सेक्समधून होणाऱ्या संसर्गापासून गर्भनिरोधक गोळी रक्षण करते का? जाणून घ्या...

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

लैंगिक संबंध म्हणजेच सेक्समधून संसर्ग होण्याचं प्रमाण जगभरात सर्वत्र आहे. अशा संसर्गाबद्दल अनेक गैरसमज असतात. गैरसमज आणि अज्ञानामुळे अनेक लोक उपचारांपासून वंचित राहातात आणि संसर्गाचं प्रमाण वाढतं.

2017 साली इंग्लंडमध्ये 15 ते 24 वयोगटात क्लमिडिया (Chlamydia) आणि गनोरिया (gonorrhoea) सारख्या आजारांचे 1,44,000 रुग्ण आढळल्याचं इंग्लंडच्या पब्लिक हेल्थ विभागानं सांगितलं होतं. याचाच अर्थ जगभरात अशा रोगांचं प्रमाण भरपूर असल्याचं दिसून येतं.

"ज्यावेळेस आपल्याला सेक्समधून संसर्ग (Sexual Transmitted Infection) झाल्याचं समजलं तेव्हा माझा विश्वासच बसला नाही", असं 19 वर्षाच्या नोहा या रुग्णानं बीबीसीशी बोलताना सांगितलं.

"हा कोणा इतर लोकांना होणारा संसर्ग आहे असं मला वाटत होतं. याआधी असा अनुभव कधीच आला नव्हता. ते काय होतं हे मला माहितीच नव्हतं. मला त्यावर विश्वास ठेवायचा नव्हता", असं नोहाने सांगितलं.

सेक्समधून संसर्ग (STI) झाल्यावर काय करायचं?

यावर उत्तर देताना डॉ. पीटर ग्रीनहाऊस सांगतात, "अशा प्रकारचा कोणताही संसर्ग दिसल्यास व्यक्तीने सर्वांत आधी जवळच्या लैंगिक आरोग्य दवाखान्यामध्ये तपासणी करुन घेतली पाहिजे."

डॉक्टरांशी बोलताना...

आपल्या लैंगिक आरोग्याबद्दल लाज वाटल्यासारखं वाटणं समजू शकतं, पण चिंताग्रस्त होऊन जाऊ नये.

"सेक्स क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या लोकांनी स्वतःहून तो पेशा निवडलेला असतो आणि त्यांना यासंबंधी योग्य ती सहानुभूती, काळजी असते. ते यावरुन तुमच्याबद्दल कोणतंही मत तयार करत नाहीत," असं डॉ. ग्रीनहाऊस सांगतात..

पुढे काय करायचं?

यापुढे तुमच्या जोडीदाराला किंवा आधी ज्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवले आहेत अशा जोडीदारांशी संपर्क करुन या स्थितीची कल्पना द्यावी, असं डॉ. ग्रीनहाऊस सांगतात.

ही थोडी लाजीरवाणी स्थिती असू शकते. परंतु जोडीदारांना याची कल्पना दिल्यामुळं त्यांनाही उपचार घेणं सोपं जाईल आणि त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होणं थांबवता येऊ शकेल.

सेक्समधून झालेले बहुतांश संसर्ग अँटिबायोटिक गोळ्या किंवा क्रिमद्वारे बरे केले जाऊ शकतात. मात्र या गोळ्यांचा कोर्स पूर्ण होईपर्यंत नव्याने लैंगिक संबंध प्रस्थापित करू नयेत याची खबरदारी घेणं गरजेचं आहे.

ज्या लोकांना दीर्घकाळ राहाणारा संसर्ग झाला आहे त्यांनी लैंगिक संबंधांच्या नियमनासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आधी सेक्स केलेल्या जोडीदारांना कसे सांगाल?

सर्वप्रथम घाबरुन जाऊ नका. कितीही गांगरुन गेल्यासारखं वाटलं तरी डॉक्टर आपल्या मदतीसाठी आहेत हे लक्षात ठेवा.

आधी ज्यांच्याशी सेक्स केलं आहे अशा जोडीदारांना तुम्ही याची कल्पना देऊ शकता. काही लोक समोरासमोर भेटून याची कल्पना देणं निवडतात. हे कसं सांगायचं याबद्दल डॉक्टर तुम्हाला सल्ला देऊ शकतील.

जर अगदीच शक्य नसेल तर काही क्लिनिक्स तुमच्यातर्फे त्या व्यक्तीला सांगण्याची सोय करतात.

काही क्लिनिक्स अनामिक एसएमएस सर्विसद्वारे त्यांना तुमच्या जोडीदाराला लैंगिक संबंधातून संक्रमण झाले आहे असं कळवतात आणि पुढील मदतीसाठी मार्गदर्शनही करतात.

अशाप्रकारची सोय काही ऑनलाइन माध्यमांद्वारेही करता येते. त्यांना या संक्रमणाची माहिती देऊन तपासणी, उपचार घेण्याचं सुचवणे आणि इतरांमध्ये ते पसरू नये याची काळजी घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे.

सत्य की असत्य?

लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांबद्दल अनेक गैरसमज पसरलेले असतात. ऑनलाइन मिळणारी माहिती नेहमी योग्य असतेच असे नाही. काही गैरसमज पुढीलप्रमाणे-

टॉयलेट सीटमुळे क्लमिडिया (Chlamydia) होतो का?

याचं उत्तर नाही असं आहे. क्लमिडिया हा जीवाणू संसर्गामुळे होतो आणि हा संसर्ग असुरक्षित संभोग आणि sexual fluidsशी (म्हणजे योनी किंवा शिश्नातून बाहेर येणाऱ्या स्रावाशी) संबंध आल्यानंतर होतो.

गर्भनिरोधक गोळी घेतल्यानंतर माझं STI (लैंगिक संबंधातून होणारं संक्रमण) पासून रक्षण होईल का?

याचंही उत्तर नाही असं आहे. ही गोळी प्रजनन रोखण्यासाठी, गर्भप्रतिबंधक आहे. कधीकधी ती पाळीचं नियमन करण्यासाठी वापरली जाते. STI पासून रक्षण होण्यासाठी तुम्हाला काँडम्सचाही वापर करावा लागेल.

पुन्हा संसर्ग होऊ नये म्हणून काय करायचं?

कोणत्याही प्रकारचे नवे लैंगिक संबंध प्रस्थापित करताना नेहमी काँडम्सचा वापर करणं विसरू नये असा मुख्य सल्ला डॉ. ग्रीनहाऊस देतात.

दोन्ही जोडीदारांची तपासणी, चाचणी होऊन त्यांच्यामध्ये सर्व काही ठीक असल्याचं लक्षात आल्यानंतरच काँडम्सच्या ऐवजी दुसरी गर्भप्रतिबंधक साधनं वापरली जाऊ शकतात असं ते सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)