You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टोकियो ऑलिंपिकची डायरी : माणसा- माणासांत भरून राहिलेली ऊर्जा
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
आज सकाळी सकाळी ऑलिंपिकच्या मिडिया प्रेस सेंटरमध्ये पोहोचले आणि नेहमीसारखी कॉफी कॉर्नरकडे धाव घेतली. गरम गरम ब्लॅक कॉफीसोबतच कामाची सुरुवात करायला मला आवडतं.
एरवी इथल्या कॉफी टेबलवर पाणी, चहा, कॉफीसोबतच चॉकलेट्स किंवा स्नॅक्स ठेवलेली असतात. आज तिथे छोटी छोटी ओरिगामी पाकिटं ठेवली होती आणि त्यात चॉकलेट्स रचून ठेवलेली होती. बदामाच्या आकाराचं डिझाईन असलेल्या त्या पाकिटांवर अगदी सुंदर अक्षरात छान संदेश लिहून ठेवले होते.
एका गुलाबी पाकिटानं माझं लक्ष वेधून घेतलं. त्यावर लिहिलेलं, हॅव अ ब्रेक. थोडी विश्रांती घ्या. पत्रकारांसाठी - आणि खरं तर सगळ्यांसाठीच हा संदेश महत्त्वाचा आहे नाही?
मी ते पाकिट उचलून पाहू लागले. तेव्हा प्रेस सेंटरमध्ये व्हॉलेंटियर म्हणून काम करणारी योशिको योशिदा तिथे आली. तिनं अगदी कौतुकानं काहीशा तुटक इंग्रजीत सांगितलं, की माझ्या मुलीनं बनवलं आहे ते, तुम्हा पत्रकारांसाठी.
हे असं अनोळखी लोकांसाठी कुणी काही केलं, की इतकं छान वाटतं ना..
योशिकानं सांगितलं, की तिच्या लहान मुलीला नान्नाला ऑलिंपिकचे सामने पाहायचे होते.
पण कोव्हिडमुळे प्रेक्षकांना मनाई आहेच पण आणीबाणी लागू असल्यानं लोकांना फार काही करताही येत नाही. तेव्हा प्रेस सेंटरमधल्यांसाठी तिनं अशी ओरिगामी पाकिटं बनवली.
तसं जपानी लोक त्यांच्या आदरातिथ्यासाठी - 'ओमोतेनाशी'साठी प्रसिद्ध आहेतच.
पण एका छोट्या मुलीला आपण काहीतरी करावं आणि आपल्या परीनं ऑलिंपिकचा भाग व्हावं असं वाटणं, ही गोष्ट मनाला स्पर्श करून गेली.
एरवी क्रीडा पत्रकार असण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला तुमचे आवडते खेळ पाहण्यासाठी पगार मिळतो, असं मी गंमतीनं म्हणते.
ते काही अंशी खरंही आहे पण फक्त सामना पाहिला आणि मजा लुटली असंही होत नाही.
खेळाचं विश्लेषण करणं, काय घडलं हे स्टेडियममध्ये प्रत्यक्ष नसलेल्या लोकांना सांगणं, खेळाडूंशी बोलणं, खेळाच्या जगातल्या चांगल्या वाईट गोष्टींवर प्रकाश टाकणं हे सगळं क्रीडा पत्रकारांनी करणं अपेक्षित असतं.
त्यासाठी अनेकदा एका स्टेडियममधून दुसरीकडे आणि तिथून तिसरीकडे अशी भटकंतीही करावी लागते. दिवसाचे दहा-बारा-चौदा तास कसे जातात तेही मग कळत नाही. यात दमछाक होत असली, तरी तेवढाच आनंदही मिळतो.
भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा..
अर्थात या ऑलिंपिकमध्ये आनंदाला वैतागाची किनारही आहे. म्हणजे कसं की एरवी अशा स्पर्धांमध्ये खेळाडूंशी बोलणं, रिपोर्टिंग करणं सोपं असतं, कोव्हिडनं सगळंच दुपटीनं कठीण करून टाकलं आहे.
त्यात योशिदासारखी माणसं भेटली, की सगळा वैताग विसरायला होतो.
टोकियोत आल्यापासून असे समृद्ध करणारे अनुभव सतत येत आहेत इथे. माणसांमधल्या या उर्जेचा मैदानावर आणि मैदानाबाहेर सतत अनुभव घेते आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)