Tokyo Olympics : रशियावर ऑलिम्पिकमध्ये बंदी, तरीही 20 सुवर्ण पदकांसह 71 पदकं कशी कमावली?

टोकियो ऑलिम्पिक, रशिया

फोटो स्रोत, Reuters

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

यंदा ऑलिम्पिकमध्ये रशियाची टीम, झेंडा आणि राष्ट्रगीत यांच्यावर बंदी होती. मग रशियाला 20 सुवर्ण पदकांसह एकूण 71 पदकं मिळाली तरी कशी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

रशियाचे खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमधून 2004 नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक पदकं घेऊन मायदेशी परतत आहेत. मात्र, रशिया या देशाची टीम म्हणून हे खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले नव्हते.

रशिया ऑलिम्पिक समिती (ROC) च्या नावाने रशियन खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते.

डोपिंग स्कँडलमुळे रशियाच्या खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यास बंदी होती.

टोकियो ऑलिम्पिक, रशिया

ROC च्या खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये 20 सुवर्ण, 28 रौप्य आणि 23 कांस्य अशा एकूण 71 पदकांची कमाई केली. 2004 सालानंतर रशियनं खेळाडूंची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

ROC ने बीजिंग, लंडनमधील कामगिरीलाही टाकलं मागे

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदकं मिळवणाऱ्यांच्या यादीत ROC पाचव्या स्थानी आहे. 2008 साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिक आणि 2012 साली झालेल्या लंडन ऑलिम्पिकमधील कामगिरीलाही त्यांनी मागे टाकलंय. मात्र, तेव्हा रशिया स्वत:च्या झेंड्यासह ऑलिम्पिकच्या मैदानात होती.

यावर्षी रशियन खेळाडूंनी लंडनच्या तुलनेत 3, तर बीजिंगच्या तुलनेत 11 अधिक पदकं जिंकली.

सुवर्ण पदकांच्या बाबतीत रशियन खेळाडूंनी रिओ ऑलिम्पिकपेक्षा एक पदक अधिक मिळवलं आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये रशियन खेळाडू अशा अनेक स्पर्धांमध्ये अंतिम फेरीतही पोहोचले नाहीत. विशेष म्हणजे या स्पर्धांमध्ये वर्षानुवर्षे रशियन खेळाडूंचं वर्चस्व राहिलं आहे.

टोकियो ऑलिम्पिक, रशिया

फोटो स्रोत, Getty Images

ROC चे अध्यक्ष स्टेनिसलाफ पोज्दनयाकोफ यांनी रशियन खेळाडूंनी केलेल्या कामगिरीला यश मानलंय. मात्र, टीकाकारांच्या मते, ROC च्या खेळाडूंनी बंदीची मस्करी उडवलीय.

रशियन खेळाडूंना टोकियोत अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं. त्यांनी टोकियोत राहायला हवं की नको, इथवर चर्चा झाली.

मात्र, खेळाच्या मैदानात रशियन खेळाडू कायम नम्र राहिले.

300 हून अधिक खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी

रिओ ऑलिम्पिकमध्ये रशियाच्या ट्रँक फिल्ड खेळाडूंना सहभागी होऊ दिलं नव्हतं. त्यामुळेच रशियाच्या उंच उडीच्या खेळातील खेळाडू मारिया लेसतस्केनेला सहभागी करून घेतलं नाही. टोकियो ऑलिम्पिकदरम्यान त्या म्हणाल्या, रशियाबाबत लोकांची मतं मला समजतात.

सुवर्ण पदक जिंकल्यानंतर मारिया म्हणाल्या, "जे पाच वर्षांपूर्वी झालं, ते व्हायला नको होतं. यामुळे अनेकांचं करिअर उद्ध्वस्त झालं. त्यात माझं करिअरचाही समावेश होता. मात्र, त्यामुळे मला त्यातून बाहेर निघायला आणि पुन्हा जोमानं सुरुवात करायला प्रेरणा मिळाली. म्हणूनच आज सुवर्ण पदक माझ्या गळ्यात आहे."

टोकियो ऑलिम्पिक, रशिया

फोटो स्रोत, Reuters

"तुम्हाला पुढे जावंच लागेल, तुम्हाला ते स्वीकारावंच लागेल. तुम्हाला हेही समजून घ्यावं लागेल की, काही लोकांना वाटतं की तुम्ही मैदानात असायलाच नको. मात्र, मी त्यांना समजून घेते. मला हेही माहित आहे की, त्यांना तसं का वाटतंय. मात्र, मी स्वत:ला खेळात इतकं झोकून दिलं होतं की, हार मानूच शकत नव्हती."

रशियाच्या 300 हून अधिक खेळाडूंनी ROC च्या बॅनरखाली टोकियो ऑलिम्पिकमधील 30 हून अधिक खेळांमध्ये सहभाग घेतला होता.

ROC अंतर्गत टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले रशियन खेळाडू जेव्हा सुवर्ण पदक जिंकत होते, त्यावेळी ऑलिम्पिकचा लोगो असलेला पांढरा झेंडा ते उंचावत असत. तसंच, रशियाच्या राष्ट्रगीताऐवजी पियानोवर संगीत वाजवलं जाई.

मात्र, रशियन खेळाडूंना रशियन झेंड्याच्या लाल, पांढरा आणि निळ्या रंगाच्या ट्रॅकसूटमध्ये खेळण्यास दिलं गेलं.

2020 जेव्हा हिवाळी ऑलिम्पिकमध्ये रशियन खेळाडू खेळतील, तेव्हा पुन्हा एकदा ते ROC च्या झेंड्याखाली मैदानात उतरतील.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)