You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Climate Change : हवामानात प्रचंड बदल, उष्ण दिवसांची संख्या दुपटीने वाढली
- Author, बेकी डेल आणि नेसोस स्टायलिआनो
- Role, डेटा पत्रकार
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
गेल्या काही वर्षांमध्ये उष्ण दिवसांची संख्या दुपटीने वाढली असून ही आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करताना दिसत आहे.
1980 पासून तापमान 50 अंशांच्या वर गेलं आहे आणि अशा दिवसांची संख्या दुपटीने वाढली आहे. बीबीसीच्या एका विश्लेषणातून हे स्पष्ट झालं आहे.
आधीच्या तुलनेत अनेक मोठ्या प्रदेशांमध्ये पाऱ्याने पन्नाशी गाठली आहे. हे वातावरण मानव प्रजातीचं आरोग्य आणि जगण्याला मूलभूत आव्हान देणारं ठरणार आहे.
1980 पासून प्रत्येक दशकात तापमान 50 झालेल्या दिवसांची संख्या वाढत चालली आहे. 1980 ते 2009 या कालखंडात दरवर्षी 14 दिवशी तापमानाने अर्धशतक गाठलेलं असतं.
2010 ते 2019 या कालखंडात अशा दिवसांची संख्या वाढून 26 पर्यंत पोहोचली आहे.
याच काळात 45 किंवा त्यापेक्षा जास्त तापमान असलेल्या दिवसांची संख्या दरवर्षाला दोन आठवड्यांवर जाऊन पोहोचली आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील पर्यावरणीय बदलासंदर्भात कार्यरत इन्स्टिट्यूटचे असोसिएट डिरेक्टर फ्रीडेरिके ओट्टो यांनी सांगितलं की, या तापमान वाढीसाठी जीवाश्म इंधनांचा वापर कारणीभूत आहे.
येणाऱ्या वर्षांमध्ये अधिक तापमानाचे दिवस वाढण्याचीच शक्यता आहे.
अधिक उष्ण वातावरण माणसाच्या आरोग्यासाठी आणि निसर्गासाठीही धोकादायक आहे. प्रचंड तापमान वाढीमुळे इमारती, रस्ते, ऊर्जाव्यवस्था यांनाही झळ बसू शकते. काही यंत्रणांच्या कामकाजात अडथळा निर्माण होऊ शकतो.
50 अंश तापमान प्रामुख्याने मध्यपूर्वेतील देशांमध्ये असतं.
यंदा उन्हाळ्यात इटलीत तापमान 48.8 सेल्सिअस एवढं होतं. कॅनडामध्ये 49.6 तापमान नोंदलं गेलं. जीवाश्म इंधनांचा वापर थांबला नाही तर जगातल्या अन्य काही ठिकाणीही पारा पन्नाशीपल्याड जाऊ शकतो.
ऑक्सफर्ड स्कूल ऑफ जियोग्राफी अँड द एन्व्हायरमेंट संशोधक डॉ. सिहान ली यांच्या मते, आपल्याला वेगाने पावलं टाकावी लागतील. कार्बन उत्सर्जनात जेवढी घट करू शकू तेवढी आपली परिस्थिती सुधारू शकते.
ते पुढे सांगतात, उत्सर्जन सुरूच राहिलं आणि आवश्यक उपाययोजना केली गेली नाही तर अधिक तापमान असणाऱ्या दिवसांची संख्या वाढून भागणार नाही, त्यातून बाहेर पडणं आणखी अवघड असेल.
बीबीसीच्या विश्लेषणानुसार, 1980 ते 2009 या कालखंडातील सरासरी तापमानाच्या तुलनेत सध्याच्या दशकाचं तापमान 0.5 अंशांनी वाढलेलंच आहे.
तापमानात झालेली वाढ जगात सगळीकडे सारख्या प्रमाणात नाही. पूर्व युरोप, दक्षिण आफ्रिका, ब्राझील या ठिकाणी एक अंशाने तापमानात वाढ झाली आहे. आर्क्टिक आणि मध्यपूर्वेत दोन अंशांनी तापमानात वाढ झाली आहे.
विविध देशांच्या प्रमुखांनी यासंदर्भात योग्य कार्यवाही करायला हवी यासाठी वैज्ञानिक आग्रही आहेत.
ग्लासगो इथे नोव्हेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रांची परिषद होत आहे. वाढणारं वैश्विक तापमान रोखण्यासाठी कार्बन उत्सर्जनाबाबत नवी धोरणं आखण्यासाठी विविध देशप्रमुखांना आवाहन करण्यात येणार आहे.
बीबीसीने लाइफ अट 50c नावाची डॉक्युमेंटरी मालिका तयार केली आहे. प्रचंड तापमानवाढीमुळे लोकांच्या दैनंदिन आयुष्यावर काय परिणाम होतो आहे याचा आढावा या माहितीपटातून घेण्यात आला आहे.
50पेक्षा कमी तापमान असलं तरी आपल्या आरोग्यासाठी ते अपायकारकच असतं. अमेरिकेतील रटगर्ज विद्यापीठाद्वारे प्रकाशित अध्ययनानुसार, ग्लोबल वॉर्मिंग याच पातळीवर सुरू राहिलं तर .. पर्यंत जगातील 1.2 अब्ज लोक उष्णतेच्या लाटेचा सामना करत असतील. आता जेवढ्या माणसांना याची झळ बसली आहे त्याच्या तुलनेत हे प्रमाण चौपट आहे.
आजूबाजूचं वातावरण बदलत चालल्याने माणसासमोरची आव्हानं बदलली आहेत. प्रचंड तापमानवाढीमुळे दुष्काळ तसंच जंगलांना आगी लागण्याची प्रकरणं वाढत आहेत. वाळवंटाचा भाग वाढण्याला अन्यही कारणं कारणीभूत असू शकतात पण हवामान बदल हे प्रमुख कारण आहे.
शेख काजमी मध्य इराकमध्ये कार्यरत आहेत. ते गव्हाची शेती करतात. त्यांच्या आसपासची शेती सुपीक होती. त्यावर त्यांची आणि शेजाऱ्यांची उपजीविका होत असे. मात्र हळूहळू ही जमीन रेताड आणि नापीक होत गेली.
ते सांगतात, "ही सगळी जमीन हिरवीगार होती. मात्र आता सगळी हिरवळ नाहीशी झाली आहे. आता हा भाग वाळवंटच झाला आहे.
"त्यांच्या परिसरातले लोक कामाच्या शोधात अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत.
"माझा भाऊ, मित्रपरिवार आणि शेजाऱ्यांना गमावलं. आमचं आयुष्य एकच होतं. आम्ही गप्पागोष्टी, मजामस्करी करत असू. ते सगळे हा भाग सोडून अन्यत्र गेले. मी एकटाच राहिलो."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)