व्हिलाज् लास इस्त्रेलास: या बर्फाळ गावात राहाण्यासाठी अपेंडिक्स काढावं लागतं..

फोटो स्रोत, Simón Vargas/Pablo Arias/Tres Tercios
- Author, रिचर्ड फिशर
- Role, बीबीसी फ्युचर
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
अंटार्क्टिकामध्ये एक वसाहत अशी आहे जिथे एक शाळा, एक पोस्ट ऑफिस आणि दाटीवाटीने काही घरं उभी आहेत.
शून्य अंश तापमानाखाली राहणाऱ्या इतर गावांसारखीच इथली स्थिती आहे, फक्त इथे एक गोष्ट वेगळी आहे: इथे येण्यापूर्वी संबंधित लोकांना एक शस्त्रक्रिया करणं अनिवार्य असतं.
तुम्हाला तुमच्या गावात अथवा शहरात राहण्यासाठी अपेंडिक्स काढावं लागेल, हा नियम चमत्कारिक वाटतो ना? पण व्हिलाज् लास इस्त्रेलास या गावात दीर्घ काळ राहणाऱ्या रहिवाशांना- अगदी लहान मुलांनासुद्धा- हा नियम पाळावाच लागतो.
हे गाव म्हणजे अंटार्क्टिकावरच्या अगदी मोजक्या वसाहतींपैकी एक आहे. इथे काही लोक आठवड्यांपुरते किंवा महिन्यांपुरते नव्हे, तर काही वर्षांसाठी राहतात.
इथे दीर्घ काळासाठी राहणाऱ्या तुरळक लोकांनी अपेंडिक्स काढलेला असणं ही अनिवार्य अट आहे. इथून बऱ्यापैकी मोठ्या रुग्णालयात जायचं म्हटलं तर, एक हजार किलोमीटरांचा प्रवास करावा लागतो.
किंग जॉर्ज बेटापलीकडे दक्षिण महासागराच्या पल्याड गेल्यावर रुग्णालय आहे. व्हिलाज् लास इस्त्रेलास इथल्या तळावर मोजकेच डॉक्टर आहेत, पण त्यांच्यातलं कोणी सर्जन नाही.

फोटो स्रोत, Simón Vargas/Pablo Arias/Tres Tercios
सुमारे शंभर लोकांच्या इथल्या वसाहतीमध्ये आळीपाळीने वैज्ञानिक येतात, तसंच चिलीच्या हवाई दलाचे व नौदलाचे कर्मचारीसुद्धा इथे राहतात. सैनिकी कारणाने दीर्घ काळ या वसाहतीत राहावं लागणारे लोक अनेकदा सहकुटुंब इथे येतात.
त्यामुळे इथे एक पोस्ट ऑफिस आहे, एक लहानशी शाळा आहे, एक बँक आहे आणि इतर प्राथमिक सोयीसुविधासुद्धा आहेत. इथे राहणाऱ्या लोकांचं जगणं कसं आहे? 'बीबीसी फ्यूचर'ने काही काळापूर्वी या ठिकाणी भेट देऊन या प्रश्नाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला.
इथे आगमन होताना स्वागत फलकापाशी जगभरातील विविध शहरं तिथून किती अंतरावर आहेत, याचा तपशील नोंदवणारे दिशादर्शक बाण लावलेले आहे.
मानवी सहजीवनापासून ही जागा किती दूर आहे, याचा अंदाज या फलकांवरून येतो. उदाहरणार्थ, बीजिंग इथून 17,501 किलोमीटर अंतरावर आहे.
तिथून जवळच विमान उतरण्यासाठीची एक खडबडीत धावपट्टी आहे- हाच इथे येण्या-जाण्याचा प्रमुख मार्ग. लॉकहीड सी-130 हर्क्युलस या प्रचंड मोठ्या सैनिकी वाहतुकीच्या विमानात बसल्यावर खाली चिलीच्या दक्षिणेकडे दूरवर पसरलेला समुद्र दिसतो. शेकडो मैल पसरलेल्या या गडद रंगाच्या, थंडगार महासागरात काही क्षणांमध्येच मृत्यू येऊ शकतो.

फोटो स्रोत, Simón Vargas/Pablo Arias/Tres Tercios
'बीबीसी फ्यूचर'ने जानेवारी 2018 मध्ये या भागाला भेट दिली. विमानाच्या दारातून उतरल्यानंतर चेहऱ्यावर थेट बर्फाचे छोटे तुकडे आदळत होते. अंटार्क्टिकात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये होणारा हा बर्फवर्षाव. जवळच प्राथमिक स्वरूपाचं बांधकाम असणाऱ्या इमारती दगडांना कवटाळून उभ्या आहेत, त्यांच्यामधून पाइप गेलेले आहेत.
काही ठिकाणी येणारी दुर्गंधी तीव्र स्वरूपाची आहे. बाहेर पडणारे वायू आणि रासायनिक संडास यांतून येणारी ही मिश्र दुर्गंधी आहे. इथलं बाह्य जगणं असं औद्योगिक धाटणीचं आहे.
पण इमारतींमध्ये मात्र स्नेहशील व स्वागतशील वातावरण दिसतं. भिंतींवर आधीच्या मोहिमांची व भेट देऊन गेलेल्या लोकांची स्मरणचित्रं व छायाचित्रं लावलेली आहेत. स्टीफन हॉकिंग यांनी इथे भेट दिली, त्याची खूण म्हणून एक स्मृतिशिलाही दिसते.
इथलं वार्षिक सरासरी तापमान उणे 2.3 अंश सेल्सियस इतकं असतं. अंटार्क्टिकातील मुख्य भूमीपेक्षा हे तापमान काहीसं उबदारच म्हणावं लागेल!

फोटो स्रोत, Richard Fisher
इथल्या 'प्रेसिडन्ट एड्युअर्डो फ्रेई मॉन्टल्वा' या हवाई दलाच्या तळावर सर्जिओ क्युबिलोस (छायाचित्रात दिसणारे) हे चिलियन कमांडर आहेत.
क्युबिलोस दोनहून अधिक वर्षं त्यांच्या पत्नीसह व मुलासह इथे राहत आहेत. त्यांची पत्नी व मुलगा अधूनमधून चिलीला जातात, पण स्वतः क्युबिलोस मात्र पूर्ण वेळ इथेच असतात.
इथलं हवामान अर्थातच कसोटी पाहणारं असतं. "या वर्षीच्या हिवाळ्यामध्ये आम्हाला काही आठवडे घरातून बाहेर पडता आलं नाही," असं क्युबिलोस सांगतात. "उणे 47 अंश सेल्सियसपर्यंत तापमान होतं."
परंतु, त्यांच्या कुटुंबीयांनी या परिस्थितीशी जुळवून घेतलं आणि इथे राहण्याचा थरार त्यांना मजेशीरही वाटला, असं क्युबिलोस सांगतात. त्यांच्या मुलाला 'हॅपी फीट' हा चित्रपट आवडतो- या चित्रपटामध्ये अंटार्क्टिकामधील एका पेंग्विनची कहाणी सांगितली आहे.
क्युबिलोस यांना स्वतःला व्हिलाज् लास इस्त्रेलासमध्ये राहायला आवडतं का? "होय, पण मी कमांडर आहे म्हणून ते आवडतं!" असं ते हसत म्हणतात.
इथले काही जण त्यांच्या जोडीदारासोबत काम करतात. उदाहरणार्थ, या तळावर कार्यरत असणारं चिलियन डॉक्टर दाम्पत्य. इथे, किमान सैनिकी कर्मचाऱ्यांना तरी गरोदर राहण्यापासून परावृत्त केलं जातं, कारण इथे ही गोष्ट खूप जोखमीची ठरू शकते.

फोटो स्रोत, Sergio Cubillos)
मुलं इथल्या लहानशा शाळेत जातात, पण अनेकदा बर्फ त्यांची वाट अडवतो.

फोटो स्रोत, Sergio Cubillos
काळे खडक आणि पांढरा बर्फ यांनी भरून गेलेल्या या वातावरणात ही छोटीशी हिरवळ

फोटो स्रोत, Sergio Cubillos
जवळपास दुसऱ्या ग्रहावरचं जगणं अनुभवल्यासारखं वाटावं, अशी पृथ्वीवरची जागा म्हणजे व्हिला लास इस्त्रेलास.

फोटो स्रोत, Richard Fisher
माणसांनी पेंग्विनची शिकार कधीच केलेली नाही, त्यामुळे ती इथे निर्भीडपणे भटकत असतात.

फोटो स्रोत, Peter Wan
या त्रिनिटी चर्चमध्ये रशियन ऑर्थोडॉक्स पाद्री आहेत.

फोटो स्रोत, Sergio Cubillos
चिलियन हवाई दलाच्या चमूचं नेतृत्व करणारे लेफ्टनंट कर्नल क्युबिलोस (सर्वांत पुढे उभे).
इथल्या वैद्यकीय सुविधा प्राथमिक स्वरूपाच्या आहेत. कोणतीही गंभीर आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास इथून बाहेर पडावं लागतं.
इथे फिरण्यासाठी फोर-डब्ल्यूडी ट्रकसारखी दातेरी चाकांची वाहनं किंवा बोटी लागतात.

फोटो स्रोत, Yadvinder Malhi
विमानांकरता वापरल्या जाणाऱ्या सी-130 या शक्तिशाली प्रॉपेलरांमुळे दोन तासांहून अधिक वेळाचा प्रवास असेल तर इअरप्लग लावावे लागतत.
चिलीच्या मुख्य भूमीवरील धावपट्टीवर उन्हात उभी सी-130 हर्क्युलस विमानं.

फोटो स्रोत, Richard Fisher
चिलीच्या सर्वांत दक्षिणेकडील प्युन्टा अरेनास या शहरात विमान परत येतं, तेव्हा हिरवा रंग डोळ्यांत भरतो. बाकीच्या जगामध्ये फुलं, गवंत व झाडं अगदी नेहमी दृष्टीस पडतात- पण व्हिलाज् लास इस्त्रेलासमधील रहिवाशांसाठी काळ्या, राखाडी व पांढऱ्या रंगछटांमुळे इतर चैतन्यशील रंग विस्मृतीत जातात.
अंटार्क्टिकामधली परिस्थिती कष्टप्रद असली, तरी जगाच्या एकदम टोकावर मोजक्याच लोकांना अनुभवायला मिळणारं एकमेवाद्वितीय स्वरूपाचं जीवन हे लोक जगतात. पण अर्थात, त्यासाठी त्यांना अपेंडिक्स काढावा लागतो इतकंच.
(छायाचित्रं: पीटर वॅन, सर्जिओ क्यूबिलोस, रिचर्ड फिशर, यादविंदर मल्ही)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























