You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टोकियो ऑलिम्पिक: टेबल टेनिसमध्ये मनिका बत्राचा पराभव
टोकियो ऑलिंपिकमध्ये टेबल टेनिसच्या महिला एकेरी स्पर्धेत भारताच्या मनिका बत्राचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
तिसऱ्या फेरीतील सामन्यात मनिका बत्राला जागतिक क्रमवारीत 17 व्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रियाच्या सोफिया पोल्कानोवानं 4-0 नं पराभूत केलं. मनिका बत्रा एकही गेम जिंकू शकली नाही.
दरम्यान टेनिसच्या सामन्यात भारताच्या सुमित नांगललाही पराभव पत्कारावा लागला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात सुमितला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या डेनिल मेदवेदेवनं 6-2,6-1 असं सरळ सेटमध्ये पराभूत केलं.
भवानी देवी पराभूत
फेन्सिंग अर्थात तलवारबाजी खेळात भारताच्या भवानी देवीने ट्युनिशियाच्या नादिया अझिझीवर 15-3 असा दणदणीत विजय मिळवला. मात्र पुढच्या लढतीत तिला पराभवाला सामोरं जावं लागलं.
फ्रान्सचया मनोन ब्रुनेटनं भवानीवर 15-7 असा विजय मिळवला. ऑलिम्पिकमध्ये या खेळात भारताचं प्रतिनिधित्व करणारी भवानी पहिलीच खेळाडू आहे.
सुतिर्था मुखर्जी पराभूत
पोतुर्गालच्या यू फू हिने सुतिर्थावर सरळ गेम्समध्ये मात केली. सुतिर्थाने रविवारी झालेल्या लढतीत दमदार प्रदर्शन केलं होतं. मात्र आज तिला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. या पराभवासह सुतिर्थाचे स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
सात्विकसैराज-चिराग पराभूत
इंडोनेशियाच्या गिडन मार्कस फेरनाल्डी आणि सुकलमाजो केव्हिन संजया जोडीने सात्विकसैराज-चिराग शेट्टी जोडीवर 21-13, 21-12 असा विजय मिळवला. रविवारी सात्विकसैराज-चिराग जोडीने झुंजार खेळ करत दिमाखदार विजय मिळवला होता मात्र सोमवारी त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. चिरागच्या पायाला सामन्यादरम्यान दुखापत झाली. मात्र तरीही त्याने खेळत राहण्याचा निर्णय घेतला. सात्विकसैराज-चिराग जोडीची उद्याची मॅच ब्रिटनविरुद्ध होणार आहे.
कोरियाने उडवला धुव्वा
कोरियाच्या त्रिकुटाने उपांत्यपूर्व फेरीत भारतावर 6-0 असा विजय मिळवला. अतानू दास, प्रवीण जाधव आणि तरुणदीप राय या त्रिकुटाने कझाकिस्तानच्या संघावर 6-2 असा विजय मिळवत आश्वासक सुरुवात केली. मात्र बलाढ्या कोरियाच्या संघासमोर त्यांचं आव्हान संपुष्टात आलं.
नेमबाजीत पुन्हा निराशा
नेमबाजीत पुन्हा एकदा भारतीय खेळाडूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. स्कीट प्रकाराच्या पात्रता फेरीत अंगद वीर सिंग बाजवाला 18व्या तर मैराज अहमद खानला 25व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. हे दोघेही अंतिम फेरीसाठी पात्र होऊ शकले नाहीत.
रविवारी काय घडलं?
भारतीय हॉकी संघाला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर 7-1 असा दणदणीत विजय मिळवला.
बॉक्सिंगपटू मेरी कोमने रविवारी डोमिनिक रिपब्लिकची खेळाडू मॅग्वेलिना हर्नांडेज हिचा पराभव करत पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवला आहे.
38 वर्षीय मेरी कोमने आतापर्यंत सहावेळा विश्वविजेतेपद पटकावलं आहे. 2012 सालच्या लंडन ऑलिंपिकमध्ये मेरी कोमने पदकाची कमाई केली होती.
मनू भाकेर आणि यशस्विनी देसवाल या युवा नेमबाजांना निराशानजक निकालाला सामोरं जावं लागलं. 10 मीटर पिस्तूल प्रकाराच्या पात्रता फेरीत मनूला बाराव्या तर यशस्विनीला तेराव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
पिस्तुलातील तांत्रिक बिघाडाचा मनूला फटका बसला. मिश्र प्रकारात ती सौरभ चौधरीच्या बरोबरीने खेळायला उतरेल.
दिव्यंश पन्वर आणि दीपक कुमार या नेमबाजांना 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र होता आलं नाही. दिव्यंशला 32व्या तर दीपकला 26व्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने टोकियात विजयी सलामी दिली. सिंधूने इस्रायलच्या सेनिया पोलिकारापोव्हावर 21-7, 21-10 असा विजय मिळवला. पुढच्या फेरीत सिंधूची लढत हाँगकाँगच्या चेयुंग न्गान यीशी होणार आहे.
अर्जुन आणि अरविंद या जोडीने उपांत्य फेरी गाठली. रोइंग लाइटवेट डबल स्कल प्रकारात उपांत्य फेरी गाठणारी ही पहिली भारतीय जोडी आहे.
युक्रेनच्या लियूडम्याला किचेनोक आणि नाडिआ किचेनोक या बहिणींनी सानिया मिर्झा आणि अंकिता रैनावर 0-6, 7-6, 10-8 असा विजय मिळवला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)