INDvsENG Test सीरिज : इंग्लंडला दोन धक्के; भारताची चांगली सुरुवात

भारत, इंग्लंड, टेस्ट सीरिज

फोटो स्रोत, PATRICK HAMILTON

फोटो कॅप्शन, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

भारताविरुद्धच्या नॉटिंगहॅमच्या ट्रेंटब्रिज मैदानावरील पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला मात्र त्यांनी दोन विकेट्स गमावल्या आहेत.

रॉरी बर्न्स पहिल्याच ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहची शिकार ठरला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. खेळपट्टीवर स्थिरावलेला झॅक क्राऊले मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. विकेटकीपर ऋषभ पंतने रिव्ह्यूसाठी कर्णधार कोहलीकडे आग्रह धरला. रिप्लेत क्राऊलेची बॅट बॉलला लागल्याचं स्पष्ट झालं. त्याने 27धावा केल्या.

भारतीय संघाने इशांत शर्मा आणि रवीचंद्रन अश्विन यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. रवींद्र जडेजा अष्टपैलू तर शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी अशी वेगवान गोलंदाजांची चौकडी असणार आहे.

शुभमन गिल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपदरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने तर मयांक अगरवालला सरावादरम्यान बॉल लागल्याने तो या टेस्टमध्ये खेळू शकणार नाहीये. यामुळे रोहित शर्माच्या बरोबरीने लोकेश राहुल सलामीला येणार आहे.

इशांत शर्मा पूर्ण फिट नसल्याचे संकेत मॅचच्या पूर्वसंध्येला मिळाले होते. त्यानुसार इशांत या सामन्यात खेळत नाहीये. त्याच्याऐवजी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजला अंतिम अकरात संधी मिळाली आहे. दोन फिरकीपटूंऐवजी भारताने चार गोलंदाजांना संधी द्यायचं ठरवल्याने शार्दूल ठाकूर ही टेस्ट खेळतो आहे.

इंग्लंडसाठी बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स आणि जोफ्रा आर्चर विविध कारणांमुळे खेळू शकणार नाहीत. जॉनी बेअरस्टो आणि सॅम करन यांचं संघात पुनरागमन झालं आहे.

पाच सामन्यांची ही मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाची असणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट टीम इंग्लंडमध्ये आली ती एका मोहिमेवर...आयसीसीने सुरू केलेली पहिली वहिली टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याची मोहीम. पण साऊदॅम्पटनच्या दमट खेळपट्टीवर फक्त तीन दिवस झालेल्या खेळात न्यूझीलंडने भारताचा आठ विकेट राखून पराभव केला आणि भारताची ही महत्त्वाकांक्षी मोहीम फसली.

टेस्ट चॅम्पियनशिपनंतर भारतीय क्रिकेट टीमसमोर काही जुनेच प्रश्न आवासून उभे राहिले. इंग्लंडमधल्या तेज गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची दाणादाण उडते का? आणि ही दाणादाण कधी थांबेल?

खेळात आकडेवारीला महत्त्व आहे. आणि मागच्या चौदा वर्षांत आपण इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकू शकलेलो नाही ही वस्तुस्थिती आहे. कॅप्टन बदलले, खेळाडू बदलले... आताही ही जुनी आकडेवारी कर्णधार विराट कोहलीला सतावते आहे. पण त्यातच टेस्ट मॅच सुरू होण्यापूर्वी घडलेल्या एका प्रसंगामुळे अंतिम अकरा खेळाडूंमध्ये कोणाला निवडायचं हा प्रश्नही त्याला सातवतोय.

रोहित शर्माच्या साथीला सलामीला कोण येणार?

टेस्ट मॅचपूर्वी सराव करत असताना सलामीवीर मयांक अगरवालच्या डोक्याला बॉल लागून तो जखमी झाला. त्याने हेलमेट घातलं होतं. पण, लेदर बॉल जोरदार येऊन आदळल्यामुळे दुखापत झालीच. आणि स्कॅन करावं लागलं. खबरदारी म्हणून ही पहिली टेस्ट तो खेळणार नाहीए. त्यामुळे विराट कोहलीसमोर नवाच प्रश्न आहे सलामीला कुणाला उभं करायचं?

विराटलाही हा प्रश्न सतावत असावा. किंवा त्याने घेतलेला निर्णय त्याला आधीच कुणाला कळवायचा नसावा. कारण, मॅच आधीच्या पत्रकार परिषदेत त्याने उत्तर देणंच टाळलं.

'अंतिम अकरा जणांचा संघ आम्ही बुधवारी मॅचच्या दिवशीच जाहीर करू. तेव्हा सलामीला कोण येणार हे तुम्हाला कळेलच.' एवढंच विराट कोहलीचं यावर उत्तर होतं.

रोहित शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

पण सलामीचा पर्याय के एल राहुलच असू शकतो. कारण, यापूर्वी अनेकदा त्याने ही भूमिका निभावलीय. पण स्वत: के एल राहुल सलामीला खेळायला उत्सुक नव्हता म्हणून आपण इतर पर्याय पाहिले. त्यात नौजवान शुभमन गिलला संधी मिळाली. आता टीमला गरज असताना के एल राहुलला पुन्हा सलामीला यायला सांगितलं जाऊ शकतं.

तर खेळपट्टीवरचं गवत पाहता रवींद्र जाडेजाच्या ऐवजी शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते. पत्रकार परिषदेत कॅप्टन कोहलीने तसं सूतोवाचही केलं आहे.

"शार्दुलचा खेळ बहुआयामी आहे. तो ऑलराऊंडर म्हणून नक्कीच पुढे येऊ शकतो. त्याचा टीमला नक्की उपयोग होईल. टीममध्ये समतोल साधला जाईल."

म्हणजे टेस्टमध्ये शार्दुलला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. पण त्याचबरोबर ही टेस्ट म्हणजे जुनेजाणते खेळाडू अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्यासाठी अस्तित्वाची कसोटी असेल.

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराची टीमला गरज नाही?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दोन्ही डावात चेतेश्वर पुजारा 8 आणि 15 धावा करून बाद झाला. तर अजिंक्य रहाणेनं पहिल्या इनिंगमध्ये सर्वाधिक 49 धावा केल्या. पण, टीमला गरज असताना दुसऱ्या इनिंगमध्ये तो 15 धावांवर बाद झाला.

संघातले सीनिअर खेळाडू असल्यामुळे दोघांकडूनही एक बाजू लावून धरणाऱ्या खेळीची अपेक्षा होती, मोठ्या इनिंगची अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. दुसरीकडे युवा रिषभ पंतने खेळात सकारात्मकता दाखवली. आणि त्याची आव्हान पेलण्याची वृत्ती मैदानावर दिसली.

विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे

फोटो स्रोत, Getty Images

या गोष्टीमुळे टेस्ट चॅम्पियनशिप गमावल्यावर विराट कोहली चांगलाच नाराज झाला होता. जिंकण्याचा सकारात्मक दृष्टिकोण ठेवणारे खेळाडू संघात हवेत अशी टिपण्णी त्याने सामन्यानंतर केली होती. त्याचा इशारा अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्याकडेच होता अशा बातम्या सगळीकडे पसरल्या. त्यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड या टेस्ट सीरिजला अजिंक्य आणि चेतेश्वर यांच्या अस्तित्वाची लढाई असंही म्हटलं जातंय.

दोघांनी मागची 4-5 वर्षं मधल्या फळीत भक्कम कामगिरी केलीय. चेतेश्वर पुजाराला तर राहुल द्रविड नंतर संघाची भिंत म्हटलं जातं.

अजिंक्य रहाणेनंही मेलबर्नमध्ये संघ 36 रन्समध्ये ऑलआऊट झाल्यावर शतकी खेळी करून भारताला टेस्ट चॅम्पियनशिपपर्यंत पोहोचवलं होतं. पण, 2018पासून 31 टेस्ट मॅचेसमध्ये त्याने 3 शतकांच्या सहाय्याने फक्त 1,821 धावा केल्यात. या सातत्यातल्या अभावामुळे अजिंक्यचं टीममधलं स्थान डळमळीत झालंय. पण, आतापर्यंत भारतीय टीमसाठी केलेली कामगिरी आणि विराटच्या अनुपस्थितीत कर्णधार म्हणूनही त्याची कामगिरी दुर्लक्ष करण्यासारखी नाही. आणि हीच बाजू ज्येष्ठ क्रिकेटर सुनील गावसकर यांनी अलीकडेच एका मुलाखतीत उचलून धरली.

'ज्या खेळाडूंकडे सोनं म्हणून पाहिलं गेलं पाहिजे त्यांना आपण संघावरचं ओझं म्हणून बघतोय. अजिंक्य आणि चेतेश्वर सारख्या खेळाडूंना दडपण विरहित खेळण्यासाठी मदत केली पाहिजे,' असं सुनील गावसकर यांनी इंडियाटुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

दोघांचा फॉर्म आणि टीमसाठी त्यांची उपयुक्तता यावर बोलणं सुरूच राहील. पण, टीकाकारांना उत्तर देण्याची योग्य वेळ आणि जागा ही क्रिकेट ग्राऊंड हेच आहे. दोघे अनुभवी फलंदाज हे जाणतात. त्यामुळे या टेस्ट सीरिजमध्ये त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)