटी-याला भारतातले लोक फक्त शॉक ट्रिटमेंट म्हणतात) द्यायचं ठरवलं.

कार्डिफ विद्यापीठातले प्राध्यापक इयान जोन्स यांनाही मला ईसीटीचा फायदा होईल असं वाटलं.

ईसीटीचं नाव घेतलं की तुम्हाला ही काहीतरी विचित्र भयानक वाटू शकेल. एखाद्या खुर्चीत बसवलंय आणि शॉक दिलाय असं नाट्यमय चित्र डोळ्यासमोर येऊ शकतं. पण ते तसं नसतं. रुग्णाला भूल दिली जाते आणि तुमच्या मेंदूमधून विजेचा करंट पाठवला जातो.

अशी साधारणतः दहा सेशन्स झाल्यानंतर माझ्या विचारप्रक्रियेत बदल होऊ लागला. माझ्यावरचं काहीतरी भयंकर ओझं उचललं गेल्यासारखं वाटत होतं. माझा जीव वाचला होता.

सॅलीचं कुटुंब

फोटो स्रोत, SALLY WILSON

फोटो कॅप्शन, सॅलीचं कुटुंब

हळूहळू एला आणि माझ्यातलं नातं वाढत गेलं, घट्ट होत गेलं.

आपण फार काहीतरी गमावल्यासारखं वाटून दुःख व्हायचं. पण तिच्याकडे पाहिलं की आताची स्थिती किती चांगली हे याची जाणिव होते. आता आम्ही आनंदी आहोत, निरोगी आहोत.

मी तिच व्यक्ती आहे का हे मी सांगू शकत नाही. पण चित्र बदललंय हे नक्की.

Post-partum psychosis: मी माझ्याच मुलीला मारेन अशी भीती मला का वाटत होती?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

एकदा तुम्हाला पोस्ट पार्टम झाल्यावर पुढच्या गरोदरपणांमध्येही तो त्रास होण्याची शक्यता जास्त असते. पण पुन्हा गरोदर राहायचं की नाही हा तुमचा निर्णय़ आहे. पण जराजरी धोक्याची शक्यता असेल तर तो मार्ग वापरू नये असं आम्हाला वाटतं.

हे कधीच संपणार नाही असं वाटायचं. पण आता नव्यानं जगताना छान वाटतंय.

पोस्ट पार्टमबद्दल माहिती

पोस्ट पार्टमबद्दल कार्डिफ विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक इयान जोन्स यांनी ही माहिती दिली आहे.

पोस्ट पार्टम नक्की काय असतं?प्रसुतीनंतरच्या मानसिक समस्यांमध्ये पोस्ट पार्टम सर्वात तीव्र समजली जाते. पोस्ट पार्टमचा त्रास 500 ते 100 महिलांमागे एकीला होतो. यामध्ये मनोविकाराची लक्षणं दिसतात. खोट्या गोष्टी खऱ्या वाटायला लागतात. मूड वऱ खाली होऊ शकतो.

ती समस्या नक्की कधी येते?पोस्ट पार्टम प्रसुतीनंतर लगेच होऊ शकतो. काहीही कल्पना न देता अचानक होऊ शकतो. काही तासांतच रुग्णाची स्थिती बदलू शकते, त्यांना मानसिक आधाराची गरज पडू शकते. काही रुग्णांमध्ये अशी स्थिती सावकाश निर्माण होऊ शकते.

हा त्रास कोणाला होऊ शकतो?साधारणतः 50 टक्के महिलांचा मानसिक त्रासाचा हा पहिलाच अनुभव असतो तर 50 टक्के महिलांना त्यापूर्वी एखादी मानसिक आरोग्याची समस्या असू शकते. बायपोलर डिसॉर्डर असणाऱ्या महिलांना सर्वात जास्त म्हणजे 20 टक्के इतका धोका असतो. तसेच याआधी पोस्ट पार्टम झालेल्या महिलांना 50-60 टक्के इतका धोका असतो.

हा त्रास का होतो?याबद्दल अनेक गृहितकं आहेत. हार्मोन्समध्ये मोठा बदल, झोपेत अडथळा, प्रतिकारशक्तीमध्ये बदल होतो. जनुकीय घटकांचा त्याच्याशी काही संबंध आहे का यावर अभ्यास सुरू आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)