राज्यातील हवामानाबाबत अलर्ट जारी, जाणून घ्या हवामान विभागाने काय इशारा दिला

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

हवामान विभागाने राज्यातील हवामानाबाबत अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज (13 जून) दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे.

तर, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांतील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाची दाट शक्यता आहे.

तसेच, दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 12-13 जून दरम्यान, कोकणात, मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह ताशी 40-50 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, परक्षणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बुलढाणा, वर्धा, वाशिम या जिल्हांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

विदर्भात काय स्थिती?

विदर्भात काही ठिकाणी उष्णेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 14, 15, 16 जूनदरम्यान विदर्भातील अमरावती, वर्धा, अकोला, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

काही ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पाऊस

फोटो स्रोत, @RMC_Mumbai

दरम्यान, राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस बरसला असला, तरी मान्सूनची प्रगती मंदावली असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच आलेल्या एल-निनोच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मुंबई मान्सून अलर्ट

मुंबईत मान्सूनच्या आगमनाबरोबरच समुद्राच्या उंच लाटांचा धोकाही वाढतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) 2026 चे भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.

त्यात जून ते सप्टेंबर दरम्यान भरतीच्या कालावधीचा तपशील दिला आहे.

बीएमसीने नागरिकांना सावध राहण्याचे आणि भरतीच्या काळात समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहनही केले आहे.

बीएमसीने नागरिकांना सावध राहण्याचे आणि भरतीच्या काळात समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहनही केले आहे.

फोटो स्रोत, Getty Images

बीएमसीनुसार, जून ते सप्टेंबर दरम्यान 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या अनेक भरती अपेक्षित आहेत. या काळात समुद्राची पातळी सामान्यपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असेल. त्यामुळे किनारपट्टी आणि सखल भागांना धोका निर्माण होईल.

दिनदर्शिकेत एकूण 24 भरतीचे दिवस नमूद आहेत.

मोठ्या भरतीच्या दिवशी व भरती कालावधी दरम्यान नागरिकांनी समुद्र किनाऱ्याजवळ जावू नये. तसेच याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

एल निनोची सुरुवात झाल्याची अधिकृत घोषणा

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत असलेल्या पॅसिफिक महासागरातील एल निनोला सुरुवात झाल्याची अधिकृत घोषणा अमेरिकेच्या संशोधकांनी केली आहे. यामुळे हवामानात तीव्र बदल जाणवतील असा इशारा वैज्ञानिकांनी दिला असल्याचे वृत्त बीबीसी न्यूजने दिले आहे.

उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरात एल निनोची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यात समुद्रपृष्ठ तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे असे अमेरिकेच्या National Oceanic and Atmospheric Administration (NOAA) या संस्थेने म्हटले आहे.

विविध मॉडेल्सच्या साहाय्याने करण्यात आलेल्या अंदाजांनुसार असे सांगण्यात आले आहे की, हा एल निनो आणखी तीव्र होऊन 'सुपर एल निनो' ठरू शकतो. आतापर्यंत नोंद झालेल्या एल निनोंमध्ये हा एल निनो सर्वांत तीव्र असण्याचा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.

2027 हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष असण्याचा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. या तापमानवाढीला मानवीय कारणे जबाबदार आहेत आणि गेल्या अनेक वर्षांतील तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर 2027 मध्ये सर्वाधिक उष्ण वर्ष नोंदवले जाण्याचा अंदाज आहे.

याचा परिणाम हवामानाच्या संतुलनावर होण्याची शक्यता आहे. परिणामी, 2027 या वर्षात अन्नपुरवठा आणि अर्थव्यवस्था प्रभावित होण्याची शक्यता आहे.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

NOAA ची ही घोषणा अनपेक्षित नाही. कारण गेल्या वर्षाच्या अखेरीस एल निनोशी संबंधित थंड हवामान पद्धती म्हणजेच ला निना (La Nina) कमकुवत झाल्यानंतर हवामानतज्ज्ञांनी या उष्ण टप्प्याची अपेक्षा व्यक्त केली होती.

मध्य आणि उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागरातील समुद्रपृष्ठ तापमान आता सरासरीपेक्षा 0.5 अंश सेल्सियसने जास्त झाले आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ एल निनोची व्याख्या करण्यासाठी याच मर्यादेचा वापर करतात.

"गेल्या महिन्यात एल निनोची परिस्थिती विकसित झाली. मध्य ते पूर्व विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरात समुद्रपृष्ठ तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे," असे संस्थेने म्हटले आहे.

NOAA ने विषुववृत्तीय पॅसिफिकवरील वाऱ्यांच्या दिशेतही बदल होऊ लागल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. यावरून वातावरण आता उबदार झालेल्या महासागराला प्रतिसाद देत असल्याचे दिसते. म्हणजेच केवळ समुद्राचे तापमान वाढत नसून त्याचा परिणाम वातावरणावरही होऊ लागला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)