कोरोना : कोव्हिडसाठीची लस गोळीसारखी घेता येईल का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मॅडी सॅवेज
- Role, बीबीसी प्रतिनिधी, स्टॉकहोम
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
कोव्हिडशी लढण्यासाठी सध्या जगभरात लस इंजेक्शनद्वारे दिली जातेय. पण कदाचित भविष्यात हीच लस इनहेलर (Inhaler) किंवा अगदी गोळीच्या रूपातही देता येईल, अशी शक्यता आहे.
दक्षिण स्वीडनमधल्या सगळ्यात मोठया सायन्स पार्क्सपैकी एक - मेडीकॉन व्हिलेज. या सायन्स पार्कच्या एका मोठ्या लॅबमध्ये काम करणाऱ्या केमिस्ट इनगॅमो अँडरसन यांच्याजवळ अगदी काडेपेटीइतका लहानसा एक प्लास्टिकचा इनहेलर आहे.
कोव्हिडविरोधातल्या लढाईमध्ये हे छोटंसं उपकरण मोठी भूमिका बजावेल अशी आशा अँडरसन यांच्या टीमला आहे. या इनहेलरच्या माध्यमातून कदाचित भविष्यात लस पावडर वा भुकटीसारखी घरोघर पोहोचवली जाऊ शकेल.
अस्थमाच्या रुग्णांसाठी इनहेलर तयार करणाऱ्या कंपनीचे सीईओ जोहान बावोर्ग सांगतात, "हे सहजपणे करता येऊ शकतं आणि अगदी स्वस्तही आहे. प्लास्टिकची एक लहानशी फित काढली की इनहेलर अॅक्टिव्ह होईल. मग तो तोंडाला लावून दीर्घ श्वास घेत तुम्ही लस घेऊ शकता. "
पावडर स्वरूपातली लस
स्टॉकहोममधल्या ISR नावाच्या इम्युनोलॉजी स्टार्ट अपने पावडर स्वरूपातली एक कोरडी लस तयार केली आहे. आयकोनॉवो नावाच्या या कंपनीने ISR सोबत भागीदारी केली आहे.
चाळीस अंश सेल्शियसपर्यंतचं तापमान सहन करू शकेल अशा कोव्हिड -19 व्हायरस प्रोटीनचा वापर या लशीसाठी करण्यात आलाय. फायझर, मॉडर्ना आणि अॅस्ट्राझेनकाच्या लशी RNA आणि DNA तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आतापर्यंत मान्यता दिलेल्या सगळ्या लशी या द्रवरूपात आहेत. या लशींना काचेच्या कुपींमध्ये घालून -70 अंश तापमानापर्यंत ठेवावं लागतं. कुपीमध्ये भरलेल्या या लशी डीप फ्रीजरमध्ये ठेवाव्या लागतात. याला 'कोल्डचेन' म्हणतात.

पण हीच लस जर पावडर किंवा भुकटीच्या स्वरूपात तयार केली तर याचं वितरण कोल्डचेन शिवाय नेहमीच्या तापमानावरही केलं जाऊ शकतं.
अशा स्वरूपातली लस ही आरोग्यसेवकांच्या मदतीशिवायही नेली जाऊ शकते असं 'IRS' च्या संस्थापक ओला विनक्विस्ट सांगतात.
लसीकरण मोहीमेला मदत
ओला विनक्विस्ट या स्वीडनच्या कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट या प्रमुख मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये इम्युनोलॉजीच्या प्राध्यापक आहेत.
सध्या त्यांची कंपनी कोव्हिड-19च्या बीटा (दक्षिण आफ्रिकन) आणि अल्फा (ब्रिटन) व्हेरियंटवर या लशीच्या चाचण्या घेत आहे.
यामुळे दक्षिण आफ्रिकेतल्या लसीकरण मोहीमेला फायदा होईल अशी अपेक्षा त्यांना आहे. दक्षिण आफ्रिकेत अद्याप कोणतीही स्थानिक लस तयार झालेली नाही.
दक्षिण आफ्रिकेत गरम वातावरण आहे आणि वीज पुरवठा मर्यादित आहे. यामुळेच सध्या मान्यता मिळालेल्या लशी वापरून लसीकरण करण्यात इथे भरपूर अडचणी आहेत.
ISR च्या या लशीच्या अजून विविध पातळीवरील चाचण्या व्हायच्या आहेत. सध्या उपलब्ध असणाऱ्या लशींच्या तुलनेत ही लस किती सुरक्षित आहे, हे देखील अजून माहित नाही.
आतापर्यंत उंदरांवरच या लशींच्या चाचण्या घेता आल्या आहेत. पण आयकोनॉवो आणि ISR ने पुढच्या दोन महिन्यांत माणसांवरच्या चाचण्या सुरु करण्यासाठी गरजेचा फंड मिळवलेला आहे.
पण या लशीबद्दल मेडिकल जगतात औत्सुक्य आहे. या लशीला कोल्डचेन लागणार नसल्याने ती साठवण आणि वितरीत करणं सोपं जाईल, परिणामी या लशीमुळे कोव्हिडच्या जागतिक साथीच्या विरोधातल्या लढयामध्ये मोठी मदत मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येतेय.
कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये ग्लोबल ट्रान्स्फॉर्मेशन हेल्थचे प्राध्यापक असणारे स्टेफान स्वार्टलिंग पीटरसन सांगतात, "ज्या भागांमध्ये पोहोचणं सध्या कठीण आहे, त्या भागातल्या लोकांच्या जीव याच्या मदतीने वाचवता येऊ शकतो."

जगभरातल्या कंपन्या पावडर व्हॅक्सिन म्हणजे भुकटीच्या वा पूड स्वरूपातल्या लशीबद्दल संशोधन करतायत. प्रा. स्वार्टलिंग यांनी आम्हाला तिथून दहा मिनिटांवरच असणाऱ्या आणखी एका स्टार्टअपबद्दल सांगितलं.
द्रवरूपातल्या लशीचा प्रभाव कमी न होऊ देता तिला 'एअर ड्राय' म्हणजे वाळवता कशा प्रकारे येऊ शकतं, यावर 'झायकम' कंपनी संशोधन करतेय.
संशोधन आणि विकासाची गरज
या लशीसाठी विकसनशील देशात काही 'Fill and Finish' म्हणजे लस कुपीमध्ये भरुन उत्पादन साखळी पूर्ण करणारी केंद्र उभारता येतील. म्हणजे एकप्रकारे देश या लशीचं उत्पादन शेवटच्या टप्प्यात आपल्या भूभागात पूर्ण करू शकतील.
लशीची ही भुकटी स्टराईल पाण्याच्या मिश्रणात घालून कुपी आणि इंजेक्शनच्या मदतीने याचं लसीकरण करता येईल.
या तंत्रामुळे नाकावाटे हुंगून किंवा गोळी (Tablet) गिळून लस घेण्याचे नवीन पर्याय खुले होतील असं कंपनीचे सीईओ गोरान कॉनरॅडसन सांगतात.
"यासाठी संशोधन आणि विकासाची गरज असेल. पण हे शक्य आहे हे तात्विक दृष्ट्या म्हटलं जाऊ शकतं."
तुलनेने चांगला पर्याय
जेननेन कंपनीने तयार केलेल्या कोव्हिड-19 विरोधातल्या लशीच्या वापराला गेल्या महिन्यात ब्रिटनमध्ये परवानगी देण्यात आली. या लशीचा एकच डोस घ्यावा लागतो.
ही कंपनी झायकेमसोबत एका पायलट प्रोजेक्टवर काम करतेय. यामध्ये 'एअर ड्राय' पर्याय किती परिणामकारक आहे, हे तपासलं जाणार आहे.
पण हा प्रोजेक्ट कोव्हिडशीच संबंधित आहे की याचा वापर इतरही रोगांसाठी होऊ शकतो, हे या औषध उत्पादक कंपनीने अद्याप सांगितलेलं नाही. पण हे संशोधन नवीन तंत्रज्ञानाबद्दल असून याचा वापर भविष्यात लशीची साठवण, वितरण आणि लसीकरण सोपं करण्यासाठी केला जाऊ शकतो, असं एका प्रवक्त्यांनी सांगितलं.
सुईची वा इंजेक्शनची भीती वाटत असल्याने लस घ्यायचं टाळणाऱ्यांसाठीही हे पावडर लशीचं तंत्र फायदेशीर ठरेल.
पावडर स्वरूपातली लस साठवण्यााठी फ्रीज लागणार नसल्याने विजेची बचत होईल, त्यामुळे द्रवरूपातल्या लशीपेक्षाही हा पर्याय चांगला ठरेल.

द्रवरूपातली लस काचेच्या कुपीत घालून डीप फ्रीजरमध्ये ठेवावी लागते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात विजेची गरज असते.
म्हणूनच पावडर रूपातली लस जगभरात पोहोचवता येऊ शकते.
उत्पादन क्षमता
कोनार्डसन म्हणतात, "जोपर्यंत सगळे सुरक्षित नाहीत, तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. जोपर्यंतच जगाच्या एखाद्या कोपऱ्यात कोरोना व्हायरस शिल्लक आहे तोपर्यंत नेमकं काय काय होईल हे सांगता येणार नाही."
लशींची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी काम करणाऱ्या 'कोअलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेअर्डनेस इनोव्हेशन' या संघटनेच्या प्रवक्त्या इनग्रिड क्रोमन सांगतात, "जागतिक साथ जागतिक स्तरावर संपुष्टात आणायची असेल तर आपल्याला जगातल्या प्रत्येक कोपऱ्यात राहणाऱ्या लोकसंख्येपर्यंत लस पोहोचवण्याची क्षमता विकसित करावी लागेल.
पावडरच्या स्वरूपातली लस सध्या निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असून यासाठीचं भरपूर काम करणं अजून शिल्लक असल्याचं त्या सांगतात.
त्या म्हणतात, "हा प्रयोग यशस्वी ठरला तर लस पोहोचवणं सोपं होईल, लस कमी फुकट जाईल आणि वितरण करणंही सोपं होईल. यामुळे लसीकरणासाठीचा खर्चही कमी होईल."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























