You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टोकियो ऑलिम्पिकची डायरी: टोकियो स्कायट्री आणि नव्या उंचीचं स्वप्न...
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी, टोकियोहून
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
आज मै उपर.. आसमां नीचे.. आत्ता या क्षणी हे गाणं मला आठवतंय. कारण मी टोकियो स्कायट्री टॉवरवर आहे. हे शहर केवढं अफाट पसरलं आहे... जिथे पाहावं तिथे फक्त शहरच दिसत राहतं.
दिवसापेक्षाही रात्री ते आणखी मोहात पाडतं. इथे काचेच्या भिंतीशेजारी बसून आजची डायरी लिहिते आहे. खाली टोकियोच्या रस्त्यांवरचे, घरांमधले आणि उंच इमारतींवरचे दिवे लुकलुकतायत.
मधून वाहणारी नदी आणि तिच्यावरचे ब्रिज, ट्रॅफिकविना मोकळ्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या वर मोकळ्या आकाशात चमकणारे तारे आणि क्षितिजावरून हळूच पुढे सरकणारे ढग.
पण भर शहरातही रात्र अशी निवांत असू शकते कधीकधी, याची जाणीव होते आहे. ऑलिम्पिकच्या सामन्यांसाठी दिवसभर एका ठिकाणाहून दुसरीकडे केलेली धावपळ विसरायला लावणारे हे क्षण आहेत.
तसा हा टॉवरही खास आहे. 634 मीटर म्हणजे 2080 फूट उंचीचा टोकियो स्कायट्री टॉवर जगात सर्वात उंच ब्रॉडकास्टिंग टॉवर आहे. खालून पाहताना याच्या उंचीचा अंदाज येत नाही.
पण लिफ्ट वर जाऊ लागली, तशी कानात दडे बसू लागले आणि आपण उंचावर जात असल्याची जाणीव झाली.
वर डेकवर पोहोचल्यावर जेव्हा काचेच्या दरवाजाआडून टोकियो शहराचं दृश्य दिसल्यावर मात्र तिथेच थांबून पाहात राहावंसं वाटलं.
जगातल्या सर्वांत उंच इमारतींचा विचार केला, तर दुबईतील बुर्ज खलिफापाठोपाठ या टॉवरचा नंबर लागतो. आयफेल टॉवरपेक्षा दुपटीनं उंच असलेला हा टॉवर गेल्या 9-10 वर्षांत टोकियोची नवी ओळख बनला आहे.
मुळात जपानसारख्या भूकंप्रवण देशात अशी एवढी मोठी इमारत उभी राहू शकते, हीच आश्चर्याची गोष्ट आहे. पण कदाचित हे फक्त जपानमध्येच शक्य आहे, असा विचारही मनात येतो.
विपरीत परिस्थितीतही माणूस काय उभं करू शकतो, याचं उदाहरण म्हणून अनेकजण या टॉवरकडे आज पाहतात, असं एका लेखात वाचलं होतं. इथे येण्याची इच्छा होती आणि आम्हाला इथून आमचे रिपोर्ट रेकॉर्ड करण्याची परवानगीही मिळाली.
आणि काय योगायोग आहे पाहा, ज्या दिवशी आम्ही इथे आलो, त्याच दिवशी भारताची ऑलिंपिकमधील कामगिरी आणखी उंचावर गेली आहे. पदकांच्या यादीत भर पडते आहे, नवी आशा जन्म घेते आहे.
अर्थातच हा अनुभव विसरता येणार नाही, असाच आहे. नवी ऊर्जा देऊन जाणारा आहे. ऑलिंपिकचे अखेरचे काही दिवस अशीच ऊर्जा वाहात राहू दे आणि नवी उंची गाठता येऊ दे. सायोनारा.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)