आयसोलेशनमधील एकांतातही सर्जनशील राहण्यासाठी काय करावं?

एकटेपणा

फोटो स्रोत, Alamy

    • Author, अनिसा पुर्बसारी हॉर्टन
    • Role, बीबीसी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

काही लोकांना एकांतामध्ये सर्जनशील प्रकल्प मार्गी लावणं सोयीचं जातं, तर काहींना अशा वेळी स्फूर्तीचा अभाव जाणवतो.

मुक्त लेखक म्हणून काम करणाऱ्या कॅरोलिन टॉपरमान 2013 साली व्हँकूव्हरहून वॉर्साला स्थायिक झाल्या, तेव्हा त्यांची सर्जनशीलता फुलून आली. दुतर्फा कॅफे असणाऱ्या फरसबंदीच्या रस्त्यांवरून चालत जाताना त्यांना स्फूर्तीने उचंबळून येत होतं.

"ज्या लोकांना स्वतःबाहेर सर्जनशीलता सापडते, अशांपैकी मी एक आहे. मला आर्ट गॅलऱ्यांमध्ये जायला, पुस्तक वाचायला आणि लोकांकडे पाहत राहायला खरोखरच आवडतं," असं त्या सांगतात.

कोरोनाची जागतिक साथ सुरू झाली तोवर टॉपरमान पुन्हा कॅनडाला परतल्या होत्या. तिथे त्या टोरान्टोजवळच्या एका लहान शहरात स्थायिक झाल्या. बाहेरचा वावर जवळपास बंदच झाल्यावर टॉपरमान यांना पुढचे दोन महिने अक्षरशः रडत काढावे लागले. "बराच वेळ एकटं राहिल्यामुळे त्या विलगीकरणाचा मला बराच त्रास झाला." अनेकांप्रमाणे टॉपरमान यांचंही सर्व काम ऑनलाइन सुरू झालं आणि प्रत्यक्ष संवादाचा अभाव त्यांना जाणवायला लागला.

स्थावर मालमत्तेचा विकास कसा झाला, याचा लेखाजोखा मांडणारा एक लेख त्यांनी पूर्ण करत आणला होता. आधी त्या संबंधित मालमत्तेभोवती फेरफटका मारत आणि तिथल्या प्रत्यक्ष दृश्यांमधून स्फूर्ती घेत- पण आता लॉकडाऊनच्या काळात त्यांना असं काही करणं शक्य नव्हतं.

त्या एका लेखक-गटाच्या सहसंस्थापकही होत्या आणि ओन्टारिओमध्ये त्या कार्यशाळा घेत असत. पण गटाचं कामकाज ऑनलाइन होऊ लागल्यावर त्यांना हे काम करणं अधिक अवघड झालं.

"मला आसपास फेरफटका मारायला मिळाला, लोकांशी गप्पा मारायला मिळाल्या आणि सहजपणे कल्पनांची देवाणघेवाण करता आली की जास्त चांगल्या तऱ्हेने काम करता येतं," असं त्या सांगतात.

टॉपरमान यांच्यासारख्या अनेक लोकांच्या बाबतीत विलगीकरणातील एकांत व स्फूर्तीचा अभाव सर्जनशीलतेसाठी मारक ठरतो. पण इतर काहींच्या बाबतीत मात्र एकांतामुळे सर्जनशील विचाराला गती मिळते. लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यक्तींना सर्जनशीलतेसंबंधीचे पेच जाणवत होते, तर इतर अनेकांनी कधी नव्हे इतकं उत्पादक काम केल्याचंही दिसून आलं.

एकटेपणा

फोटो स्रोत, Alamy

लॉकडाऊन नक्की काय होतं ज्यामुळे काही लोकांची सर्जनशीलता ठप्प होते आणि इतर काहींची सर्जनशीलता उफाळून येते? आपल्या कामकाजावरचे निर्बंध अजूनही सुरूच आहेत, अशा वेळी विलगीकरणातील एकांतातही स्फूर्तीचे स्त्रोत कसे व कुठे शोधायचे आणि सर्जनशीलता परत कशी मिळवायची, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.

उत्तेजना व कंटाळा

आपल्याला सर्जनशीलतेची भुरळ पडते. या क्षेत्राचा खूप अभ्यास झालेला आहे, पण स्फूर्तीचा क्षण कोणत्या विचारप्रक्रियेतून उद्भवतो, याबद्दल वैज्ञानिक अजूनही संशोधन करत आहेत.

लॉस अँजेलीसमधले मनोवैज्ञानिक आणि 'वायर्ड टू क्रिएट : अनरॅव्हलिंग द मिस्ट्रीज् ऑफ द क्रिएटिव्ह माइंड' या पुस्तकाचे सहलेखक स्कॉट बॅरी कॉफमन यांनी म्हटल्यानुसार, सर्जनशीलता म्हणजे परस्परविरोधी वाटणाऱ्या गुणांचा व सवयींचा संयोग असू शकतो. उदाहरणार्थ, नवीन अनुभवांबाबत खुलं असणं आणि स्वतःच्या विचारांमध्ये रमण्याची क्षमता असणं, ही दोन सर्वसामान्य वैशिष्ट्यं महत्त्वाची असतात, असं ते म्हणतात.

सेंट्रल लँकशायर विद्यापीठातील मानसशास्त्राच्या ज्येष्ठ व्याख्यात्या आणि 'द सायन्स ऑफ बोअरडम: व्हाय बोअरडम इज गुड' या पुस्तकाच्या लेखिका सॅन्डी मान यांनी उत्तेजना व कंटाळा हे दोन परस्परविरोधी घटक सर्जनशीलतेसाठी आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.

कंटाळ्याला लोक कशा तऱ्हेने प्रतिसाद देतात यावरून सर्जनशीलतेच्या काळात त्यांची सर्जनशीलता जोपासली जाईल का हे ठरत असतं, असं त्या म्हणतात.

नवलाईमधून सर्जनशीलता मिळवणारे लोक विलगीकरणाच्या काळात इलेक्ट्रॉनिक उपकरणांकडे वळण्याची जास्त शक्यता असते, कारण तो उत्तेजनेचा एक प्रकार असतो. परिणामी, कंटाळा त्यांच्या अंगावर येण्याची शक्यता मंदावते आणि अधिक सर्जनशील होण्यासाठी कंटाळा गरजेचा असतो. "पण आपण कंटाळ्याला सोबत ठेवून घेतलं, तर आपलं मन भरकटायला लागतं आणि त्यातून आपण अधिक सर्जनशील होण्याची शक्यता असते," असं त्या म्हणतात.

सृजनशीलता

फोटो स्रोत, Caroline Topperman

परंतु, कंटाळ्याचीही कमाल मर्यादा असते, कारण अति कंटाळा झाला तर आपली ऊर्जा कमी होऊ शकते, असंही मान म्हणतात. सध्याच्या विलगीकरणातील एकांतामुळे काहींना कदाचित त्या कमाल मर्यादेपलीकडे ढकललं असावं.

उदाहरणार्थ, युनायटेड किंगडममधील ससेक्स इथे स्थायिक असलेल्या नेतृत्वगुणविषयक प्रशिक्षक, नाट्यदिग्दर्शिका व गायिका/गीतलेखिका डॅनी-लू कार या सर्जनशील स्फूर्तीसाठी आत्तापर्यंत प्रवासावर आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी लोकांना भेटण्यावर विसंबून राहिलेल्या आहेत.

जागतिक साथ उद्भवण्यापूर्वी कार स्वतः सर्जनशील काम करू शकत होत्या; कार्यक्रमाच्या ठिकाणी लोकांशी बोलून त्या स्फूर्ती मिळवायच्या आणि मग एकट्याने केलेल्या लांबच्या ट्रेन किंवा विमान प्रवासामध्ये त्या स्वतःच्या कल्पनांना आकार देत होत्या. परंतु, लॉकडाऊनच्या काळात एकांताचे दीर्घ कालावधी मोडून काढण्यासाठी स्फूर्तीचे क्षणच त्यांना मिळेनासे झाले, त्यामुळे कार यांना सर्जनशील काम करणं अवघड होऊन गेलं.

"विलगीकरणामध्ये एकांतात असताना डोक्याचं कामकाज बदलतं असं मला वाटतं. डोक्याला काही अवकाशच मिळेनासा होतो," असं त्या म्हणतात.

इतर लोकांशी जवळून काम केल्यामुळे मिळणारी स्फूर्तीही त्यांना आता उपलब्ध होईनाशी झाली आहे. जागतिक साथीपूर्वी त्या एका अल्बमसाठी रेकॉर्डिंग करत होत्या. "मी माझ्या निर्मात्यांना भेटत होते, आम्ही स्टुडिओमध्ये खेळीमेळीने काम करायचो. पण आता अचानक आम्हाला दुरून काम करावं लागतं आहे, त्यामुळे मला खूप रितं वाटतं आहे."

आपल्या कल्पना बोलून दाखवण्यासाठी समोर कुणी नसल्याची रुखरुख त्यांना जाणवते.

"तुम्ही कोणातरी सोबत असल्यावर जी एक वेगळीच किमया निर्माण होते, ती आपण गमावली आहे, असं मला वाटतं."

मान म्हणतात त्याप्रमाणे ज्या लोकांना त्यांचा "कंटाळ्याचा सुखकारक क्षण" साधता येतो, त्यांना दीर्घ काळ एकांतवासातही सर्जनशीलता जोपासणं अधिक शक्य होतं. छत्तीस वर्षीय कलाकार व मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्या केटी रुइझ यांना कोव्हिडमुळे बराच काळ त्यांच्या मूळ शहरात- सॅन दिआगो इथे राहणं भाग पडलं.

जागतिक साथीपूर्वी रुइझ सातत्याने प्रवासात असायच्या, अध्यापनापासून मुलं सांभाळण्यापर्यंत विविध जबाबदाऱ्या त्या पार पाडत असत- शिवाय त्यांचे कलाप्रकल्प सुरूच होते. त्यांच्या या व्यग्र जीवनक्रमातून त्यांना प्रचंड स्फूर्ती मिळत होती, पण या स्फूर्तीमधून सर्जनशील काम उभं करण्यासाठीचा वेळ वा मानसिक ऊर्जा त्यांना बहुतेकता सापडत नसे.

"अनेकदा माझ्या डोक्यात काही कल्पनांचे धुमारे फुटत असतात, पण त्यातून काही नवीन स्फुरण्यासाठी वेळ व विचार आवश्यक असतो," असं त्या म्हणतात.

एकटेपणा, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

जागतिक साथ सुरू झाल्यापासून रुइझ यांचं वर्ष कलात्मकदृष्ट्या अत्यंत उत्पादक ठरलं आहे. त्यांनी या काळात चाळीसहून अधिक चित्रं काढली व शिल्पं तयार केली.

"प्रामाणिकपणे सांगायचं तर मी साथीच्या काळात निर्माण करत असलेल्या गोष्टींबद्दल मी गेली सुमारे पाच वर्षं विचार करत आलेले आहे," असं त्या सांगतात.

"साथीपूर्वीच्या काळात मी प्रत्येक आर्ट-शोला व कार्यक्रमाला जाऊन स्वतःची सर्व ऊर्जा गमावत होते, असं मला वाटतं. त्यामुळे हा चांगला मोकळा वेळ मिळाला." पण साथीआधीच्या जगण्याच्या काही बाजूंची रुखरुख जाणवत असल्याचंही त्या म्हणतात.

"कला प्रदर्शनं पाहणं, मित्रमैत्रिणींना भेटणं आणि माझं सामाजिक जीवन परत मिळवणं, हे मला अर्थातच आवडेल."

नवीन प्रक्रियांचा शोध

या विचित्र काळात सर्जनशीलता मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असलेल्यांनी सर्जनशील प्रक्रियेचा पुन्हा विचार करायला हवा आणि उपयुक्त स्फूर्ती म्हणजे काय याचाही त्यांनी पुनर्विचार करायला हरकत नाही.

प्रत्यक्ष संवादाचा अभाव जाणवतो आहे, असं म्हणणाऱ्या कॉफमन यांन अशी शंका वाटते की, काही लोकांना सर्जनशीलता कमावता येत नाही, याचं एक कारण म्हणजे ते लोक "त्यांच्या सर्जनशील प्रक्रियेविषयी जुनाट मार्गांनी विचार करून त्यात अडकले आहेत."

लोकांनी "नवीन अनुभवां"चा अर्थ विस्तारण्याची गरज आहे, असं ते म्हणतात: "आपण घरात अडकून पडल्यामुळे काही अनुभवाचा खुलेपणा संपुष्टात येण्याची गरज नाही."

उदाहरणार्थ- रोजनिशी लिहिणं, सजग राहणं व ध्यानधारणा करणं असे नवीन 'आंतरिक अनुभव' उपलब्धच असतात. आपल्या भावनांच्या नोंदी ठेवल्याने सर्जनशीलतेच्या बाबतीत वाट मोकळी होते, असं कॉफमान म्हणतात.

एकटेपणा, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

ज्या लोकांच्या सर्जनशील प्रक्रियांमध्ये खासकरून इतरांचा प्रत्यक्ष सहभाग असतो, त्यांनी आंतरजालीय गटांमध्ये सहभागी व्हावं किंवा भिन्न रुची व कल्पना असलेल्या लोकांशी बोलावं, असं कॉफमन सुचवतात. अशी संभाषणं नियमितपणे होत असतील, तर "कोणत्या तरी क्षणी सर्जनशीलता बाहेर येणं अनिवार्य आहे," असं ते म्हणतात.

लोकांची 'चौकटीबाहेर विचार' करण्याची इच्छा असेल, तर सर्जनशीलताचा वापर करण्यासाठीच्या 'खऱ्याखुऱ्या संधी' उपलब्ध आहेत, असा कॉफमन यांना विश्वास वाटतो. जुने मार्ग आता व्यवहार्य नाहीत, हे स्वीकारणं कळीचं आहे, असं ते म्हणतात.

किंबहुना नवीन सर्जनशील प्रक्रिया प्रस्थापित करण्यातूनच टॉपरमान यांना पेचातून सुटता आलं. "मी दृश्यात्मक माणूस असल्यामुळेच विद्यापीठातून चित्रपट विषयात पदवी घेतली असं अचानक माझ्या ध्यानात आलं," असं त्या म्हणतात.

"अरे, माझीसुद्धा फोटोग्राफी चांगली आहे, हे माझ्या लक्षात आलं, आणि मी माझ्या फोनवर फोटो बघायला लागले."

प्रवासातील छायाचित्रांचा आधार घेऊन त्या नियमितपणे लिहायला लागल्या आणि अखेरीस एका जुन्या मैत्रिणीशी त्या पुन्हा जोडल्या गेल्या. आता एकत्रितरित्या त्यांनी टॉपरमान यांचं लेखन पुस्तक रूपात प्रसिद्ध करायचं ठरवलं आहे, त्या पुस्तकाचं संपादक त्यांची मैत्रीण करणार आहे. याच काळात टॉपरमान यांनी नियमितपणे चालायला सुरुवात केली, पायी फिरताना त्यांना स्वतःचं शहर जाणून घ्यायची संधी मिळाली. स्थानिक कलेसोबतच बर्फातील कोरीवकाम पाहिल्यामुळे त्यांना स्वतःच्या मनाला स्फूर्ती द्यायला व नवीन कल्पना निर्माण करायला मदत झाली.

दरम्यान, कार यांनी त्यांच्या निर्मात्यासोबत दीर्घ वेळ कॉफी पित संवाद साधला. त्यातून त्यांना एकाकीपणाशी लढायला मदत झाली आणि एकांतात सर्जनशील काम करण्यासंदर्भातील हताशेवरही मात करता आली. सर्जनशील होण्याचा दबाव झुगारून देणं सर्वांत मदतीचं ठरलं, असं कार व टॉपरमान दोघीही सांगतात. या प्रक्रियेमध्ये असं दबाव झुगारणं कळीचं ठरतं, याबद्दल तज्ज्ञ व सर्जनशील व्यक्ती दोघांचंही एकमत होतं. कार म्हणतात, "ते अंतिम उद्दिष्ट बाजूला ठेवलं, तर तुम्हाला काहीतरी सापडण्याची शक्यता असते."

"सर्जनशील असण्याबद्दल ताण बाळगणं महत्त्वाचं नाही," असं टॉपरमान म्हणतात. "मी स्वतःवर सक्ती करायला लागले की त्या क्षणी माझा मेंदू बंद होतो."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)